मायेचा पदर ( भाग ५)

आज नंदिनीच्या पाठीमागे तिच्या सासूबाई आणि आत्तेसासूबाई खंबीरपणे उभ्या होत्या. आणि एका स्त्रीला दुसरं काय हवं असतं?


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आज नंदिनीला खूपच हलके वाटत होते. आता खरी तिला आधाराची, कोणीतरी तिची मानसिकता समजून घेण्याची गरज होती. जी की आत्याबाई आणि सुलभा काकूंनी समजून घेतली. त्यामुळे तिला खूप मोठा भावनिक आधार मिळाला होता. आणि तसंही निशांत होताच तिच्या बरोबर. ह्या बाबतीत मात्र नंदिनी खूपच भाग्यवान होती. आपल्या माणसांची भक्कम साथ,त्यांची सोबतच आता तिचा भक्कम आधार बनली होती.

आईपण ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला एका ठराविक कालावधीनंतर पालकत्वाचे वेध हे लागतातच. असेच काहीसे झाले होते निशांत आणि नंदिनीसोबत.

नंदिनीला मातृत्वाचे इतके वेध लागले होते की कधी एकदा ते गोंडस, निरागस रुप हाती विसावते असे झाले होते तिला. सद्ध्या तिच्या आणि निशांतच्या बोलण्यात एकच विषय असायचा नेहमी आणि तो म्हणजे "त्यांचं बाळ." गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही मनोमन बाळाची स्वप्न रंगवत होते. आज तरी आनंदाची बातमी येईल,उद्या तरी येईल. असं करता करता लग्नाला आता वर्ष होवून गेलं होतं. पण दर महिन्याला सपशेल निराशाच व्हायची दोघांचीही. वेळोवेळी निशांत मात्र नंदिनीचे मनोबल वाढवत होता, तिला मानसिक आधार देत होता. अखेर दोघांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. शेवटी मग एकमताने दोघांनीही दवाखाना गाठला. पूर्ण चेकअप नंतर लक्षात आले की, सगळे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, मग आपल्याच नशीबी हा विरह का? हे दोघांनाही समजेना.

दोघांनाही विचाराने झोप काही लागेना.

"नंदिनी, अगं किती वेळ जागणार आहेस अशी? झोप बरं आता. नाहीतर पुन्हा तुलाच त्रास होईल."

"नाही ओ, आईपणाचे सुख नशिबात नसणे यापेक्षा मोठा त्रास दुसरा कोणता असूच शकत नाही."

"मान्य आहे अगं, पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. असे तूच म्हणत असतेस ना नेहमी आणि नक्की येणार लवकरच तो दिवस. मग आता असा नकारात्मक विचार का करतेस तू?"

"आणि ती वेळ आलीच नाही तर?" नुसत्या विचारानेच नंदिनीच्या डोळ्यांत आसवांची गर्दी झाली.

"नंदिनी, शांत हो बरं. नको ना असा वाईट विचार करुस. तूच जर अशी हार मानलीस तर मी काय करु? आणि आता तर आत्या आणि आईपण आहेत ना आपल्यासोबत."

" देवाचीच कृपा म्हणायची ओ ती. कारण अशावेळी घरातीलच लोक वैरी होतात तिचे. मूल होत नाही म्हणून अक्षरशः तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जातो. पण त्यात तिची काय चूक? हा विचार कोणीच करत नाही. जसे आजी आजोबांना नातवंडाची ओढ लागते, त्यापेक्षा कितीतरी पटीने बाळाची ओढ त्याच्या आई बाबांना लागलेली असते. हे बऱ्याचदा समजून घेत नाही हा समाज. पण मी खरंच खूप भाग्यवान आहे याबाबतीत. माझ्यासोबत माझ्या माणसांची खरी संपत्ती आहे. आणि तिच्या जीवावर आयुष्यात येणाऱ्या अशा प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ निर्माण होते."

