लकी चार्म

Story shows that how to react with children in some difficult situations and handle their mantallity with soft words.

श्रेयस अगदी नाराजीतच घरी आला, दरवाजा जोरजोरात वाजवत . 
काही सेकंदात आईने दरवाजा खोलला. तरी साहेब रागातच बोलले आई किती वेळ लावलास ग. 
अरे कामात होते. बर ही कोणती पद्धत दरवाजा वाजवायची.  आज काय बिनसलं आहे माझा बाळाचे, काही कळेल का  मला?? आईने त्याचा राग शांत करायचा म्हणून हळूच विचारलं. 
आई परवा माझी फायनल क्रिकेट  मॅच आहे अन माझी आज बॅट तुटली. तो आता रडत सांगू लागला. आई ती  लकी आहे माझासाठी. आता मी खेळायला गेलो तरी हरणार. त्यापेक्षा मी परवा जाणारच नाही. आणि त्याचा रूम मध्ये निघून गेला.
श्रेयस तसा गुणी मुलगा. सहावी चा वर्गात शिकतो. अभ्यासात उत्तम अन खेळातसुद्धा. तसा समजदार होता. सांगितले की समजून घ्यायचा पण कधीकधी चिडचिड करायचा. अन एवढ्यात तर हे प्रमाण खूप वाढले होते त्याचे जसे की, पेपर लिहायला त्याला फिक्स त्याचा लकी पेन हवा असायचा, तर काही महत्वाचे काम असेल तर त्याला त्याचे ते एक-दोन  फिक्स शर्ट पैकी च लागत.
आईने त्याला  एकटेच राहू दिले. रात्री बाबा आले की दोघे मिळून समजावू असे मनाशीच ठरवलं. कारण इतर वेळी  ठीक आहे पण परवाची मॅच त्याचे स्वप्न होते व त्याची एक जबाबदारी ही होती.असे आयत्या वेळी मागे हटने अयोग्य आहे हे ती जाणून होती.हे लकी वगैरे काही नसते तर आपले प्रयत्न महत्वाचे हे ही त्याला समजवून सांगायचं होत . 

रात्री श्रेयस नीट जेवला पण नाही  मग आईने विषय काढला बाबा समोर.
बाबा बोलू लागले -
हे बघ श्रेयस, मला आईने सांगितलं सर्व. मी तुला नवीन बॅट  आणून देतो. पण तुला परवा मॅच खेळावीच लागेल. तू हुशार आहेस ना, मग असे चुकीचे नाही वागायचं बेटा. 
नाही बाबा, पण ती माझी लकी बॅट  होती. ती  बॅट  मी घेतली तेव्हापासून मी नेहमी जिंकतो म्हणून.
 ती जरा जुनी झालीय म्हणून  तुला मी मागे एकदा  नवीन  बॅट  आणली  तर ती तू तुझा मित्राला दिलीस. 
हे बघ आपल्याला बऱ्याचदा असे वाटते की आपली लकी वस्तू सोबत असली की आपण यशस्वी होतो पण मला असे वाटते की हे म्हणजे आपण मनाला दिलेली एक खोटी आशा आहे. यामुळे तर आपण आपल्या कामाला, मेहनतीला कमी मानतो, त्यावर, स्वतः वर अविश्वास दाखवतो. 
म्हणूनच बेटा लकी वगैरे काही नसते.फक्त  कोणतेही काम करताना ते सकारात्मकतेने आणि अगदी मनापासून कर त्यात तुला नक्कीच यश मिळेल . तसेच एखाद्यावेळी नाहीच आले यश तर आपण मनापासून प्रयत्न केले हेही तितकेच महत्वाचे अन समाधानाचे असते.

मग काय त्याला थोडे पटले बाबाचे,  जरासे मनाविरुद्ध पण त्याने होकार दिला अन दुसऱ्याच दिवशी बाबा सोबत नवीन  बॅट  आणली. त्याचा  बॅटने  तो फायनल मॅच ही खेळला.तो उत्तम खेळाडू  अन मनापासून खेळत असल्यामुळे त्यांचा संघ यशस्वी झाला. सर्वांनी एकच जल्लोष केला.
त्याच आनंदात घरी येऊन त्याने सर्वात आधी आई बाबा चे आभार मानले. त्यांना वचन दिले की मी आता ह्यापुढे नेहमी  कोणतेही काम मनापासून करेल, लकी वस्तू वर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवेल. 
हम्म, म्हणजे आपला  आत्मविश्वास च आपला लकी चार्म, होना... बाबा बोलले. 
ह्यावर आई बाबानी  त्याला शाबासकी दिली अन दोघेही त्याची सकारात्मकता पाहून मनोमन सुखावले.