मितवा part seventeen

Love story of a young couple

मितवा भाग सतरा

मागील भागात आपण पाहिले कि मेघना तिच्या पप्पांची काळजी घेण्यासाठी कोल्हापूरला थांबते.. इतके दिवस ती आर्यनसोबत बोलतही नाही. पण आता पुन्हा कॉलेजला जायचा ती निर्णय घेते.. पण अप्पा पाटलांच्या मनात दुसरंच काही असते.. आता पाहू पुढे...

मेघना आणि अप्पा पाटील आज देशमुख काकांकडे जेवायला जाणार असतात. हे देशमुख अप्पा पाटलांचे अगदी जवळचे मित्र असतात. दोघांमध्ये अगदी घरच्या सारखे संबंध असतात. मेघनासुद्धा लहानपणापासून देशमुखांना ओळखत असते. बऱ्याचदा त्यांच्या घरी गेलेली असते. पण आता मोठं झाल्यापासून मेघना काही त्यांच्या घरी गेलेली नसते. हे देशमुख काका म्हणजेच धनंजय देशमुख पाटलांसोबत राजकारणात असतात. भरपूर उसाची शेती, साखर कारखाने असं बरंच मोठं प्रस्थ असतं. देशमुखांना दोन मुलं असतात. घरात कशाची कमी नसते.

         मेघना जेवायला जायचं म्हणून आवरत असते. काय कपडे घालावे तिला सुचत नसतं.
"हे देशमुख काका म्हणजे जरा अतीच आहेत. बघायला गेलं तर पप्पांचे इतके घनिष्ठ मित्र पण दोघांमध्ये किती फरक.. माझे पप्पा किती मॉडर्न विचारांचे पण काका मात्र अगदी परंपरावादी.. त्यांच्या घरातल्या बायका दिवसभर साडीतच वावरतात..आणि बापरे तो पदर.. खांद्यावरून खाली घ्यायचा नाही.. कोणत्या काळात राहतात काय माहित.. आता त्यांच्याकडे जायचं म्हणजे आपला पंजाबी ड्रेस घातलेला बरा.. " असं स्वतःशी बोलत मेघना कपाटातून एक ड्रेस काढते. पंजाबी ड्रेस पाहून तिला आर्यनची आठवण येते. कसा असेल तो?? , काय करत असेल तो.?? . कॉलेजला जात असेल का?? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येतात. तिचे डोळे पाणावतात. डोळे पुसत ती म्हणते, "बास आजचा दिवस  आर्यन.. उद्या मी येणार आहे पुण्याला.. सगळ्यात पहिल्यांदा तुलाच भेटणार आहे.. "म्हणत ती आवरायला जाते.

       आवरून खाली हॉल मध्ये येते तर पाटील तिची वाट बघतच असतात.
"काय बेटा.. किती वेळ? देशमुख वाट बघत असेल.. "पाटील बोलतात.

"सॉरी पप्पा.. मला ना काय कपडे घालू समजतच नव्हतं.. मला देशमुख काकांकडे जायचे म्हणजे खूप दडपण येतं.. त्यांचे ते नीतिनियम.. बापरे.. "मेघना बोलते.

"पण बरं झालं तुम्ही पंजाबी ड्रेस घातला.. खूप छान दिसत आहात.. अचानक मोठ्या झाल्या आहात असं वाटतंय आम्हाला.. चला आता.. "पाटील आणि मेघना घरातून निघतात.

    थोड्या वेळातच देशमुखांच्या घरी पोहोचतात. देशमुखांचं घर कुठलं.. मोठाच्या मोठा जुन्या काळातील वाडाच असतो. आंगण, तुळशीवृंदावन, जुन्या पद्धतीचे खांब,लाकडी झोपाळा अगदी जुन्या काळातील मराठमोळं घर असतं ते. वाडयात जाऊन मेघनाच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. याच अंगणात ती देशमुख काकांच्या मुलांसोबत खेळायची... आणि माई म्हणजे देशमुखांची पत्नी त्यांचा तर फार जीव होता मेघनावर.
"यावे यावे... तुमचीच वाट बघत होतो आम्ही" देशमुखांच्या आवाजाने मेघना भानावर येते.

"काय मग मेघना बाळ कशा आहात?? "देशमुख विचारतात.

"हो काका.. एकदम मजेत.. "असं म्हणत मेघना त्यांच्या पाया पडते.

"अगं काका काय म्हणतेस?? आम्ही पण तुमच्या पप्पांसारखेच... पप्पाच म्हणा आम्हाला.. "देशमुखांचं बोलणं मेघनाला जरा विचित्र वाटतं.

