मायेचा पदर ( भाग २)

आई वडिलांनंतर लेकीला माहेर परके होते हा समज सगळ्यांच्याच बाबतीत खरा होतो असे नाही.काही अपवादही असतात याला.

कथेचे नाव - मायेचा पदर..

विषय - कौटुंबिक कथामालिका

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

"काय मग आक्का कशी आहेस? कसा झाला मग कालचा प्रवास..? सुधाकररावांनी बाहेरुन येताच आपल्या लाडक्या बहिणीची चौकशी केली.

"खूपच लवकर विचारलं रे बाबा. आजकाल तुम्ही सगळेच जण खूपच बिझी झालात. इथे कोणाला बोलायलाही वेळ नाही."

बोलता बोलता आत्याबाईंनी टोमणा मारलाच भावाला.

"अगं रात्री थोडं कामात होतो. आमची सामाजिक कार्यकर्त्यांची मीटिंग होती काल त्यासाठीच गेलो होतो. यायला थोडा उशीरच झाला. आल्यावर समजलं तू आली आहेस."

" हो का..? म्हणजे मी येणार आहे हे आधी माहीतच नव्हतं वाटतं तुला.?"
"साधा एक फोन नाही, ना काही चौकशी. निघालीस की नाही? गाडी भेटली की नाही? गाडीत बसायला जागा मिळाली  की नाही? लांबचा प्रवास आहे. काळजी घे. एवढं जरी बोलला असता ना तरी बरं वाटलं असतं रे माझ्या जीवाला."

"माहिती होती ग मला तू येणार आहेस ते. सुलभाने मला परवाच सांगितले होते. पण मीच काल थोडा गडबडीत होतो."

" हो रे बाबा. समजू शकते मी तुम्हा सगळ्यांचीच कामाची गडबड. सून आली नि सगळ्यांनी कसं स्वतःला कामात अगदी वाहून घेतलंय. तुमच्या बाबतीत थोडं उलटच झालंय नाही??"
आत्याबाई मात्र भावाला टोमणा मारायची एक संधी सोडत नव्हत्या.

"पण कितीही काम असलं तरी एक ते चारची वेळ काही चुकायची नाही हो तुमची. त्यात काही खंड नाही पडायचा."

पुन्हा एकदा खोचक टोमणा देत पुणेकरांच्या जणू वर्मावरच बोट ठेवले होते आत्याबाईंनी.

" नाही आ आक्का. मी काल दुपारी दोन अडीचलाच घराबाहेर पडलो होतो आणि आजकाल एक ते चारची वेळ तर अजिबात पाळत नाही मी. आजकाल तेव्हढा वेळही नसतो आराम करायला. आणि तशीही मला दुपारी आराम करायची आधीपासूनच सवय नाही. आता कुठे थोडाफार वेळ मिळतो त्यातही कामात स्वत:ला गुंतवून घेतो.
कारण माणसाने कसं नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी कामात गुंतवून ठेवावं. आणि आपला वेळ सत्कारणी लावून निरोगी आयुष्य जगावं."

" तसंही माझ्या बाबतीत तो नियम फक्त नावालाच आहे बरं का. हा आता घरातील बायकांना करावेच लागते त्या नियमाचे पालन म्हणा." सुलभा काकूंकडे एक कटाक्ष टाकत सुधाकरराव थोडे गमतीच्या सुरात बोलले.

"म्हणजे आम्ही घरात नुसत्या झोपाच काढतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बायकांना ते सोडून इतरही खूप कामं असतात हो घरात." सुलभा काकू म्हणाल्या.

"बस झालं तुमचं समाजज्ञान. नका ऐकवू मला. जरा घरातही लक्ष दे सुधाकर आता. समाजाचं हित करायच्या नादात घरचं हित राहून जायचं." आत्याबाई हळूहळू मूळ मुद्द्याकडे सरकत होत्या.

