मायेचा पदर ( भाग ८)

घरात बसून नको ते विचार डोक्यात येण्यापेक्षा नंदिनीने पुन्हा ऑफिस जॉईन करण्याचा घेतलेला निर्णय निशांतलाही पटला. आणि मग तिच्याच वर्गमित्राच्या कंपनीत नंदिनीला जॉबदेखील मिळाला.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

"अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे." नंदिनी

"बोल की मग वाट कोणाची बघतेस." निशांत

"आता मी कशाला वाट पाहू कोणाची?" नंदिनी

" बोल ग बाई, बोल. गंमत करत होतो. आवडतं मला तुझी खेचायला." मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेल्या निशांतचे अर्धे लक्ष नंदिनीकडे आणि अर्धे मोबाईलकडे होते.

" हो का? पण त्यासाठी तुमचे लक्ष तर असायला हवे ना." नंदिनी थोडी रागातच बोलली

"कोण म्हणतं माझं लक्ष नाही.?" निशांतही मग मोबाईल मधून थोडं वर डोकं काढत, लक्ष आहे असं भासवतच बोलला

"तो मोबाइल ठेवा बरं आधी बाजूला. तुम्ही सगळे पुरुष ह्या बाबतीत सारखेच. बाबाही असंच करत असतात आईंना. तेव्हा त्यांचीही मग अशीच चिडचिड होते. आणि मग पुन्हा तुम्ही लोक बोलायला तयारच, ह्या बायका उगीचच चिडतात म्हणून. उगीच चिडायला आम्हाला काय वेड लागलंय का हो?"

"बरं बाई, हे घे ठेवला मोबाईल बाजूला. नको आता चीडूस, बोल ऐकतोय मी."

"अहो मी ऑनलाईन एका कंपनीत अप्लाय केलंय नोकरीसाठी. उद्या प्रत्यक्ष जावून भेटेन म्हणते त्यांना. पुन्हा ऑफीस जॉईन करण्याचा विचार सुरु आहे माझा."

"अरे वा, छानच की. जावून ये मग उद्या."

" हो ना, कंटाळा आला ओ घरात बसून आता. आयुष्य भलत्याच दिशेने धावायला लागलंय. मग उगीच रिकामा वेळ घालवण्यात काय अर्थ आहे. आजूबाजूच्या लोकांचा सततचा एकच प्रश्न, कधी घेताय मनावर? द्या लवकर आनंदाची बातमी. आता त्यांना काय बोलणार ना? त्यापेक्षा वेळीच घराबाहेर पडलेलं बरं."

" चालेल, जा तू उद्या. बघ काय होतंय."

"उद्या सोबतच जावू आपण. तुमच्या ऑफिसच्या रस्त्यातच आहे ही कंपनी. जाता जाता प्लीज मला ड्रॉप कराल?"

"अजिबात नाही. मला वेळ नाही तेव्हढा."

"हो का. बरं जाईन मी माझी."

"अगं पण काय विचारतियेस तू? हा प्रश्न झाला का नंदिनी? सोडेल मी, डोन्ट वरी."

दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि निशांत दोघेही मग सोबतच घराबाहेर पडले. जात असताना सिग्नलला एका ठिकाणी गाडी थांबली. अचानक एक बाई कडेवर एक लहान मूल घेवून प्रत्येक गाडीच्या जवळ जावून पैसे किंवा काहीतरी खायला मागत असल्याचे नंदिनीच्या दृष्टीस पडली. कडेवर एक आणि हातात एक अशी दोन मुले होती तिच्याकडे. अंगात कळकटलेले कपडे, केस अस्ताव्यस्त विखुरलेले, कितीतरी दिवस आंघोळ नाही की केसांना कंगवा देखील केलेला नसेल. अशी काहीशी त्यांची अवस्था. नंदिनी बारकाईने दुरुनच त्यांचे निरीक्षण करत होती. तेवढ्यात सिग्नल सुटला.

