मायेचा पदर ( भाग ४)

नंदिनीची मुलासाठी ट्रीटमेंट सुरु आहे हे आत्याबाईंना समजल्यावर त्या खंबीरपणे तिच्या पाठीशी उभ्या राहतात. जे की सर्वांसाठी अनपेक्षित होते.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


सर्वांची जेवणं आटोपली. नंदिनीचा मुड आता थोडा ठीक वाटत होता. नीरजच्या गमतीशीर स्वभावामुळे घरातील वातावरण थोडे हलके फुलके झाले होते.
तरीही आज नंदिनी आणि निशांत दिवसभर नेमके कुठे आणि कशासाठी गेले होते? याबाबतीत जाणून घेण्यासाठी आत्याबाई मात्र फारच उत्सुक होत्या.

नेहमीच्या सवयीप्रमाणे जेवणानंतर सर्वजण गप्पा मारत बसले होते. आत्याबाईंनी न राहवून निशांतला विचारलेच, " काय रे सोनू आज काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते का दोघेही?"

आत्याबाईंचा प्रश्न अनपेक्षित होता निशांतसाठी. त्यांचा हा प्रश्न कानी पडताच निशांतने लगेच नंदिनीकडे पाहिले. शेवटी आज ना उद्या ही गोष्ट सर्वांनाच समजणार आहे. एकदाचं सांगून मोकळं व्हावं असं क्षणभर निशांतच्या मनात आले. पण नंदिनीला नाही आवडणार अशी खाजगी गोष्ट सर्वांसमोर बोललेली. पुन्हा मग ती दुखावली जाईल. म्हणून निशांतने सांगण्याचे टाळले.
" काही नाही अगं आत्या, दावाखान्यात गेलो होतो."

निशांतच्या या बोलण्यावर सुलभा काकू आणि नंदिनी दोघीही अवाक होवून एकमेकींकडे पाहू लागल्या.
आता पुढे निशांत काय बोलतो याकडे दोघींचेही लक्ष लागून राहिले.

"आता दवाखन्यात आणि ते कशाला ?"आत्याबाई हळूहळू मूळ मुद्द्याकडे सरकत होत्या.

" काही नाही अगं नंदिनीच्या मैत्रिणीला भेटायला गेलो होतो. मुलगा झाला ना तिला. म्हणून मग तिलाच भेटायला गेलो होतो.

खोटं बोलून निशांतने तात्पुरती वेळ तर मारुन नेली होती. पण त्याचे वाक्य त्याच्याच अंगाशी आले.

"अरे वा. छानच की मग."
"पण काय रे सोनू असं किती दिवस दुसऱ्याच्या बातम्या ऐकून आनंदी व्हायचं आम्ही. तुम्ही कधी देताय आनंदाची बातमी??" आत्याबाईंना आपणहून आता विषय काढून दिला होता निशांतने.

" देवू ग कसली घाई आहे? प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते ग आत्या."

" असं काही नसतं बरं. वेळेचे महत्त्व जर तुमच्या आजकालच्या मुलांना समजले असते तर करियर सेट करायच्या नादात खाजगी आयुष्याकडे असं दुर्लक्ष नसतं केलं तुम्ही. काही गोष्टी या वेळेतच होणं गरजेचं असतं. आणि नेमकं तेच कळत नाही तुमच्या या आजच्या पिढीला." आत्याबाई समजूतदारिच्या शब्दांत निशांतला सांगत होत्या.

बरं तुमचं चालू द्या. आम्ही जातो झोपायला. म्हणत नीरज आणि  सुधाकरराव मात्र तिथून निसटले.

आज निशांत कितीही खोटे बोलला , खरे कारण घरातल्यांसमोर त्याने नाही येवू दिले तरी ते लपवणे चुकीचे आहे. ही सगळी आपली माणसं आहेत. आणि ह्यांच्यापासून तरी काय लपवायचे.?? त्यात आत्याबाई निशांतला मुलगा मानतात मग त्यांना तर हे माहीत असायलाच हवं. वेडी आशा असते शेवटी. बाहेरुन कुठून समजण्यापेक्षा आपणच हे सगळं आत्यांना सांगायला हवं. नंदिनीच्या मनात सहज विचार आला. पुढे जावून समजण्यापेक्षा आज का नाही? जे होईल ते होईल. सांगून टाकलेलं बरं. म्हणजे मनावरचा ताण तरी कमी होईल. नाही जमणार मला एवढं मोठं अपेक्षांचं ओझं घेवून वावरायला.

" आत्या, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. पटतंय मला तुमचं म्हणणं." नंदिनी म्हणाली.

