मितवा part two

Love story of a young couple

मितवा.. भाग दोन 

काही तांत्रिक अडचणींमुळे मितवा कथेचे भाग पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहेत. तुमचा आधीसारखाच प्रतिसाद अपेक्षित आहे.. 

मागील भागात आपण पाहिलं कि मेघनाच्या वर्गात आर्यन मल्होत्राची ऍडमिशन होते. एखाद्या हिरो प्रमाणे दिसणाऱ्या आर्यनकडे बघून सगळ्या मुली वेड्या होतात.. पण तोच आर्यन वर्गातील सगळ्यात सुंदर मुलगी मेघनाकडे बघतही नाही.. त्यामुळे मेघनाला त्याचा राग आलेला असतो.. आता पाहूया पुढे..

       मेघना रागातच घरी जायला निघते.. पार्किंगमध्ये पुन्हा तिला आर्यन दिसतो. स्वतःच्या गाडीजवळ उभा राहून तो कोणाशीतरी फोनवर बोलत असतो. मेघनाचा पारा अजून चढतो.. "असेल आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलत.. तेव्हा तर बाकी कोणत्या मुलीकडे लक्ष पण देत नाही" असं म्हणून ती गाडी काढून निघून जाते. 

        घरी गेल्यावर मेघनाचा राग जरा कमी होतो मात्र तिच्या डोक्यातून आर्यनचा विचार जात नाही.
"खरचं असेल का त्याला गर्लफ्रेंड?? माझ्यापेक्षा सुंदर असेल का ती दिसायला?? हो असेल कदाचित..  पण मी का एवढा त्याचा विचार करतीये?? मला काय करायचंय.. असू दे त्याला गर्लफ्रेंड.. मला का फरक पडतोय..?? " अशा एक ना अनेक विचारांचं काहूर माजलं होतं तिच्या मनात. डोकं शांत करायला तिने ब्लॅक कॉफी घेतली.. एकदा बघावंच त्याला गर्लफ्रेंड आहे का नाही याची शहानिशा करण्यासाठी तिने फेसबुक ओपन केलं.. आर्यन मल्होत्राच्या नावाने सर्च केलं तर त्याचं प्रोफाइल तिला लगेच सापडलं..

       प्रोफाइल फोटो बघून दोन मिनिट मेघना टक लावून बघतच बसली. जिम मध्ये वर्क आऊट करत असतानाचा त्याचा फोटो होता.. एखाद्या हिरोला सुद्धा लाजवेल इतका कमाल फिट दिसत होता तो.. त्याचे दंड.. त्याचे ऍब्स.. सगळं एकदम परफेक्ट होतं..  व्यायाम करत असल्याने त्याला घाम आला होता आणि त्यामुळे जणू त्याचा चेहरा चमकत होता.. चेहऱ्यावर एक कमाल अटीट्युड होतं त्याच्या.. मेघनाने तो फोटो सेव करून मोबाईलवर घेतला.. आणि आता त्याचे इतर फोटो पाहू लागली.. कुठे एखादी मुलगी दिसतीये का हे ती बघू लागली. पण गर्लफ्रेंड सोबतचा एकही फोटो तिला दिसला नाही. तिच्या जीवात जीव आला. आत्ता कुठे तिला बरं वाटत होतं.

          तिने मनोमन ठरवलं कि उद्या कॉलेजला इतकं छान तयार होऊन जायचं ना कि त्याने तिच्याकडे पाहिलं  पाहिजे आणि आर्यनचा फोटो झूम करून बघू लागली. बघता बघता तर तिने त्या मोबाईल स्क्रीनलाच किस केले. तिला तो फोटो अर्थात आर्यन भयंकर आवडला होता. आणि आर्यनचाच विचार करत ती झोपून गेली.