"घरात लक्ष घालायचे दिवस गेले ग आता आक्का. आता सुरु झाले मुलांचे राज्य. आणि मुलेही ते उत्तमरीत्या सांभाळत आहेत. काळजीचे कारणच नाही बघ आता. स्वामींच्या कृपेने पूर्वी केलेल्या कष्टाचे चीज झाले बघ. आता उरलेले दिवस आनंदात आणि मनासारखे जगायचे." सुधाकरराव म्हणाले.

"आणि नातवाचे तोंड कधी पाहायचे मग.? दुसरी सून घरात यायच्या आत एक तरी नातवंडं नको का घरात.? तुझ्या बायकोला समजावून दमले आता. पण ती काही सुनेला हिताच्या चार गोष्टी सांगायची नाही. निदान तू तरी सांगून बघ सोनूला."

(आत्याबाई निशांतला लाडाने सोनू म्हणत. हा पण फक्त त्या एकट्याच बरं का. बाकी कोणी त्याला सोनू म्हणायचं नाही हा आत्याबाईंचाच नियम. कोणत्याच मुलाला टोपण नाव ठेवायचं नाही. त्यामुळे त्यांची मूळ ओळख हरवते. म्हणून हा नियम. पण घरातील पहिले बाळ. आत्याबाईंचा पहिला लाडका भाचा निशांत. निशांतवर थोडा जास्तच जीव आत्याबाईंचा. लहानपणी प्रत्येक सुट्टीला निशांतला आत्याबाई त्यांच्या गावी घेवून जायच्या. तोही रमायचा मग त्यांच्याकडे.

स्वत:च्या मुलांमधे आणि निशांतमध्ये आत्याबाईंनी कधीच भेदभाव केला नाही. आत्याबाईंना दोन मुली आणि एक मुलगा. पण मुलगा लहानपणीच हे जग सोडून गेला. तेव्हा तर आत्याबाई इतक्या खचल्या की पुन्हा त्या उभ्या राहू शकतील की नाही याचीच चिंता होती साऱ्यांना.  निशांत आणि आत्याबाईंचा मुलगा जवळपास एकाच वयाचे. त्या प्रसंगानंतर आत्याबाई निशांतमधेच आपल्या मुलाला पाहायच्या. त्यांचा मुलगा जर आज असता तर आत्याबाईंनादेखील एखादे नातवंडं नक्कीच असते.  म्हणून तर कधी एकदा नंदिनीची गोड बातमी कानावर येते असे झाले होते त्यांना. निशांत आणि नंदिनीच्या बाळाची गोड स्वप्न त्या मनोमन रंगवतही होत्या.)

"अगं आक्का आजकाल असं सांगतं का कोणी? मुले शिकलेली आहेत. त्यांचे निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत. त्यांचेही काही प्लॅन असू शकतात. त्यात आपण काय बोलणार."

"अहो मीही तेच सांगितले आत्याबाईंना. बरं नाही वाटत असं मुलांच्या पर्सनल लाइफ मध्ये लक्ष घालायला." सुलभा काकू म्हणाल्या.

"दोघं कसे अगदी सारख्याला वारके मिळालेत हो तुम्ही. एकाच विचाराने चालणारे. द्या द्या आणखी सूट द्या लेकाला आणि सुनेला. होवू द्या मग त्यांची पर्सनल गोष्ट सार्वजनिक. वेळीच जर काही गोष्टी नाही लक्षात आल्या तर एक ना एक दिवस ते होणारच आहे म्हणा.
ही आजकालची मुलं नको त्या गोष्टींचे प्लॅनिंग करण्यात वेळ घालवतात आणि निम्मं आयुष्य त्यातच वाया घालवतात. आता नाही विचार करायचा मुलाबाळाचा  मग काय म्हातारपणी करायचा का??
येवू दे सोनूला मीच बोलते त्याच्याशी."

"बरं बाई तुला जे वाटते ते कर. मी येतो माझे काम आटोपून पटकन्. तुझं आपलं चालू दे." एवढे बोलून सुधाकररावदेखील आक्काच्या तावडीतून निसटले.

