मायेचा पदर ( भाग १०)

रोजच्या कामाच्या व्यापातून थोडा चेंज म्हणून सगळेच जण आत्या बाईंच्या सांगण्यावरुन चार पाच दिवसासाठी गावी जाण्यासाठी तयार होतात.
कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नंदिनीने पुन्हा ऑफिस जॉईन केले. एक एक करत यशाची पायरी ती चढत होती. घरातील सर्वांचीच तिला त्यात मोलाची साथ लाभली होती. सारं काही सुख देवाच्या कृपेने अगदी भरभरुन मिळालं होतं नंदिनीला.
फक्त आता तिचा मायेचा पदर आतूर झाला होता तिचे आयुष्य परिपूर्ण करणाऱ्या त्या लहानग्या जीवाला  पाहण्यासाठी, त्याच्यावर मातृत्वरुपी प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी. घराच्या भिंतीही आता आतुर झाल्या होत्या लहानग्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी.

नंदिनी आणि निशांतच्या लग्नाला आता जवळपास तीन वर्षे उलटून गेली होती. नीरजच्या लग्नाची चर्चाही आता घरात जोर धरु लागली होती. नंदिनीचे देखील प्रमोशन होवून आता तिचा कामाचा लोडही खूपच वाढला होता.
निशांतही त्याच्या कामात इतका बिझी झाला होता की, दोघांनाही एकमेकांसोबत बोलायलाही जास्त वेळ मिळायचा नाही. त्यामुळे अधून मधून खटके उडायचे दोघांचे. पण पुन्हा चुकीची जाणीवही व्हायची दोघांनाही.

नीरजने देखील स्वत:चा दवाखाना टाकला होता. त्यामुळेच आता दोनाचे चार हात करण्याचा विचार घरचे करत होते.

घरासाठी, नात्यांसाठी आता वेळच नव्हता कोणाकडे. सुधाकरराव त्यांच्या समाजकार्यात बिझी होते. उतारवयात त्यांनी समाजकार्य हाती घेवून खूप समाधानी जीवन जगत होते ते. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, समाजातील निराधार लोकांना आधार म्हणून मदत मिळवून देणे, गरीब अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. ही आणि अशी अनेक कामे त्यांचा ग्रुप करत होता. पण त्यातून मिळणारे समाधान काही औरच.
सुलभा काकूंचीही त्यांना उत्तम साथ होती. नंदिनीदेखील तिच्या कामात व्यस्त. मुलांनाही आजकाल वेळ नसायचा त्यांच्यासाठी. पण या गोष्टीची त्यांनी कधीही तक्रार केली नाही. अधून मधून आत्याबाईंचे जाणे येणे देखील सुरुच असायचे.

खूप दिवसानंतर आत्याबाई जेव्हा आल्या तेव्हा घरातील वातावरण खूपच बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुले सकाळी लवकर घरातून बाहेर पडतात आणि रात्री उशिरा घरी येतात. त्यामुळे कोणाचाच कोणाशी जास्त संवाद होत नाही. त्यामुळे आत्याबाईंनी सर्वांनाच पाच सहा दिवसाची सक्तीची सुट्टी घ्यायला भाग पाडले.

रोजच्या रहाटगाड्यातून थोडासा तरी विसावा मिळावा सर्वांना यासाठी आत्याबाईंनी गावी लहान भावाकडे म्हणजेच मधुकररावांकडे जाण्याचे ठरवले होते. कितीतरी दिवसांनी सगळेच गावी जाणार होते. थोडे वातावरण बदलले की सगळेच जण फ्रेश होतील. आणि नात्यांनाही थोडा तरी वेळ देता येईल. असा विचार करुन सर्वांनी काहीही कारण न देता सुट्टी मंजूर करुन घेतली. तिकडून आल्यावर मग नीरजच्या लग्नाचेही पाहता येईल. असा सर्वांचा विचार पक्का झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्वजण गावी जायला निघाले. दोन अडीच तासांचा प्रवास होता. गाडी सुरु झाली.

" अरे सुधाकर मधूला फोन करुन सांग रे, आम्ही सगळे येतोय म्हणावं." आत्याबाईंनी फर्मान सोडले.

" अगं सांगायचे काय त्यात, सरप्राइजच देवू की सर्वांना."

"नको रे बाबा, त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल ही. पण आपल्या सुनांना धडकी भरायची आपल्या सर्वांना असे अचानक पाहून. पुन्हा म्हणायला नको त्यांनी, आम्हाला आधी सांगितलेही नाही म्हणून."
आत्याबाईंची पारखी नजर गावच्या दोन्ही सुनांना बरोबर ओळखून होती. शेवटी जुन्या माणसांचा अंदाज चुकायचा नाही कधी.

