Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नशीब भाग-१०

Read Later
नशीब भाग-१०
आज घरी आल्यानंतर वैशाली विचलित नव्हती. ती अगदी शांत आणि निवांत होती. जणू मीनाक्षी आणि वैदेहीने तिच्या मनातले सगळे संभ्रम दूर केले होते. तिच्या सर्व शंका नाहीशा केल्या होत्या.
इकडे मात्र अंकितची सुट्टी देखील संपत आली होती. आता परत मुंबईला जाण्यासाठी त्याची तयारी चालू होती. वैशाली विषयी काही खास डोक्यात नव्हते त्याच्या. कदाचित तिचा संबंध एवढाच होता असा मानून तो सुद्धा निवांत होता.
इतक्यात त्याचा फोन वाजला आणि फोन वर वैशाली नाव झळकत होते.
"हॅलो, हा बोल ना वैशाली. थोडं लवकर बोलतेस का? मला जरा घाई आहे. मुंबई साठी निघायचं ग! थोडं पटकन बोल."
असं बोलत असतानाच वैशाली त्याचं बोलणं मध्येच तोडून बोलली. 
"अरे थांब जरा, मला जरा बोलायचं होतं. जरा दोन मिनिट ऐकतोस का? " 

"हो थांब मी थोड्यावेळात फोन करतो. थोडं काम चालू आहे. ते पूर्ण झालं की करतो मी फोन." असं बोलून अंकितने फोन ठेऊन दिला.
उदास होऊन वैशाली स्वतःशीच बोलली,
"काय बाई हा अंकित, दोन मिनिट काही तरी महत्वाचं बोलायचं होतं, पण वेळ असेल तर ना ह्याला! देव जाणे, नेहमी बोलायला लावलं तर कधी बोलेल!" 
थोड्यावेळात वैशालीच्या फोन वर अंकितचा कॉल आला.
"हॅलो हा बोल ना काय म्हणतेस."
"अंकित आता पुढचे पाच मिनिटे माझे म्हणणे एकदम काळजीपूर्वक आणि कान देऊन ऐक बर का, आणि वाईट नको वाटून घेऊ!"
"ओके मॅडम, बोला!"
"अंकित, तू एक खूप चांगला मुलगा आहेस आणि तुझ्यासारखा मित्र कमवायला खरंच भाग्य लागतं. तुझी आणि विराजची मैत्री मी कधी जवळून नाही पहिली पण आतापर्यंत जेवढी अनुभवली ती खूप सुंदर आहे. तू माझ्या पेक्षा खूप समजदार, हुशार, काबिल आहेस. तू एक मित्र म्हणून एवढा चांगला असू शकतोस तर तू कुठलेही नाते खूप समजदारिने निभावशील ही आशा मला आहे. तेव्हा तू जर आधी आला असता तर आज परिस्थिती खूप वेगळी असती. कदाचित आपलं नातं, आपली मैत्री कधी टिकलीच नसती. हो! कारण तू खूप अभ्यासू होतास. हा.. एक झालं असतं, कदाचित मी सुद्धा खूप हुशार असते!"
"वैशाली, मुद्यावर येतेस का? एवढं घुमुन फिरून का बोलते आहेस! मला भीती वाटत आहे आता." अंकित घाईतच बोलला.
"अरे, हो ऐक ना, तर मला असे वाटते की ही वेळ योग्य आहे .मी नशिबाला खूप कमी महत्त्व देते. पण आज इतक्या वर्षानंतर तू माझ्या आयुष्यात आला आणि ते पण कसा, तर एकदम सरळ सरळ... म्हणजे मुळात आपण दोघांनी कधी काही केलं नाही रे; जे काही झालं ते सर्व कुठे ना कुठे तरी घडून आलं. म्हणजे बघ ना इतक्या वर्षांनी आपली परत ओळख होणं . कोण कुठले ते परस्पर मित्र ध्रुव घे किंवा मीनाक्षी, वैदेही घे किंवा काही न बोलता न भेटता पण मनापासून आपल्यासाठी इच्छा प्रकट करणारी मंजिरी घे किंवा आपला सर्वात महत्त्वाचा भाग विराज घे या सर्व मित्रांमधून एका जुन्या व्यक्तीची आठवण निघते त्याच्या मुळे जुन्या गोष्टी बद्दल संधी घेणं आणि तू नशिबाने सर्व बाबतीत योग्य बसणे आणि माझी यायची वेळ सुद्धा किती योग्य ना म्हणजे बघ ना मी जर तुझ्या वाईट वेळेत तुझ्या आयुष्यात आली असती तर कदाचित तू कधीच मला संधी नसती दिली. मला ना शाहरुख खानचा ना एक प्रसिद्ध संवाद आठवतो.. \"किसी चीज को अगर शिद्दत से चाहो ना तो पुरी कायनाथ उसे तुमसे मिलाने में जुड़ जाती है\"
मला खरंच नवल वाटतं रे की खरंच हे सर्व नशिबाचे खेळ की फक्त एक योगायोग.
आणि तुला माहितीये, खरतर मला अजून एक संवाद आठवतो... \"मेरी प्यारी बिंदू या चित्रपटातील!\" \"हॅपी एंडिंग्ज बिक्ती ज्यादा है\" अर्थात चांगला शेवट असेल तर लोक आवर्जून वाचता. (वैशाली हसूनच बोलली.) मला काय वाटतं अंकित ठाकरे, एक संधी तर द्यावी तुम्हाला!"
अंकितचा स्वतःच्या कानांवर विश्वास नव्हता बसत. त्याची धडधड अगदी भयानक वाढली होती. त्याची खुशी दुप्पट झाली होती आणि अशातच तो बोलला,
"काय? वैशाली खरंच तू मला एक संधी देत आहेस! (अंकित एकदम शांत पणे बोलला.) वैशाली तुला माहित आहे, तू माझ्या आयुष्यातले ना सर्वात अनपेक्षीत पण सर्वात सुंदर प्रकरण आहे..."
वैशाली हसतच बोलली,
"खरंच!"
आणि बराच वेळ त्यांच्या गप्पा चालल्या.
एक नवीन प्रकरणास सुरवात झाली होती.

   | समाप्त |


मित्रानो, ही कहाणी तर संपली. पण आपल्या आजूबाजूला असे कित्येक वैशाली आणि अंकित असता. हा मानते प्रत्येकाचा शेवट असा नाही होत, पण इथे शेवट नक्कीच सुखद झाला. नशिबाने खेळ केले की फक्त योगायोग होता, हे तर वेळेलाच ठाऊक पण नशिबाला एक संधी तर द्यावीच. आपल्या आयुष्यात भूतकाळ काहीही असो पण त्याचा परिणाम आपल्या वर्तमानात नाही झाला पाहिजे. आणि हो अपेक्षा ठेवणं चुकीचं नसतच कधीच; पण जर त्या अपेक्षांमध्ये कुणी योग्य बसत असेल तर त्याला संधी देण्यापूर्वी एकदा विचार करून बघण्यास हरकत पण नसते 
मग काय म्हणता! 
मित्रानो, अंकित आणि वैशालीच्या आयुष्यात नशीब होतं की योगायोग काय वाटतं तुम्हाला. कमेंट करून कळवा जरुर.
( ही कथा फक्त एक काल्पनिक कथा आहे.कृपया कोणतीही गोष्ट तंतोतत मानू नये.)


        । धन्यवाद ।
लेखिका: वर्षा गिते
ईरा टीम: नाशिक
कथेचे नाव: नशीब - भाग - १० (अंतिम)
स्पर्धा: ईरा राज्यस्तरीय करंडक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//