नशीब भाग -९

Luck


आज वैशाली, वैदेही, आणि मीनाक्षी निवांत बसल्या होत्या. पण वैशाली थोडी विचलित वाटत होती.
"वैशाली, चल तासिकेला उशीर होत आहे." वैदेही
मीनाक्षी आणि वैदेही एवढं बोलून प्रस्थान झाल्या.
"अरे, वैशाली चल की!" मीनाक्षी परत थांबून बोलली.
"हो आलेच." असं बोलत अखेरीस वैशाली निघाली.
"काय झालं वैशाली? कुठे गुंग आहेस एवढी?"
"काही झालं आहे का?" मीनाक्षी आणि वैदेही परत एकदा वैशालीला विचारू लागल्या.
"अगं, काही नाही तुम्हाला नाही का मी अंकित विषयी बोलली होती तोच विचार करते आहे जरा."
वैशाली खाली बघतच बोलली.
"हो पण त्याचं काय? तू काही बोलली का?" वैदेही उच्चारली.
"अगं, मला वाटतं मी कदाचित त्याला दुखवलं आहे. बघ ना काल बोलली होती मी त्यावर त्याने काही उत्तरच नाही दिले. मी थोडी नीट पण सांगू शकत होते; कदाचित मित्र खरंच चांगला आहे तो!" विचलित होऊन वैशाली बोलली.
"जाऊदे वाटलं तर बोलेल नाही तर राहीलं, चल उशीर झाला आहे."
असं बोलत तिघी पण मार्गस्थ झाल्या.
सायंकाळी घरी आल्यावर शेवटी वैशालीने न राहून स्वतःच फोन केला.
"हॅलो, अंकित तू ठीक आहे ना! मला तुला दुखवायचं नव्हत रे, पण आता भीती वाटते रिस्क घ्यायला. पण आपण मित्र राहू, आवडेल मला!" अशी वैशाली सुरूच पडली.
"अगं थांब काय बोलते आहेस? मला काही एक कळत नाही! झालं काय आहे नेमकं? आणि आता ठीक आहे ना तू?" अंकित
"मी? मला काय होणार! मी एकदम मस्त आहे! पण तू असा का विचारतो आहेस." वैशाली विस्मायित होऊन बोलली.
"अच्छा, तर आता तू ठीक आहेस. तुझा राग शांत झाला!"
"काय?" वैशाली चकित होऊन बोलली.
"अगं, मला वाटलं तुला राग आला आहे. आणि तू खूप रागात बोलली. म्हटलं आता बोललो तर अजून गोष्टी खराब होतील म्हणून जाऊद्या शांत झाली की येईल परत म्हणून मी बोलत नव्हतो. (असं बोलून काही वेळ अंकित शांत झाला.) हॅलो... हॅलो वैशाली आहेस ना!" अंकित परत बोलला.
"अरे अंकित कसा रे तू? अरे मी विचार करत होती की मी तुला दुखवलं पण नाही. खरंतर तुझ्यासारखा मुलगा मी पहिलाच नाही! खरंच धन्य आहे रे तू! साष्टांग नमस्कार हो तुला! (हसतच वैशाली बोलली.) जाऊदे ठीक आहे. काही नाही. यासाठीच फोन केला होता, चल बोलू नंतर." असं म्हणत दोघांचे संभाषण समाप्त झाले.
वैशाली या प्रकरणानंतर खूप वेळ हसत होती. कुठे ना कुठे तरी तिला अंकित प्रामाणिक वाटत होता. तिच्या अपेक्षांमध्ये पुरेपूर योग्य बसणारा वाटत होता.
मनात तिला कुठेतरी वाटत होते की संधी घेण्यास काय हरकत आहे ना! नाही कदाचित, मी संधी देईल पण.... पण मी सर्वांना खूप संधीसाधू वाटेल. नाही. मला नाही संधी द्यायची, अखेरीस वैशाली बोलली.
"संधीसाधू." हीच ती शंका होती जी तिच्या मनाला खात होती.
एवढ्यात तिचा फोन वाजला आणि न बघताच,
"हा, अंकित बोल ना काय झालं?" असं एकदम ती बोलून गेली.
"वैशाली अगं मी बोलते आहे वैदेही. अगं लक्ष कुठे आहे तुझं?"
वैशालीने पटकन फोन पहिला. आणि हसतच ती बोलली,
"अगं सॉरी, ते जरा चुकून झालं. बोल ना काय झालं?"