"हो ना ग, मग घ्या की मनावर. या अशा गोष्टीत जास्त उशीर करुन नाही चालत अगं. पुढे जावून पश्र्चाताप करण्यापेक्षा वेळीच जागं झालेलं बरं ना. असं नाही वाटत का तुम्हाला? आणि तसंही आता तुमच्या लग्नाला तर वर्ष होवून गेलं. आणि आता तर तू घरीच असतेस, जॉब पण करत नाहीस. सगळ्या गोष्टी कशा अगदी जुळून आल्यात बघ. हीच योग्य वेळ आहे नंदिनी. तुला काय वाटतंय सोनू??"

निशांतला खूप काही बोलायचे होते पण का कोण जाणे शब्दच जणू हरवले होते.

आत्याबाईंचा प्रत्येक शब्द नंदिनीच्या काळजाला जावून भिडत होता. त्यांचे अपेक्षांचे ते बोल ऐकून नंदिनीच्या डोळ्यांत अश्रूंची दाटी झाली.

सुलभा काकू देखील निःशब्द होवून शांतपणे सारं काही ऐकत होत्या. काय बोलावे त्यांनाही समजेना. खरं समजल्यावर काय वाटेल आत्याबाईंना ? याच विचारात त्या गढून गेल्या होत्या.

"अहो अजून किती दिवस आशेवर ठेवायचं सगळ्यांना?" नंदिनी निशांतला म्हणाली.

चला माझं अर्ध काम तर इथेच झालं. म्हणजे तुझा निर्णय पक्का झालाय ना नंदिनी? आत्याबाईंनी आशेने नंदीनीला विचारले.

"आत्या मी जे काही सांगणार आहे  प्लीज समजून घ्या आधी. तुमच्यापासून तरी काय लपवणार ना?" आत्याबाईंचा हात हातात घेत नंदिनी म्हणाली."
"आत्या आम्ही दवाखान्यात गेलो होतो, पण मैत्रिणीला भेटायला नाही तर आम्ही स्वतः आमच्यासाठी दवाखान्यात गेलो होतो. आम्ही बाळासाठी ट्रीटमेंट सुरु केलीये आत्या. कारण सहा महिन्यापासून मलाही बाळाचे वेध लागलेत ओ. आई होण्याची मनापासून खूप इच्छा आहे पण सध्या तरी ते सुख आमच्या नशिबात नाही, असंच दिसतंय. कुणाची लहान मुलं खेळताना पाहिली तरी मातृत्वाची ओढ लागते. जाणूनबुजून आम्ही आयुष्यातील इतका महत्त्वाचा निर्णय लांबणीवर नाही टाकत आहोत आत्या."

" माहित नाही या ट्रीटमेंटने फरक पडेल न पडेल, या साऱ्यांत अजून किती दिवस जातील? शेवटी आमचे नशीब. ते तर आम्ही नाही बदलवू शकत आता. पण देवाचीच काहीतरी योजना असेल यामागे असे समजून प्रयत्न करणं एवढंच काय ते करु शकतो आम्ही."

" काय ग सुलभा, तू ही इतकी मोठी गोष्ट लपवत होतीस सकाळपासून.?"

आत्याबाईंच्या प्रश्नावर सुलभा काकूंनी मात्र काहीही न बोलता शांत राहणेच पसंत केले.

आत्याबाईंना धक्काच बसला. काय बोलावे क्षणभर त्यांनाही समजेना.

" अगं मीपण एक स्रीच आहे. समजू शकते मी नंदिनीच्या भावना.काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात. जी गोष्ट हवीहवीशी वाटते नेमकी तीच आपल्यापासून दूर पळत असते. पण नंदिनीची एक गोष्ट मला खूप आवडली. कुठलेही आढेवेढे न घेता तिने जे आहे ते सांगून टाकले. नाहीतर ह्या अशा खाजगी गोष्टी आजकाल नाही सांगत मुली  कोणाला. आणि आपण जर स्वतःहून विचारले तर पुन्हा आम्हीच मूर्ख  ठरतो . पण तुझं तसं नाहीये. खूप मोकळ्या मनाची आहेस तू नंदिनी. आणि तितकीच समजूतदारदेखील .आता मला समजतंय, सुलभा तुझे इतके गुण का गात असते ते."
"काळजी करु नकोस आणि टेन्शन तर बिलकुल घेवू नकोस. सगळं काही ठीक होईल." आत्याबाईंनी नंदिनीला विश्वासाची हमी दिली.

आत्याबाईंचे हे प्रेम, प्रेमाचे, मायेचे शब्द ऐकून नंदिनीला भरुन आले. अलगद मग ती आत्याबाईंच्या कुशीत शिरली. डोळ्यांतील आसवांनी आपली सीमा केव्हाच ओलांडली होती. मायेच्या त्या मिठीत क्षणभर तिला आईचाच भास झाला. आत्याबाईंच्या मायेच्या पदरात तिला खूपच सुरक्षित वाटत होते.

