Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

मायेचा पदर (भाग ३)

Read Later
मायेचा पदर (भाग ३)


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

" अगं नंदिनी, सावकाश."
दारात येताच नंदिनीचा पाय अडखळला. ती पडणार तोच वेळीच निशांतने तिला सावरले.

सकाळी घराबाहेर पडलेले निशांत आणि नंदिनी सायंकाळी उशिरा घरी परतले. सुलभा काकू मुलांची वाटच पाहत होत्या. काय झालं असेल? सगळं ठीक असेल ना? याच विचारात होत्या त्या. पण आधी मुलांना फ्रेश होवू दे निवांत विचारता येईल .म्हणून मग लगेचच त्यांनी काहीही विषय काढला नाही.

निशांत आणि नंदिनी दोघेही जरा नाराजच दिसत होते. काहीतरी काळजीचे कारण नक्की आहे हे सुलभा काकूंनी अचूक हेरले होते. त्यात नंदिनी थोडी जास्तच थकल्यासारखी वाटत होती.

"आई मी थोडा वेळ पडू का ओ.? खूप थकल्यासारखं वाटतंय." चेहराही खूपच रडवेला झाला होता तिचा.

"हो जा. फ्रेश हो आणि थोडा वेळ आराम कर."

तेवढ्यात निशांत फ्रेश होवून बाहेर आला.
" आई चहा करतेस का ग थोडा?" दमलेल्या सुरातच तो बोलला.

" हो आणते" म्हणत सुलभा काकू किचनकडे वळल्या. निशांतही आईच्या मागे गेला.

"काय रे काय म्हणाले डॉक्टर..?"

" केलंय ग आज सगळं चेकअप. रिपोर्ट तर नॉर्मल आहेत दोघांचेही. झालिये ट्रीटमेंट सुरु. पण आई नको व्हायला होतं ग हे सगळं. आता या सगळ्यांत आणखी किती वेळ जाणार? आणि एवढं सगळं करूनही प्रयत्नांना कितपत यश येईल? याचा काहीही अंदाज नाही."

" काळजी करु नकोस. स्वामींवर विश्वास ठेव."

" नंदिनी खूप नाराज झाली ग पण. गेल्या सहा महिन्यांपासून बाळाचे वेध लागलेत तिला. सारखं बोलण्यात तोच विषय असतो तिच्या. आणि आज तर धक्काच बसला तिला. ह्या अशा दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागतील याचा स्वप्नातही आम्ही विचार केला नव्हता कधी. आई व्हायचं म्हणून मेंटली प्रिपेअर होण्यासाठी जॉब सोडला तिने. आणि आता हे असं होवून बसलंय."

"हे बघ निशांत आता तिला आधार देणं हे आपलं काम आहे. आपणच असं खचून नाही चालायचं. आणि आता कुठे ट्रीटमेंट सुरु झालीये ना. मग इतक्यात लगेच कसा फरक पडेल.?"
आयुष्यात ह्या अशा परीक्षा द्याव्याच लागतात रे बाळा. सारी सुखं ओंजळीत असताना दुःख देखील वाट शोधत येतेच रे. नियतीचा नियमच आहे तो. पण त्यावर मात करण्याची तयारी आपल्याला ठेवायलाच हवी ना. ?"
"मी बोलते नंदिनीसोबत. समजावते तिला. काळजी करु नकोस तू."

सुलभा काकू मग चहाचा कप घेवून नंदिनीच्या खोलीत गेल्या.
खरंच घरात सासू आणि नवरा ह्या दोन व्यक्ती सुनेच्या पाठी भक्कम उभ्या असतील तर मग आयुष्यात कितीही मोठे संघर्ष करण्याची आणि अपयश पचविण्याची तिची मनाची तयारी होते. फक्त एकमेकांना समजून घेत आयुष्याचे हे अवघड कोडे सोडवावे लागते.

सुलभा काकू रुममध्ये आल्या. नंदिनी बेडवर आडवी झाली होती. झोपली नसावी पण नक्कीच खोल विचारांत हरवली होती ती. सुलभा काकूंचा अंदाज खरा होता.

सुलभा काकूंनी आवाज दिला तशी ती भानावर आली.

" हे घे बाळा, चहा पी थोडा.. बरं वाटेल तुला. उठ जराशी. दिवे लागणीची वेळ पण झाली आहे. उठून बस थोडा वेळ. हवं तर नंतर पुन्हा झोप."

