मितवा part twenty

Love story of a young couple

मितवा भाग वीस

मागील भागात आपण पाहिले कि अक्कांच्या फोनवरून मेघनाचे आर्यनसोबत बोलणे होते. राजने या लग्नासाठी नकार द्यावा यासाठी मेघना आज राजला भेटणार असते. आता पाहू पुढे....

मेघना ठीक दहा वाजता रंकाळ्याला पोहोचते. राजलाच भेटत असल्याने अप्पा पाटलांनी तिच्या सोबत बाकी कोणाला सोडलेलं नसतं. समोर बघते तर राज गाडीत तिची वाट बघतच असतो. आता मेघनाकडे मोबाईल नसल्याने तिलाच कारमधून उतरून राजच्या कार पर्यंत जावं लागतं. मेघना त्याच्या गाडीची काच वाजवते तसं राज तिला आत बसायला बोलवतो. मेघना राजच्या गाडीत जाऊन बसते.
मेघना : मला तुझ्याशी बोलायचं आहे.. आणि तू हे रंकाळ्या सारखी पब्लिक प्लेस शोधलीस... वा... ग्रेट आहेस...

राज : परत तुम्ही वरून अरे तुरे वर आलात... सकाळी पप्पांसमोर नाटक करत होता का आमच्याशी नीट बोलायचं?

मेघना : हे बघ.. फालतू बडबड करायला वेळ नाहीये माझ्याकडे.. हे असं आपण मूर्खासारखं गाडीत बसून बोलायचं आहे का??

राज : नक्कीच नाही.. आपण आता पन्हाळ्याला जायचं आहे.. तिथे आमचं घर आहे.. तिथे बसून बोलू..

मेघना :आर यू मॅड? मी तुझ्यासोबत एकटी पन्हाळ्याला येणार नाहीये.. मला वाटलं कोणतीतरी डिसेंट जागा सांगशील... तुझ्या घरी.. एकटी.. नो वे...

राज : मला तुमचा हा राग आहे ना तो फार आवडतो बघा.. नाकाचा शेंडा कसा लगेच लाल होतो तुमचा.. अहो मेघना.. आपण असच डिसेंट जागी बसून बोलू शकत नाही.. चार लोकं ओळखतात आम्हाला.. कोणीतरी ओळखीचं भेटणार.. आपल्याला बोलता येणार नाही. त्यापेक्षा तिथे एकांतात बोलू...

मेघना : मी तुझ्यासोबत एकांतात कुठेही येणार नाहीये..

राज : ठीक आहे.. मग नको बोलायला.. तुमची मर्जी..

मेघना :(स्वतःच्या रागावर खूप नियंत्रण ठेवते कारण आज कोणत्याही परिस्थितीत तिला राज सोबत बोलायचंच असतं..)बरं ठीक आहे.. जाऊ पन्हाळ्याला.. पण मी माझ्या कार मधून येणार.. तुझ्या सोबत नाही..

राज : आता हे काय नवीन? किती हट्टी आहात तुम्ही.. लहानपणापासून तुमचा स्वभाव काही बदलला नाही.. अहो जाता जाता सुद्धा आपण बोलू शकतो... आणि आमच्यावर विश्वास ठेवा.. आम्ही तुम्हाला काहीपण करणार नाही.. तेवढा एक मित्र म्हणून तर विश्वास ठेवाल ना आमच्यावर??

मेघना : (काहीसा विचार करून ) उम्म्म... बरं.. ठीक आहे.. चल.. तू बालमित्र आहेस म्हणून येते तुझ्यासोबत..

राज : नशीब आमचं... चला. बरं.. आज तुम्ही खूप छान दिसत आहात.. लाल रंग सुंदर दिसतो तुमच्यावर...

मेघना : स्टॉप फ्लर्टींग... गाडी चालव.. मला काय चांगलं दिसतं ते मला माहित आहे.. तुला इम्प्रेस करायला नाही आलीये मी..

राज :अरे तुम्ही कधी सरळ शब्दात उत्तर देऊ शकत नाही का?? कसं झेललं असेल त्या आर्यन मल्होत्राने..

