माऊली-एक मायेची सावली. भाग-पंधरा(अंतिम)

अंतिम भाग.

माऊली-एक मायेची सावली. भाग-पंधरा[अंतिम]


 

सयाजीला नंदिनीचा भास झाला की, ती खरोखरचं आली होती हे त्याला समजत नव्हतं.पण पुढे काय करायचं आहे हे मात्र त्याला समजलं होतं.

त्याच्या मनावरचा ताण आता हलका झाला होता.त्याने उत्साहात गाडी सुरु केली आणि तो घरी निघाला.त्याच्यातला आत्मविश्वास पुन्हा उभारी घेत होता.

थोड्याच वेळात तो वाड्याच्या दारात पोहोचला.गाडी गेटमधून आत येताच भैरवीने काय ठरवलं हे ऐकण्यासाठी आईची उत्सुकता ताणली गेली.ती काठी टेकीत टेकीत बाहेर येऊन ओसरीजवळ उभी राहिली. सयाजी गाडीची चावी बोटात अडकवून गोलगोल फिरवतच आतमध्ये आला.आईने त्याच्याकडे पाहिलं तर तो प्रसन्न दिसत होता. आईने मनाशी अंदाज बांधला की,'भैरवीने सयाजीचं म्हणणं ऐकलेलं दिसतय.'

आई घाईघाईत सयाजीला म्हणाली,

"काय रे सयाजी!स्वारी जाम खूष दिसत आहे. भैरवीने तुझं म्हणणं ऐकलेलं दिसतंय."

यावर सयाजी हसतच म्हणाला,

"नाही आई. तिने माझं काहीच नाही ऐकलं. ती तिच्या भूमिकेवर ठाम आहे."

आई अचंबित होऊन म्हणाली,

"अरे मग तू इतका आंनदी का झाला आहेस? तिने नकार दिला याचा तुला आनंद झाला की काय?"

सयाजी आईला म्हणाला,

"आई!आजवर आपण फक्त आपला विचार करत होतो. स्वार्थाच्या पट्टीने आपले डोळे असे बंद केले होते की न्याय-अन्याय,चूक-बरोबर काहीच आपल्याला दिसत नव्हतं. पण नंदिनीने आज माझे डोळे उघडले."

आई हैराण होऊन म्हणाली,

"सयाजी!तू काय बोलत आहेस? तुझं तुला तरी कळतंय का? अचानक न्याय-अन्यायाच्या गोष्टी कशा करायला लागलास?आणि नंदिनीने डोळे उघडले म्हणजे?मला तुझं काहीच समजेना.

सयाजी गालात हसत म्हणाला,

"अगं आई, सांगतो ऐक. आज मला नंदिनी भेटली होती, म्हणजे तिचा भास होता की आणखी काही हे मला माहित नाही. पण तिने मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली. आपण भैरवीबरोबर खूप चुकीचे वागत आहोत याची उपरती मला झाली आहे आणि मी भैरवीला सत्य सांगायचं ठरवलं आहे."

आई आश्चर्याने म्हणाली,

"बापरे!काय बोलत आहेस तू?सयाजी तुझी तब्येत ठीक आहे ना? चलं आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ."

सयाजी आईला म्हणाला,

"आई मला काही नाही झालं. मी पूर्ण शुद्धीत आहे. खूप झालं, खूप मनस्ताप झाला सगळ्यांना, पण आता बस्स झालं. मी भैरवीला सगळं सांगून तिला घरी घेऊन येणार आहे. आपल्या हट्टापायी मुलांची आणखी हेळसांड नको.

आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. यावर आणखी चर्चा नको."

आई नाईलाजाने म्हणाली,

"ठीक आहे बाबा. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मी काय पिकलं पान, आज आहे उद्या नाही.पण तुला अजून आयुष्य काढायचं आहे,त्यामुळे तुझा निर्णय तूच घेतलेला बरा."

सयाजी आईला म्हणाला,

"आई तू माझ्या निर्णयाला नक्की पाठिंबा देशील मला खात्री आहे. मी आताच भैरवीशी बोलून घेतो. आणखी वेळ लावायला नको."

सयाजी भैरवीला फोन करण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला.