सासूच्या या प्रेमळ शब्दांनी नंदिनीच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली. सुलभा काकूंनी सुनेचे पदराने डोळे पुसले. अलगद मग ती सासूच्या कुशीत शिरली. सासूच्या मायेच्या पदराचा तो उबदारपणा नंदिनीला  खूप मोठा आधार देवून गेला. पण डोळ्यांतील आसवे थांबायचे नाव काही घेइनात.

" इतक्यात हार मानायची का नंदिनी.? तुझ्यासारखी हुशार मुलगी असं वेड्यासारखं वागणार का आता?"

" आई पण असं माझ्यासोबत नव्हतं व्हायला पाहिजे ना. कुठे कमी पडले ओ मी.? बरं रिपोर्ट मध्ये काही दोष समजला असता तर तेही समजू शकले असते. आज ना उद्या आशा संपलीही असती. पण असं आशेवर किती दिवस जगायचं ना आई.?"

" हे बघ प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावीच  लागते ग. काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना."

"कोणाची तरी दृष्ट लागली आई. पहिल्यापासून सगळं अगदी सहज मिळत गेलं मला. कोणत्याच गोष्टीसाठी झगडावं लागलं नाही. आणि आयुष्याच्या या वळणावर आज अचानक आयुष्यच थांबल्यासारखं वाटतंय ओ."

दोघी सासू सूनांचे हे बोलणे सुरु असताना बाहेर आत्याबाईंचा आवाज आला. तशा सुलभा काकू सावध झाल्या.

" डोळे पुस बाळा. आत्याबाईंनी जर चुकून पाहिले ना तर त्यांची प्रश्नांची  मालिका थांबायचे नाव काही घ्यायचे नाही."

" आई पण आता ही गोष्ट थोडीच ना लपून राहणार आहे. आज ना उद्या त्यांना सांगावेच लागेल. त्यात आता लग्नाला वर्ष उलटलं म्हणजे हळूहळू लोक बोलणारच आहेत. आपल्या समाजाची रीतच आहे ती."

" हो, योग्य वेळ पाहून सांगू आपण त्यांना आता लगेच नको. त्यांनाही टेंशन येईल. पण तू नको टेंशन घेवू. आणि लोकांचे तर अजिबात टेंशन घ्यायचे नाही. लोक काय घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीदेखील चालू देत नाहीत. आपण लोकांचं बोलणं किती मनाला लावून घ्यायचे ते आपल्या हातात असते. शेवटी आयुष्य हे आपलं आहे आणि ते आपल्याच पद्धतीने जगायचं असतं. आयुष्यात हे असे चढउतार येतच असतात ग. त्यामुळे खंबीर होवून त्याचा सामना करायचा. असं मुळूमुळू रडत बसलीस तर कसं व्हायचं सांग बरं.?"

सासूबाईंच्या धीराच्या शब्दांनी नंदिनीला सकारात्मक ऊर्जा मिळाली होती. अशा वेळी आधाराच्या या शब्दांची खरंच गरज असते. आणि त्याबाबतीत नंदिनी खूपच भाग्यवान होती. हे शब्द तिला तिच्या सासुबाईंकडून मिळाले होते. नाहीतर समाजात बहुतांश ठिकाणी मुल होत नाही म्हटल्यावर सासूच सुनेची पहिली वैरी बनते.

तेवढ्यात आत्याबाई ह्या दोघींचे नेमके काय सुरु आहे पाहण्यासाठी खोलीत येतात.
"हे काय ? आज कुठे बाहेर जेवायला जायचे आहे का सगळ्यांना? वाजले बघा किती? अजून स्वयंपाकाची काहीच सुरुवात नाही. आणि देवापुढे दिवा देखील लावला नाही तू आज. आताच लावून आले मी."आत्याबाई सुलभा काकूंना म्हणाल्या.

" हो हे काय आता सुरुवातच करायची स्वयंपाकाला. आणि बरं  झालं तुम्ही लावला दिवा. मी तर विसरलेच होते बघा.सुलभा काकू उत्तरल्या.

"नंदिनी तू आराम कर मी बघते स्वयंपाकाचं."

" नाही आई मी करते मदत चला."

" हिला काय झालंय? तोंड का एवढं बारीक दिसतंय? बरं नसेल तर राहू दे मी करते मदत. पण काय ग सकाळी तर एकदम ठीक होती. कुठे डोंगरावर फिरायला गेला होतात की काय ग दोघे?"

