मायेचा पदर ( भाग ६)

आज सामंतांचे घर गोकुळासारखे गजबजत होते. सत्यनारायण पूजेसाठी नात्यातील सर्वच जमले होते. सगळ्या चील्या पिल्यांमध्ये नंदिनी स्वतःचा आनंद शोधत होती.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


"अरे अरे थांब, पडशील."
छोट्या नीलच्या मागे धावत जावून नंदिनीने त्याला पकडले.

"ये आऊट." म्हणत तिने त्याला कडेवर उचलून घेतले. आणि त्याची गोड गोड पापीदेखील घेतली.

"कोणाला चॉकी पाहिजे? माझ्याकडे हे एवढं मोठ्ठं चॉकी आहे बरं का."

"मामी मला, मामी मला.."  म्हणत नीलने सुरच लावला.

" चला, चला ज्याला ज्याला चॉकलेट पाहिजे त्यांनी या बरं पटकन् माझ्याकडे."
काकी आम्हाला पण, आम्हाला पण म्हणत सारी चिली पिली नंदिनीच्या अवतीभोवती गोळा झाली.

आज सामंतांचे घर गोकुळासारखे गजबजत होते. उद्या असलेल्या सत्यनारायण पूजेसाठी नात्यातील सर्व जमले होते. एरव्ही घराला पाच ते सहा जणांचीच सवय पण आज मात्र निशांतचे काका काकू, त्यांची मुले, नातवंडं, बहीण नीलिमा, तिची छोटीशी दोन पिटुकली, निशांतची मावशी, आत्याबाईंच्या दोन्ही मुली असा सारा गोतावळा जमला होता. घर कसे अगदी गजबजत होते.

नणंद नीलिमा हिची दोन मुले, जाऊ पुनम आणि पल्लवी यांची मिळून तीन मुले, आत्याबाईंची चार नातवंडे(मुलींची मुले) अशी एकूण आठ मुले, या साऱ्यांची जबाबदारी आज एकट्या नंदिनीवर होती. मुलेही कोणी मामी तर कोणी काकी काकी करत नंदिनीच्या मागे पुढे करत होती.

त्यात काही वेळातच नंदिनीचा मुलांना लागलेला लळा पाहून सारेच आश्चर्यचकित झाले.

"काय ग वहिनी, लग्नाआधी काय पाळणाघरात जॉब करत होतीस का काय तू?" नेहमीच्या सवयीप्रमाणे नीरजने नंदिनीची खेचायला सुरुवात केली.

हे एवढे कार्टून एकत्र आल्यावर संपूर्ण घर उध्वस्त करतात एरव्ही. आणि त्यात ही सगळी गँग येणार म्हटल्यावर मला आधीच माझ्या सगळ्या वस्तू लपवून ठेवाव्या लागतात. नाहीतर माझा स्प्रे, परफ्यूम, पावडर, शाम्पू साऱ्यांना दरवेळी कुर्बानी द्यावी लागते. आज सकाळी गडबडीत बाहेर पडलो. सगळ्या वस्तू तशाच बाहेर राहून गेल्या. दिवसभर एकच डोक्यात, आता संपलं सगळं. काही शिल्लक नाही राहणार आता असं वाटलं होतं. त्यातच या विचाराने आज कामात पण लक्ष लागेना. फोन करुन सांगावं म्हटलं तर तुम्ही खूप गडबडीत असाल म्हणून मग नाही केला फोन. पण आज अजून तरी सगळं शाबूत आहे. घर अगदी जसेच्या तसे आहे आणि माझ्या वस्तूही. किती भारी फिलिंग आहे हे. मी शब्दात सांगूच शकत नाही. देवच पावला म्हणायचं. पण तू काय जादू केलीस ग या सगळ्यांवर? जमले तर आम्हालाही थोडे ट्रेनिंग दे."

आता मात्र सगळ्यांनाच हसू आवरेना. नीरजच्या गमतीशीर स्वभावाने नेहमीप्रमाणेच वातावरण अगदी हलकेफुलके झाले.

"भाऊजी लहान मुलांसोबत लहान होवूनच वागावं लागतं. नुसतं रागावून नाही होत काही साध्य. आणि तसंही तुम्हारे बस की बात नहीं हैं वो.  म्हटले होते मी तुम्ही लहान मुलांचे डॉक्टर व्हायला पाहिजे होते. पण झालात हाडांचे डॉक्टर.
मग सोडूनच द्या आता तुम्ही लहान मुलांशी मैत्री करणं."
नंदिनीने देखील निरजच्या बोलण्यावर गमतीशीर प्रतिउत्तर दिले.

तेवढ्यात,"मामी नको बोलूस ह्या  खडूस मामासोबत. तो खूप मारतो आम्हाला. माझे लाड पण नाही करत तो. चल आपण तिकडे खेळूयात." म्हणत नील नंदिनीचा हात जोरजोरात ओढू लागला.