सकाळची दुपार झाली पण अजूनही निशांत आणि नंदिनी आले नाहीत म्हणून सुलभा काकूंनी फोन करुन चौकशी केली तर "आणखी किती वेळ लागेल ते नाही सांगू शकत. तुम्ही जेवण करुन घ्या. आम्ही बाहेरच खावून येतो काहीतरी."निशांत म्हणाला.

सुलभा काकू देखील चिंतेत पडल्या. "देवा ह्यावेळी तरी नको नाराज करु लेकरांना. येवू दे त्यांच्या  प्रयत्नांना यश." म्हणत त्यांनी देवाला साकडे घातले.

तेवढ्यात आत्याबाईंचा आवाज आला. "अगं ये सुलभा पोरांना फोन तरी करुन बघ. वाजले बघ किती? जेवायचा टाईम उलटून गेला."

"केला होता फोन आत्ताच. वेळ लागेल अजून निशांत म्हणाला. चला आपण जेवून घेवू. ते बाहेरच जेवून येतील."

" काय ग.. असं कोणतं महत्त्वाचं काम करायला गेलेत दोघं.?" आत्याबाईंचा पुन्हा प्रश्न.

" तुम्ही जेवून घ्या बरं आधी. मी सांगते नंतर."

" हे बघ सुलभे, माझ्यापासून काही लपवत असशील तर तसं सांगून टाक आत्ताच. म्हणजे मी तरी पुन्हा पुन्हा नाही विचारणार तुला काही."

"आत्याबाई, काळजीचं काही कारण नाही. योग्य वेळ आली की सांगेल तुम्हाला. नका काळजी करु."

" आता आत्याबाई देखील काळजीत पडल्या. म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे. देवा मला जी शंका येतिये तसं काही कारण नसलं म्हणजे मिळवलं."

"काय ग सुलभा, एक विचारु?"

" विचारा की."

"लग्नाआधी सूनबाई नोकरी करत होती ना आणि लग्न झाल्यावर पण  काही दिवस जात होती ना ऑफिसला? मग मध्येच असा जॉब का सोडला तिने?"

"अहो निशांतने आणि नंदिनीने मिळून तो निर्णय घेतलाय. दोघांनीही दिवसभर असं घराबाहेर राहायचं मग घरासाठी, एकमेकांसाठी वेळ कधी द्यायचा? असा विचार करुन नंदिनी स्वतःच म्हणाली थोडे दिवस ब्रेक घेते म्हणून. कारण वर्कलोड पण खूपच होता तिचा. सकाळी लवकर जावं लागायचं आणि रात्री उशीरा यायची. त्यातच थकून जायची पोरगी. मग तिचं तिनेच ठरवलं."

" म्हणजे आता पुन्हा नोकरी वगैरे करण्याचं खुळ नाही ना तिच्या डोक्यात. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तर आज गेली नाही ना ती..?"

" नाही ओ आत्याबाई. त्यांचं वेगळंच काम आहे."

" वेगळं आहे पण मला सांगायचं नाही. हो ना."

" असं काही नाही ओ, घ्या ना समजून थोडंसं." लवकरच कळेल तुम्हालाही."

दुपारचे जेवण आटोपून आत्याबाई त्यांच्या खोलीत जावून पडल्या थोडा वेळ. सुलभाकाकू  मात्र मुलांची वाट पाहत तशाच बसून राहिल्या. सारखं सारखं फोन करुन विचारणंदेखील त्यांना योग्य वाटेना. तरी न राहवून त्यांनी केलाच फोन निशांतला.

" आई येतोच अर्ध्या तासात. निघालोय आता."

आता कुठे सुलभा काकूंच्या जीवात जीव आला. कधी एकदा मुले घरी येतात असं झालं होतं त्यांना. मुलांची वाट पाहत त्या तशाच बसून राहिल्या.

नक्की नंदिनी आणि निशांत कोणत्या कामासाठी बाहेर गेले असावेत बरं? आत्याबाईंना समजेल का याचे कारण?
जाणून घेण्यासाठी भाग तीन वाचायला विसरु नका.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all