" आत्याबाई...मी सांगितले ना तुम्हाला. त्यांचं थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले होते ते."

" तू काही बोलूच नकोस सुलभे. मला सांगेल माझा सोनू. तू सकाळपासून मला कसं फिरवतिये दिसतंय मला."
"बरं घ्या आवरुन आता सगळे भूक भूक करत येतील."

सुलभा काकूंनी मग कुकर लावला. उशीर झाल्यामुळे थोडा घाईतच स्वयंपाक उरकला. नंदिनीच्या वाट्याला जास्त काही काम नाही येवू दिले त्यांनी . आणि आत्याबाईंनी देखील मदत केली त्यामुळे वेळेत आटोपले. नंदिनीने स्वयंपाक टेबलवर मांडला. एक एक करत सगळेच गोळा झाले जेवणाच्या टेबलावर.

नीरज देखील आला होता दवाखान्यातून. जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये त्याची इंटर्नशीप सुरु होती. आज नेहमीच्या सवयीप्रमाणे वहिनीने म्हणजेच नंदिनोने त्याची खेचायला सुरुवात केली नाही त्यामुळे त्याला थोडे चुकल्या सारखेच वाटले.

" काय मग वहिनीसाहेब, आज भांडण झालं वाटतं आमच्या दादासाहेबांसोबत.? चक्क आज तुम्ही.इतक्या शांत.? आज सूर्य नेमका कुठून उगवला होता बरं.?"

नंदिनीने नीरजकडे पाहत उसने अवसान आणून फक्त एक हलकीशी स्माईल केली.

" तू जेवून घे रे नीरज. अरे आज वहिनीची तब्येत बरोबर नाही. नको तिला त्रास देवूस. निमूटपणे जेव." सुलभाकाकू म्हणाल्या.

"अरे काय झालंय नेमकं? वहिनी, मी पण डॉक्टर झालोय आता. विसरताय तुम्ही सगळे. आय एम ऑलवेज हियर."

" हो रे बाबा, पण इथे हाडांचा आजार कोणालाही झालेला नाही अजून. तू जेव बरं आता गुपचूप."सुलभा काकू म्हणाल्या.

"काही नाही ओ भाऊजी. जरा डोकं दुखतंय." तेवढ्यात नंदिनी उत्तरली.

" अरे, मग औषधाची गरजच काय? दादाकडून चेपून घ्या डोकं. अशी संधी कधी सोडायची नसते ग वहिनी." थोडं हसतच नीरज बोलला.

"अरे, हो का? बरं, मग पुढे जावून मीही निशाला शिकवेल हो हे सगळं." नंदिनीने हळू आवाजातच नीरजला टोमणा मारला.

" अगं गप्प बस की बाई, हा विषय इथे नको. प्लीज."

"मग जेवा आता मुकाट्याने." नंदिनीने थोडं ब्लॅकमेल केलं नीरजला. कारण नीरजचे एक सिक्रेट नंदिनीला माहिती होते. जे त्याने फक्त नंदिनीलाच सांगितले होते. घरात बाकी कोणालाही माहिती नव्हते.

मेडिकलला असल्यापासून नीरजला त्याच्याच कॉलेजमधील निशा नावाची एक मुलगी आवडत होती. गमती जमतीत नंदिनीला नीरजकडूनच ही माहिती मिळाली होती. मग काय आता दीराला ब्लॅकमेल करण्याची एक संधीदेखील ती सोडत नव्हती.
पण दोघांच्या गमती जमतीमुळे  घर मात्र हसत खेळत असायचे.

निशांतचा स्वभाव मात्र नीरजच्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्ध होता. थोडा शांत स्वभावाचा निशांत जरा जास्तच समजूतदार होता. त्यालाही मग नीरज आणि नंदिनीच्या सुरु असलेल्या या गमतीजमतीवर खूपच हसू यायचे. नंदिनीचा त्यावेळी त्याला खूपच हेवा वाटायचा.
"नातं जपण्याची कला कोणी नंदिनीकडून शिकावी." मनोमन निशांत बायकोचे नेहमीच कौतुक करायचा. पण सध्या नीरजमुळे नंदिनीचा मूड मात्र काही अंशी का होइना पण बरा झाला होता. त्यामुळे निशांतलाही थोडे हायसे वाटले.

क्रमशः

ह्या हसत्या खेळत्या घराला कोणाची दृष्ट तर नाही ना लागणार ?? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरु नका.

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//