"काय ग? काय झालं?" नंदिनीला अचानक शांत झालेले पाहून निशांत बोलला

"अहो पाहा ना, कसं असतं ना आयुष्य. आपल्याकडे आज सगळं काही आहे. पैसा, घर, गाडी, प्रेमाची माणसं पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आपण बाळासाठी झुरत आहोत.  आणि दुसरीकडे सिग्नलवर भीक मागणारी ही लोकं. पोटासाठी काय काय करावं लागतं ना ह्यांना? त्यात लहान लहान मुलं सोबत. कसं भरत असतील पोट? देवच जाणे. पण अशा लोकांना एक नाही, दोन नाही तर चार -चार पाच- पाच मुलं. ज्यांचे दोन वेळच्या जेवणाचे वांदे त्यांच्याकडे पाहा संतती सुख आणि आपल्याकडे सारं काही आहे तर आपल्या नशिबात अजूनतरी संतती सुख नाही."

"अगं यालाच तर आयुष्य म्हणायचं नंदिनी ."

"समाजात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत तिथे दातच नाहीत."

आज कितीतरी दिवसांनी नंदिनी कामानिमित्त घराबाहेर पडली होती. पण बाहेर आल्यावर देखील ती जुन्याच विचारांत अडकली होती.
बोलता बोलता कधी कंपनी आली ते दोघांनाही समजलेच नाही. नंदिनीला ड्रॉप करुन निशांत त्याच्या कामासाठी पुढे गेला.

इंटरव्ह्यूसाठी लोकांची गर्दी जमली होती. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर नंदिनीचा नंबर आला. ती आत जायला निघाली.
" मे आय कम इन सर..?"

"येस कम इन. अरे नंदिनी तू. कशी आहेस? किती दिवसांनी भेटतियेस. ये ना ये बस."
नंदिनीचा वर्गमित्र सलील देशपांडे होता समोर. नंदिनीला पाहून त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. त्याला समोर पाहून नंदिनी देखील थोडी रिलॅक्स झाली. टेन्शन कुठच्या कुठे पळाले तिचे.

"बरं आधी मी इंटरवह्यू देते मग आपण बोलूयात. चालेल?"

"तुझा इंटरव्ह्यू मी घेवू? वेड लागलं की काय मला?"

वर्गातील एक आदर्श विद्यार्थिनी. आमच्या समोरील आदर्श तू. जिच्यामुळे संपूर्ण वर्गाला बोलणे खावे लागायचे.
साठे सरांचे एक वाक्य आजही आठवतंय, घ्या जरा, नंदिनीचा आदर्श घ्या. सगळ्याच बाबतीत अगदी परफेक्ट काम आहे तिचं. आठवलं तरी मनात तुझ्याविषयी अजूनही दरारा निर्माण होतो बघ."

"असं काहीच नाहीये  बरं. आता तुम्ही तर आमच्याही पुढे निघून गेलात की. बघ आज तू माझा इंटरव्ह्यू घेणार आहेस."

"नाही नाही. ते नाही जमणार मला. तुझ्या इंटरव्ह्यूची मला तरी गरज पण वाटत नाही आणि तसंही तुझ्यासारख्या  हुशार एम्प्लॉयीची गरज आहे आमच्या कंपनीला. तू  तुझा बेस्टच देणार यांत मला तरी कुठलीच शंका वाटत नाही. तरी पण तू म्हणतेस म्हणून फॉर्मलिटी म्हणून एकदोन प्रश्न विचारतो.

"आधीची कंपनी सोडण्याचे कारण काय?" सलील

"अंतर खूपच होते. त्यामुळे येण्या जाण्यातच वेळ जायचा. लग्नानंतर प्रत्येक मुलीवर अनेक जबाबदाऱ्या असतात. आणि त्या पूर्ण करणे ही तिची जबाबदारी नाहीये का? म्हणून मग लग्नानंतर काही दिवस ब्रेक घेतला आणि आता पुन्हा ऑफिस जॉईन करण्याचा विचार मनात आला." नंदिनी

"तसंही तुझ्यासाठी थोडीच ना काही अवघड आहे. क्षणात साऱ्यांना आपलंसं करण्याची तुझी सवय तर खरंच भावते मनाला. आणि कामातील परफेक्टनेसपणा तो तर आधीपासूनच ठासून भरलाय तुझ्यात."

आज सलिलला किती बोलू नि कित्ती नाही असेच झाले होते.

"बरं तुझ्याविषयी पण सांग काहीतरी." नंदिनी म्हणाली

"माझं काय ग, इंजिनिअरिंगनंतर प्लेसमेंट थ्रू जॉब मिळाला. पुण्यातीलच एका कंपनीत जॉब केला काही दिवस. त्यानंतर वडिलांनी स्वतःची कंपनी उभारली. आणि सगळा व्याप माझ्या खांद्यावर सोपवून ते निश्चिंत झाले. आणि आज हा मी तुझ्यासमोर असा आहे."
"पण आज खरंच खूप छान वाटतंय. त्यावेळी केलेल्या कष्टाचे आज चीज झाले. याचे समाधान खूप वेगळे."

