मितवा part twenty eight

Love story of a young couple

मितवा भाग अठ्ठावीस
मागील भागात आपण पाहिले कि आज राज आणि मेघनाचा साखरपुडा आहे.. सकाळी सकाळीच आर्यन तिच्या घराखाली येऊन थांबला आहे.. पण मेघना त्याच्या सोबत जायला नकार देते.. आणि पाटील कुटुंबीय महाबळेश्वरला लग्न समारंभसाठी जायला निघतात.. आता पाहू पुढे...

     देशमुख आणि पाटील कुटुंबीय महाबळेश्वरला पोहोचतात... संध्याकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने सगळ्यांची लगबग सुरु असते. एक एक पाहुणे आता कार्यक्रमस्थळी यायला सुरुवात झालेली असते.
      मेघना तिच्या रूममध्ये आवरून बसलेली असते. हिरवी साडी, हिरवा चुडा, मेहंदी यामुळे तिचे रूप अजूनच खुलून आले होते. मेकअप आर्टिस्ट तिची साडी नीट करत असतात तितक्यात तारा अक्का तिच्या रूम मध्ये येतात.त्यांना पाहून मेघना बाकी सगळ्यांना बाहेर जायला सांगते. तारा अक्का मेघनाकडे बघतच बसतात. ती आज फार सुंदर दिसत असते.मेघना जाऊन तारा अक्कांना मिठी मारते...

मेघना : बरं झालं अक्का तू आलीस.. खूप एकटं वाटत होतं.. बघायला गेलं तर सगळेच आहेत इथे.. पण मायेनं विचारपूस करणारी तू एकटीच आहेस...

तारा अक्का : असं कसं आम्ही तुम्हाला एकटं टाकू?? आमची लेक आहात तुम्ही... पण बेबी आमची अन तुमची साथ एवढीच होती.. आता उद्या तुम्ही सासरी निघून जाल.. आम्ही मग कोणाच्या मागे फिरायचं?? म्हणून उद्यापासून आम्ही बंगल्यावर नाही राहणार.. आमच्या गावी निघून जाणार..

मेघना : अक्का.. अगं.. असं का बोलतीयेस?? मी याच शहरात असणारे.. माझ्या आईच्या जागी आहेस तू.. मला कोण मग आईची माया लावणार??

तारा अक्का : अहो.. तिथे माई आहेत कि.. त्यांनाच आता तुम्ही आई मानायचं... तुम्ही आम्हाला आईच्या जागी बघता म्हणून सांगतोय बेबी.. आता आर्यनरावांचा विचार सोडून दया... भूतकाळात जे घडलं ते मागे ठेवा.. उद्यापासून नव्या आयुष्याची सुरुवात करा.. आम्ही पाहिलं आहे.. राजराव पण खूप चांगले आहेत स्वभावानी...तुम्ही त्यांची बायको आणि देशमुख घरण्याची सून बनणार आहात.. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.. पटकन तिथे तोंडाला येईल ते बोलू नका.. यापुढे राजरावांच्या सुख दुःखात त्यांची साथ दया.. झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा बेबी... विसरून जा...

मेघना : (मेघनाला अक्काचं बोलणं ऐकून तर रडूच कोसळलं...)अक्का... मला कोण समजून घेणार तिथे?? अक्का तू पण चल ना गं?? मला तुझ्यासारखं सांभाळून कोण घेणार तिथे???

तारा अक्का : (डोळे पुसत ) बेबी.. आपली साथ एवढीच होती.. आता पुढे आयुष्य कसं घालवायचं हे तुमच्या हातात आहे.. जुन्या गोष्टी आठवून रडत बसायचं का पुढ्यात आलेलं सत्य स्वीकारायचं हे तुमच्या हातात आहे... आणि काही वाटलं तर एक फोन करा.. आम्ही येऊ लगेच तुम्हाला भेटायला...

मेघना :अक्का... सॉरी... मी कधी चुकून तुझा अपमान केला असेल तर मला माफ कर... मी तुझं ऐकलं नाही त्या वेळेला त्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळतीये...

तारा अक्का : चूप बसा बेबी... माफी काय मागताय? लेक आहात तुम्ही... शिक्षा वगैरे काही नाही हो.. सगळा नशिबाचा खेळ आहे... तुमच्या नशिबात राजराव आहेत..

मेघना : अक्का... (मेघना हुंदके देत रडते )हो... मला चांगलंच समजलं आहे... नशिबापुढे काही होऊ नाही शकत...

