Login

मान - अपमान भाग अंतिम

-
मान - अपमान   भाग अंतिम

©आरती पाटील- घाडीगावकर

जलद लेखन स्पर्धा


मोनिकाचं बोलणं ऐकून सर्वजण हैराण होते. त्यावर मिहीर चिडून म्हणाला, " मोनिका तूला नक्की कळतंय ना तू काय बोलतेस? "

मोनिका तितक्याच शांतपणे उत्तर देते, " हो, मला चांगलंच कळतंय मी काय बोलतेय. तुम्ही जावयाचा योग्य तो मान द्यायला हवा होता. खरंच काय कमी आहे ? द्यायची होती चारचाकी."

शामराव, " अगं पण आपण रीतीला धरून सर्व केलंच ना ? सोन्याची अंगठी, चांदीचा दिवा. "

मोनिका पुन्हा थंड स्वरात म्हणाली, " बाबा, पण ते त्यांच्या स्टेटस नुसार नव्हतं ना ? त्यांच्या स्टेटस नुसार फक्त चांदीचा दिवा आणि सोन्याची अंगठी हे अपमान जनक वाटणार ना? "

मोनिकाचं बोलणं आणि विचार ऐकून मिहीर ला राग येत होता. तरी संयम राखत तो आईकडे पाहून बोलतो.

मिहीर, " आई ऐकतेय ना तूझ्या सुनेचे विचार ? "

सुलोचना बाई मोनिका कडे पाहत म्हणतात, " हो ऐकले मी मोनिकाचे विचार आणि मला ते पटले सुद्धा. "

सुलोचना बाईच्या तोंडून असे शब्द ऐकून मिहीर आणि शामराव रागाने आता सुलोचना बाई कडे पाहू लागले.

सुलोचना बाई पुढे बोलू लागल्या, " सोनल किंवा मोनिका काय चुकीचं बोलली ? तिच्या स्टेटस नुसार करण्यात तुम्ही कमी पडलात. आठवतंय का जेव्हा आपला पहिला धोंड चा महिना होता. माझ्या घरीची परिस्थिती आधीच नाजूक होती. त्यात लग्नासाठी कर्ज काढलं होतं. तेच फिटलं नव्हतं. तरी उसणवारी करून आई - बाबांनी चांदीचा दिवा केला होता. किती बोल लावला होता तुम्ही आई - बाबांना ? किमान आमच्या स्टेटस नुसार एक सायकल तरी द्यायची. त्यावेळी सायकल म्हणजे चैनीची वस्तू होती. गावात क्वचित कोणाकडे असायची. तुम्ही श्रीमंत म्हणून तुम्हाला लोकांमध्ये मिरवायला आणि सांगायला म्हणून सायकल हवी होती. ती देऊ शकले नाही म्हणून तुम्ही माझं माहेर बंद केलंत. कधी गेले होते माहित आहे मी माझ्या माहेरी ? बाबा वारले तेव्हा.

आणि काय रे मिहीर मोनिकावर चिडतोयस ? बापाच्या पायावर पाय ठेवून तू पण तेच केलंस ना ? गेल्या आठवड्यात मोनिकाच्या घरी गेलात तेव्हा तू काय केलंस ? बाईक साठी तू रुसवा - फुगवा केलंसच ना ? आम्ही श्रीमंत आहोत तर त्यानुसार धोंड मिळावं असा विचार होताच ना ? मोनिकाचे आई - वडील नाहीत. भाऊ एकटा सर्व संभाळतोय. अजून तो लग्नाच्या कर्जच्या बोझ्या खाली आहे. कारण तूला लग्न थाटात हवं होतं. तिच्या भावाला अजून एक बहीण आहे. बायको आहे, मुलं आहेत. या सर्वात त्याने तूला बाईक द्यावी अशी अपेक्षा तू केलीस ना ? मग तू, तुझे बाबा कमावते, शिवाय आधी पासून घरची श्रीमंती आहे. मग हेमंत ने चारचाकीची अपेक्षा केली तर काय चुकलं ?

मोनिका सुलोचना बाईंच्या बाजूला उभी राहत म्हणाली, " तुम्ही मगाशी म्हणालात बाबा,' हेमंत माझ्या मनातून उतरला. एवढी श्रीमंती असून आपल्याकडे अश्या प्रकारे गाडी मागवतो. ते ऐकून राग सुद्धा आला तुम्हांला. मग मला सांगा, तुम्ही जे आईंसोबत वागलात त्यानंतर त्यांच्या माहेरच्यांच्या मनात तुम्ही छबी काय असेल आणि आईच्या सुद्धा ? आणि मिहीर तू, तू जे गेल्या आठवड्यात केल ना त्यानंतर तूला खरंतर मी तूला सोडून द्यायला हवं होतं. तुझ्या हट्टमुळे दादाने लग्नासाठी कर्ज काढलं. खरंतर ही गोष्ट मला उशीर समजली लग्नाआधी समजली असती तर मी नक्कीच लग्न मोडलं असत. कारण जो माणूस परिस्थिती समजून घेऊ शकत नाही तो पुढे काय साथ देणार ? आणि तेच झालं. तू आता सुद्धा तसाच वागलास. दादाने खूप केलंय माझ्यासाठी आणि माझ्या मागे माझी बहीण सुद्धा आहे लग्नाची म्हणून अजून तूला डिवोर्स दिला नाहीये. पण मनातून तू नक्की उतरलास.  

हे सर्व पाहून सोनल मोठी झाली आहे. त्यामुळे तुम्ही जे केल ते तिला तिच्या नवऱ्याचा अपमान वाटणं साहजिक आहे. त्यामुळे आता सकाळी जाऊन हेमंतची माफी मागा आणि चारचाकी बुक करा. नाहीतरी कदाचित यावरूनचं  आईंसारखी सोनल सुद्धा माहेरला मुकेल. "

एवढं बोलून मोनिका आपली कामे आवरायला निघून गेली. इकडे शामराव आणि मिहीर आपल्या वागण्यावर खजिल होते. दोघांनाही आपल्या वागण्याचा पश्चाताप होतं होता.  आणि आपल्या कर्मा नुसार माफी मागायला सकाळी ते जाणार होते.