"लग्न वगैरे काही केलं की नाही.?" नंदिनीने गमतीशीर सुरात विचारले.

"हो हो, मी कितीही नाही म्हटलं तरी घरचे थोडीच ऐकतात. त्यांनी जबरदस्ती बसवलंच घोड्यावर. तीन वर्ष होतील आता लग्नाला."

"अरे वा, भारीच की मग."

" हो, म्हणजे तुझ्याइतकी सुंदर नाही माझी बायको पण वाईटही नाही ग. खूप समजून घेते मला. म्हणून तर आज इथे आरामात बसू शकतो मी. हो पण एक गोंडस अशी परी दिलीये  तिने मला गिफ्टमधे लाइफटाईम."

" म्हणजे?" आश्चर्यकारकरित्या नंदिनीने प्रश्न केला.

" अगं म्हणजे दीड वर्षांच्या लेकीचा बाप आहे ग मी."

"नशीबवान आहेस बाबा तू, देवाने लेकीचा बाप होण्याची संधी तुला दिली."

"ते तर आहेच पण म्हणजे मग तुमच्याकडे काय बेबी बॉय का?"विषय निघाला म्हणून सलिलने देखील तिला प्रश्न केला.

"नाही रे आमच्याकडे काही नाही अजून."थोडी नजर चोरतच नंदिनी उत्तरली.

"नाही तू लग्नानंतर काही दिवस ब्रेक घेतलास म्हणाली म्हणून विचारलं."

"बरं चला, बाहेर अजून खूप लोक ताटकळत आहेत. माझ्यामुळे त्यांना नको त्रास." टेबलवरील फाईल सावरत नंदिनी उठण्याच्या तयारीतच होती.

"अगं थांब, सॉरी हा. चहा कॉफी काही विचारलेच नाही तुला मी."

"मी आज इथे तुझी मैत्रीण म्हणून नाही तर एक एम्प्लॉयी म्हणून आलीये सलील. चहा कॉफी वगैरे घेवू पुन्हा कधीतरी."

"ओके, चालेल मग. उद्यापासून कर कंपनी जॉईन. आज तुझ्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन कमी झालं बघ. नाहीतर एवढ्या लोकांमधून दोन लोक सिलेक्ट करणं सोप्पं नाही."

"बरं उद्या येईल मी वेळेत."नंदिनी

"ओके बाय सी यू टुमारो  अँड काँग्रॅच्युलेशन्स फॉर युवर न्यू अचिव्हमेंट."

"थँक्यू यू सो मच. आज तुझ्यामुळे इतक्या सहजासहजी ही नोकरी मिळाली मला. वन्स अगेन थँक्यू सलिल."

"बस ग किती वेळा थँक्यू म्हणशील आता? तुझ्यासारख्या एम्प्लॉइला रिजेक्ट करण्याची चूक मी करुच शकत नाही."

हसतच मग नंदिनी केबिन बाहेर पडली. बाहेर आल्या आल्या तिने सर्वात आधी निशांतला फोन करुन ही आनंदाची बातमी सांगितली. त्यालाही खूपच आनंद झाला.

घरी आल्यावर सासू सासरे, आत्याबाई, निलिमा सर्वांना जेव्हा ही आनंदाची बातमी समजली तेव्हा सर्वांनीच नंदीनीचे खूप कौतुक वाटले.

पण तरीही सकाळी सिग्नलवर दोन लहान मुले घेवून  भीक मागणारी ती महिला, काही केल्या नंदिनीच्या डोक्यातून जाईना. त्यातच आपल्या सोबतचे जवळपास सर्वचजण आज आपल्याही पुढे निघून गेलेत आणि आपण मात्र आधी साऱ्यांच्या पुढे असूनही आज मात्र मागेच राहिलो याची सल तिच्या मनाला बोचत होती.

क्रमशः

मूल नसण्याचे दुःख घराबाहेर पडल्यावर तरी विसरु शकेल का नंदिनी? घरच्यांची अशीच साथ तिला शेवटपर्यंत मिळेल का? जाणून घेण्यासाठी वाचा "मायेचा पदर" पुढील भाग.

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all