Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

मायेचा पदर (भाग १)

Read Later
मायेचा पदर (भाग १)


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

"मायेचा पदर" ही एक कौटुंबिक कथामालिका आहे. कुटुंब म्हटले की माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, काळजी, एकमेकांबद्दलची आपुलकी, प्रसंगी वादविवाद, मतभेद या साऱ्या गोष्टींबरोबरच एकाच छताखाली वावरणारी विविध स्वभावाची मंडळी नात्यांच्या एकाच माळेत गुंफली जातात.
स्वभाव कितीही विरोधी असले तरी एकमेकांना समजून घेत आयुष्याची वाटचाल ही करावीच लागते. "मायेचा पदर" ही एका सुशिक्षित कुटुंबाची कहाणी. आयुष्यात येणारे चढ-उतार, यश - अपयश, सुख-दुःख या साऱ्यांतून मार्ग काढत जीवनाचा प्रवास हा सुरुच असतो.
कधी कधी सारं काही असूनही आयुष्य अगदी नीरस वाटतं. अशावेळी मनाला समजवायला आवश्यकता असते ती आपल्या हक्काच्या माणसांची. हक्काच्या त्या मायेच्या पदराची ऊब प्रत्येकालाच जीवनात पुढे वाटचाल करण्यासाठी कामी येत असते. अशाच मायेच्या धाग्यात गुंफलेल्या सामंत कुटुंबाची ही कहाणी. कधी मनाला हळवे करणारी तर कधी अलगद गाली हास्य फुलवणारी. पण मायेच्या प्रेमळ धाग्यात साऱ्या कुटुंबाला एकत्र घट्ट बांधून ठेवणारी.
म्हणूनच..

मायेचा पदर हवा आधारासाठी..
खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी..
आले कितीही दुःखाचे डोंगर तरी ,
भेदूनी त्यांना वाट गवसते मग सुखाच्या गावची..
************************************************

"नंदिनी अगं आवरले की नाही तुझे? आवर पटकन, बरोबर अकरा वाजताची अपॉइंमेंट आहे.
काय सुरु आहे तुझं नेमकं? ये बरं बाहेर लवकर."

निशांतने बायकोला आवाज दिला.

"आले आले एवढे कपडे टाकू द्या दोरीवर. आईंचा हात नाही पोहोचणार जास्त उंचावर. दोनच मिनिटे थांबा आलेच."

"अगं राहू दे बाई. जा तू. मी करते राहिलेलं. नाहीतर पुन्हा त्याची बोलणी ऐकावी लागतील तुला. आधीच म्हणत असतो सारखा, तुम्ही दोघी सासू सुना बाहेर नेण्याच्या कामाच्याच नाहीत. रोज घरातच असता तरी तुमची कामं काही संपतच नाहीत."

"झालंच हो आई, आणि तसंही पुरुषांना काय कळणार ह्या बाबतीत बाईच्या भावना काय असतात ते. त्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा."
एकमेकींकडे पाहून दोघी सासू सुना गालातल्या गालात हसल्या.

"नंदिनी.." पुन्हा एकदा निशांतने आवाज दिला.

"आता राहू दे बाई, बाकीचं मी ठेवते उचलून सगळं. तू जा पळ."

दोघी सासू सुना आता कुठे जेमतेम एक वर्षाच्याच सोबती झाल्या होत्या. पण दोघींचे सुर मात्र छान जुळले होते. नंदिनी आणि निशांतच्या लग्नाला आता कुठे एक वर्ष झालं होतं.
घराला साजेशी सून सुलभा काकूंनी शोधली होती.

निशांत आणि नंदिनी यांचा एक वर्षांपूर्वी थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला होता. निशांत हा सुधाकरराव सामंतांचा मोठा मुलगा. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला निशांत एका नामांकित कंपनीत बक्कळ पगाराच्या नोकरीवर रुजू झाला नि घरातील मंडळींनी त्याच्यासाठी वधू संशोधन सुरु केले. उंचपुरा, नाकी डोळी नीटस, थोडासा सावळा जरी असला तरी त्याचे देखणे व्यक्तिमत्त्व हे अगदी सहजच कोणाच्याही नजरेत भरायचे.

