मायेचा पदर (भाग ७)

नंदिनीने आता पुन्हा ऑफिस जॉईन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला घरातील सर्वांनीच मोठ्या मनाने सहमती दर्शवली.
कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

सामंतांच्या घरी सत्यनारायण आणि कुलदेवतेची पूजा विधीवत संपन्न झाली. आत्याबाईंच्या शब्दाचा मान राखत सुधाकरराव आणि सुलभा ताईंनी जरी नंदिनी आणि निशांतसाठी ही पूजा केली असली तरी त्यातून त्यांना खूप मोठे समाधान लाभले होते. कारण काही का असेना पण आपल्या हातून देवाची सेवा घडणं हेही काही कमी नाही.

पुजेमुळे घरातील वातावरण अगदीच प्रसन्न झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावाकडची सर्व मंडळी गावी रवाना झाली. आत्याबाईंच्या मुलीदेखील त्यांच्या सासरी जायला निघाल्या. निशांतची बहीण निलिमा तेवढी आणखी दोन दिवस थांबणार होती माहेरी. नणंदेच्या मुलांमधे खूपच रमली होती नंदिनी. मुलेही मामी मामी करत तिच्या मागे मागे फिरायची. लेकरांच्या किलबिलाटाने घर आनंदाने गजबजून गेले होते.

खरंच लेकरांशिवाय कोणत्याच घराला घरपण नाही. याची जाणीव नंदिनीला झाली. पण आपल्या नशिबात ते सुख कधी येणार? की येणारच नाही? पण असा विचार तरी किती दिवस करत राहणार? सारखे घरात राहीले की असे विचार काही डोक्यातून जाणार नाहीत. त्यापेक्षा घराबाहेर पडलेलेच बरे. नंदिनी पुन्हा ऑफिस जॉईन करण्याचा विचार करत होती. तिने सुलभा काकूंना तिच्या मनातील विचार बोलून दाखवला.

"आई तुमची काही हरकत नसेल तर मी पुन्हा ऑफिस जॉईन करु का ओ?"

"अगं, असं का विचारतियेस? तुला मी नाही म्हणणार आहे का? आणि मी तर याआधीच सांगितले आहे, तुला कधीही पुन्हा ऑफिस जॉईन करावेसे वाटले तर नक्की विचार कर. तसंही घरात राहिलं की तेच तेच नकारात्मक विचार येत राहतात डोक्यात. त्यापेक्षा तु घेतलेला निर्णय अगदीच योग्य आहे. तुला हवं तेव्हा तू ऑफिस जॉईन कर. मी आहे नेहमी तुझ्यासोबत. काळजी नको करुस."
आणि एक, जग काय म्हणेल? माझ्याच बाबतीत असं का?माझ्याच बाबतीत मातृत्व सुख का नाही? हे आणि असे अनेक प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण आता सध्या तरी सगळी चिंता त्या वरच्या परमेश्वरावर सोडायची आणि आपण निश्चिंत राहायचं? कारण काहीही झालं तरी कोणीच कोणाचे नशीब बदलवू शकत नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतातच मुळी. आणि तसंही देवाला तर खूप मानतेस ना तू. त्यालाही कळतातच ग भक्ताच्या मनातील भावना. फक्त आपली परीक्षा सुरु आहे असं समजून तिला सामोरं जायचं. बघ एक ना एक दिवस त्यालाही प्रसन्न व्हावेच लागेल."

"आई किती समजून घेता ओ मला. आणि कित्ती छान समजून पण सांगता. तुमच्यासोबत बोललं की खूप हलकं वाटतं. मनाला मग वेगळेच समाधान भेटते."

"आज समाजात  जवळपास नव्वद ते पंच्यान्नव टक्के घरात सासू सून वाद पाहायला मिळतो. आणि त्याचे एकच कारण ते म्हणजे दोन पिढ्यांतील अंतर आणि विचारांतील तफावत. कोणीच माघार घ्यायला तयार होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही ताणली जाते आणि मग एक ना एक दिवस ताणले की तुटणारच हेही काही चुकीचे नाही. पण मी मात्र त्याबाबतीत स्वतःला खूपच भाग्यवान समजते. तुमच्या जागी दुसरी एखादी सासू असती तर एव्हाना नातवंडासाठी सुनेला वेठीस धरले असते. मूल होत नाही म्हणून तिचा मानसिक छळ केला असता. पण माझ्या सासूबाईंसारखी सासू प्रत्येक सुनेला मिळाली तर कित्ती छान होईल सगळं."

"हो पण त्यासाठी सूनेनेही तितकेच समजूतदार असायला हवे बरं का. अन्यथा हे नाते असे आहे ना की जे एकदा गैरसमजांनी ग्रासले की मग पुन्हा कधीच एक होवू शकत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तितकाच विश्वास आणि समजूतदारपणा अपेक्षित आहे."

" हो आई अगदी खरं आहे हे. आणि मला तरी वाटतंय की तो आपल्या नात्यात आहे आणि यापुढेही तो टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करुयात."

"हो ग. बरं चल निलिमा म्हणेल ह्या सासू सुना रोज सोबत असतात तरी त्यांच्या गप्पा काही संपत नाहीत. म्हणेल आम्ही दोन दिवस येतो पण आमच्याशी बोलायलाही वेळ नसतो ह्यांना. उगीच चिडचिड करत बसायची ती."

"हो आई चला."

"काय मग झाल्या का सासू सुनेच्या गप्पा? झाल्या असतील तर आमच्याकडेही थोडे लक्ष असू द्या."
निलिमाने नाही पण आत्याबाईंनी मात्र दोघींना हटकले. तुमच्या सारख्या सासू सुना जगात शोधून सापडायच्या नाहीत.