सुधाकररावांनी फोन लावला, "अरे दादा आम्ही येतोय आज सगळेच जण गावी. खूप दिवस झाले येणं झालंच नाही. आणि आक्का पण आलिये कालच. त्या निमित्ताने भेटही होईल सर्वांची आणि निवांत गप्पाही होतील."

"अरे वा.. या या आम्ही वाट पाहतोय. दुपारच्या जेवणालाच भेटू मग." मधुकरराव म्हणाले.

"अरे नको, जेवायला नाही येत. आक्काला औषधे घ्यावी लागतात. जेवायला जास्त उशीर करुन नाही चालणार. वाटेत खावू आम्ही काहीतरी. सुलभाने डबा पण आणलाय सोबत."

" बरं बरं. या मग सावकाश." एवढे बोलून फोन ठेवला.

तात्यांची धाकटी सून पल्लवी, जणू त्यांचे बोलणे ऐकण्यासाठीच तिथे थांबली असावी.

"तात्या कोण येणार आहे आपल्याकडे आज?" लागलीच  तिने प्रश्न केला.

"अगं गावावरुन सगळेच येताहेत. चार पाच दिवसासाठी."

"काय? असं अचानक? पण का?"

"अगं येणार असतील थोडा बदल हवा म्हणून. तसंही मागच्या दोन वर्षात कामाच्या व्यापात जमलेच नाही कोणालाही इकडे यायला."

पण पल्लवीला ही गोष्ट जास्त रुचलेली दिसत नव्हती. कारण सगळेच येणार म्हटल्यावर कामाचा व्याप वाढणार. पण कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक वृत्तीने पाहण्याची दोघी जावांची मानसिकताच नसते कधी. याचा आत्याबाईंना खूप वेळा अनुभव आला होता.
पल्लवीने लगेचच मोठ्या जावेला जावून ही बातमी सांगितली. तसे दोन्ही जावांचेही जास्त पटत होते असे नाही. पण अशावेळी मात्र दोघींचीही एकी होणार हे मात्र ठरलेले असायचे.

"अहो, ताई ऐकलं का, गावावरुन आज सगळेच जण येत आहेत इकडे."

"आता? पण असं मधेच कशाला येत आहेत? आणि तुला कुणी सांगितले हे?"

"अहो आताच फोन येवून गेला सुधाकर काकांचा. माझ्या समोरच बोलत होते तात्या आणि त्यांनीच सांगितले मला सगळे  निघालेत यायला म्हणून."

"म्हणजे झालं. आधीच कामं काय कमी होती त्यात आणखी भर. पण हे बघ आपण नाही नुसती कामं करत बसायची बरं. आणि सगळयांच्या पुढे पुढे तर बिलकुल नाही करायचं. तिकडे गेल्यावर पण आपणच सगळी कामं करा आणि इकडे आल्यावर पण आपणच करा. आराम म्हणून नाही जीवाला. त्यांनी मात्र मज्जा करायची सगळ्यांनी मिळून. आपण बसायचं धुणी, भांडी, स्वयंपाक करत. वरुन गुरा ढोरांची आणि शेतीची कामं आहेतच."

"नाहीतर काय. त्या नंदिनीला करु दे काय करायचं ते. कर म्हणावं तुझ्या माणसांचं तू. आपण बाजू बाजूनेच राहायचं. आणि तसंही कितीही काम केलं तरी आत्याबाईंच्या नजरेत नंदिनीला जो मान आहे तो आपल्याला थोडीच ना मिळणार आहे. तसे पाहिले तर त्यांनी सुनांमध्ये असा भेदभाव नाहीच करायला पाहिजे. त्यात आपल्या आई आणि तात्यांना सगळ्यांचं पुढं पुढं करायची हौसच आहे."

"मग काय. त्यांचीच साथ आहे त्यांना म्हणूनच तर हे सगळं घडतंय. बरं चल आवर पटकन्. सगळे पोहोचायच्या आत आहेत ती कामं तरी उरकली पाहिजेत. नाहीतर ते येतील तरी आपल्या गप्पा काही संपायच्या नाहीत.

दोघी जावा आज एक झाल्या होत्या. त्यांची ही खोड कोणाला माहिती असो वा नसो पण आत्याबाईंना बरोबर ठावूक होती. आणि ह्या दोघींच्या तुलनेत नंदिनी मात्र पूर्णपणे वेगळी होती. याचीही आत्याबाईंना कल्पना होतीच.

क्रमशः

आता गावच्या सुनांना वठणीवर आणण्यासाठी आत्याबाई नेमकी काय शक्कल लढवणार? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all