निशांत आणि सुलभा काकूंनाही क्षणभर भरुन आले.

"आत्या कितीही नाही म्हटलं तरी खूप टेन्शन येतंच ओ. कितीही सकारात्मक विचार करायचे ठरवले तरी हळूच मन नकारात्मक विचारांच्या मागे धाव घेते.

"अगं मानवी स्वभावच आहे तो. आपल्या मनासारखे जर नाही घडले तर असंख्य नकारात्मक विचार मनाच्या कोपऱ्यात अलगद येवून कधी घर करतात ते आपल्यालाही समजत नाही. पण प्रत्येक गोष्ट घडण्यामागे परमेश्वराचीच काहीतरी योजना असते हे आताच तू म्हणालीस ना. मग नको आता कोणताही वाईट विचार मनात आणू." आत्याबाईंनी नंदीनीचे मनोबल वाढवले.

आता नंदिनीच्या मनावरचे खूप मोठे ओझे हलके झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. खरंच घरात जर अशी जीव लावणारी, एकमेकांना आणि विशेष म्हणजे सुनेला समजून घेणारी, तिच्या भावनांचा आदर करणारी, वेळप्रसंगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिची हक्काची माणसे तिच्या सोबत असतील तर मग आयुष्यात पुढे जाण्यासाठी नक्कीच वाट गवसते.

आत्याबाईंच्या कडक चेहऱ्यामागे एक हळवे मन दडलेले आहे हे निशांतने आज जवळून अनुभवले. एरव्ही सर्वांना कडक शब्दांत उपदेश देणारी आत्या आज नंदिनीच्या मागे खंबीरपणे उभी असलेली पाहून क्षणभर त्याला भरुन आले.

"आत्या तू खरंच ग्रेट आहेस" म्हणत तोही मग आत्याच्या त्या मायेच्या पदरात अलगद शिरला. निशांतच्या त्या लाडीक वागण्याने आत्याबाईंना त्यांच्या मुलाची राघवची आठवण आली. त्याच्या आठवणीत नकळतपणे त्यांचे डोळे पाणावले.
"आज माझा राघव असता तर असाच लाड करुन घेतला असता त्याने माझ्याकडून. पण तो गेला आणि मायेचा हा पदर कायमचा पोरका झाला. पण तसं नाही, तर निशांत आणि नंदिनीमुळे आज पुन्हा एकदा ह्या मायेच्या पदराला हक्काचा आधार मिळाला.
आत्याबाईंनी ओलावलेल्या पापणीच्या कडा पदराने अलगद टिपल्या.

" काळजी करु नका." सगळं काही ठीक होईल. जा आता झोपा जावून." आत्याबाई म्हणाल्या.

मनावरचा खूप मोठ्ठा भार हलके झाल्याचे समाधान घेवून नंदिनी आणि निशांत दोघेही त्यांच्या खोलीत गेले.

पण अपराधीपणाची भावना मनात ठेवून सुलभा काकू मात्र तिथेच उभ्या होत्या. त्यांना आत्याबाईंचे हे वागणे अनपेक्षित होते. आजुबाजूच्या अनुभवावरुन सुलभा काकूंच्या मनात एक अनामिक भीती होती ती म्हणजे नंदिनीच्या ट्रीटमेंटबद्दल समजल्यावर आत्याबाई नेमक्या कशा रिॲक्ट होतील.? पण त्यांनी जसा विचार केला त्यापेक्षा अगदी उलट झाले. खरंच आत्याबाईंच्या मनाची एक हळवी बाजू आज पहिल्यांदाच त्यांनी अनुभवली होती.

"आत्याबाई चुकलं ओ माझं. तुम्ही उगीच गैरसमज करुन घेवू नका. तुमच्यापासून हे सगळं लपवण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता. पण हे सगळं समजल्यावर तुम्हाला खूप त्रास होईल, तुमची चिडचिड होईल म्हणून मग लगेच नाही कळू दिले तुम्हाला. बाकी काहीच नाही. त्यात डॉक्टर नेमकं काय सांगतात याची वाट पाहत होते मी म्हणून मग लगेच कोणालाही काहीच बोलले नाही. निशांतने मला अगदी अलिकडे या गोष्टीची कल्पना दिली. मलाही काहीच ठावूक नव्हते.

" हो ग, समजू शकते मी. जा आता तू पण जावून झोप. खूपच उशीरा झालाय. बोलू आपण नंतर."

क्रमशः

खरंच आत्याबाई आणि सुलभा काकू शेवटपर्यंत अशीच साथ देतील का नंदिनीला? नंदिनीची मातृत्वाची इच्छा होणार का पूर्ण. जाणून घेण्यासाठी पुढे वाचन सुरु ठेवा.

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all