मेघना : शट अप.. त्याचं नाव घेऊ नकोस.. तुला काय करायचं आहे आमच्या बद्दल जाणून...

राज : बरं.. तुमचा मोबाईल कुठे गेला?पप्पांनी तुमच्या प्रेमप्रकरणामुळे घेतला कि काय काढून??

मेघना : स्टॉप इट राज.. किती चिडवशील आणि त्रास देशील मला? तू भावनाशून्य असशील वाटलं नव्हतं मला... माझं प्रेम, माझं सर्वस्व आहे आर्यन.. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय.. तुला हे सगळं एक जोक वाटतोय का?? तुला काय करणार प्रेमाची किंमत? तुला हे लग्न करून असुरी आनंद मिळतोय ना??

राज : अहो आम्ही तुमचा मूड ठीक करायला बोलत होतो.. सॉरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर..

मेघना : माझं प्रेम हा काय चेष्टेचा विषय आहे का? तुला काय सांगतीये पण मी?? तू कधी कोणावर प्रेम केलं असशील तर समजेल तुला...

राज :आमचं प्रेम आणि आमचं दुःख कोणीच समजू शकत नाही...

मेघना राजच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देत नाही. ती स्वतःच्या बॅगेतून हेडसेट काढते, मोबाईल वर गाणी लावते आणि कानात हेडसेट घालून गाणी ऐकू लागते. राजची फालतू बडबड ऐकण्यापेक्षा गाणी ऐकलेली बरी असा ती विचार करते. गाणी ऐकत ती बाहेर बघून विचार करू लागते.

"ई.. माझं राज सोबत लग्न झालं तर मी एक दिवस सुद्धा त्याच्या सोबत राहू शकत नाही... किती फालतू बडबड करतो तो.. आणि काय तर तुम्ही... आम्ही... ई.... हे काय बोलणं आहे? असं कोण बोलतं आजकाल? मी अशा माणसासोबत आयुष्य काढू शकत नाही... आज याच्याकडून नकार काढून घेतला कि झालं काम.. नंतर मला तर याचा चेहरा बघायची पण इच्छा नाहीये...नाही म्हणजे आहे तो दिसायला चांगला.. सगळं आहे त्यात जे मुलीला आवडू शकेल.. पण तरी तो अजिबात रोमँटिक नाहीये... स्वतःच्या पप्पांना विचारून सगळे निर्णय घेतो... असं कोण असतं का आजकाल? ज्याला स्वतःची बुद्धी नाही असा नवरा नको मला..." मेघना मनोमन असा विचार करत असते तोच प्लेलिस्ट मध्ये मितवा गाणं लागतं...मेघना इतर सगळे विचार बंद करून खूप शांतपणे गाणं ऐकते.. त्यातला एक एक शब्द ती फील करते... आर्यनची आठवण आल्याने चटकन तिच्या डोळ्यात पाणी येतं."हे गाणं म्हणून आर्यनने आपल्याला प्रेमाची कबुली दिली होती... त्याच्यासोबत कार मध्ये सुद्धा हेच गाणं ऐकलं होतं.. किती छान वाटलं होतं तेव्हा...मला आता लवकरात लवकर आर्यनला भेटायचं आहे... एकदा इथून गेले ना कि परत काही येणार नाही मी इथे... काय तर म्हणे देशमुखांच्या घरची सून.. नो वे.. मी फक्त आर्यनची आहे.. मेघना मल्होत्रा... किती छान वाटतं हे नाव... कीती ओपन माईंडेड आहे आर्यनची फॅमिली.. नाहीतर हे देशमुख.. मूर्ख लोकं.. साडी काय आणि तो खांद्यावरचा पदर काय... देवा प्लीज आज मला हेल्प कर... मला राज कडून नकार काढून घ्यायचा आहे.. थोडं कठीण काम आहे.. पण अशक्य नाही.. किती भाव खातो ना हा राज सुद्धा.. स्वतःला कोण समजतो काय माहित... कसा माझा हा फ्रेंड होता लहानपणी देव जाणे.. ह्याला मेघना कधीच भेटणार नाही... कधीच नाही.... "मेघनाच्या मनात नाना विचारांचं काहूर माजलं होतं.

