Nov 26, 2020
प्रेम

मितवा part fifteen

Read Later
मितवा part fifteen

मितवा भाग पंधरा

मागील भागात आपण पाहिले कि आर्यनच्या घरी सगळ्यांना मेघना आवडते.आता प्रश्न फक्त मेघनाच्या वडिलांनाचा होता. समक्ष जाऊन त्यांच्याशी बोलावे असं मेघना ठरवते आणि ती कोल्हापूरला जाते. आता पाहू पुढे....

मेघना आणि तारा अक्कांना असं अचानक आलेलं पाहून अप्पा पाटील आश्चर्यचकित होतात.

"अरे बेटा.. सगळं ठीक आहे ना? असं अचानक आला तुम्ही.. काय झालं??फोन सुद्धा केला नाही.. "अप्पा पाटील बोलतात.

"सरप्राईज... तुम्हाला सरप्राईज द्यायला आले मी.. तुमची खूप आठवण येत होती पप्पा.. आणि असं पण वीकएंड आहे.. म्हणून दोन दिवस राहायला आले.. "मेघना बोलते.

"मग आम्हाला सांगायचं.. आम्ही आलो असतो पुण्याला.. "अप्पा पाटील बोलतात.

"पप्पा.. तुम्ही तर राहू दया.. काल मी तुम्हाला फोन केला होता.. तर तुम्ही साधा कॉल बॅक पण केला नाही मला.. "

"अरे बेटा रात्री खूप उशीर झाला म्हणून नाही केला.. आज निवांत फोन करणारच होतो.. "

"बरं.. मग आज रात्री माझ्यासाठी वेळ काढून ठेवा.. मला तुमच्याशी बोलायचं आहे.  आणि हो फक्त तुम्ही.. बाकी कोणी नको.. "मेघना बोलते.

"बरं.. आज तुमच्यासाठी आम्ही घरीच थांबतो.. बास.. " पाटील बोलतात.

मेघना आनंदाने तिच्या पप्पांना मिठी मारून रूममध्ये निघून जाते.तारा अक्का सुद्धा त्यांच्या खोलीत जायला निघतात, तेवढ्यात अप्पा पाटील त्यांना विचारतात..
"अक्का काय म्हणताय तुम्ही.. आमच्या लेकीची काळजी घेताय ना? "

"हो साहेब.. मेघू बेबीला काय हवं काय नको ते सगळं बघतोय आम्ही.. " अक्का बोलतात.

"मग आज असं अचानक आमच्याशी बोलण्यासाठी आमची लेक अशी धावतपळत कशी आली?? "पाटील विचारतात.

"त्यांना तुमची आठवण येत होती साहेब.. बाकी काय बोलायचं आहे ते आम्हाला काही माहित नाही.. "तारा अक्का सांगतात.

"तुमचं लक्ष आहे ना आमच्या लेकीवर?  कोणासोबत उठबस करते ती माहित असेलच तुम्हाला.. आमच्या घराण्यावर कोणी बोट दाखवता कामा नये.. "पाटील बोलतात.

"हो साहेब.. मेघू बेबीकडे आमचं लक्ष आहे.. त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे आम्हाला माहित आहेत.. काळजी नसावी.. " असं म्हणत अक्का सुद्धा त्यांच्या खोलीत जातात. अक्कांना खूप टेन्शन आलेलं असतं. आत्ता साहेबांसमोर खोटं बोललो याचं त्यांना वाईट वाटत असतं. पण त्या सांगणार तरी काय साहेबांना. काहीही झालं तरी साहेब त्यांनाच जाब विचारणार होते. अक्का आता खूप बेचैन झाल्या होत्या. मेघना त्यांच काही ऐकत नव्हती. आर्यनसुद्धा त्यांची बाजू समजून घेत नव्हता. त्या हतबल होऊन खोलीत बसून होत्या.

             रात्री जेवण झाल्यावर अप्पा पाटील आणि मेघना हॉलमधेच गप्पा मारत बसले होते.
अप्पा पाटील : मग बेटा.. आवडलं का पुणं तुम्हाला?? का आपलं कोल्हापूरचं बरंय??

मेघना : आहे छान.. पण खूप गर्दी आणि वर्दळ आहे.. पण मला पुण्यात सेटल्ड व्हायला आवडेल.

अप्पा पाटील : आणि मग आमचा एवढा बिजनेस.. तो कोण पाहणार?? बरं तुम्हाला काय झालं? इतकी आमची काय आठवण आली.. आम्हाला भेटावसं का वाटलं??

