Login

मितवा part twenty one

Love story of a young couple

मितवा भाग एकवीस

मागील भागात आपण पाहिले कि मेघनाला राजकडून समजते कि या लग्नाला कारणीभूत तिचे पप्पाच आहेत. त्यांच्यामुळे आर्यन आणि त्याच्या कुटुंबियांना धोका आहे.राज फक्त मेघनाचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवत आहे. मेघनाकडे राजसोबत लग्न करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाहीये. आता पाहू पुढे...


परतीच्या प्रवासात राज आणि मेघना एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. दोघांची मने सुन्न झालेली होती. मेघनाला तर विश्वासच बसत नव्हता कि तिचे पप्पा या थराला जाऊन राजकारण करतील. आर्यन आणि त्याच्या परिवाराला त्रास द्यायचा विचार करतील.
"या सगळ्यात त्याच्या कुटुंबाचा काय दोष होता? त्यांना विनाकारण का त्रास सहन करावा लागतोय?आर्यनच्या मॉमच बुटीक बंद पाडलं.. बापरे.. हे सगळं किती वाईट आहे.. एखाद्याचं का नुकसान करावं? काही दिवसांपूर्वी पप्पा माझं सर्वस्व होते... आदर्श होते.. माझ्यावर किती प्रेम करायचे ते.. मी ज्या गोष्टीवर बोट ठेवायचे ती गोष्ट माझ्यापुढे हजर करायचे.. इतक्या वर्षात पप्पा आणि तारा अक्कांमुळे मला आईची कमी जाणवली नव्हती.. पण आज जे काही मी पप्पांबद्दल ऐकलं त्यावरून वाटतं कि हे माझे पप्पा नाहीत. निवडणूक, मतं, राजकारण, स्वतःची इमेज यापुढे त्यांना मी, माझी स्वप्न, इच्छा, प्रेम काहीच दिसत नाहीये.. या घाणेरड्या राजकारणासाठी ते त्या गायकवाडांच्या घरात सुद्धा मला द्यायला तयार झाले होते.. गुंड घराणं.. मी काय शोभेची वस्तू आहे का?काय केलं असतं मी त्या गुंड घराण्यात..??? राज जरा तरी बरा आहे. त्याला माझं दुःख समजतं तरी.. पण नवरा म्हणून मी त्याचा कसा स्वीकार करू?? माझं त्याच्यावर प्रेम नाहीये.. आणि मी करू नाही शकत त्याच्यावर प्रेम... कारण मी फक्त आणि फक्त आर्यनवर प्रेम करते.. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून.. बघितल्या बघितल्या मला तो आवडला होता.. किती वेडी झाले होते मी त्याच्यासाठी... एकदा तर त्याचा पाठलाग सुद्धा केला होता.. हळू हळू आमच्यात मैत्री झाली... आणि मग प्रेम.. खरंतर प्रेम आधीच झाले होते.. बघता क्षणी... किती खुश होतो आम्ही एकेकांसोबत.. मी पंजाबी फॅमिलीत लग्न करणार या विचाराने किती खुश होते..स्वप्नांच्या दुनियेत स्वछंद फिरत होते.. पण स्वप्न खरी होत नाहीत.. कदाचित मझ्याबाबतीत तर नाहीच.. डोळे उघडले आणि हे भयानक वास्तव माझ्यासमोर आले... हा राज माझ्या का आयुष्यात आला?काय वेळ आली माझ्यावर.. ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याच्याशी लग्न करावं लागत आहे.. कसं निभावणार मी हे? आयुष्य कसं काढू मी फक्त या मैत्रीच्या नात्यावर?मैत्री वगैरे सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत.. उद्या या राजने लग्न झाल्यावर त्याचा पुरुषार्थ गाजवला तर?? मी काय करू शकणार आहे? नवरा होणार आहे तो माझा.... काय करू देवा..."
मेघना मनोमन असा विचार करू लागली.

राजला सुद्धा काय करावं सुचत नव्हत... त्याला अजिबात मेघनाला सांगायचं नव्हतं कि त्याने हे सगळं तिच्या भल्यासाठी केलं आहे.. पण आज मेघनामुळे त्याला हे सत्य तिच्यापुढे मांडावे लागले. बाप लेकीच्या नात्यात दुरावा निर्माण करायचा त्याचा हेतू नव्हता, पण आर्यन आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे सगळं मेघनाला सांगणं गरजेचे होते.
"लग्नानंतर तरी आमच्यात मैत्रीचं नातं फुलतंय कि नाही काय माहित... मेघनाने असाच अबोला धरला तर अवघड आहे सगळं.. त्या आपल्या घरात कसं निभावून घेतील देव जाणे.. पण आम्ही त्यांची साथ कधीच सोडणार नाही.. त्यांचं हरएक स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आमची असेल.. हो फक्त त्यांचं पहिलं प्रेम हे फक्त स्वप्नच राहील.. ते काही आम्ही पूर्ण करू शकत नाही... हे राजकारण आमच्या खाजगी आयुष्यात असं डोकावेल हे वाटलं नव्हत आम्हाला..." राजचा मनोमन विचार सुरु असतो. मेघनाला बोलतं करण्यासाठी शेवटी राज पुन्हा एकदा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो..