        दुसऱ्या दिवशी ती जरा लवकरच उठली. आज कॉलेजला जायला तिला अजिबात उशीर करायचा नव्हता. तिने कपाटातील तिचा आवडता लाल टॉप काढला, त्या वर ब्रँडेड स्किनी जीन्स चढवली.. केस स्ट्रेट केले.. लीप ग्लॉस लावला आणि निघाली कॉलेजला जायला. आज तर पार्किंग लॉट पासून सगळ्यांच्या नजरा मेघनावर खिळल्या होत्या. ती वर्गात गेली आणि मैत्रिणींच्या घोळक्यात जाऊन उभी राहिली, तेवढ्यात आर्यनही वर्गात आला आणि आजही मेघनाचा हिरमोड झाला. त्याने तिच्याकडे अजिबात पाहिलं नाही. तो सरळ जाऊन आपल्या बेंचवर बसला आणि मित्रांशी गप्पा मारू लागला. मेघनाला आता काही सुचेनासं झालं. तिचा चेहरा पडला. तिला फार वाईट वाटत होतं. कसबसं ती वर्गात बसली.. ती फक्त कॉलेज सुटायची वाट बघत होती. आणि सगळे लेक्चर संपले. पुन्हा आर्यन तिच्याकडे न बघता निघाला.. उलट आत्ता तर त्याने मेघनाची मैत्रीण सियाकडे बघून स्मित केले.मेघनाला आता जास्तच राग येऊ लागला त्याचा. त्याच्या पाठोपाठ ती पण निघाली. तिला काय वाटले काय माहित पण ती त्याच्या गाडीचा पाठलाग करू लागली. हा काय करतो, कुठे जातो बघुयातच आज असं  तिने ठरवले.

         आर्यनने एका बुक स्टोर समोर गाडी थांबवली आणि तो आत गेला. त्याच्या मागे नकळत मेघना सुद्धा गेली. आर्यन तडक लव्ह नॉव्हेलच्या विभागात गेला. दोन तीन पुस्तकं त्याने चाळली आणि त्याने ती पुस्तकं खरेदी केली. मेघनाला ते बघून आश्चर्य वाटलं. इतकं अटीट्युड असणारा मुलगा प्रेमाच्या कादंबऱ्या का वाचेल हा तिला प्रश्नच पडला.आर्यन तिथून निघाला तशी मेघना पण निघाली. तिथून तो प्रभात रोडवरील 'मल्होत्राज' नावाच्या बंगल्यात शिरला. आता नावावरून हा त्याचाच बंगला आहे हे मेघनाने ओळखलं. खूप मोठा आलिशान असा बंगला होता.
"याहून मोठा बंगला माझा कोल्हापूरला आहे.. "असं म्हणून नाक मुरडून मेघना तिथून निघाली आणि घरी गेली.

       घरी जाऊन पुन्हा नेहमीप्रमाणे मेघना आर्यनचा विचार करू लागली...
"हा मुलगा घर.. कॉलेज या व्यतिरिक्त कुठं जात नाही..  ना याला गर्लफ्रेंड आहे.. मग हा भाव कशा साठी खातो एवढा?? " मेघना आता वारंवार त्याचा विचार करत होती पण तिला काही केल्या समजत नव्हतं कि हा मुलगा बोलत का नाही आपल्याशी.

       आता बरेच दिवस होऊन गेले होते. आर्यन मेघनाच्या इतर मैत्रिणींशी थोडं फार बोलायला लागला होता. पण मेघनाकडे त्याने अजून पाहिलं नव्हतं.
मेघनाला असह्य झालं हे सगळं. तिने एक दिवशी शेवटी ठरवलं कि आपण आता स्वतःहून त्याच्याशी बोलायचं आणि ती कॉलेज मध्ये पोहोचली.

        तिला पुन्हा मैत्रिणींची कुजबुज ऐकू आली...
"आता काय झालं?? पुन्हा कोणीतरी हिरो येतोय का वर्गात?? "तिने सियाला विचारलं.

"नाही गं.. पण त्या हिरोला कोणीतरी हिरोईन भेटलीये.."
सिया म्हणाली..

"म्हणजे?? नीट काय ते सांग.. "मेघना वैतागून बोलली.

"अगं तो आर्यन आहे ना त्याला कोणीतरी मुलगी आवडते असं त्याच्या मित्रांनी आम्हाला सांगितलंय.. " सिया म्हणाली.

सियाचं वाक्य ऐकून मेघनाच्या पायाखालची जमीन सरकली... तिच्या डोळ्यात पाणी आले.. ती पळत पळत वॉश रूमला गेली.. आणि तिथे रडू लागली...

क्रमश :

आर्यनला तर गर्लफ्रेंड भेटली.. आता मेघनाचं काय होईल.. ती विसरू शकेल आर्यनला??  बघूया पुढच्या भागात..

वाचकहो कथा कशी वाटतीये ते मला कंमेंट्स द्वारे नक्की कळवा.. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©️®️

          
          

🎭 Series Post

View all