प्राक्तन (नशीब)- शाप की वरदान?

अपंगत्व नशिबी आलेल्या मुलाची कैफियत मी या कथेतून मांडली आहे.त्याला आलेल्या नैराश्यातून त्याची आई समर्थ पणे बाहेर काढून,त्याला जगण्याची उभारी कशी देते,त्याचे प्राक्तन तो स्वतःच कसे बदलू शकते हे समजवण्याचा प्रयत्न या कथेतून ती करते.

         "आई ,मी वैतागलो आहे ग !प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी करायला मला खूप कष्ट घ्यावे लागतात. माझ्याच नशिबात एवढे कष्ट का? अगदी खाली वाकुन एखादी गोष्ट घ्यायची तरी, मला लवकर घेता येत नाही .बाकीची सर्व मुले कशी पटकन आपली कामे करतात! शाळेत मला सारखं मुलं चिडवायची, "या अपंग मुलांना काहीच कसं लवकर करता येत नाही ? ह्याच्या सारखे आपण वागलो तर ट्रेन मुंबईला जाऊन पोहोचेल ,तरीही आपली कामे लवकर होणार नाहीत .हा हा हा.."यावर मी मात्र मान खाली घालून, अगदी ओशाळल्या सारखा व्हायचो आणि घरी परत यायचो.हे माझ्यासोबत रोजच व्हायचे .कसाबसा त्यातून सुटून महाविद्यालयीन जीवनात आलो, तिथेही काही गुंड मुले माझा पिच्छा सोडायला तयारच नव्हती; शेवटी प्रिन्सिपल सरांकडे तक्रार केल्यावर मी त्यांच्या जाचातून सुटलो! अशी अवहेलना मी का म्हणून सतत झेलायची? 

          आता तर मला कळून चुकलय,की मी कितीही मोठा झालो, तरीही माझ्यातील व्यंग ,अपंगत्व मला पूर्णपणे स्वावलंबी होऊ देणार नाही. मी कधीच सर्वसामान्य मुलांसारखा होणार नाही. आई, आज मी एवढी एमपीएससीची तयारी करतोय, त्यात मला नक्की यश मिळेल का आणि यदाकदाचित मिळालंच तर मी एखादा उमदा, रुबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून शोभेल का ?इतर लोक माझा मान सन्मान करतील का? आता मात्र मी खरंच डगमगतोय आई! माझा आत्मविश्वास कमी होत चाललाय !खरच माझ्यासारख्या जन्मतःच अपंगत्व आलेल्या मुलाचा या जगात येऊन काही उपयोग आहे का ?मी जन्मलो त्याचवेळी तू मला ठार का केले नाहीस आई ? खरंच ,हे अपंगत्वाचे प्राक्तन (नशीब )माझ्यासाठी शापच आहे असंच मला वाटतंय!!"

          आता मात्र प्रेक्षाचा (सौरभ ची आई) संयम सुटला होता." बास! सौरभ बास !लहानपणापासून मी तुझ्यावर किती मेहनत घेतली आहे माहित आहे का तुला ?तुझ्या फिजिओथेरपी मध्ये सातत्य ठेवूनच आज उशिराने का होईना ,पण स्वतःची कामे तू स्वतः करु लागला आहेस. तुला कोणाच्याही आधाराची गरज आज नाही ! तरीही तू म्हणतोस की तू स्वावलंबी नाही? एक आई म्हणून तूला वाढवताना मला सुद्धा खूप वाईट वाटायचं .पण माझा ठाम निर्धार होता की हळूहळू का होईना मी माझ्या सौरभला स्वतःच स्वतःची सर्व कामे करायला शिकवीन ,त्याला सर्वार्थाने स्वावलंबी करेल. अरे बाळा, तुला काय वाटतं ,तुझ्या मनातील घालमेल मला समजत नाही? इतर मुलं जेव्हा तुझ्यापेक्षा फास्ट पळायची ना, तेव्हा मनाला मी फार समजवायचे की नाही प्रेक्षा, तुझा सौरभ कासव जरी असला ,तरी त्याच्या जीवनातील खऱ्या इनिंगला तो या सर्व वेगवान सशांना पुरून उरणारच! तेव्हा आजवर जो वैचारिक त्रास,कष्ट तू सोसले आहेस ,ज्यांची अवहेलना तू झेललीस ,त्यांनीच तर तुला खरं बळ दिलय!!"

       सौरभ थोडावेळ पेचात पडला."आई म्हणजे ?मला नाही समजलं?" 