तारा अक्का : तुम्ही राजरावांची पत्नी होणार आहात.. देशमुखांचे नीतिनियम कडक आहेत... पण तुम्ही निभावून न्याल आम्हाला खात्री आहे... हे बघा.. आम्ही तुमच्यासाठी काय आणलय ते...
(असं म्हणत तारा अक्का त्यांच्या पिशवीतून एक छोटासा सोन्याचा कुंकूवाचा करंडा काढतात )
आम्हाला फार महागडे काही देता येत नाही पण आम्हाला वाटतं एका स्त्रीची लग्नानंतर खरी ताकद तिचं कुंकू असतं... म्हणून तुम्हाला हा करंडा आणला आहे.. जपून ठेवा.. राजराव तुमची खरी ताकद आहेत हे ओळखा... त्यांची साथ दया... सुखाने संसार करा..

      अक्का आणि मेघना एकमेकींना मिठी मारतात.. दोघींच्याही डोळ्यातील अश्रू थांबायचं काही नाव घेत नसतात... तितक्यात दार वाजते.. दोघी तशा पटकन सावरतात.. डोळे पुसतात.. मेघना "आत या " बोलते.. आणि तिचे पप्पा रूमध्ये येतात...

पप्पा : चला बेटा.. खाली तुम्हाला बोलवत आहेत.. चला..

मेघना : ह्म्म.. येते..

पप्पा :अजून रागावला आहात का आमच्यावर??

मेघना : अजून??? म्हणजे?? मला कसले हक्क ठेवलेत का तुम्ही?हसते, रडते, उठते, बसते सगळं तुमच्या मर्जीने... माझ्यात काय हिंमत जे मी तुमच्यावर नाराज होईल...

तारा अक्का : बेबी.. आज तरी नका असं बोलू.. बापाचं काळीज आहे.. उद्या तुमच्या जाण्याने साहेबांना पण करमणार नाहीये..

पप्पा : हो बेटा.. तुम्ही आमचा जीव कि प्राण आहात..

मेघना : पप्पा.. प्लीज.. उशीर होतोय खाली चला...

पप्पा : आम्हाला माहित आहे तुमच्या मनाविरुद्ध हे लग्न घडतंय.. पण देशमुख घराणं खूप चांगलं आहे. तुमची काळजी घेतील ते सगळे..

मेघना : माझ्या साखरपुड्याच्या दिवशी मला नका सांगू कोण कसे आहे ते... तुमच्यासाठी गायकवाड घराणं पण चांगलं होतं.. आणि मुळात मला आता तर चांगलं आणि वाईट यातला फरकच समजत नाहीये...माझ्यासाठी तुम्ही पण खूप चांगले होता पप्पा.. पण गेल्या काही दिवसात तुम्ही जे वागला ना.. त्या नंतर मला कळतच नाहीये नक्की काय चांगलं आहे नि काय वाईट..

पप्पा : बेटा.. तुम्ही कोणताही महाराष्ट्रीयन मुलगा आमच्यापुढ्यात आणला असता ना तरी तुमचं लग्न लावून दिलं असतं त्याच्यासोबत... पंजाबी मुलगा का??

मेघना : कारण प्रेम आंधळं असतं पप्पा..

पप्पा: माफ करा आम्हाला.. तुमच्या आयुष्याचं राजकारण केलं.. पण आमच्याकडे काही पर्याय नव्हता..

मेघना : नुसतं राजकारण नाही.. घाणेरडं राजरकारण... तुम्ही एखाद्याचा जीव घ्यायला तयार झाला, निष्पाप लोकांना त्रास द्यायला लागला... आणि मी हे लग्न तुमच्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त आर्यनच्या केसालाही धक्का लागू नये म्हणून करतीये.. आणि हो उद्या माझं लग्न झाल्यावर आर्यनच्या मॉमच बुटीक पुन्हा चालू झालं पाहिजे.. आणि त्यांच्या फॅक्टरीतील सगळे प्रॉब्लेम्स संपले पाहिजेत...

पप्पा : काय खात्री तो मुलगा लग्नानंतर तुमच्या आयुष्यात परत येणार नाही???

मेघना : शी... पप्पा.. किती घाणेरडे विचार आहेत तुमचे.. आता काही वेळापूर्वी तुम्ही माझी माफी मागत होतात आणि आता हे असं बोलत आहात... प्लीज माझ्याशी बोलूच नका तुम्ही... चला आता खाली..