"तुम्हाला काही हवंय का आत्याबाई?"

"नाही ग मला नको, तुझ्या लेकीला काय हवंय बघ जा जरा. काही सापडत नाही तिला तुमच्या घरात. केव्हाची शोधतीये ती तुला."

" अरे हो का, आलेच हा मी" म्हणत सुलभा काकू धावतच गेल्या.

"काय मग नंदिनी कसं वाटतंय मग आज. छान झाली ना कालची पूजा? घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालं बघ ."आत्याबाई म्हणाल्या

"हो ना आत्या. छानच झाली कालची पूजा."

"बरं काय सुरु होतं दोघी सासू सुनांचे गुळपीठ? माझ्याबद्दल काही बोलत होतात की काय?"

" काहीही काय आत्या, तुमच्याबद्दल कशाला काय बोलू आम्ही."

"मग केव्हाच्या गप्पा सुरु होत्या. माझं लक्ष होतं बरं का खिडकीतून."

"ते आत्या मी पुन्हा ऑफिस जॉईन करायचं म्हणतीये. तेच सांगत होते आईंना."

"हे एक बरं केलंस. घरी असलं की उगीच मनात नको ते विचार येत राहतात. त्यापेक्षा चार माणसांमध्ये गेल्यावर आपोआपच फ्रेश राहतं माणूस. आणि सुलभाचं काही नाही ग. खूप मायाळू आहे ती. सगळ्यांना समजून घेते. कोणत्याच बाईला नणंदेने तिच्या संसारात लुडबुड केलेली आवडायची नाही, पण मी मात्र हक्काने तिची आणि सुधाकरची कानउघडणी करत असते वरचेवर. पण दोघेही ना नेहमी तोंडात साखरच घेवून फिरतात जणू. कधी म्हणून उलट उत्तर देत नाहीत मला. आत्याबाई असं, आत्याबाई तसं. सारखं सुरु असतं तिचं.अगदी तोंड भरुन आवाज देते. मलाही आवडतं तिच्याकडून लाड करुन घ्यायला. कितीही राग आला तरी सुलभाने नुसतं "आत्याबाई" म्हटलं की राग कुठच्या कुठे पळून जातो ते कळतच नाही.
आई आप्पांनंतर सुलभाने आणि सुधाकरने त्यांची जागा घेतली बघ. पण माझा शब्द खाली पडून देत नाहीत दोघेही. खूप मानतात मला. आज सुलभा आहे म्हणून मी या घरात केव्हाही येवू शकते आणि कितीही दिवस राहू शकते. आईच्या माघारी लहान असूनही सुलभाच माझी आई झाली. तिच्या मायेच्या पदराखाली साऱ्यांना तिने आपलंसं करुन ठेवलंय. प्रत्येक नातं अगदी मनापासून जपते. कोणामध्ये तिला वाईट काही दिसतच नाही. आणि तिच्या ह्याच गुणामुळे साऱ्यांच्या मनात घर करुन जाते ती." आज आत्याबाईंना भावजयीबद्दल बोलताना शब्दही कमी पडत होते.

"मीही हे सारे अनुभवते आहे आत्या. या घरात माझी खरी ताकद म्हणजे आई आहेत. सून म्हणून मला कधी वागवलंच नाही ओ त्यांनी. लेकीप्रमाणेच जीव लावतात मला. मनमोकळेपणाने गप्पा मारतात. मनातील सारं आईंना सांगावसं वाटतं. आनंद, दुःख सारं काही. खरंच मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तर मला आईंसारखी सासू मिळाली."

"हो मग ते तर आहेच. पण तुझं सून म्हणून या घरात येणं यामागे खूप मोठी कहाणी आहे बरं. पण सांगेल केव्हातरी."

"केव्हातरी काय आत्या,आताच सांगा ना. मलाही नक्कीच आवडेल ऐकायला. अगं आता अशाच गप्पा सुरु ठेवल्या ना तर सगळी कामं सुलभावर एकटीवर पडतील ग. आणि ती काही तिच्या सुनेला साधा आवाज पण द्यायची नाही की ये बाई मदतीला म्हणून."

"सॉरी आत्या, पण खरंच माझ्या लक्षातच नाही आले ते. पण मला नक्की सांगा आमच्या लग्नामागची खरी कहाणी."

"हो, नक्की सांगेल. पण एक सांगते नंदिनी तुला, सासू सासर्यांना कधीही दुखावू नकोस हा. देवमाणसं आहेत ग दोघेही. शेवटपर्यंत अशीच खंबीरपणे उभी राहा त्यांच्या पाठीशी. एकमेकांची खरी ताकद बनून संसाराचा हा गाडा असाच पुढे ने. ह्या कुटुंबाची खरी ताकद आता तू आहेस आता."

नंदिनीने देखील आत्याबाईंच्या हातात हात देत विश्वासाची हमी दिली.
"तुम्ही काहीच काळजी करु नका आत्या. तुमचा हा विश्वास मी कधीच तोडणार नाही."

आज पहिल्यांदा आत्याबाई आणि नंदिनीमध्ये एवढे संभाषण झाले असेल. नकळतपणे आत्याबाईंच्या मनात घर केले होते नंदिनीने. म्हणून तर आज इतक्या गप्पा रंगल्या दोघींच्याही. आणि नंदिनी होतीच तशी अगदी काही क्षणातच सगळ्यांचे मन जिंकणारी.

क्रमशः

दिवसागणिक फुलत असलेला नात्यातील हा गोडवा अनुभवण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all