मायेचा पदर ( भाग ९)

घरातील आनंद टिकवण्यासाठी प्रत्येक नात्यात एकमेकांसाठी थोडा तरी वेळ आणि संवाद खूप गरजेचा असतो.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आज सामंतांच्या घरी सकाळ थोडी लवकरच झाली होती. नंदिनीचा ऑफिसचा पहिलाच दिवस. म्हणून मग ती नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठली होती. आवरुन, देवपूजा करुन तिने ऑफिसची तयारी केली.

तोवर सुलभा काकूंनी डब्यासाठी भाजी बनवली. पोळ्या तेवढ्या नंदिनीने केल्या. आधीच काकूंनी कणीक मळून ठेवली होती. डबा होईपर्यंत निशांतही आवरुन तयार झाला.

मुलं घराबाहेर पडायच्या आत आत्याबाई, नीलिमा आणि सगळेच उठले.

"आत्त्या तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना.? पण काल नेमकी मी बाहेर गेले त्यामुळे राहून गेलं. पण आज नक्की सांगा घरी आल्यावर." नंदिनी अजूनही विसरली नव्हती आत्या तिला काहीतरी सांगणार होत्या.

"हो ग नक्की सांगेल. पण किती हट्टी आहेस ग तू. एकवेळ मी विसरेल पण तू विसरुन देशील तर शपथ. इतक्या गडबडीत देखील आठवण करुन दिलीस."

" हो मग. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मलाही चैन नाही पडणार. अशी कोणती गोष्ट आहे जी मला ह्यांच्याकडून समजू शकली असती पण समजली नाही. आणि ती गोष्ट समजेपर्यंत हा विचार काही पिच्छा सोडणार नाही माझा."

नीलिमा म्हणजेच नंदिनीची नणंद, खुर्चीत बसून नंदिनी आणि आत्याच्या गप्पा ऐकत होती.
"खरंच हीच्यामुळे आणि आत्यामुळे आजही घराचे घरपण टिकून आहे. आत्या इथे असली की घरात आणि घरातील प्रत्येकात वेगळाच उत्साह संचारतो. देवा कोणाचीही दृष्ट न लागो या घराला. फक्त आता लवकरच ह्या घरात एखादा बाळकृष्ण खेळू दे." नीलिमा मनातच देवाची प्रार्थना करत होती.

आज पहिलाच दिवस होता नंदिनीचा ऑफिसचा. त्यामुळे तिची खूपच गडबड सुरु होती आणि बडबडही. तरीही घराबाहेर पडताना सगळ्यांचा आशिर्वाद घ्यायला विसरली नाही ती.

निशांत आणि नंदिनी दोघेही मग सोबतच ऑफिसला गेले.

"अगं सुलभा मी पण आता गावी जाईल म्हणते. बरेच दिवस झाले येवून." आत्याबाई म्हणाल्या.

"थांबा की आत्याबाई अजून काही दिवस."

"हो मी कायमची जरी इथेच राहिले तरी तुला काही फरक पडणार नाही. माझ्यासाठी काही नवीन नाहीये आता ते. मी जायचं म्हटलं की तू अजून दोन चार दिवस वाढवतेसच माझा मुक्काम."

"तुम्ही गेल्यावर घर रिकामं रिकामं वाटतं हो. त्यात नंदिनीची लुडबुड सुरु असायची मध्येमधे, पण तीही आता ऑफिसला जाणार रोजच. नीलिमा पण जाईल आज उद्या. घर खायला उठेल हो. चार पाच दिवस तरी थांबा ना. तुम्ही असल्या की खूप आधार वाटतो."

"झालं का पुन्हा तेच सुरु तुझं. असं ब्लॅकमेल करतेस की पुढे नाही म्हणायला जीभच रेटत नाही मग माझी."

"राहा हो दोन चार दिवस अजून."

"आई मी पण उद्या जाईल म्हणते. तिकडून हुकूम यायच्या आतच आपणहून  निघालेले बरे." नीलिमानेही पुन्हा सासरी जाण्याचा तिचा निर्णय आईला सांगितला.

"हो जा बाई. मी नीरजला सांगते तुला सोडायला." सुलभा काकुंनीही मग कुठलेही आढेवेढे न घेता लेकीला जाण्याची परवानगी दिली.

" बघ आत्या, तू जायचं म्हणते तरी तुला कशी राहा राहा म्हणते आई आणि मी जायचे म्हटल्यावर लगेच जा म्हणते ही."