इथे राजने सुद्धा गाडी चालवताना हळूच बाहेर बघणाऱ्या मेघनाकडे पाहिलं. खरचं मेघना लाल ड्रेस मध्ये आज खूपच सुंदर दिसत होती."कीती छान दिसत आहेत  ना मेघना आज .. लहानपणी एकत्र खेळायचो, जेवायचो आम्ही.. आम्हाला तर तेव्हापासूनच मेघना आवडायच्या ... नकळत आम्ही कधी त्यांच्या प्रेमात पडलो माहितच नाही.. मोठं झाल्यावर फारसं काही बोलणं, भेटणं झालं नाही.. पण आज आमचा विश्वासच बसत नाहीये कि त्यांच्यासोबत आमचं लग्न ठरलं आहे.. पण.... पण त्यांना काही किंमत नाहीये आमच्या प्रेमाची.. सहाजिक आहे.. त्या दुसऱ्या कोणावर प्रेम करतात, त्याची स्वप्न बघतात अशात अचानक आमच्याशी लग्न करणे त्यांना कठीण जात असणारे... मेघना फक्त एकदा आमचं मन जाणून घ्या तुम्ही.. कमीत कमी आमच्याशी पूर्वीसारखी मैत्री तर करा तुम्ही.. कसं सांगू तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही काहीपण करू शकतो... तुमचं आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून हा लग्नाचा निर्णय घेतला आहे आम्ही.. कसं समजवू तुम्हाला?आमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे तुम्ही..." राजसुद्धा मनोमन मेघना बद्दल विचार करत असतो.

बघता बघता दोघे देशमुखांच्या पन्हाळ्यावरील फार्म हाऊसला पोहचतात.फार्म हाऊस बघून मेघनाच्या पुन्हा बालपणीच्या आठवणी जाग्या होतात.

मेघना : आपण सगळे कीती वेळा यायचो ना इथे? मला फार आवडायची ही जागा.. पप्पा मला सुट्टीच्या दिवशी सुद्धा घेऊन यायचे... कीती मजा यायची... पण गेले ते दिवस.. एक काळ होता जेव्हा पप्पांना माझी खूप काळजी होती... आता मात्र त्यांना राजकारणाशिवाय काही दिसत नाहीये...

राज : अहो असं काही नाहीये.. ते अजूनही तुमच्यावर तितकंच प्रेम करतात... तुमच्या काळजीपोटी हे सगळं चालू आहे.. शेवटी बापाचं काळीज ते....बरं चला.. आपण मागच्या बागेत बसून बोलूया... मी आपल्यासाठी चहा सांगून येतो.. तुम्ही व्हा पुढे...

मेघना : नको मला काही.. मी ठीक आहे...

राज : आता त्या बिचाऱ्या चहाची काय चूक? बरं कॉफी सांगू का??

मेघना : उम्म्म.. बरं ठीक आहे.. मी कॉफी घेईन..
असं म्हणत मेघना बागेत जाते. समोर खूप सुंदर डोंगररांग असते.. धुकं पडलेलं असतं.. जणू काही ढग खाली आले आहेत असं जाणवत असतं.. खूपच छान वातावरण असतं. मेघनाला पुन्हा तिची आर्यनसोबतची लोणावळा ट्रिप आठवते. असचं काहीसं वातावरण तेव्हा पण होतं.. तो थंड वारा अंगावर शहारे आणत होता आणि तेव्हाच नकळत ती आर्यनच्या मिठीत सामावली होती. मेघना डोळ्यातील अश्रू पुसून मन खंबीर करते. तितक्यात मागून राज तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो.
राज : हे घ्या मेघना... कॉफी प्या..

मेघना : वा.. देशमुख घराण्यातील मुलाने चक्क चक्क एका मुलीला हातात कॉफी आणून दिली आहे..

राज : आमच्या घराण्यात आम्हाला मुलींचा आदर, सन्मान करणे शिकवले आहे.. तेच करत आहोत.. बरं बोला तुम्ही... काय बोलायचं आहे तुम्हाला?