पाटील आणि मेघना हॉल मध्ये बसतात. तितक्यात पदर सावरत माई पाणी घेऊन येतात.
"आली का माझी लेक?? किती वर्षांनी आलीस गं? आमची आठवण येते कि नाही? "माई विचारतात.

   तसं मेघना पटकन उठून त्यांच्या सुद्धा पाया पडते.
"माई.. अहो.. येते कि आठवण.. पण मी सध्या पुण्याला शिकायला असते ना.. म्हणून नाही आले तुम्हाला भेटायला.. "मेघना बोलते.

"तिथे नीट जेवत नाही वाटतं तुम्ही.. काय किती बारीक झाला आहात.. जरा खात पीत जा.. "माई बोलतात.

"माई अहो.. नको.. मला जाड नाही दिसायचं.. "मेघनाचं उत्तर ऐकून सगळे हसतात.
देशमुख : मग झालं कि नाही शिक्षण पूर्ण??

मेघना :नाही काका.. अजून परीक्षा बाकी आहे..

देशमुख : आता कुठं पुण्याला जाता? इथेच करा शिक्षण पूर्ण..

माई :हो.. आता इथेच करा शिक्षण पूर्ण.. काही गरज नाहीये पुण्याला जायची.. बरं मग तुम्ही स्वयंपाक वगैरे शिकला कि नाही?

मेघना :(मेघनाला काहीच समजत नाही.. हे लोकं का पुण्याला जाण्यावरून बोलत आहेत.. आणि असा इंटरव्हियू का घेत आहेत? )नाही माई.. अजून काही येत नाही मला बनवता..

माई : असू  दे.. आम्ही शिकवू तुम्हाला.. तांबडा, पांढरा रस्सा आला कि बास.. चला आत आमच्यासोबत.. या लोकांना बोलू दे इथे..
       असं म्हणत माई मेघनाला स्वयंपाकघरात घेऊन जातात. मेघना जरा गोंधळलेली असते. जाता जाता ती वाडयात इकडे तिकडे बघते. एखाद्या मराठी मालिकेचा सेट वाटावा असा सुंदर वाडा असतो तो.
"ये बाळा... ये.. हे बघ आपलं स्वयंपाकघर.. आठवतंय का तुम्हाला आम्ही तुम्हाला इथेच भारवायचो.. "माई म्हणतात.

"हो माई.. खेळून दमून आल्यावर तुम्ही आम्हा तिघांना इथंच भरवायचा जेवण.. "मेघना सांगते.

"मेघना हे बघ.. सारिका.. थोरल्याची बायको.. आमची मोठी सून.. "माई सारिकासोबत मेघनाची ओळख करून देतात. देशमुखांच्या मोठया मुलाची ती बायको असते.
"हाय.. मेघना हिअर.. नाईस टू मीट यू.. "मेघना बोलते.

"हॅलो.. सारिका हिअर.. यू लूक सो प्रिटी.. "सारिका बोलते.
    सारिका साधारण मेघनाच्या वयाचीच असते. मेघनला  तिच्याकडे बघून वाटते कि काय ही बिचारी मुलगी.. इतकी शिकलेली.. माझ्या वयाची आणि साडी नेसून, पदर सांभाळून किचन मध्ये काम करतीये.. "

सारिका : सॊ.. यू आर रेडी?

मेघना :रेडी फॉर व्हॉट?

सारिका : टू गेट मॅरीड.. यू लाइक धिस प्लेस??

मेघना : मॅरीड? सॉरी मला कळलं नाही..
          तितक्यात देशमुख माईंना आवाज देतात..
"अहो या बाहेर... राज आलाय.. "

"मेघना चला.. राज आला आहे बाहेर.. त्याला भेटा"
असं म्हणत माई मेघनाला घेऊन बाहेर येतात. राज देशमुखांचा धाकटा मुलगा असतो. मेघनाचा बालमित्र सुद्धा असतो पण बरेच वर्ष त्यांची भेट झालेली नसते.मेघना राज एकमेकांकडे बघतात. राज आता खूप उंच झालेला असतो. दिसायला पण छान असतो. अस्सल मराठमोळा मुलगा शोभत असतो. गोरापान, गालावर खळी.. एकदम स्मार्ट दिसत असतो.

देशमुख :मेघना हा बघा राज.. तुम्ही ओळखलं कि नाही त्याला?

मेघना :हो काका.. राज अरे किती वेगळा दिसतोस तू आता.. लहानपणी किती रडका होतास.. सारखा खेळताना रडायचा..

राज : हो.. तुम्ही काय कमी खोड्या काढायचा का?? तुमच्यामुळे रडायचो..