"हे बघ, जगाचा विचार सोड आता. आणि तुझी ही हक्काची माणसे कायम तुझ्या सोबत असणार याची खात्री आहे मला. मग तू कशाला काळजी करतेस? आणि इतर बायकांना येत असतीलही वाईट अनुभव पण आपल्या घरात तुला दोष देणारे कोणीही सापडणार नाही. अजिबात काळजी करु नकोस. एक ना एक दिवस स्वामींच्या कृपेने सगळं ठिक होणार, विश्वास आहे मला."

"हो, पण मला आई व्हायचंय ओ. बाकी जगाचे मला काहीच घेणेदेणे नाही. आणि जी साथ मला आता मिळत आहे सर्वांची तशीच साथ मला बाळ झाल्यानंतर अनुभवायची आहे."
रडवेल्या सुरात नंदिनी बोलली नि अलगद मग निशांतच्या कुशीत ती शिरली.
"मला माहित आहे आपलं बाळ म्हणजे घरातील प्रत्येकासाठी किती आनंदाचा क्षण असणार आहे आणि आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील तोच आनंद मला प्रत्यक्ष अनुभवायचा आहे. माहित नाही माझ्या नशिबात आहे की नाही तो आनंद पण दिवसेंदिवस माझी आशा मावळत चाललीये ओ. मान्य आहे आता कुठे वर्षच झालंय लग्नाला, पुढे जावून मिळेलही तो आनंद पण सध्या लोकांच्या नजरा, त्यांच्या मनात सुरु असलेले असंख्य प्रश्न न बोलताही समजतात मला."

एरव्ही नंदिनी इतकी हळवी कधीच होत नाही. आज पहिल्यांदा तिला असे खचलेले पाहिले निशांतने. पण आता एकमेकांना आधार देत त्या योग्य वेळेची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता दोघांकडेही.
"पण खरंच, नंदिनी म्हणते तसं ती वेळ आलीच नाही तर?" निशांतही काही क्षण नकारात्मक विचारांच्या गर्तेत हरवून गेला.

त्याच्या कुशीत नंदिनीला कधी झोप लागली हे त्यालाही समजले नाही. नंदिनीच्या बंद पापण्यांच्या ओलावलेल्या कडा निशांतने मग अलगद टिपल्या. हलकेच मग तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तिचे ते निरागस रुप पाहून आपसूकच मग त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
"देवा, खूप निरागस आहे रे माझी बायको. कोणाबद्दल कधीही वाईट विचारसुद्धा तिच्या मनाला शिवत नाही." सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारी नंदिनी आज स्वतः आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळवण्यासाठी धडपडत होती.
आज तिला अशी खचलेली पाहून खूपच वाईट वाटत होते निशांतला."

क्षणभरही नंदिनीला आपल्या बाहूपाशातून दूर करु वाटेना त्याला. नंदिनीच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक पाहत मग तोही निद्रेच्या अधीन झाला.

प्रत्येक दिवस आशेचा किरण घेवून उगवत होता. पण नंदिनी आणि निशांतच्या बाबतीत मात्र दिवसेंदिवस मुलाबद्दलच्या साऱ्या आशा निराशेच्या गर्तेत हळूहळू मावळत चालल्या होत्या.

आत्याबाईंनी खूप सारे नवस सायास केले नंदिनी आणि  निशांतसाठी. त्यांना मुल व्हावे म्हणून सुलभा काकूंनीदेखील स्वतः उपास तापास सुरु केले.
"हे सगळे चुकीचे वाटत होते निशांतला. त्याच्या समजण्याच्या पलिकडे होते सारे काही. असं नवस करुन, उपास तापास करुन जर एखाद्याला मुल होत असते तर जगात कोणत्याही स्रीची मातृत्वाची झोळी कधी रिकामी राहिलीच नसती. यापेक्षाही जास्त त्याला वाईट वाटत होते नंदिनीचे. कारण इंजिनियर झालेली ही मुलगी तीदेखील या साऱ्यावर विश्वास ठेवून स्वतः देखील त्यांचे अनुसरण करण्यात गुंतली होती. निशांतला ह्या साऱ्या गोष्टी अजिबात पटत नव्हत्या . पण फक्त त्या तिघींच्या  भावनांचा आदर म्हणून तो काहीच बोलत नव्हता.