राज : मेघना तुम्ही अशा उदास राहू नका..काहीतरी बोला.. काय चालू आहे मनात ते तरी सांगा..

मेघना: उदास राहू नको मग काय करू? मला नाही करायचं तुझ्याशी लग्न.. तुझ्याशी काय.. मला आर्यन सोडून कोणीच नको... बोल.. करू शकतोस माझी इच्छा पूर्ण?

राज : मेघना.. हे बघा.. सारखं त्याच त्याच गोष्टी उगाळण्यात काही अर्थ नाही... तुम्ही अजूनही मला सांगू शकता.. मी या लग्नाला नकार देईन.. आर्यनच्या फॅमिलीला काही त्रास होऊ नये.. आर्यनचा जीव धोक्यात पडू नये म्हणून या लग्नाच्या निर्णयात आता तुम्ही सुद्धा सामील आहात.. घरी जा.. शांतपणे विचार करा आणि मग मला सांगा तुम्ही काय निर्णय घेतला तो.. आम्ही तुमच्या सांगण्यावरून कधीही या लग्नाला नकार देऊ शकतो...

मेघना : पप्पांना सांग.. मला माझा फोन परत दया.. तेवढं तुझं ते ऐकतील.. आणि मला तुझा नंबर पण लिहून दे..

राज : आम्ही बोलतो पप्पांशी.. तुम्हाला फोन द्यायला सांगतो.. ठीक आहे?

मेघना : ओके..

दोघे जण आता कोल्हापूरला आले होते. राजने मेघनाला रंकाळ्याजवळ सोडले. जाता जाता मेघनाने त्याला पुन्हा फोन संदर्भात आठवण करून दिली आणि ती तिच्या गाडीत बसून घरी गेली.

राज घरी गेल्यावर बघतो तर घरी नवीन सूनेच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झालेली असते. माई आणि सारीका म्हणजेच देशमुखांची मोठी सून मेघनासाठी कोणत्या साड्या घ्यायच्या,कोणते दागिने घ्यायचे या संदर्भात बोलत होत्या. राजला आलेलं पाहून माईनी  त्याला जवळ बोलावले.

माई : राज.. बोला.. कोणत्या रंगाची साडी छान दिसेल मेघनावर?

राज : काय हे आई.. आम्हाला कुठे काय कळतं त्यामधलं.. तुम्ही आणि वाहिनी बघून घ्या ते..

सारिका : भावोजी.. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टीत रस घ्यावा लागणार.. आयुष्यभर थोडी ना मी आणि आई तुमची मदत करणार आहोत?

माई : अगदी खरंय.. एखादा रंग असेल ना मनात.. जो मेघनावर खुलून येईल.. सांगा  ना..

राज : उम्म्म...त्यांच्यावर लाल रंग खूप सुरेख दिसतो.. काय छान दिसत होत्या त्या आज .. (असं म्हणून पटकन तो शांत होतो )

सारिका : ओहो.. भावोजी.. आज भेट झालेली दिसतीये वाटतं..

राज : नाही ते.. असचं सहज भेटलो होतो..

माई : त्यात काय लाजायचं? भेटला तर काय?तुमची होणारी बायको आहे.. राज आम्हाला सांगा.. मेघना आपल्या घरात मिळतंजुळतं घेईल ना रे? नाही म्हणजे आई विना पोर.. तिला चार उपदेशाचे शब्द कोण सांगणार तिथे.. म्हणून आपलं विचारलं...

राज : आम्हाला एकच गोष्ट समजते.. त्यांच्या इच्छा,आकांक्षा यांचा मान ठेवला तर त्या आपल्या गोष्टींचा मान का नाही ठेवणार.. काळजी नका करू तुम्ही.. मेघना समजूतदार आहेत..

राजला घरात चालू असणारी जय्यत तयारी बघून मनोमन वाईट वाटलं. मेघनाने त्याला नकार द्यायला लावला तर काय होईल... घरात सगळे किती खुश आहेत... त्या सगळ्यांना किती वाईट वाटेल हा विचार करून राज बेचैन झाला.तितक्यात त्याला अप्पा पाटलांना मेघनाच्या फोन संदर्भात सांगायचे आठवले आणि त्याने पाटलांना फोन लावला ...
अप्पा पाटील : हा.. राजराव बोला.. काय कशी झाली भेट?

राज : भेट झाली चांगली.. पण मला सांगा मेघना घरी व्यवस्थित पोहोचल्या ना??

अप्पा पाटील : हो हो.. आल्या त्या घरी...

राज : बघा.. हे असं होतं.. आम्हाला मेघनाशी काही बोलायचं झालं तर तुम्हाला फोन करायला लागतो.. तेवढा त्यांना फोन दया कि.. आता आम्ही एकमेकांना फोन करणार, मेसेज करणार.. ते कसं करायचं आम्ही..? तुमच्या फोन वर तर नक्कीच नाही.. त्यांना फोन दया बघू.. आमच्या होणाऱ्या बायकोकडे मोबाईल पाहिजे कि.. का आम्ही घेऊन देऊ त्यांना नवीन फोन??