एक मोठा श्वास घेऊन सयाजीने भैरवीला कॉल लावला.पण ती कॉल रिसिव्ह करत नव्हती. मग त्याने तिला टेक्स्ट मॅसेज पाठवला,

'भैरवी कॉल रिसिव्ह कर, मला आपल्याबद्दल खूप इम्पॉर्टन्ट गोष्ट सांगायची आहे.'

मॅसेज वाचल्यामुळे भैरवीने पुढचा कॉल रिसिव्ह केला.

"हॅलो!भैरवी."


 

"हो. बोला."


 

"भैरवी मला तुला खूप इम्पॉर्टन्ट गोष्ट सांगायची आहे."


 

"हो.सांगा."


 

"असं कॉलवर नको, भेटून बोलूं."


 

"सॉरी. मी तुम्हाला भेटू शकत नाही.जे काय असेल ते इथंच सांगा."



 

"अगं असं नाही सांगता येणार. मला माझी चूक समजली आहे म्हणून तु परत घरी यावं असं मला मनापासून वाटत."


 

"आता चूक समजून काय होणार? खूप वेळ केलात तुम्ही. आता या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. तेव्हा मला आणखी मनस्ताप देऊ नका."


 

"अगं मला त्यासंदर्भातचं बोलायचं आहे. तुला वाटत तसं काही संपलेलं नाही. प्लीज एकदा भेट म्हणजे तुला समजेल. एक संधी दे फक्त शेवटची."


 

थोडा विचार करून भैरवी म्हणाली,

"हम्म!ठीक आहे.उद्या घरी या तुम्ही."


 

"अंहं!घरी नको.तुमच्या गावात नदीजवळ जे शंकराचं मंदिर आहे तिथे भेटू."



 

"ठीक आहे. उद्या ठीक अकरा वाजता तुम्ही तिथे या."


 

"ठीक आहे. थँक यु सो मच."

असं म्हणून सयाजीने कॉल ठेवला.

त्याला मनावरचं एक ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं.

त्याने मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना मिठी मारून तो म्हणाला,

"बाळांनो तुमची आई आता परत येईल. मी लवकरच तिला घेऊन येईन."

मुलं खूष होऊन आनंदाने नाचू लागली. हे पाहून सयाजीचे डोळे भरून आले.

बघता बघता रात्र झाली आणि सयाजी आपल्या रूममध्ये झोपायला गेला.

आता तो उद्याचा दिवस उजाडण्याची वाट पाहत होता.

आणि तो दिवस उजाडला. सयाजीने लवकर उठून आपलं सगळं आटोपून घेतलं आणि कडेगावला अकरा वाजता पोहोचेल अशा बेताने तो गाडी घेऊन बाहेर पडला.

गाडीत त्याने आपल्या आवडीचं गाणं लावलं,

"मेहबूब मेरे, मेहबूब मेरे,

तू है तो दुनिया कितनी हसीन हैl

जो तू नही तो कुछ भी नही है,

मेहबूब मेरे, मेहबूब मेरे……………

गाण्यांच्या धुंदीत हरवून तो कधी कधी इप्सित(इच्छित)स्थळी पोहोचला त्याला कळलंच नाही.

त्याने गाडी नदीघाटाकडे वळवली.एका झाड्याच्या सावलीत आपली गाडी पार्क केली आणि तो घाटावर गेला.तिथे नदीत हातपाय स्वच्छ धुवून तो महादेवाच्या मंदिरात जाऊन बसला.मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि प्रसन्न होता.आजूबाजूला वडाची उंचच उंच डेरेदार वृक्ष,त्यांची खाली पडलेली घनदाट सावली,थंडगार वाटणारा वारा,शेजारी संथपणे वाहणारी निर्मळ नदी आणि त्या नदीच्या काठावर असलेलं हे प्राचीन शिवमंदिर.शिवमंदिरात पिंडीवर अखंडीतपणे होणारा जलाभिषेक आणि त्याचे आजूबाजूला उडणारे थेंबांचे तुषार पाहून सयाजी भान हरपून गेला.पिंडीवरती डोकं टेकून त्याने नमस्कार केला आणि मग डोळे मिटून तिथे ध्यानस्थ बसला.त्याच्या मनाला एक आत्मिक समाधान लाभत होतं. दहा मिनिटे झाल्यावर त्याला भैरवीच्या येण्याची चाहूल लागली आणि त्याने डोळे उघडले.