     कदाचित अप्पा पाटील तो मुलगा मेघनाच्या आयुष्यात अजून आहे कि नाही याची पुष्टी करायला आले होते. त्यानंतर पाटील, अक्का आणि मेघना साखरपुड्यासाठी हॉलकडे जायला निघाले. मेघना हॉल मध्ये पोहोचली तर सगळा हॉल पाहुण्यांनी तुडुंब भरला होता, स्टेज वर खूप आकर्षक सजावट केली होती. सगळ्यांच्या नजरा मेघनावर खिळल्या होत्या कारण मेघना आज अतिशय सुंदर दिसत होती. राजची तर नजरच हटत नव्हती तिच्यावरून. मेघना हिरव्या साडीत आज कमाल दिसत होती.मेघना साखरपुड्याचे विधी करण्यासाठी स्टेजवर गेली. राज आणि मेघनाचे साखरपुड्याचे विधी झाले आणि आता एकमेकांना अंगठी घालण्याची वेळ आली.मेघनाने थरथरत तिचा हात राजच्या हातात दिला.. राजने आज पहिल्यांदा मेघनाचा हात हातात घेतला होता.. तिला पहिल्यांदा स्पर्श केला होता.. मेघनाच्या मनाची घालमेल त्याच्या लक्षात आली.. तो हळूच, "काळजी करू नका.. आम्ही आहोत तुमच्यासोबत " असं पुटपुटला.. मेघनाने त्याच्या डोळ्यात पाहिले.. आज पहिल्यांदा त्यांची  नजरेला नजर भिडली.. आणि नकळत मेघनाचं थरथरणं थांबलं.. आणि राजने तिच्या हातात अंगठी घातली... मेघनानेही राजच्या बोटात अंगठी घातली आणि दोघांचा साखरपुडा पार पडला.

       साखरपुड्याचा कार्यक्रम संपवून मेघना तिच्या रूममध्ये आली. तिची छाती अजूनही धडधडत होती. आज तिचा राज सोबत साखरपुडा झाला होता... आणि आर्यन आणि तिच्या नात्याचा शेवट झाला होता... मेघनाला रडू कोसळल...
"खरचं.. आज खऱ्या अर्थाने आमचं नातं संपलं.. आज खऱ्या अर्थाने मी राजची पत्नी होण्यासाठी पाऊल उचललं... आर्यन काय करत असेल?? तो गेला असेल ना नीट घरी??? तो खरंच गेला असेल का घरी??? का इथे पण बाहेर येऊन थांबला असेल?? बापरे.. मी हा विचारच केला नाही.. तो खरंच असेल का खाली?? तो म्हटला होता महाबळेश्वरला पण येणार म्हणून... काय करू?? खाली जाऊन बघू का?? पण आत्ता?? रात्रीचा एक वाजला आहे.. आत्ता कुठे खाली जाऊ?? कोणी मला पहिलं तर?? पण आर्यन... तो वाट बघत असेल तर??? त्याला घरी जा म्हणून सांगते.. कमीत कमी एकदा शेवटचं त्याला पाहून तरी घेते...."असा विचार करून मेघनाने कपडे बदलले, एक ओढणी तिच्या चेहरावरून घेतली आणि ती धावतपाळतच हॉटेलच्या एंट्रन्स गेट कडे पोहोचली... गेटजवळ उभं राहून तिने रस्त्यावर वाकून पाहिले.. तितक्यात सिक्युरिटी गार्डने तिला विचारले.."मॅडम सब ठीक है ना? कुछ चाहिये क्या आपको?? इतनी रात को आप ऐसे बाहर आये हो..."
"नही.. कुछ नही.. किसी को ढुंड रही हू.." मेघना उत्तरली..
तितक्यात आर्यनची कार रस्त्याच्या पलीकडे येऊन थांबली... आर्यन कार मधून बाहेर आला.. त्याने ओढणीतील मेघनाला ओळखलं होते.. आर्यनला रस्त्याच्या पलीकडे पाहून मेघना अजून थोडी पुढे सरसावली  पण गेटच्या बाहेर जायची तिची हिंमत होईना.. जणू ते गेट तिच्यासाठी लक्ष्मण रेषा बनले होते...तिने गेट जवळ उभे राहून आर्यनला फोन केला..

मेघना : आर्यन.. का थांबला आहेस?? प्लीज जा.. सेफ नाहीये हे तुझ्यासाठी..

आर्यन : तू येण्याची वाट बघतोय.. तुम्हे लेकर ही जाऊंगा..

मेघना : ते शक्य नाही.. माझा आत्ता साखरपुडा झाला आहे....

आर्यन : सो व्हॉट?? रिंग उतारके फेक दो.. शादी तो नही हुई.. मेघना बघ अजूनही उशीर झालेला नाहीये.. आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा चल माझ्यासोबत...

