माऊली-एक मायेची सावली. भाग-अकरा.

एका मातृत्वाची अग्निपरीक्षा.

माऊली-एक मायेची सावली. भाग-अकरा.


 

भैरवीने बाळाची इच्छा व्यक्त केल्यापासून सयाजी अस्वस्थ होता. सयाजीने 'बाळाबद्दल विचार करू' असं सांगितल्यामुळे भैरवी प्रचंड आशावादी बनली होती.तिने बाळाची स्वप्न बघायला सुरवात केली होती.

पण इकडे आई आणि सयाजी यांनी वेगळाच बेत आखला होता.भैरवीला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

ती दिवसभर आपल्या दैनंदिन कामात गुंग होती.

त्या रात्री भैरवीने पुन्हा सयाजीजवळ बाळाचा विषय काढला.

"अहो!बाळाबद्दल तुम्ही काय विचार केला आहे?"

भैरवी म्हणाली.

"अगं एवढी काय घाई आहे तुला?मी सांगितलं ना, नंतर बोलूं म्हणून."

सयाजी म्हणाला.


 

"मला लगेच घाई नाही, पण तुम्ही त्यावर तुमचा निर्णय तरी सांगावा.असं मला वाटत."

भैरवी म्हणाली.

"हे बघ! मला आधीच खूप टेंशन आहेत, मी दोन-तीन दिवसासाठी बाहेरगावी जाणार आहे. तिकडून आल्यावर मग यावर बोलूं."

सयाजी वैतागून म्हणाला.

"तुमचं माझ्यावर प्रेमच नाही.अलीकडे तुम्ही मला प्रेमाने जवळपण घेत नाही.दोघांत अंतर आल्यासारखं वाटतं आहे मला."

भैरवी नाराज होतं म्हणाली.

"तुला वाटत तसं काही नाही,मी जाऊन आल्यावर आपण बोलूं."

असं म्हणत सयाजीने लाईट बंद केली आणि पांघरून घेऊन झोपी गेला.

भैरवी मात्र तळमळत होती. तिला अनामिक हुरहूर लागली होती.

काहीतरी चुकीचं होणार आहे याचा जणू पूर्वाभास तिला झाला होता.

अशा विचारात असतानाच पहाटे पहाटे नळकत तिचा डोळा लागला.

सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं तर शेजारी सयाजी नव्हता, म्हणून तिने लगबगीने उठून पाहिलं तर सयाजी नुकताच बाथरूममधून अंघोळ आवरून बाहेर येताना तिला दिसला.

तिला जणू आश्चर्याचा धक्काच बसला.

ती सयाजीच्या कपाळावर हात लावून म्हणाली,

"तुमची तब्येत तर ठीक आहे ना?"

"माझ्या तब्येतीला काय होतंय? ठीक आहे मी."

सयाजी म्हणाला.

"नाही आज एवढ्या लवकर उठून चक्क अंघोळसुद्धा आटोपली म्हणून विचारलं."

भैरवी मिश्कीलपणे म्हणाली आणि हसू लागली.

यावर सयाजीने डोळे वटारून तिच्याकडे पाहीले.

"मी कामानिमित्त बाहेर चाललो आहे, हे तुला सांगितलं आहे मी. मग असं माहित नसल्यासारखं का बोलत आहेस?"

सयाजी म्हणाला.

"मस्करी केली ओ, गेले काही दिवस तुम्ही हसायचं बंदच केल आहे. म्हणून वाटलं थोडसं हसू उमटलं तर उमटलं.पण कशाचं काय, इथं माझ्यावरच डोळे वटरायला सुरवात झाली."

भैरवी तोंड पाडत म्हणाली.

सयाजीने तिच्याकडे दुर्लक्ष केल आणि तो लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करू लागला.

थोड्याच वेळाने भैरवी सगळं आटोपून त्याच्यासाठी चहा नाष्टा घेऊन आली आणि म्हणाली,

"बाहेरगावी जातं आहात,नीट जा,गाडी सावकाश चालवा आणि स्वतःची काळजी घ्या."

"ठीक आहे."