"अगं बयो, तसं नाही ग. माझ्या लेकीला सासरी कुणी बोललेलं मला तरी नाही आवडणार. नाहीतर तुलाही आग्रह केला असताच की ग. आत्याबाई काय आणि तू काय, दोघीही या घरच्या लेकीच आहात ना. मग लेकिंमध्ये कुणी असा भेदभाव करतं का?"

दोन चार दिवस माहेरी राहून आता पुन्हा सासरी जाताना निलिमाच्याही जीवावर आले होते. पण जावं तर लागणारच होतं. नीलिमाची सासू जरा जास्तच कडक स्वभावाची होती. त्यामुळे नीलिमाला तिचा थोडा जास्तच धाक वाटत होता. इकडे आई आणि नंदिनीचे नाते पाहून तिला त्यांचा खूप हेवा वाटायचा. आणि म्हणूनच त्या दोघींचे नाते पाहून ती मनोमन सुखावत असे.

"नंदिनी खरंच किती नशीबवान आहे. आईसारखी सासू मिळायलादेखील भाग्यच लागतं. पण नंदिनीदेखील आपलेपणाने वागते सर्वांशी. जावू दे माझी सासू कशी का असेना, पण माझ्या आईला सून चांगली मिळाली हे महत्त्वाचं." नीलिमा मनातच विचार करत होती.

उद्या जायचे म्हणून नीलिमाने आजच सगळी तयारी करुन ठेवली होती. सारं आवरण्यातच मग तिचा दिवस गेला. चार आठ दिवस राहून लेक पुन्हा सासरी जाणार या विचारानेच सुलभा काकू हळव्या आल्या.

सायंकाळी ऑफिस सुटल्यावर नंदिनी आणि निशांत दोघेही मग सोबतच घरी आले. आज पहिलाच दिवस त्यामुळे नंदिनी थोडी थकल्यासारखी दिसत होती.

"काय मग कसा होता ऑफिसचा पहिला दिवस?" आत्याबाईंनी आल्या आल्या तिला प्रश्न केला.

"छान होता पण मधल्या काळात आरामाची सवय झाली होती त्यामुळे रुटीन बसायला आणखी दोन तीन दिवस तरी लागतील."

"बरं आत्या सांगा ना, काय सांगणार होतात ते?" टेबलावर पर्स सरकवत नंदिनीने पुन्हा आत्याला आठवण करुन दिली.

"अगं आधी फ्रेश तर हो. मग सांगते पण त्याआधी तुझ्या हातचा चहा प्यावासा वाटतोय. बनवतेस?"

"अगं तू जा फ्रेश हो. मी बनवते चहा."सासूने सुनेची बाजू घेवून चहा करण्याची तयारी दर्शवली.

" राहू द्या ओ आई, बसा तुम्ही. बनवते मी."

"ये सुलभे, ती म्हणतिये ना ती बनवते म्हणून, मग कशाला एवढं पुढे पुढे करतेस सुनेचं? नाहीतरी सवयच आहे तुला तशी."

"अहो आत्याबाई, दमली असेल ओ ती म्हणून म्हटलं बाकी काही नाही."

"आणि तू, दिवसभर झोपली होतीस का? जसं जसं वय होत चाललंय तशी जास्तच तरुण होत चाललीयेस. बस इथे. दोन तीन दिवसांत जाणार आहे मी पण. जरा माझ्याशी पण गप्पा मार थोड्या."

" बरं बाई बसले. बोला आता."

"हे बघ मी गेल्यावर आजुबाजूच्या बायकांना विनाकारण जास्त वेळ घरात थांबवून घेवू नकोस. शेजारी पाजारी खूप रिकामटेकडे लोक आहेत. मी इथे आहे तोपर्यंत नाही फिरकणार इकडे. मी जावू दे की, लगेच येतील नसत्या चौकशा करायला. आणि त्यातल्या त्यात नंदिनी आणि निशांतच्या आनंदाच्या बातमीसाठी कान तरसले असतीलच त्यांचे. म्हणून म्हणते अशा  लोकांच्या प्रश्नांना जास्त उत्तरं द्यायची नाहीत. आणि तसंही कोणाचं बरं झालेलं देखवत नाही अशा लोकांना. म्हणून तर नको त्याच विषयावर चर्चा करुन आनंद घेत असतात ते. आणि म्हणूनच अशा लोकांपासून थोडं दूरच राहा."

"हो आत्याबाई. पण मला नाही ओ कोणाला तोडून बोलता येत. म्हणूनच मी अडकते ह्या लोकांच्या बोलण्यात."