मेघना : आर्यन प्लीज जा ना तू... तुला काही झालं तर मी आयुष्यभर रडतच बसेन..

आर्यन : मेघना यार.. चलो ना.. क्या प्रॉब्लेम है तुम्हारी?? चलो.. आओ.. नही तो मै अंदर आता हू..

मेघना : नाही.. तुला माझी शपथ आहे.. इथे तुला कोणी पाहिलं तर अवघड होईल.. आर्यन जा.. मी फक्त तुला शेवटचं बघायला आले होते... बाय.. आता पुन्हा आपली भेट नाही.. ना बोलणं होईल आपलं.. बाय...
    असं म्हणून मेघना फोन ठेवून आत पळून जाते... आर्यन तसाच तिथे उभं राहून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहतो... मेघना डोळे पुसत पुसत तिच्या रूमचं लॉक उघडत असते तितक्यात राज तिच्या मागून तिला बोलतो...

राज : आहे ना खाली उभा?? मग का आला वर?? जा ना निघून... कशाला परत आलात ??

मेघना : तू?? इतक्या रात्री इथे??

राज : आमचं सोडा.. तो बघा.. इतक्या रात्री सुद्धा तुमची खाली उभं राहून वाट बघतोय..

मेघना : तुला माहित आहे.. मी का वर आली आहे परत..

राज : किती प्रेम करता तुम्ही एकमेकांनावर... तुम्ही त्याच्या जीवासाठी आमच्याशी लग्न करत आहात.. आणि तो जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी इथे आला.. आम्ही कुठून आलो तुमच्यामध्ये?? खरच ग्रेट आहात तुम्ही दोघे...

मेघना : स्वतःला आत्ता कसं रोखलं मी ते माझं मलाच माहितीये... तो लग्न होईपर्यंत इथून जाणार नाही.. मला माहित आहे..

राज :कोण करत आजकाल एकमेकांवर इतकं प्रेम?

मेघना : का?? तू नाही करत माझ्यावर??? तुला माहित आहे मी तुझ्यावर प्रेम करत नाही.. मी तुझी कधीच होऊ शकत नाही.. तरी करतच आहेस ना माझ्याशी लग्न.. आजकाल कोण करतं असं??

राज : बोलण्यात तुमचा हात कोणी धरू शकत नाही.. हे जगासाठी लग्न आहे.. आमचा तुमच्यावर काहीही अधिकार नाही.. तुम्ही काळजी करू नका..

मेघना : हे सांगण्यासाठी इतक्या रात्री इथे आलास??

राज : हो.. तुम्ही टेन्शन घेऊ नका लग्नाचं.. मगाशी तुमचा हात थरथरत होता..तुम्ही लग्नानंतरही आर्यन सोबत बोलू शकता आणि वाटलं तर भेटू शकता..

मेघना : मी आत्ता शेवटचं बोलले आणि भेटले त्याला.. काळजी करू नकोस तू..

राज : तुम्ही तुमचा पूर्ण वेळ घ्या.. आणि वाटलं तरच आमच्याशी मैत्री करा...

मेघना : तू हे सगळं का सांगतोयस मला?? आणि माझ्यासाठी इतकं सगळं का करतोयस??

राज : कारण आम्हाला तुम्ही आवडता... आणि आम्ही फारसं मुव्ही वगैरे बघत नाही.. पण एका मुव्हीमधला डायलॉग आम्हाला फार आवडतो.. "असली प्यार का मतलब हासील करना नही होता..."

मेघना : खरंय... असली प्यार का मतलब हासील करना नही होता.... लांब राहून आपण त्या व्यक्तीवर तितकंच प्रेम करु शकतो..

राज : हो.. जे आम्ही तुमच्यावर करतो.. आणि यापुढे ही करणार... मेघना जमलं तर आमच्या मैत्रीच्या प्रस्तावावर नक्की विचार करा..

मेघना : हम्म... झोपते मी.. उद्या लग्न आहे आपलं.. सकाळी लवकर उठायचं आहे.. बाय.. गुड नाईट..

    आणि मेघना रूम मध्ये जाते.

क्रमश :

आता पुढे काय होईल? उद्या राज आणि मेघनाचं लग्न होईल??? आर्यन असाच खाली थांबून राहील का? ही खरचं आर्यन आणि मेघनाची शेवटची भेट होती???
पाहूया पुढच्या भागात...

वाचकहो हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा.. धन्यवाद..

सिद्धी भुरके ©®

    

🎭 Series Post

View all