देशमुख : तुम्ही दोघे बाहेर जाऊन निवांत गप्पा मारा.. आम्हा मोठ्यांमध्ये तुम्हाला उगाच कंटाळा येईल.. राज जा.. मेघनाला घेऊन बागेत जा..
       तसं मेघना आणि राज बाहेर बागेत जातात. मेघनाला हे सगळं विचित्रच वाटत असतं. आत बोललो असतो तर काय झालं असतं.. एवढं बागेत जाऊन गप्पा मारण्यासारखं काय आहे असं तिला वाटतं..

राज : मग कधी आला कोल्हापूरला तुम्ही?

मेघना : अरे तू तरी अहो वगैरे नको म्हणूस..मी तुझी फ्रेंड आहे.. इतकं काय फॉर्मल बोलायचं..

राज : इकडची हीच पद्धत आहे.. सगळ्यांना आदर द्यायचा..

मेघना : अरे काय.. जग कुठं चाललंय.. पण तुमचं घर काही बदलल नाही.. मी आत्ता सारिकाला भेटले.. माझ्या वयाची आहे ती.. पण साडी नेसून घरकाम काय करतीये? तू पण तुझ्या बायकोशी असच वागणार का?

राज : आता पप्पांपुढे कोणाचं काय चालतं? पण आम्ही आमच्या बायकोला घरकाम नाही करायला लावणार.. त्यांनी आमच्या सोबत कारखान्याचं काम बघायचं..

मेघना :ओहो.. इतकं प्लॅनिंग झालंय..मुलगी पसंत केली आहेस कि काय?

राज : तुम्हाला माहित नाहीये का तुम्ही इथे का आला आहात??

मेघना : म्हणजे? लंच साठी आले आहे.. का काय झालं?

राज :खरचं तुम्हाला माहित नाहीये का??काका काही बोलले नाही का?

मेघना : नाही.. पप्पा नाही काही बोलले.. राज मला सांग काय चालू आहे नक्की? मला आल्यापासून जरा विचित्र वाटतंय पण मी दुर्लक्ष केलं..

राज : अहो आपल्या लग्नाची बोलणी चालू आहेत.. बोलणी काय घेऊन बसलाय.. आपलं लग्न ठरलंय..

मेघना : व्हॉट?? नो वे.. कधी ठरलं??  कोणी सांगितलं तुला?? काहीतरी बरळू नकोस...

राज : तुम्हाला माहित नसेल.. पण आपलं लग्न बरंच आधी ठरलंय.. पप्पांच्या आणि काकांच्या राजकीय उन्नतीसाठी आपलं लग्न बरंच आधी ठरवलंय.. तुमच्या आर्यन प्रकरणाच्यापण बरंच आधी..

मेघना : (आश्चर्यचकित होऊन ) तुला कसं माहित आर्यन बद्दल??

राज : आमच्या होणाऱ्या बायकोविषयी आम्ही सगळी माहिती ठेवणारच.. पण आम्हाला काय आक्षेप नाही.. तो भूतकाळ होता तुमचा..

मेघना : (चिडून )तू कोण समजतोस रे स्वतःला? होणारी बायको.. मी तुझी? आणि तू कोण आहेस मला भूतकाळ सांगणारा?? मी हे लग्न करणार नाहीये.. थांब आत्ताच पप्पांना जाऊन विचारते..

राज : (मेघनाचा हात पटकन धरून तिला मागे खेचतो )
जरा रागावर नियंत्रण ठेवायला शिका.. आत जाऊन काय तमाशा करणार आहात? काका आत्ता कुठे बरे झाले आहेत.. आणि सगळ्यांसमोर त्यांना जाब विचारणार आहात तुम्ही?

मेघना :हात सोड माझा.. मला परत हात लावलास ना तर याद राख.. मी फक्त आर्यन वर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करणार आहे.. समजलं?

राज : आम्ही नाही तर दुसरं कोणी.. पण एक पंजाबी मुलगा तरी नक्कीच नाही.. आणि आम्ही तुम्हाला सुखात ठेवू.. आम्हाला तुम्ही आवडता..

मेघना :बास.. एक शब्द बोलू नकोस.. मी फक्त आर्यनची आहे.. मी हे लग्न मोडणार.. बघच तू.. इथे नाही.. पण घरी जाऊन नक्कीच पप्पांना जाब विचारेन..
    असं म्हणून मेघना रागात आत निघून जाते.

क्रमश :
आता पुढे काय होईल? अप्पा पाटील मेघनाचं ऐकतील? मेघना आर्यनला सांगेल हे सगळं? आर्यन काय करेल आता? पाहूया पुढच्या भागात..

वाचकहो हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा मला. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे. हा भाग आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®




 

🎭 Series Post

View all