भैरवीनेही पिंडीला नमस्कार केला आणि सरळ विषयाला हात घालत ती म्हणाली,

"बोला, काय सांगायचं होतं?काय आहे असं ज्याने सगळं ठीक होईल असं तुम्हाला वाटत?"


 

सयाजी म्हणाला,

"भैरवी, मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला आहे. मला स्वतःचीच खुप लाज वाटत आहे."

भैरवी म्हणाली,

"हे पहा, पश्चाताप करून काही परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे उगाच स्वतःचा आणि माझा वेळ वाया घालवू नका.तुम्हाला आता जी लाज वाटत आहे ती स्वतःची सर्जरी करून घेण्याआधी वाटायला हवी होती. आता या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत."


 

सयाजी तिला समजावत म्हणाला,

"अगं तेच सत्य मला तुला सांगायचं आहे. म्हणून तुला भेटायला बाहेर बोलावलं."

भैरवी म्हणाली,

"सत्य!कसलं सत्य?"

सयाजी म्हणाला,

"भैरवी, मी सर्जरी केलेली नाही. फक्त तू बाळाचा विषय डोक्यातून काढून टाकावा म्हणून मी खोटे रिपोर्ट्स बनवून आणले आणि तू त्यावर विश्वास ठेवलास."


 

भैरवीसाठी हापण एक धक्का होता.

ती म्हणाली,

"म्हणजे? काय बोलताय तुम्ही हे? सर्जरी केली नाही!असं कस शक्य आहे?"

सयाजी तिला समजावत,

"हे बघ भैरवी. तू सारखी बाळाचा विषय काढत होती म्हणून त्या विषयातुन सुटका व्हावी म्हणून मी खोटे रिपोर्ट्स बनवून आणले होते.मी कोणत्याही डॉक्टरकडे गेलेलो नव्हतो."

भैरवी म्हणाली,

"ते रिपोर्ट्स माझ्यासाठी एक धक्का होता.त्यामुळे त्याक्षणाला मला त्याची सत्यता पडताळून पाहावं असं डोक्यातही आलं नाही."


 

सयाजी म्हणाला,

"भैरवी, झालं गेलं गंगेला मिळालं.आता तुला काही अडचण नसेल ना. मग तू आपल्या घरी परत यावंसं असं मला वाटत."


 

भैरवी म्हणाली,

"माफ करा,पण ते रिपोर्ट्स खोटे होते की तुम्ही आता खोटं बोलताय हे मला कसं समजणार?माझा विश्वासघात करणाऱ्यावर मी का विश्वास ठेवावा?"


 

सयाजी म्हणाला,

"तुझं संशय घेणं रास्त आहे, पण मी या महादेवाची शप्पथ घेऊन सांगतो की मी आता खरं बोलतोय. आतातरी तुझा विश्वास बसेल ना?"

भैरवी म्हणाली,

"अहो देवाला कशाला वेठीस धरत आहात?तुमच्यासारखे स्वार्थी लोक वेळ पडल्यास देवालाही खोटं पाडायला कमी करणार नाहीत."


 

सयाजी तिची समजूत काढत म्हणाला,

"अगं मी देवाची खोटी शप्पथ घेईन का?बर चल ठीक आहे, तू सांग काय केल म्हणजे तुझा विश्वास बसेल?"

भैरवी म्हणाली,

"माझ्या माहेरचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन टेस्ट करून घेण्याची तुमची तयारी आहे काय?"


 

सयाजी आत्मविश्वास दाखवत म्हणाला,

"हो मी कधीही तयार आहे. तू सांग कधी जायचं? आता जाऊया का?"


 

भैरवी त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली,सयाजीचं तयार होणं तिला अपेक्षित नव्हतं.

ती म्हणाली,

"ठीक आहे, पण आता नाही. अपॉइंटमेंट घेऊन मग तुम्हाला सांगेन.पण जरी तुम्ही सर्जरी केली नसली तरी तुम्हाला मनापासून आपलं मुल नको आहे.तुम्ही नाईलाज म्हणून माझा पुन्हा स्वीकार करत आहात. मुळ प्रश्न मनापासून आपलं मुलं देण्याचा आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध जरी ते या जगात आलं तरी तुमच्या मनातलं त्याच स्थान काय असेल? त्यापेक्षा आपण पुन्हा एकत्र न आलेलच बर होईल. कोणाच्या आयुष्यात जबरदस्ती करून राहणं मला मान्य नाही. त्यापेक्षा एकटी राहणं पसंत करीन."