अप्पा पाटील : अहो.. राजराव.. काय बोलत आहात तुम्ही.. तुम्ही नका घेऊ फोन.. आम्ही देतो त्यांना फोन.. काळजी करू नका..

राज : लगेच दया.. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे..

अप्पा पाटील : हा हा..ठीक आहे..

फोन झाल्यावर पाटील समोरच बसलेल्या मेघनाला पाटील विचारतात.
अप्पा पाटील : तुम्ही राजरावांना तुम्हाला फोन दया हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितला का?

मेघना: मी कशाला सांगेन पप्पा.. त्यांनाच बोलायचं असतं.. मग ते कसं बोलणार.. म्हणून ते स्वतःच बोलले पप्पांशी बोलतो असं.. तुम्हाला नसेल द्यायचा तर नका देऊ...

अप्पा पाटील :त्यांनी सांगितल्यावर द्यावा तर लागेलच आता...

असं म्हणून पाटील मेघनाचा मोबाईल घेऊन आले आणि त्यांनी तो मेघनाकडे दिला.
"याद राखा... परत त्या पंजाबी मुलासोबत बोलला तर माझ्यासारखा वाईट नाही कोणी...."पाटील बोलले.

"हे बघा पप्पा मला चांगलंच समजलं आहे तुमच्यासारखं कोणी वाईट नाहीये... आणि माझ्यावर विश्वास नसेल तर नको मला मोबाईल..."मेघनाने उत्तर दिले.

"असू दे असू दे... तारा अक्कांसोबत लग्नाच्या तयारीला सुरुवात करा.. कोणत्या साड्या, दागिने अजून काय पाहिजे ते सगळं ठरवा.. आम्ही उद्या वेडिंग प्लॅनरला बोलवलं आहे..."पाटील बोलले.

"हो... ठीक आहे..." असं म्हणून मेघना तिच्या रूम मध्ये गेली. मेघना मोबाईल मिळाल्यामुळे जाम खुश होती. राजशी गोड बोलून आपण मोबाईल परत मिळवला याचा तिला भलताच आनंद झाला होता.
"असचं जर राजला या लग्नाला नकार द्यायला लावला तर.... माझ्यावर काही पप्पांना संशय येणार नाही.. हे लग्न मोडलं जाईल.. आणि मग मी नजर चुकवून इथून पळून जाईल पुण्याला.. पुरे झालं पप्पांच्या इमेजला जपणं... मी आता माझा विचार करणार... पण.. पण तो पर्यंत आर्यनला काही त्रास झाला तर??? त्याचा जीव धोक्यात कसा घालू मी?? पण पप्पांनी त्याला काही करायच्या आत मी इथून पळून जाईल..."मेघनाच्या मनात विचारचक्र सुरु झाले. तिला आज मोबाईल परत मिळवल्याने वाटत होते कि पप्पांना आपण आरामात अशा प्रकारे मात देऊ शकतो.

तितक्यात तारा अक्का तिच्या रूम मध्ये आल्या.
तारा अक्का : मेघू बेबी काय झालं??? काय बोलले राज??

मेघना : अक्का आज पप्पांचा भयानक चेहरा माझ्यासमोर आला. त्यांनी आर्यनच्या फॅमिलीला त्रास द्यायला सुरुवात केलीये. पण आर्यन म्हटला तसा राजला मी खूप आवडते. तो माझ्यासाठी काहीपण करायला तयार आहे. तो नकार सुद्धा देईल... पण आर्यनच्या फॅमिलीला धोका तर आहेच... यावर काय उपाय करावा कळत नाहीये...

तारा अक्का : बाप रे.. त्यांचा जीव कशाला धोक्यात घालायचा..??

मेघना : हो ना गं अक्का.. आज राजशी गोड बोलून मी मोबाईल परत मिळवला.. तसंच काहीतरी करता आलं तर... हा मी विचार करतीये...

तारा अक्का : पण आर्यन रावांच्या जीवाला धोका आहे या मध्ये...

मेघना : हो ना गं अक्का... मी इथून पळून गेले तर?? मी नाही आता पप्पांचा विचार करणारे... तुला काय वाटतं???

तारा अक्का : मी तर पहिलेच तुम्हाला बोलले होते.. जा पळून.. आम्ही मदत करू..

मेघना :हे सगळं जरा अति फिल्मी नाहीये का??? पळून जाणं वगैरे... मी आर्यन सोबत बोलते... मग ठरवते.. तो पर्यंत तुला काही सुचलं तर सांग...

क्रमश :

आता पुढे काय होईल? मेघना खरचं पळून जाईल का? आर्यनच्या जीवाला काही धोका निर्माण होईल का?? राज खरंच लग्नाला नकार देईल का? पाहूया पुढच्या भागात....

वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा..
आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®




 

🎭 Series Post

View all