मेघना : हो.. जरा महत्वाचं बोलायचं आहे... मला सांग तुला मी आवडते ना?

राज : हा काय प्रश्न आहे?

मेघना : अरे सांग ना.. माझ्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचे आहे...

राज : हो.. आवडता तुम्ही...

मेघना : तुला मी इतकी आवडते तरी सुद्धा मला त्रास होईल असं का वागतोस तू?? माझी इच्छा नाहीये तरी हे लग्न का करत आहेस तू?मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा... मला वाटतं कि आपल्यला जी व्यक्ती आवडते आपण त्याच्या आनंदासाठी काहीपण करू शकतो... पण तू तर मला त्रास देत आहेस... का??? कशासाठी या लग्नाचा अट्टाहास???

राज : आम्हाला खूप आवडता तुम्ही... आणि तुम्हाला काही त्रास होऊ नये.. तुमचं आयुष्य बरबाद होऊ नये म्हणूनच आम्ही स्वतःहून तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे...

मेघना : म्हणजे??? मला समजलं नाही... मला वाटतं उलट तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य बरबाद होईल... मी अजिबात खुश नाही राहणार तुझ्यासोबत.. तू स्वतःहून नाही म्हण या लग्नासाठी.. नकार दे... माझं इथे कोणी ऐकणार नाहीये.. तुझं तसं नाहीये.. काहीही कारण दे आणि नाही बोल...

राज : आम्ही नकार देऊन तुम्हाला काय वाटतं तुमचं आयुष्य खूप सुखी होईल???असं असतं तर आम्ही समोरून मागणी घातली नसती तुम्हाला... आता ऐकाच काय विचार करून आम्ही तुमच्याशी लग्नाचा निर्णय घेतला ते.. प्रतापराव गायकवाड नाव ऐकलंच असेल तुम्ही... मित्र पक्षातील नेता आहेत ते... त्यांची पार्टी आणि आपल्या पप्पांची पार्टी एकत्र निवडणूक लढवणार आहेत... काही महिन्यापूर्वी त्यांनी तुमच्या पप्पांकडे तुमच्यासाठी मागणी घातली होती त्यांच्या मुलासाठी... तुमच्या पप्पांचा यावर विचार सुद्धा सुरु झाला होता... पार्टीची मैत्री नात्यात बदलली तर काय वाईट आहे... याने निवडणुकीत फायदा होईल असं तुमच्या पप्पांच मत होतं.... पण त्यांचं घराणं म्हणजे गुंड घराणं आहे..ते गायकवाड आधी गुंड होते.. बंदुकीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचले आहेत... त्यांचा मुलगा सुद्धा तसाच.. घरात बायकांना कवडीमोलाची किंमत नाही.. त्या मुलाला सुद्धा इतर नको ते बाहेरचे शौक... आम्हाला हे समजताच तुमच्यासाठी हे स्थळ योग्य नाही वाटले.. मग आम्ही स्वतःहून तुमच्यासाठी मागणी घातली आणि तुमच्या पप्पांना पटवून दिलं कि त्यांच्या पार्टीशी असलेली मैत्री ही नात्यात बदलली तर त्यांच्या पार्टीचा आपल्यावर दबदबा वाढेल... तुमच्या पप्पांना ते पटलं सुद्धा...मध्यंतरीच्या काळात तुमच्याशी मैत्री वाढवावी, तुमच्याशी बोलावं असा विचार केला तर तुमचं आर्यन सोबत प्रेम आहे हे समजलं आम्हाला... आम्ही माघार घेणारच होतो.. आम्हाला तुमच्या मध्ये यायची इच्छा नव्हती.. पण तुमच्या पप्पांना निवडणूकिआधी तुमच्या लग्नाचे वेध लागले होते... करा लग्न नाहीतर गायकवाड आहेतच असा त्यांनी तगादा लावला.. त्यात तुमच्या पप्पांना तुमचं प्रेम प्रकरण समजलं.. हे सगळं पूर्णपणे बंद करण्यासाठी आर्यनच्या वडिलांची फॅक्टरी ईल लीगल आहे.. वगैरे वगैरे कारणं शोधून काढून त्यांनी स्वतःच्या राजकारणतील पॉवरचा वापर करून मल्होत्राजला त्रास द्यायला सुरुवात केली... जा विचारा तुम्ही आर्यनला... त्यांच्या आईचं बुटीक बंद पाडलं आहे सध्या...