नंदिनीदेखील काही कमी नव्हती बरं का. दिसायला गोरीपान, उंच, नाकी डोळी नीटस, सुडौल बांधा, पाठीवर रुळणारी लांबसडक वेणी ह्या सर्व गोष्टी नंदिनीच्या सौंदर्यात आणखीच भर घालत होत्या. निशांतच्या तुलनेत मात्र नंदिनी थोडी  उजवी होती. तिच्या माहेरी देखील कशाची म्हणून कमी नव्हती. वडील शिक्षक त्यामुळे अगदी लहान वयातच खूप छान संस्कार त्यांनी तिच्यावर केले होते.
स्तोत्र पाठांतरात तर तिचा कोणी हात धरुच शकत नव्हते. तीन भावंडांत मधली नंदिनी. मोठी बहीण स्वानंदी आणि धाकटा भाऊ अमेय. असा काय तो तिचा माहेरचा परिवार. अत्यंत संस्कारांत वाढलेली ही मुले.

सासरही उत्तम मिळालं होतं नंदिनीला. आईची माया देणारी सासू, वडीलांप्रमाणे जीव लावणारे सासरे, लहान भावाच्या रुपात लहान दीर नीरज, मोठ्या बहिणीच्या रुपात असलेली नणंद नीलिमा आणि विशेष म्हणजे नंदिनीवर जीवापाड प्रेम करणारा, तिच्या भावना समजून घेणारा तिचा नवरा निशांत. नंदिनीचे सासर म्हणजे जणू माहेरचीच प्रतिमा.

याव्यतिरिक्त चुलत सासरे, आत्ते सासूबाई, मावससासूबाई इतकंच नाही तर आजेसासूबाई असा खूप मोठ्ठा गोतावळा होता नंदिनीच्या सासरी. निशांतचे छोटे काका गावी शेती पाहत होते. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले त्यांचे टुमदार घर, घर कसलं वाडाच होता मोठा. सणावाराला सारे एकत्र जमायचे. गोकुळासारखे घर भरलेले वाटायचे त्यावेळी. अगदी दृष्ट लागण्याजोगे.

निशांतने आवाज दिला तशी नंदिनी धावतच बाहेर आली. टेबलावर असलेली पर्स आणि  फाईल घेवून घाईतच मग दोघेही घराबाहेर पडले.

तेवढ्यात कालच गावावरुन आलेली निशांतची आत्या सुलभा काकूंना म्हणजेच निशांतच्या आईला म्हणाल्या, " कुठे गेले हे दोघं हुंदडायला?"

"थोडं काम होतं त्यांचं. म्हणून गेलेत." सुलभा काकू उत्तरल्या.

"दोघं एकाच वेळी.? असं काय खास काम होतं बाई. आणि आज भेटली का सोनूला(निशांतला) सुट्टी? काल तर मला स्टेशनवर घ्यायला यायला वेळ नव्हता त्याला आणि आज चक्क सुट्टी घेतली पोराने बायकोसोबत फिरायला."

"ऐका ना आत्याबाई.अहो तुम्ही उगीच गैरसमज करुन घेताय. ते दोघे फिरायला  नाही गेलेत. त्यांचं काम होतं महत्त्वाचं. विनाकारण निशांत सुट्टी नाही घेत कधी ऑफीसमधून."
पण काय काम होतं हे सांगण्याचं मात्र सुलभा ताईंनी जाणूनबुजून टाळलं.

"तुम्ही आधी नाश्ता करुन घ्या बरं. तुम्हाला गोळी घ्यावी लागते ना. येतील ते त्यांचं काम झालं की."