"अगं मी आणि मीनाक्षी आलो आहे. चल बर मस्त पाणीपुरी खाऊन येऊ."
"हो आलेच मी!" असं बोलत वैशाली निघाली.
अचानक वैदेही आणि मीनाक्षी तिला भेटायला आल्या होत्या.
वैदेही आणि मीनाक्षी कधी पासून बघत होत्या, वैशालीचे काही लक्षच नव्हते. देव जाणे ती कुठे अडकली होती.
म्हणून अस्वस्थ झालेली वैदेही अखेरीस बोलली,
"अगं वैशाली अगं, काय झालं सांगशील का?
"संधीसाधू गं." वैशाली उत्तरली
"काय?" मीनाक्षी मध्येच उद्गारली.
"अगं, काही नाही असच." वैशाली बाजू सावरत बोलली.
"वैशाली सांगतेस की नाही आता, बोल बघू किती वेळा पासून बघते आहे. काही लक्षच नाही तुझं इकडे. " थोडी चिडूनच बोलली वैदेही.
"अगं, म्हणजे कसं आहे ना ! बर ऐका. मला असं वाटतं की, अंकित चांगला मुलगा आहे. सर्व गुण पण आहेत. म्हणजे नाही म्हणायला मला कारणच नाही. पण मला असं वाटतं मला सर्व संधीसाधू संबोधतील. म्हणजे बघ ना तू , आता तो एवढा स्थायिक आहे. समजदार आहे. हुशार आहे. त्याच्या सर्व गोष्टी किती योग्य आहेत. सर्व काही अगदी निश्चिंत आहे. आणि मी बघ त्याच्याएवढी हुशार नाही, स्थायिक नाही, वरतून समजदार तर नाहीच. उलट रागीट आहे खूप. अगं कुठेच जोड नाही ग आमची! त्याला कित्येक छान आणि त्याच्या बरोबरीच्या मुली भेटू शकतात ना ! मग मीच का?" वैशाली उद्गारली.
"कदाचित वैशाली तू त्याच्या आयुष्यातली पहिली मुलगी होती. जी त्याला मनापासून आवडली आणि त्याला तुझ्याशी स्पर्धा नाही करायची की तो तोडीस तोड बघेल. तू जशी आहे तू त्याला तशीच आवडते आणि एक लक्षात घे तू त्याच्या आयुष्यात नेहमी त्याच्या चांगल्या काळातच आली. म्हणजे हे बघ तू पाहिले पण त्याला आवडलीस तेव्हा सुद्धा तो त्याच्या आयुष्यात उत्तम करत होता.. आणि आजही तू त्याच्या आयुष्यात परत आली तेव्हाही तो उत्तमच करत आहे." वैदेही.
"वैशाली हे बघ असं पण नाही की खूप मुलींमध्ये तो गुंतला होता. तो नेहमीच त्याच्या अभ्यासात गुंतला होता. तू फक्त त्याच्या आयुष्यातले एक चांगले पर्व होते. तू त्याच्या आयुष्यात नव्हतीस पण कधी त्याने ती गोष्ट गंभीरतेने नाही घेतली. त्याने गोष्टी वेळेवर सोडून दिल्या. आणि एवढं सगळं मिळवून सुद्धा तूच म्हणतेस तो आजही तसाच आहे. आणि राहीलं संधीसाधू तर आजकाल सगळेच भविष्याचा विचार करतात ग! त्यामुळे स्वतःला कमी नको लेखू . उलट आजही त्याच्या आयुष्यात तुझी जागा तीच आहे जी शाळेत होती. बाकी तुझी इच्छा!"
असं बोलून मीनाक्षी पण शांत झाली.
दोघींचे बोलणे काळजीपूर्वक ऐकल्यावर वैशालीला आता गोष्टी थोड्या स्पष्ट होत होत्या, की कदाचित ती खूप अवघड करत आहे सर्व!
"अच्छा, कदाचित योग्य असणार तुम्ही! चला उशीर होतोय निघायचं का?" वैशाली उद्गारली.


क्रमशः
(काय होणार पुढे? वैशाली ची शंका योग्य होती का? ती अंकितला एक संधी देणार का? की शेवटी नशिबाने एवढं जुळून सुद्धा सर्व व्यर्थ जाणार का? बघु पुढच्या भागात..)

लेखिका: वर्षा गिते

ईरा टीम: नाशिक

कथेचे नाव: नशीब - भाग - ९

स्पर्धा: इरा राज्यस्तरीय करंडक

🎭 Series Post

View all