 

सयाजी तिला समजावत म्हणाला,

"अगं तसं अजिबात नाही, मला खरोखरचं माझी चूक समजली आहे.मला दृष्टांत झालाय असं समज. तुझं मातृत्व नाकारून मी खूप मोठं पाप करतं होतो. मला मनापासून सगळं मान्य आहे. देवाने जसं चमत्कार करून तुला तुझं मातृत्व परत दिलं आहे. तसा त्याच्या मनात आलं तर तो आशीर्वाद देईल आणि तू खरोखर मातृत्व अनुभवू शकशील.विश्वास ठेव माझ्यावर पुन्हा तुला तक्रारीची संधी अजिबात देणार नाही."


 

भैरवी म्हणाली,

"ठीक आहे,मी विचार करीन. मला आता घरी गेलं पाहिजे. जास्तवेळ थांबू नको असं घरच्यांनी सांगितलय."

सयाजी म्हणाला,

"ठीक आहे, निघ तू घरी. मीपण निघतो."


 

दोघांनीही महादेवाच्या पिंडीला पुन्हा नमस्कार केला आणि एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघाले.

भैरवी घरी गेल्यावर नानांनी  तिला विचारलं,

"भैरवी!काय झालं? कशाला बोलवलं होतं त्याने तुला?"

यावर भैरवीने त्यांना सगळी वृतांत सांगितला.

ते ऐकून नाना म्हणाले,

"भैरवी बाळ!भलेही त्यांनी ऑपरेशन नसेल,पण आपल्याशी खोटंच बोलले ना ते.मग ते जे वागले ते चूकच नाही का? उद्या तो आणखी काही चुकीचं वागणार नाही कशावरून?"


 

भैरवी नानांना म्हणाली,

"बाबा!मला सगळं मान्य आहे की ते चुकीचं वागले. आपल्याशी खोटं बोलले. पण त्यांनी हे सगळं आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करूनच केल आहे. एका बापाचच काळीज ते, त्यामुळे घाबरले असेल. पण आता त्यांच्या डोळ्यात मी सत्य पाहिलंय. यावेळी ते खोटं नाही बोलत आणि मला जे आईपणाचं वरदान परत मिळालं ते कदाचित त्यांचं माझ्या आयुष्यात येण्यानेच असेल. कारण मुल होतं नाही म्हणून माझ्याशी कोणीच लग्न करत 

नव्हतं. कदाचित माझं आयुष्य असच लग्नाविना गेलं असतं. भलेही माझ्याशी लग्न करण्यामागे त्यांचा स्वार्थ होता पण सयाजींनी माझ्याशी लग्न करून मला बाईपण दिलं आणि आईपण सुद्धा नक्की देतील.बाबा एक म्हण आहे,'सुबह का भुला शामको वापस आये तो उसे भुला नहीं कहते.आणि खरंतर मलाही मुलांपासून दूर राहवत नाही.'

पुन्हा त्यांच्या आयुष्याला पोरकेपणाच्या झळा पोहचू नयेत म्हणून मीचं त्यांची माऊली बनून त्यांना आजन्म माझ्या मायेची सावली देईन."

नाना म्हणाले,

"ठीक आहे. तुला एवढा आत्मविश्वास आहे तर तसंच असेल कदाचित.

पण तरीही आमच्या खात्रीसाठी तू त्याची टेस्ट करून घ्यावी.

तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या पाठीशी असेन.पण जो निर्णय घेशील तो विचारपूर्वक घे."

भैरवीने नानांच्या सांगण्यावरून डॉक्टर पाटील यांना कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली.

भैरवीचा तो पूर्ण दिवस असाच विचार करण्यात निघून गेला.

दुसऱ्यादिवशी तिने सयाजीला डॉक्टर पाटीलांकडे बोलवून घेतलं. त्यांनी त्याच्या रिपोर्टची फाईल बघितली आणि ते म्हणाले,

"हे रिपोर्ट्स फेक आहेत. मुळात रिपोर्ट्स असेल नसतातच. रिपोर्ट्सचा पण एक साचा असतो त्याप्रमाणे रिपोर्ट्स बनतात. हे तर कोणाकडून तरी बनवून घेतले आहेत, ज्यावर ना डॉक्टरचे पूर्ण नाव आहे,ना मोबाईल नंबर आहे.मुळात या नावाचं हॉस्पिटल तरी आहे की नाही ही शंकाच आहे."