निशांतच्या आत्याला सुलभा काकू आत्याबाई म्हणून हाक मारत असत. मोठ्या नणंदेचा खूप मान राखत सुलभा काकू. सासूपेक्षाही जास्त ननंदेचाच धाक वाटायचा त्यांना. पण आदरयुक्त धाक बरं का. तसं खूप छान जमायचं दोघींचं. पण घरात अशी एक तरी व्यक्ती कडक शिस्तीची असायलाच पाहिजे. त्याशिवाय घराला शिस्त लागत नाही. निशांतच्या आजोबांवर ह्या आत्याबाई गेल्या होत्या. वडीलांकडूनच घर कसं बांधून ठेवायचं? घराला, घरातील माणसांना शिस्त कशी लावायची? हे त्यांच्याकडूनच शिकल्या होत्या त्या.

घरात सगळ्या भावंडांत मोठ्या होत्या त्या. पण त्यांचा धाकही तितकाच होता. थोड्या जुन्या विचारांच्या होत्या पण तशा मायाळू पण होत्या. वर्षातील दोन तीन महिने तरी त्या अशा माहेरी येवून राहायच्या. इकडे राहिल्या तरी त्यांच्या सासरच्या कामाचे सर्व नियोजन त्या चोखपणे पार पाडत. पण सगळ्यांवर कसं अगदी बारीक लक्ष असायचं त्यांचं. आई-वडिलांनंतर लेकिंना माहेर परकं होतं अशी प्रथा प्रचलित आहे समाजात. पण सामंतांचे घर या गोष्टीला अपवाद होते बरं का.

नंदिनी निशांतसोबत बाहेर गेली खरं पण आत्याबाईंच्या डोक्यात मात्र असंख्य विचारांचे थैमान सुरु झाले. 
"मला एक सांग सुलभे तुझ्या लेकाचं आणि सुनेचं नेमकं चाललंय तरी काय ग? वर्ष उलटलं की आता लग्नाला. जरा पोराबाळाचं मनावर घ्या म्हणावं आता." आत्याबाई खोचकपणे बोलल्या. तशा त्या थोड्या फटकळ स्वभावाच्याच होत्या. पण काही वेळा असं स्पष्ट बोलणंही गरजेचच असतं.

"झालं...जे टाळायला पाहातिये नेमकं तेच समोर येतंय." सुलभा काकू मनातल्या मनात बोलल्या.

"अहो आत्याबाई तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ओ. आजकाल असं कुणी सांगितलेलं नाही आवडत मुलांना. आणि तसंही ते दोघेही खूप समजूतदार आहेत. त्यांना नाही प्रत्येक गोष्ट शिकवावी लागत. आता कुठे लग्नाला वर्षच तर झालंय. तुम्ही नका टेंशन घेवू. होईल सगळं ठिक."

"तू अशीच राहा. तू काही सुधरणार नाहीस. अगं जे टेंशन तू घ्यायला हवंय ते मला येतंय. आणि तसंही काही गोष्टी या वेळेतच व्हायला पाहिजेत. एक वर्षात घरात पाळणा हा हलायलाच हवा होता. पण नाही तुला सांगून काही उपयोग आहे का?"
"एक सासू म्हणून काही गोष्टी सुनेला शिकवणं, समजावणं हे तुझं काम आहे. पण नाही."

"आत्याबाई, अहो आजकालची ही पिढी आपल्यापेक्षा हुशार आहे हो. सोशल मिडियाच्या जगात वावरणारी ही मुलं, चांगल्या वाईटातला फरक बरोबर ओळखतात. तुम्ही नका काळजी करु."

"माहिती आहे मला. सुनेला कसं मोकळं सोडलंय तू. दिसतंय मला सगळं. एक दिवस मिऱ्या नाही वाटल्या तुझ्या डोक्यावर तिने म्हणजे मिळवलं. जरा धाकात ठेवायला शिक सुनेला.अजून एक सून यायची बाकी आहे तुला. हिला ताब्यात ठेवलं तरच दुसरीही ताब्यात राहील. नाहीतर आधीच मी म्हटलंय तुझं काही खरं नाही म्हणून"

"अहो नंदिनी तशी नाही ओ आत्याबाई. उलट त्याबाबतीत मी देवाचे खूप आभार मानते. स्वामींच्या कृपेने मला इतकी समजूतदार सून मिळाली. काय हवं आणखी. नाही का?"