एव्हाना निशांत आणि नंदिनीच्या दवाखान्याच्या वाऱ्यादेखील वाढल्या होत्या. हळूहळू आता शेजारी पाजारी या चर्चेला उधाण आले होते.
"अगं नंदिनी पेढे, बर्फी कधी खावू घालतेस मग आम्हाला? सुलभाताई तुमच्या सुनेला काही आहे की नाही अजून? ही आजकालची मुले पण ना, लहान मुलाचा त्रास अजिबात नको म्हणतात इतक्यात. आता सोप्पं वाटतंय त्यांना. पण, पुढे जावून मग ह्या गोष्टीचे दुष्परिणाम पुन्हा त्यांनाच भोगावे लागतात. आणि ही इतकी महत्त्वाची गोष्ट कशी काय त्यांना समजत नाही? देवच जाणे."
असे अनेक प्रश्न विचारले जावू लागले होते. एक ना अनेक मुद्दे आता आजूबाजूच्या लोकांच्या चर्चेचा विषय बनले होते. पण कोणाला उत्तर देण्यात काहीच तथ्य नव्हते. लोकांचा स्थायी स्वभावच असतो तो म्हणत लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता.

आत्याबाईंनी मात्र काही कारण असो अगर नसो पण आपल्या हातून कोणतीच चूक व्हायला नको म्हणून मग त्यांनी घरातच एक छोटीशी  सत्यनारायण आणि कुलदैवताची पूजा घालण्याचे ठरवले. सुधाकरराव आणि सुलभा काकूंना या गोष्टींची त्यांनी कल्पना देखील दिली. त्यांनीही लगेचच होकार दर्शवला. पुढच्याच आठवड्यात मग पूजेची तारीख निश्चित करण्यात आली.

गावी मधुकर काकांना आणि घरातील सर्व मंडळींना पूजेची कल्पना देण्यात आली आणि सर्वांना एक दिवस आधीच येण्यास सांगितले. जवळच्या सर्व नातेवाईकांना तसेच शेजारी पाजारीही पूजेचे निमंत्रण पाठवण्यात आले. निशांतची बहीण नीलिमाही दोन दिवस आधीच माहेरी आली. तसंही खूप दिवस झाले तरी तिचे माहेरी येणे झालेच नव्हते. पूजेच्या निमित्ताने का होईना पण आता तिलाही तेवढाच बहाणा मिळाला होता माहेरी थांबण्याचा.

निशांत आणि नंदीनीच्या लग्नाच्या वेळी हे सर्वजण एकत्र जमले होते. त्यानंतर आज दीर्घ  कालावधीनंतर हा सारा गोतावळा पुन्हा एकदा एकत्र जमणार होता. त्यामुळे सर्वच जण खूपच उत्साही होते.

क्रमशः

आपल्या माणसांची खरी साथ आणि सोबत ही कामी येत असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी. आता पूजेच्या निमित्ताने पुन्हा सगळे एकत्र जमणार होते. तसेच हे सारे काही सुरु होते ते म्हणजे नंदिनी आणि निशांतसाठी. थोडक्यात आपल्या सुनेची मातृत्वारुपी प्रेमाची झोळी ओसंडून वहावी यासाठी आत्याबाईंनी पूजेचा हा घाट घातला होता. या गोष्टीला घरातील सर्वांचाच पाठिंबा हा होताच.
खरंच नात्यांची संपत्ती ही कामी येत असते  निराशेच्या गर्तेतही आशेचा किरण दाखवायला. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग शोधायला.

सामंतांच्या घरी सत्यनारायण पूजा निर्विघ्नपणे पार पडणार का? की टाकेल कोणी मिठाचा खडा त्यात? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा पुढील भाग.

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all