माऊली-एक मायेची सावली. भाग-पहिला. (मराठी कथा)

कथा एका माऊलीच्या प्रेमाची........ लढाई एका स्त्रीच्या आईपणाची.......

माऊली-एक मायेची सावली. भाग-पहिला.

[सदर कथा ही सत्यघटनेवर आधारित असून वास्तवाला थोडी कल्पनेची जोड देऊन लिहीलेली आहे, तरी कोणत्याही घटनेशी साधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.]


 

कराडच्या स्वर्गीय बाबाजी पाटलांच नाव शिक्षणक्षेत्रात खूप आदराने घेतलं जायचं. खेडेगावातील आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक महाविद्यालय काढलं होतं. या महाविद्यालयात मोफत शिक्षण दिल जायचं. त्यामुळे सर्वजण बाबाजी पाटलांचा आदर करायचे.

बाबाजी पाटलांच घराणं वतनदार असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आणि गडगंज होती.त्याचबरोबर त्यांच्याकडे दातृत्वही होतं.दीनदुबळ्या,रंजल्यागांजल्या लोकांना ते नेहमीच सढळ हाताने मदत करायचे.पण म्हणतात ना,

"जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला."

अगदी तसच बाबाजी पाटील सर्वांना सोडून देवाघरी गेले.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ताराबाई, मुलगा सयाजी आणि सुन नंदिनी असं कुटूंब होतं.

बाबाजी पाटील स्वर्गवासी झाल्यावर ताराबाईंनी सगळा व्याप सयाजीच्या खांद्यावर दिला.

सयाजीही बाबाजींच्या पाऊलावर पाऊल टाकत पुढे वाटचाल करत होता. आपल्या भारदस्त आणि राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे सयाजी सर्वत्र भाव खाऊन जायचा.तो बुलेटवर बसल्यावर एवढा रुबाबदार दिसायचा की तरुणवृद्ध सगळ्यांना त्याचा हेवा वाटायचा.

तशीच सयाजीची पत्नी नंदिनी ही अस्सल लावण्यखणी होती.तिच्या सौंदर्यापुढे  स्वर्गातील अप्सरासुद्धा लाजून चुर्र व्हावी असं तीच सौंदर्य होतं

सयाजीच्या घरी सुखसमाधान आनंदाने नांदत होतं. ऐश्वर्य जणू त्याच्या घरचा सदस्य असल्यासारखं घरी मुक्काम करून होतं.

एकमेकांना अनुरूप असणाऱ्या सयाजी आणि नंदिनी यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं,दोघेही एकमेकांपासून कधी जास्तकाळ दूर राहत नव्हते. या दोघांच्या संसारवेलीवर शुभ्रा आणि श्वेता नावाच्या दोन गोंडस कळ्या उमलल्या होत्या.दोघीही अगदी गोंडस, लाघवी आणि बोलक्या होत्या.त्यांचे ते बोबडे शब्द ऐकून सगळ्यांना ते ऐकतच रहावं असं वाटायचं,या दोघींच्या बाललीला पाहणारा त्यांच्यातच हरवून जायचा.

असेच मस्त मजेत दिवस जात होते.

एकेदिवशी सयाजीची आई त्याला म्हणाली,

"सयाजी आता पुढचा काय विचार केला आहेस?"

सयाजीला  याचा काही अर्थ लागला नाही म्हणून त्याने प्रश्नार्थक हावभाव करत विचारलं,

"आई तुला काय म्हणायचं आहे? मी समजलो नाही."

यावर आई म्हणाली,

"अरे दोन मुली झाल्या, पण आता मुलगा व्हावा म्हणून कायतरी ठरवायला नको का?"

यावर सयाजी म्हणाला,

"आई एवढी काय घाई आहे गं? बघू की सावकाश."

यावर थोड्या नाराजीच्या सुरात आई म्हणाली,

"सावकाश कधी? मुलींना तीन वर्ष झाली. अजून किती वेळ थांबणार आहेस?"

सयाजी म्हणाला,

"आई,जेव्हा नशिबात असेल तेव्हा सगळं घडून येईल. तू उगाच घाई नको करू."

आई वैतागून म्हणाली,

"माझे डोळे बंद होण्याआधी मला नातवाचं तोंड बघायचं आहे. काय करायचं ते तू ठरव.माझी अर्धी लाकडं स्मशानात पोहोचली आहेत.मी आज आहे तर उद्या नाही."

सयाजी आईला समजावत,

"आई असं निर्वाणीचं बोलू नको,तुला अजून खूप जगायचं आहे.आम्हाला तुझी गरज आहे आई.अशीं सोडून जाण्याची भीती नको घालू."

यावर आई म्हणाली,

"मग मी सांगितलं ते मनावर घे आणि या पाटील घराण्याचा वंशज लवकर या वाड्यात येऊदे."

सयाजी म्हणाला,

"ठीक आहे आई, तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल."

हे ऐकून आई सुखावून गेली,तिच्या डोळ्यासमोर तिचा नातू तिच्याकडे झेपावताना तिला दिसू लागला आणि ती मनातल्या मनात हर्षोउल्हासीत होऊन हसू लागली.

सयाजीने आतापर्यंत मुलाचा विचार केला नव्हता,कारण तो आपल्या दोन्ही मुलींमध्ये रममाण असायचा.

तसा त्याने कधी मुलगा मुलगी असा भेदभाव केला नव्हता,पण आईच्या बोलण्यामुळे त्याच्याही डोक्यात आता मुलाचा विचार पिंगा घालू लागला होता.

एकेदिवशी एकांतात असताना तो नंदिनीला म्हणाला,

"नंदिनी, अगं आई म्हणतं होती की,…….."