मेघना : काय???? माझे पप्पा असं वागले???

राज : हो.. आर्यनच्या जीवाला सुद्धा धोका होता.. आम्ही मध्ये पडलो आणि सांगितलं कि मेघना आमची जबाबदारी... तिच्या भूतकाळाशी आमचं घेणं देणं नाही.. मेघना हे राजकारण फार वाईट आहे.. आर्यनचं घराणं कितीही श्रीमंत असलं तरी त्यांना राजकारणाचा गंध सुद्धा नाहीये... ते लोकं नाही टिकू शकणार तुमच्या  पप्पांसमोर... म्हणून तुमचं आयुष्य गायकवाड घराण्यात जाऊन बरबाद होऊ नये.. आर्यनचं कुटुंब सुरक्षित रहावं यासाठी तुमची इच्छा नसतानाही आम्ही तुमच्याशी लग्न करत आहोत....

मेघनाला आता काय करावं सुचत नव्हतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. पप्पांची ही बाजू तिने कधी पहिली नव्हती... तिला खूप रडायला आलं..

राज : मेघना आता तुम्ही सांगा... काय करू ते.. आर्यनचा जीव धोक्यात घालण्याची तुम्हाला नक्कीच इच्छा नसणार... तुम्हाला वाटत असेल तर आम्ही नकार देतो.. पण आम्ही बोललो तसं आम्ही नाही तर दुसरं कोणी.. पण आर्यन नक्कीच नाही......

मेघनाचं मन सुन्न झालं होतं.. तिच्या पुढे राज सोबत लग्न करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. ती फक्त आणि फक्त रडत होती.

मेघना: (रडत रडत )मी काय कोणाचं वाईट केलंय जे माझ्यासोबत हे सगळं घडतंय? ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्याशी लग्न करावं हीच एक इच्छा होती माझी.. काय एवढं जगावेगळं केलं मी?? राज मी नाही तुझ्यावर प्रेम करू शकणार... माझ्या मनात फक्त आर्यन आहे... हे नातं कसं निभावू मी??

राज : मेघना हे बघा रडू नका.. तुमचं आणि आमचं दुःख काही वेगळं नाहीये... तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशी तुमचं लग्न नाही होऊ शकत आणि आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी लग्न होऊन आम्हाला प्रेम नाही मिळू शकत...जीवापाड प्रेम करूनही त्या व्यक्तीचा सहवास लाभू नये याचं दुःख आम्ही जाणतो.. पण विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही तुम्हाला सुखी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करू... भले तुमच्या मनात आर्यन असो.. आपण मैत्री करून तर राहू शकतो ना?? नका बायको म्हणून निभावू पण चांगली मैत्रीण तर बनू शकाल ना???

मेघना : (रडत रडत ) तू उगाच मला सहानभूती देऊ नकोस.. आर्यन सोबत नाही माझ्या तर लगेच तू चान्स मारू नकोस... मला नकोय तुझी मैत्री... नात्यांवरून माझा विश्वास उडाला आहे... हे लग्न फक्त आणि फक्त आर्यन आणि त्याच्या फॅमिलीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून कारणार आहे मी.. कळलं?? मला तुझी मैत्रीण होण्यात काही इंटरेस्ट नाहीये... आय हेट यू...

असं म्हणून मेघना रडत रडत गाडीजवळ जाते. राजसुद्धा हताश होऊन मागून येतोच... दोघे गाडीत बसतात आणि कोल्हापूरला जायला निघतात.

क्रमश:

आता काय होईल पुढे? राज आणि मेघनाचं लग्न होईल? आर्यन काय करेल आता? पाहूया पुढच्या भागात...

वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा...
आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®





 

🎭 Series Post

View all