म्हणत सयाजीने जास्त बोलणं टाळलं आणि चहा नाष्टा आटोपून तो आईच्या खोलीत गेला.थोडावेळ तिच्याशी बोलून त्याने तिचा निरोप घेतला आणि तो गाडी घेऊन वाड्याबाहेर पडला.

भैरवीशी लग्न झाल्यापासून सयाजी पहिल्यांदा बाहेरगावी मुक्कामी गेला असल्याने भैरवीला त्याची काळजी वाटत होती.भैरवी त्याच्या काळजीपोटी त्याला कॉल लावत होती पण तो कॉल रिसिव्ह करतं नव्हता.

त्यात त्याने नक्की कुठे जात आहे हेपण सांगितलं नसल्यामुळे तिच्या काळजीत जास्तच भर पडत होती.

असेच दोन दिवस निघून गेले.

त्यादिवशी भैरवी श्वेता, शुभ्रा आणि परीक्षित यांना घेऊन ओसरीवर बसली होती.

इतक्यात सयाजीची गाडी गेटमधून आत येताना दिसली.

सयाजीला पाहून मुलं गाडीच्या दिशेने धावत गेले, भैरवीसुद्धा उठून उभी राहिली. तिलापण सयाजीच्या येण्यानं आनंद झाला होता. तिची काळजी मिटली होती.

सयाजी गाडीतून उतरला आणि त्याने आपल्या मुलांना मिठी मारली आणि त्यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांना दिला.

मुलांनी त्याला प्रश्न केला,

"पप्पा कुठे गेला होता, आम्हांला तुमची खूप आठवण येत होती."

यावर सयाजी त्यांना म्हणाला,

"तुमच्यासाठीच गेलो होतो, एक महत्वाचं काम होतं बाळांनो. आता आत चला."

सगळेजण आत येताच भैरवीने सयाजीला विचारलं,

"अहो, किती काळजी वाटत होती तुमची.कुठे जात आहात तेपण सांगितलं नाहीत आणि वर कॉलपण रिसिव्ह करतं नव्हता."

सयाजी तीला म्हणाला,

"हो नाही सांगितलं, कारण काम खूप इम्पॉर्टन्ट होतं."

भैरवीने काळजीने विचारलं,

"अच्छा!पण गेल्यासारखं काम नीट झालं ना?"

सयाजी म्हणाला,

"हो काम नीट झालं आणि ते होणारच होतं."

असं म्हणून तो हसू लागला.

भैरवी विचारात पडली आणि म्हणाली,

"म्हणजे?मी समजले नाही."

[सयाजी मनातल्या मनात म्हणाला,

"समजेल, समजेल. तुला तर सांगावंच लागेल. तुझ्यामुळेच तर मला ते काम करणं भाग पडलं."]

"काही नाही,नंतर सांगेन. आता मला जरा फ्रेश होउदे."

सयाजी म्हणाला आणि तो बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेऊ लागला.

तोपर्यंत भैरवीने त्याच्यासाठी चहा बनवायला घेतला.

शॉवर घेऊन आल्यावर त्याने चहा घेतला आणि तो आईच्या खोलीत गेला.

"ये सयाजी,गेला होतास ते काम कसं झालं?"

आई त्याला आत येताना पाहताच म्हणाली.

"हो आई ठरल्याप्रमाणे सगळं ठीक झालं, आता आपल्याला कशाची भीती राहिली नाही."

सयाजी हसत हसत म्हणाला.

"हा!आता जेव्हा ती बाळाचा विषय काढेल तेव्हा तिची बोलती बंद कर. तिने परत बाळाचं नावदेखील काढता कामा नये. बरी आली स्वतःच बाळ हवं म्हणून हट्ट करणारी. असं करायच होतं तर आपल्या अटी मान्यचं कशाला केल्या? आणि मान्य केल्याचं होत्या तर त्या पाळायला हव्या होत्या ना?"

आई नाक मुरडत म्हणाली.

"पण आई!आपण चुकीचं तर नाही ना वागलो? अशीं फसवणूक करणं मला सर्वस्वी मनापासून आवडलेलं नाही. पण नाईलाज म्हणून मला हे करावं लागलं."