"नसेल जमत तर शिकून घे आता. नशिबाने सून चांगली मिळाली तुला. त्या गावच्या सूनांसारखी असती तर काय झाले असते तुझे काय माहित?"

" हो ना."

तेवढ्यात नंदिनी चहा घेवून आली. "घ्या आत्या, आई तुम्ही पण घ्या. थांबा हा बाबांना  देवून येते आधी.

"काही नको, इकडेच बोलाव सर्वांना, अरे निदान घरात असताना तरी एकत्र येवून चहा, नाश्ता, जेवण करत जा. त्या निमित्ताने तरी एकमेकांना वेळ देणं होईल. ह्या सूचना मी गावी गेल्यावर सुध्धा पाळल्या गेल्याच पाहिजेत. हे ध्यानात ठेवा सर्वांनी." आत्याबाई पुढील गोष्टींचा विचार करुन बोलत होत्या.

आत्याबाईंनी फर्मान सोडले आणि सगळेच जण सायंकाळच्या चहासाठी एकत्र जमले.

"आत्या आतातरी सांगा ना आमच्या लग्नाची वेगळी काय कहाणी आहे ते?" नंदिनी ने आत्याबाईंचा चांगलाच पिच्छा पुरवला होता.

"अगं बाई ही मुलगी काही ऐकायची नाही. बरं ये बस सांगते.
अगं ह्या पठ्ठ्याने एकाच वेळी दोन मुली पसंत केल्या होत्या लग्नासाठी.  एक म्हणजे  तू आणि आणखी एक, तिचं नाव सायली. आणि विशेष म्हणजे आधी मुलींपासून दूर पळणारा तुझा हा नवरा चक्क फोटो पाहताच दोघींच्याही  प्रेमातच पडला. आता नक्की कोणाला हो म्हणावं हा मोठा प्रश्न होता त्याच्यासमोर. आणि हा निर्णय त्याचा त्याने घ्यायचा होता. पण महाराज काही निर्णयापर्यंत पोहोचेनात. शेवटी मग नीरजने त्याला मदत केली  तुझी निवड करण्यात."

"आत्या अगं बस झालं ना. हिला काही सांगू नको बरं तू. तिला माझी खेचण्याची आयती संधीच देते आहेस तू."

"आत्या तुम्ही सांगा, त्यांच्याकडे नका लक्ष देवू. मग पुढे काय झालं?"

"आम्हाला तर तुला यातील काहीही सांगायचे नाही म्हणून सक्त ताकीत दिली होती साहेबांनी." सुलभा काकूनींही न राहवून मनातील गोष्टी बोलून टाकल्या.

"काय अगं आई, आता तू पण?"

त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आत्याबाईंनी पुन्हा सांगायला सुरुवात केली."अगं पुढे काय होणार, मला नंदिनी माझी वहिनी झालेली आवडेल, आणि सायली-निशांतपेक्षा नंदिनी-निशांत ही जोडी भारदस्त वाटते. असे म्हटल्याबरोबर नंदिनीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आणि इतक्या वेळापासून नंदिनी आणि सायलीवर अडकलेली गाडी अखेर पुढे सरकली."

आता निशांतला तर कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असेच झाले.

" अच्छा, असं आहे होय. म्हणजे मी ह्यांच्यामुळे नाही तर भावोजींच्या कृपेमुळे आज या घरात आहे तर."

" आत्या काय ग तू पण, लावलीस ना आता आग. आता उठता बसता टोमणे ऐकावे लागतील मला."

"अरे जास्त लोड नाही घ्यायचा, लग्नानंतर सर्वच पुरुषांना हे करावेच लागते नाहीतर त्यांचे काही खरे नसते. शेवटी अनुभवाचे बोल रे बाबा." सुधाकरराव सुलभा काकूंकडे तिरपी नजर करत खोचकपणे बोलले.

पण खरंच, त्या प्रसंगामुळे घरातील वातावरणच बदलून गेले. रोज अशा छोट छोट्या प्रसंगांमुळेच घरातील वातावरण आनंददायी होते. त्यामुळे असं रोज एकदा तरी घरातील प्रत्येकाने एकत्र करुन रोजच्या त्याच त्या पणातून  बाहेर पडायला हवं. त्यामुळे घरातील वातावरणही हलकं फुलकं होतं आणि घरात एक प्रकारची सकारात्मकता टिकून राहते.

क्रमशः

नात्यातील हा गोडवा असाच अनुभवण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all