" हो असू दे, नको सांगू तुझ्या सुनेचं कौतुक. मी स्वतःच्या डोळ्याने काही गोष्टी पाहिल्याशिवाय आणि प्रत्यक्ष तिचा अनुभव घेतल्याशिवाय नाही विश्वास ठेवायची."

"आता आत्याबाईंचे हे पुराण एकदा सुरु झाले की थांबायचेच नाही. त्यापेक्षा आपणच गेलेलं बरं आपल्या कामाला."  म्हणत  सुलभा काकू किचनमध्ये निघून गेल्या. नंदिनीने सगळा स्वयंपाक करुन ठेवला होता. भांडी तेवढी घासायची बाकी होती. त्यात कामवाल्या मावशींची आज सुट्टी. म्हणून मग सुलभा काकूंनी स्वतःच भांडी घासायला सुरुवात केली. नंदिनीला किती वेळ लागेल यायला काहीच अंदाज नव्हता. आणि तसंही कामाच्या बाबतीत सुलभा काकू कधीच सुनेची वाट पाहत नसत. नंदिनीदेखील तिची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होती. त्यामुळे दोघींचं ट्यूनिंग मात्र उत्तम जुळलं होतं.

"घे घे सुनेला आणखी घे डोक्यावर. तुझ्यासारखी सासू शोधून सापडायची नाही या जगात. ती आल्यावर घासेल की भांडी. तुला काय एवढी घाई आहे ग? आता मलाच लक्ष घालावं लागेल यात." आत्याबाई थोड्या चरफडतच बोलल्या.

तेवढ्यात निशांतचे वडील म्हणजेच आत्याबाईंचे धाकटे बंधू सुधाकरराव बाहेरुन आले. स्वेच्छा निवृत्ती घेवून त्यांचा अमूल्य असा वेळ त्यांनी सामाजिक कार्यासाठी देण्याचे ठरवले होते. याआधी ते एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होते.

शंभर रु. वेतनापासून सुरु झालेला त्यांचा सांसारिक प्रवास सुलभा ताईंच्या साथीमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे यशस्वी झाला. पण आता एक मुलगा हाताशी आला, मुलगी सासरी सुखात नांदत होती. दुसरा मुलगा डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करुन इंटर्नशिप करत होता. आर्थिक आणि भौतिक दृष्ट्या घर परिपूर्ण झाले. म्हणून मग आयुष्यातील उरलेले  पुढचे दिवस समाजकार्यासाठी  द्यावेत म्हणून हा सारा अट्टाहास होता सुधाकररावांचा.

आयुष्यात गरिबी जवळून पाहिलेल्या सुधाकररावांनी शून्यातून ही सारी प्रगती केली होती. सुलभा काकू मात्र खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अन्यथा हे सारे अशक्यच.
कोणाच्या बाबतीत कधीही वाईट विचार मनात आणू नये. प्रामाणिकपणे आयुष्य जगावे. सुखामागून दुःख आणि दु:खामागून सुख हा खेळ तर सुरुच असतो आयुष्यभर. फक्त आलेल्या प्रत्येक परिस्थतीवर मार करण्यासाठी लागतो एक सकारात्मक दृष्टिकोन. आणि तो निर्माण करण्यासाठी वेळोवेळी साथ हवी असते ती आपल्या हक्काच्या माणसांची. आणि सुधाकररावांना त्यांच्या वाईट काळात आपल्या माणसांची ही साथ पुरेपूर लाभल्याने ते आज एक यशस्वी जीवन जगत होते.

क्रमश:

नाती ही अशीच असावीत वेळप्रसंगी एकमेकांना साथ देत आयुष्यात पुढे जाण्यासाठी सोबत करणारी.
असाच नात्यांतील हा गोडवा अनुभवण्यासाठी पुढील भाग जरुर वाचा.


©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//