"असं नाही बोलायचं नील, त्या मामाकडे किनई एवढं मोठ्ठं इंजेक्शन आहे बरं का. त्यांना जो उलट बोलतो त्यांना ते इंजेक्शन देतात.आता मामा डॉक्टर झाले किनई.
"मला नको इंजेक्शन, सॉरी मामा मी नाही आता तुम्हाला उलट बोलणार." म्हणत तीन वर्षांच्या  नीलने मग ओढतच नंदिनीला दुसऱ्या रुममध्ये नेले.

दिर भावजयीची ही अशी नोकझोक, नीलचे ते लाडिक बोलणे हे सारं पाहून सगळ्यांच्याच ओठी आपसूकच मग हास्य उमटले.

नंदिनी आज लहान मुलांमध्ये इतकी रमली होती की तिला त्या विश्वातून बाहेर पडूच वाटेना झालं होतं.

त्यात मुलांना सांभाळून घरातील सर्व काम करणं सगळ्या बायकांना थोडं अवघड वाटत होतं. पण नंदिनीने त्यांना छान प्रकारे हँडल केलेलं पाहून, "नंदिनी तू बाकी काहीच काम करू नकोस, ह्या सर्व कार्टूनला तू सांभाळ आम्ही बघतो स्वयंपाकाचं" म्हणत गावावरुन आलेल्या नंदिनीच्या दोन्ही जावा स्वयंपाकाला लागल्या. अर्थातच सुलभाकाकू आणि आत्याबाईंची त्यांना मदत होतीच.

स्वयंपाक आटोपला. जेवणाची तयारी झाली. आज कधी नव्हे तो सर्व मुलांनी ताटातील सर्व जेवण संपवले. नंदिनीने गोड बोलून, गाणी, गोष्टी सांगून सर्वांना पोटभर खावू घातले. आज पहिल्यांदा लेकरांच्या मातांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. खूप दिवसांनी आज त्यांनी सुखाने जेवण केले होते. एरव्ही मुलांना खावू घालायच्या नादात स्वतः मात्र अर्धवट उपाशीच राहायच्या त्या.

आज सर्वचजण नंदिनीचे खूपच कौतुक करत होते. खरंच सुलभा काकूंनी लाखात एक सून शोधली. निशांत पण किती नशीबवान आहे, त्याला नंदिनी सारखी समजूतदार बायको मिळाली. किती लवकर आपलंसं करते ही सर्वांना. हिच्या जागी दुसरी कोणी असती तर मुलांचा एवढा गोंधळ पाहूनच चिडचिड केली असती. पण खरंच निशांतची बायको खूपच प्रेमळ आहे. म्हणत सर्वांच्याच मनात नंदिनीविषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली. निशांत आणि नंदिनीच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच सर्वजण नंदिनीचा जवळून अनुभव घेत होते.

सर्वांची जेवणं आटोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे म्हणून "झोपून घ्या आता सर्वजण" असे आत्याबाईंनी फर्मानच काढले. आज मुलांनी मात्र "आम्ही मामीकडेच झोपणार" म्हणून हट्टच धरला. नंदिनीने मग सर्वांनी एक छानशी गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकता ऐकता मुले कधी झोपी गेली ते कळलेच नाही.

"वहिनी तू ना प्ले ग्रुप सुरु करच आता. छान टेक्निक आहे तुझ्याकडे मुले सांभाळायचं." नीरज म्हणाला

"पण खरंच मानलं नंदिनी तुला. मुलांना सांभाळणं किती अवघड पण तू तर अगदी सहज करुन दाखवलंस. आता तुम्हीही घ्या लवकर चान्स. घाला खावू आम्हाला पेढे नाहीतर बर्फी. आणि तसेही नंदिनीला तर लहान मुलांची खूपच आवड आहे. मग चांगल्या कामाला उशीर कशाला?"
मोठ्या जावूबाईंनी शेवटी विषय घेतलाच.

लगेचच निशांत आणि नंदिनीने एकमेकांकडे कटाक्ष टाकला.

"बरं आता बस झाल्या गप्पा. झोपा बरं आता सगळे. आणि आम्हालाही झोपू द्या. सकाळी  लवकर उठायचंय. जास्त जागत बसू नका आता."
आत्याबाईंनी विषय वाढण्याआधीच थांबवला. पण नंदिनी मात्र पुन्हा त्याच विचारांच्या गर्तेत हरवून गेली.

दुसऱ्या दिवशी लवकरच उठले सर्वजण. पटापट आवरुन पूजेच्या तयारीला लागले. निशांत आणि नंदिनी दोघे पूजेला बसणार होते. सकाळी सर्वांचे आवरता करता अकरा वाजले. आंघोळी, चहा नाश्ता यातच बराच वेळ गेला सकाळचा. त्यात दुसरीकडे पूजेची तयारीही सुरुच होती. नंदिनी आणि निशांत दोघांचाही आज उपवास होता. नंदिनीने काहीही न खाता निराहार राहून उपवास करायचे ठरवले होते.
निशांतने खूप समजावले पण तिने काहीही ऐकून घेतले नाही. तिच्या आयुष्यातील ही खूप मोठी अग्निपरीक्षा आहे असे ती समजत होती आणि नेटाने सर्व परिस्थीतीचा सामना करण्याचे बळ मिळावे म्हणून ती देवाकडे आज मनापासून प्रार्थना करत होती. घरातील सर्वांची अशीच साथ शेवटपर्यंत राहावी म्हणून देवाला तिने साकडे घातले होते.