 

सयाजी भैरवीकडे बघत म्हणाला,

"बघ भैरवी, मी तुला हेच सांगत होतो.पण तुला पटत नव्हतं.डॉक्टर साहेबांनीसुद्धा हे रिपोर्ट्स खोटे आहेत म्हणून सांगितलं आहे. तरीपण मी टेस्ट करून घ्यायला तयार आहे."


 

भैरवी संभ्रमात सापडल्यामुळे हो किंवा नाही काहीच बोलली नाही.

मग सयाजी स्वतःच डॉक्टरना म्हणाला,

"डॉक्टर,मी बाप होऊ शकतो की नाही हे जाणण्यासाठी कोणती टेस्ट करायला हवी?"


 

डॉक्टर पाटील म्हणाले,

"असा टेस्टला 'फर्टिलिटी टेस्ट' असं म्हणतात."

सयाजी म्हणाला,

"ठीक आहे तुम्ही माझी टेस्ट करा."

डॉक्टर पाटील यांनी त्यांना आपल्या लॅबमध्ये जाऊन आपलं लेटर दाखवायला सांगितलं.

त्याप्रमाणे सयाजी टेस्टची प्रक्रिया पूर्ण करून आला.

डॉक्टर पाटील त्यांना म्हणाले,

"तुमचे रिपोर्ट्स उद्या मिळतील, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता."

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर सयाजी भैरवीला म्हणाला,

"रिपोर्ट्स उद्या मिळणार आहेत, ते तूच इथून घेऊन जा. तेवढ्यासाठी उद्या माझी आणखी फेरी नको आणि तसेही रिपोर्ट्स तुलाच दाखवायचे आहेत."

भैरवीने मान हलवून होकार दिला.

सयाजी आणि भैरवी आपापल्या घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता भैरवी डॉक्टर पाटील यांच्या हॉस्पिटल मध्ये गेली आणि सयाजीचे रिपोर्ट्स तिने आपल्याकडे घेतले.

तिच्या मनात धाकधूक सुरु होती. हॉस्पिटलमधून बाहेर येऊन ती तिथल्या एका बाकावर बसली आणि तिने रिपोर्ट्स पाहिले. त्यानंतर तिने सयाजीला कॉल केला आणि म्हणाली,

"हॅलो, मी आता पाटील हॉस्पिटलमध्ये आहे. तुमचे रिपोर्ट्स माझ्या हातात आहेत."

सयाजी अधीरपणे म्हणाला,

"काय आहे रिपोर्टमध्ये?"

भैरवी त्याला म्हणाली,

"सयाजी हे तुम्ही ठीक नाही केलंत, मी तिकडे नाही येऊ शकत."


 

सयाजी घाबरून म्हणाला,

"अगं पण काय झाल?का येणार नाही तू? रिपोर्ट्समध्ये काही दोष आढळला काय?"

भैरवी म्हणाली,

"नाही ओ माझ्या बाबाची स्वतःची गाडी नाही तिकडे घालवायला. त्यामुळे तुम्हालाच मला न्यायला यावं लागेल आणि हो येताना मुलांनापण घेऊन या."

यानंतर दोघेही मोठ्याने हसू लागले.

समाप्त.

©®सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.

(नमस्कार वाचक मित्र/मैत्रिणींनो मी एक छंद म्हणून तोडकंमोडकं लिहीत असतो, तरी तुम्ही भरभरून प्रतिसाद देत असता, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. पण मी काही व्यावसायिक लेखक नाही,तरी दैनंदिन कामातून वेळ मिळेल तस लिखाण करत असल्यामुळे कधीकधी एखादा भाग उशिरा पोस्ट होतं असतो. त्यामुळे आपली गैरसोय होते याची मला पुरेपूर जाणीव आहे. पण आपल्याला ताटकळत ठेवण्याचा अजिबात हेतू नसतो. ही कथा आज समाप्त होतं आहे, पण लवकरच आपल्या भेटीला एक आगळीवेगळी लव्हस्टोरी घेऊन येत आहे.तोपर्यंत निरोप घेत आहे.)










 

🎭 Series Post

View all