          प्रेक्षा म्हणाली ,"अरे बाळा, या सर्वांची आव्हाने पेलूनच तर तू इथवर आला आहेस! हळूहळू का होईना शाळेत तू नेहमी अचूक गणिते सोडवायचास. इंग्रजीही तू छान आत्मसात केलीस. कम्प्युटरही तू खडतर अशा मेहनतीने आज छान ऑपरेट करतोस .एवढेच काय, तर तू तुझे स्वतःचे बँक अकाउंट मोबाईल द्वारे (नेट बँकिंग) ऑपरेट करतोस! हे सर्व काही इतर सामान्य मुलांप्रमाणे येतच की तुला !हळूहळू का होईना अचूक कामे करतोस की नाही तू ?मग ?अरे बाळा ,आज असेही आई-वडील आहेत ज्यांची धडधाकट मुले दारू,सिगारेट सारख्या व्यसनांपायी अडाणी राहिली आहेत, बेरोजगार आहेत .त्यांचे नशीब ,भविष्य कसे आहे ?सर्व अंधारातच आहे ना ?मग,माझा एवढा गुणी, हुशार मुलगा असा नैराश्यात जाऊन ,पोकळ व अवाजवी विचारसरणी असणार्‍या लोकांच्या नादाला लागून ,आपले प्राक्तन शाप म्हणून कसे काय ठरवतोय, याचे मला आश्चर्य वाटते! याच साठी तू एवढी मेहनत करून इथवर आलास का?

          हे बघ, सौरभ. तुला तरी चालण्याचा व हातातील काही व्यंगांचा त्रास आहे .अरे, काही मुलांना तर यासोबतच दिसत नाही शिवाय ऐकूही येत नाही. त्यांनी काय करायचं? तर बघ सौरभ ,या मुलांसाठी तू आदर्श बनला पाहिजे. प्राक्तन शाप ठरवायचे की वरदान म्हणून सिद्ध करायचं हे आपल्याच हातात असतं राजा !!म्हणुनच म्हणतात ना," You are the creator of your own destiny." तेव्हा या सर्व पोकळ विचारसरणी असणार्‍या लोकांना तू एमपीएससी मध्ये चांगला प्रशासकीय अधिकारी बनून चपराक दे !तेव्हाच तू त्यांची तोंड बंद करू शकशील आणि जेव्हा तू ,तसेच तुझी कामे सरकार नवाजेल टीव्ही वर प्रदर्शित होतील, तेव्हा हीच तुला चिडवणारी मंडळी,"हा आमचा शाळेतील ,कॉलेजातील वर्गमित्र होता !"असे म्हणून आनंदित होतील व त्यावेळी केलेली तुझी अवहेलना आठवून शरमेने मान खाली घालतील, तुला भेटायला रांगा लावतील .तेव्हा माझ्या राजा,हार मानू नकोस.देवाने तुला हे जीवदान केवळ तुझे प्राक्तन वरदान कसे ठरेल, हे दर्शवण्यासाठी दिले आहे आणि हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी परत एकदा तू स्वतःला झोकून दिले तर इतर परीक्षां सारखी ही परीक्षाही तू सहजरित्या पास होशील व एक रुबाबदार प्रशासकीय अधिकारी बनशील! तर मग झाला का तुझ्यातील न्यूनगंड शून्य ? चल तर मग, लाग अभ्यासाला !!आयुष्याची खरी इनिंग खेळायला सज्ज होऊन, अपंगत्वासारख्या व्याधीला पार करत, माझा सौरभ जर इथवर  पोहोचलाय, तर इथून पुढेही तो सर्व अडचणींवर मात करेल यात शंका नाही !हो ना माझ्या राजा?"

            " हो नक्कीच! थँक्यू आई! तू माझ्यातील न्यूनगंड आता कायमचा घालवला आहेस! बघ आता मी जोमाने अभ्यासाला लागतो व माझे प्राक्तन( नशीब) शाप नाही तर वरदान म्हणूनच सिद्ध करतो! ही माझी तुझ्याशीच नाहीतर स्वतःशी सुद्धा ठाम निर्धाराची लढाई ठरणार आहे.आता मी खरोखरच तन-मन-धनाने माझे ध्येय साकारण्यासाठी पूर्णपणे सिद्ध झालो आहे."

समाप्त.

फोटो: साभार गुगल

        प्रिय वाचकवर्ग,माझे लिखाण उत्तरोत्तर रोमांचक बनवण्यासाठी तुमचा फार मोठा सहभाग आहे. तुमची भरभरून मिळणारी शाबासकी माझे मनोबल खरंच वाढवते.तेव्हा अनेक अनेक धन्यवाद.

भेटूया पुढच्या कथेमध्ये.

पुनश्च धन्यवाद!!