आज छानपैकी तयार होवून नंदिनी पूजेला बसणार होती. तशी तिलाही नटण्या सजण्याची खूपच आवड.
भरजरी हिरवीगार नऊवारी पैठणी, नाकात नथ, पायांत पैंजण, हातभार बांगड्या, दागिने या साऱ्यांमुळे नंदिनीचे रुप आणखीच खुलले. एरव्ही पाठीवर रुळणारी लांबसडक वेणी आज आंबाड्यात गुंफली गेली. त्यावर मोगऱ्याच्या गजर्यांचा थाट तो काय वर्णावा.
"अगदी नव्या नवरीप्रमाणे तिचे रुप खुलून दिसत होते. सौंदर्याच्या बाबतीत सामंतांच्या घराचे नाक होती नंदिनी. पारंपरिक पेहरावात निशांत देखील उठून दिसत होता. पण आज मात्र नंदिनीवरुन त्याची नजर हटायचे काही नावच घेईना. पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडावं अशीच काहीशी अवस्था झाली निशांतच्या मनाची. नंदिनी आणि निशांतची जोडी म्हणजे जणू लक्ष्मी नारायणाचा जोडाच .

दोघी जावांनाही आज नंदिनीचा खूपच हेवा वाटत होता. सगळं कसं अगदी भरभरुन मिळालं होतं नंदिनीला.
"खरंच किती नशीबवान आहे नाही नंदिनी. सुलभा काकींसारखी सासू आणि निशांतसारखा नवरा मिळायलाही भाग्यच लागतं. ह्या शहरातील बायकांचे नशीब कित्ती छान असते. मनाप्रमाणे आयुष्य जगता येते. पाहिजे तेव्हा बाहेर फिरायला जाता येते. काम आवरलं की मग आरामच आराम. एवढ्या मोठ्या बंगल्यात ऐशोआरामात जीवन जगायला भेटते ते वेगळेच. नाहीतर आपण. रोजच ती शेती आणि शेतीची कामे आपल्या जणू पाचवीला पुजलीत. त्यासाठी नशीब घेवून जन्माला यावं लागतं बाई. आपलं नशीब कुठे एवढं मोठं." दोन्ही जावांच्या गप्पा भारीच रंगल्या होत्या.
कालपर्यंत नंदिनीचे कौतुक करण्यात पुढे असलेल्या तिच्या दोन्ही जावा आज पाठीमागे तिचीच निंदा करत होत्या.

तेवढ्यात आत्याबाईंनी दोघींनाही आवाज दिला. "अगं पुनम, पल्लवी आता पूजा आटोपली की पाहुण्यांच्या जेवणाची तयारी करावी लागेल. सुलभाला मदत करा दोघीही."

"हो. इथे काम करायलाच आलोय आम्ही. तिकडेही राब राब राबायचं आणि इकडे आल्यावर पण सुटका नाही. चल बाई, काम काही चुकलं नाही आपल्याला." नंदिनीची मोठी जाऊ तोंडातच पुटपुटली.

" हो ना, पण नंदिनीचं बरंये नाही ताई, मस्त नटून थटून बसलिये पूजेला." कोणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात दोघी जावांचे संभाषण सुरू होते.

का कोण जाणे पण अचानकच दोघींच्याही मनात नंदिनीविषयी तेढ निर्माण झाली होती. कालपर्यंत नंदिनीचे कौतुक करण्यात पुढे असलेल्या तिच्या दोन्ही जावा आज पाठीमागे तिचीच निंदा करत होत्या.

थोड्याच वेळात पूजा संपन्न झाली. पाहुण्यांचे आगत स्वागत, भोजन समारंभ सारे काही व्यवस्थित पार पडले. नंदिनीचे आई वडील आज लेकीचे सुख पाहून अगदी भरून पावले होते. नंदिनीच्या आईने तसेच आलेल्या सुवासिनींनी मग नंदिनीची ओटी भरली. "लवकरच आनंदाची बातमी येवू देत" म्हणत साऱ्यांनीच देवाकडे प्रार्थना केली तसेच नंदिनीला भरभरुन आशीर्वाद दिले.

एक मनाची कल्पना म्हणून आत्याबाईंनी घातलेला हा पूजेचा घाट अखेर संपन्न झाला होता. पूजा झाल्यानंतर घरात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

क्रमशः

आतातरी मातृत्वाचे सुख पडेल का नंदिनीच्या पदरी? आणखी किती आव्हानांना सामोरे जावे लागणार तिला? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all