सयाजी म्हणाला.

"हे बघ!तुला वाईट वाटायची गरज नाही. तू काही चुकीचं नाही केल. आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक बाप म्हणून तू दक्षता घेतली आहेस. बाकी जास्त विचार करायची काहीएक गरज नाही."

आई निर्धाराने म्हणाली.

आईच्या बोलण्याने सयाजीला थोडासा धीर आला आणि तो होकारार्थी मान डोलावून तिथून बाहेर पडला.

थोड्याच वेळात दिवस मावळला.

रात्रीच जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सयाजी आणि भैरवी आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेले.

आणि सयाजी ज्याची वाट बघत होता ती गोष्ट घडली.

भैरवीने आज पुन्हा बाळाचा विषय काढला.

"अहो!तुम्ही म्हणाला होता की,मी परत आल्यावर बाळाबद्दलचा निर्णय सांगेन."

भैरवी आठवण काढत म्हणाली.

"हो!म्हणालो होतो."

सयाजी म्हणाला.

"मग लवकर काय तो निर्णय मला सांगा ना. मला आणखी राहवत नाही."

अधीरपणे भैरवी म्हणाली.

"हो मला तुला सांगायचच आहे. थांब एक मिनिट."

असं म्हणत सयाजी उठला आणि आपल्या कपाटाचं कुलूप काढलं.

त्यातून एक फाईल बाहेर काढून कपाट बंद केलं.

"ही फाईल घे आणि नीट बघ. यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल."

फाईल भैरवीच्या हातात देऊन सयाजी म्हणाला.

"यात काय आहे आणि यातून मला कसं उत्तर मिळेल?"

भैरवी कपाळावर आठ्या आणून म्हणाली.

"अगं उघडून बघ तरी, तुला सगळं समजेल."

सयाजी म्हणाला.

भैरवी ती फाईल उघडून वाचू लागली.

आतील मजकूर वाचताना तिचे हात थरथर कापू लागले, पोटात भीतीने खड्डा पडला, पायात गोळे आले. काय होतंय हे तिला समजेना,सगळं जग गोलगोल फिरू लागलं आणि ती भोवळ येऊन खाली पडली.

सयाजीने तिला नीट झोपवलं आणि तोंडावर पाणी शिंपडून तिला जाग करायचा प्रयत्न करू लागला. थोड्या वेळात तिला शुद्ध आली आणि तिच्या हातात असणारा सयाजीचा हात तिने झिडकारून लावला. तिच्या तळपायाची आगं मस्तकी गेली. सयाजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला, पण तिने त्याला दूर ढकलून दिलं.

तिने आपला मोबाईल घेतला आणि आपल्या वडिलांना म्हणजेच नाना मोहित्यांना कॉल केला.

"बाबा, आताच्या आता मला न्यायला या.मला इथं एक क्षणही  राहायचं नाही."

भैरवी रागाने फणफणत म्हणाली.

"अगं बाळ!पण झालय तरी काय? आणि एवढ्या रात्री का यायचंय तुला?मी सकाळी येतो तिकडे शांत हो."

नाना तिला समजावत म्हणाले.

"तुम्ही आताच्या आता येणार आहात की,मी जीव दिल्यावर येणार?माझा विश्वासघात केलाय या माणसाने."

भैरवी निर्वाणीचं बोलली होती.

"अगं हो! हो! हो!मी लगेच निघतो, तू शांत हो. मी येतोय."

नाना घाबरून म्हणाले.

नानांनी भावकीतील एकजनाला गाडी घेऊन येण्याची विनंती केली आणि ते भैरवीकडे निघाले.

पण त्यांच्या मनात नानाविध शंका येत होत्या की, एवढ्या रात्री तातडीने भैरवीने का बोलावलं असेल. त्या बापाचं काळीज लोहाराच्या भात्याप्रमाणे आकुंचन प्रसरण पावत होतं. उरात धडकी भरली होती.

नेमक काय झालं असेल हे तिथं गेल्यावरच कळणार होतं.

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.

🎭 Series Post

View all