त्याने वाक्य अर्धवट सोडून दिल.

त्यावर नंदिनी प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली,

"काय झालं? काय म्हणत होत्या आत्या?"

सयाजी गालात हसत म्हणाला,

"अगं ती म्हणतं होती की, तिला लवकरात लवकर नातवाचा चेहरा बघायचा आहे."

हे ऐकताच नंदिनी लाजेने चुर्र झाली आणि नजर दुसरीकडे वळवून गालात हसू लागली.

हे बघून सयाजी तिला लाडिकपणे म्हणाला,

"अगं काय झालं? इकडे बघ ना. लाजतेस काय एवढी?आपल्याला याआधी दोन मुली झाल्या आहेत. त्यात नवीन काय आहे?"

नंदिनी त्याच्याकडे बघत म्हणाली,

"जा तिकडं, तुमचं आपल काहीतरीच असतं बाई."

यावर सयाजी लाडात येऊन तिचा हात पकडून म्हणाला,

"अगं,अगं एवढीपण लाजू नको.ऐकून तर घे."

नंदिनी आपला हात सोडवून हसत हसत तिथून निसटली.

पण तिने सयाजीजवळ विषय टाळला असला तरी,आता मुलाचा विचार तिच्याही मनात रुंजी घालत होता. तिलाही वाटत होतं की आपल्या मुलींबरोबर आपला एक गोंडस राजकुमारही असावा. जो धुडूधुडू सगळ्या वाड्यातून पळत सुटावा आणि आपण त्याच्या मागे पळत त्याला अलगदपणे पकडून काळजाशी कवटाळावं.तसेच आईंना हवा असणारा 'पाटील' घराण्याचा वंशाचा दिवा लवकरच या वाड्यात जन्माला यावा.

अशातच एकेदिवशी सयाजी आणि नंदिनीने आपल्या फॅमिली डॉक्टर असणाऱ्या डॉक्टर पत्की यांची अपॉइंटमेंट घेतली.

डॉ. पत्कीजवळ त्यांनी मुलाची इच्छा व्यक्त केली.

सयाजी म्हणाला,

"डॉक्टरसाहेब, आम्ही पुन्हा एकदा प्रेग्ननन्सी चान्स घ्यायचं ठरवलं आहे. म्हणून तुमचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे."

डॉ पत्कींनी आपला चष्मा थोडासा खाली करून सयाजी आणि नंदिनीकडे एक कटाक्ष टाकला.

हे पाहून सयाजी आणि नंदिनीने लाजून मान खाली घातली.

थोड्या वेळाच्या शांततेनंतर डॉ पत्की म्हणाले,

"सयाजी आणि नंदिनी, मी तुमचा फॅमिली डॉक्टर आहे.बाबाजी पाटलांच्या पासून मी तुमच्या कुटुंबाशी जोडला गेलो आहे. मला तुम्ही तुमच्या कुटुंबाचाच एक भाग समजता, तसा मीही समजतो.

गेल्या प्रेगनन्सीत दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यामुळे नंदिनीला प्रचंड त्रास झाला होता, हे आपण जाणताच.

पुन्हा लगेच प्रेगनन्सी चान्स नको म्हणून आपण तेव्हा नंदिनीला कॉपर टी देखील बसवली आहे.

आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला पुन्हा मुलं हवंच असेल तर आपण ती कॉपर टी काढून टाकू. पण……………….."

सयाजी अधीरपणे म्हणाला,

"पण काय डॉक्टर साहेब? काही प्रॉब्लेम आहे काय?"

नंदिनीसुद्धा डॉ.पत्कींच्या तोंडाकडे बघत राहिली.

एक दीर्घ श्वास घेत डॉ.पत्की म्हणाले,

"अहं…..काही नाही. आपण काही आवश्यक टेस्ट आहेत त्या करून घेऊ. त्याचे रिपोर्ट्स पाहून मग पुढची चर्चा करू."

डॉ. पत्कींनी त्यांना कोणकोणत्या टेस्ट करायच्या ते एका लेटरवर लिहून दिलं आणि आपल्या लॅबोरेटरी तसेच सोनोग्राफी विभागाकडे जाण्यास सांगितलं.

सर्व टेस्टसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया पूर्ण करून डॉक्टर पत्कींचा निरोप घेऊन सयाजी आणि ना नंदिनी घरी आले.

घरी आल्याआल्या आईने उत्साहात प्रश्न विचारला,

"काय म्हणाले डॉक्टरसाहेब? सगळं ठीक आहे ना?"

यावर सयाजी म्हणाला,

"होय सगळं ठीक आहे, पण काही टेस्ट केल्या आहेत. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढचं बोलू म्हणाले."

यावर आई आत्मविश्वास दाखवत म्हणाली,

"सगळं ठीकच असणार आहे आणि लवकरच माझा नातू या घरात येणार."

यावर सयाजी आणि नंदिनीने होकारार्थी मान हलवली.

पण दोघांच्याही मनाला डॉ. पत्कींच्या पण………… च्या पुढे नक्की काय होतं?याचा घोर लागला होता. त्याचबरोबर टेस्टचा रिपोर्ट काय येईल? याचीही काळजी वाटत होती. पण त्यासाठी उद्याच्या दिवसाची वाट पाहावी लागणार होती.

क्रमशः

काय असेल डॉ. पत्कींच्या, पण… च्या पुढच वाक्य आणि काय असेल नंदिनीचा रिपोर्ट? याची उत्तरं मिळण्यासाठी पाहूया भाग दोन.


 

©®श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.

9975288835.



 

🎭 Series Post

View all