मेघना : पप्पा मला तुमच्याशी बोलायचं आहे.. खूप महत्वाचं..

अप्पा पाटील : कॉलेज मध्ये कोणी त्रास देत नाहीये ना?

मेघना : नाही हो पप्पा.. कोणाची हिंमत तुमच्या मुलीला त्रास द्यायची? मला माझ्या आयुष्याबद्दल आणि स्वप्नांबद्दल बोलायचं आहे... बरं मला सांगा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता?

अप्पा पाटील : आता हा काय प्रश्न आहे बेटा??  काय ते सरळ सांगा..

मेघना : म्हणजे तुम्ही माझी स्वप्नं पूर्ण करायला काय करू शकता?? तुमच्यासाठी मी महत्वाची कि तुमची पार्टी??

अप्पा पाटील : अरे बेटा काय झालं आहे तुम्हाला?? हा सगळा बिझनेस तुमच्यासाठी तर उभा केला आहे.. तुमची स्वप्न पूर्ण करायला, तुम्हाला काही कमी नं पडू द्यायला आम्ही झटतोय... पार्टी तुमच्यापेक्षा जास्त महत्वाची कशी असेल?? तुमच्यापुढे कोणी नाही आमच्यासाठी...

मेघना : लव्ह यू पप्पा.. मला माहित होतं तुम्ही माझ्या कोणत्या गोष्टीला नाही म्हणणार नाहीत.. पप्पा मी एका मुलाच्या प्रेमात पडलीये.. मला तो फार आवडतो.. मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो पंजाबी आहे.. पण एकदम घरंदाज.. त्यांचा मोठा बिझनेस आहे.. मोठा बंगला आहे पुण्यात.. आपल्या घराण्याला शोभेल असा आहे एकदम... 

अप्पा पाटील : (त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो ) बेटा काय बोलताय तुम्ही? तुम्ही तिथे शिकायला गेला होता कि प्रेम प्रकरण करायला..

मेघना : पप्पा आता प्रेम काय असं ठरवून होतं का?? मला तो खूप आवडतो पप्पा..

अप्पा पाटील : (त्यांना आता राग अनावर होतो ) बास... बास.. एक शब्द काढू नका आता.. बापासमोर असं बोलायची हिंमत कशी झाली तुमची?? आम्ही हे सहन करून घेणार नाही.. प्रेम करताय ते पण पंजाबी मुलासोबत??  आम्ही इथे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतोय..आणि तुम्ही पंजाबी मुलासोबत लग्न करणार? लोकं या अप्पा पाटलांवर थू थू करतील..
पुण्याला जाऊन निर्लज्ज व्हाल आम्हाला वाटलं नव्हतं..

मेघना : (पप्पांचा राग बघून घाबरते )पप्पा अहो तुमची पार्टी यात कुठून आली? माझी पर्सनल लाइफ आहे..
मला कोण आवडतं यात तुमच्या लढ्याचा काय संबंध? आणि आर्यनची तिसरी पिढी पुण्यात राहते.. तो खूप छान मराठी बोलतो..

अप्पा पाटील : तुम्हाला जरा सुद्धा शरम वाटत नाही बापासमोर वर तोंड करून तुम्ही प्रेम प्रकरण सांगताय?  अहो तीस वर्ष गेली आमची पार्टीमध्ये हे स्थान मिळवण्यासाठी.. मराठी बोलता येणं आणि मराठी असणं यात फरक असतो.. आत्ताच सांगून ठेवतोय विसरून जा त्या मुलाला.. परत कधी त्याचं नाव घ्याल तर याद राखा..

मेघना : पप्पा अहो मला तो आवडतो.. मी नाही राहू शकत त्याच्या शिवाय..

अप्पा पाटील : हद्द पार केली तुम्ही आज.. बास झालं.. अजिबात पुण्याला परत जायचं नाही.. तारा अक्का.. ओ तारा अक्का बाहेर या.. बाहेर या.. (अप्पा पाटील जोरात ओरडतात )
     तशा तारा अक्का घाबरतच बाहेर येतात आणि त्यांच्या समोर उभ्या राहतात.
अप्पा पाटील : माझ्या लेकीची जबाबदारी तुमच्यावर दिली होती.. काय करत होता तुम्ही?? तुम्हाला हे सगळं माहितीये??

तारा अक्का : (घाबरून ) साहेब ते.. साहेब..

अप्पा पाटील : मला हो का नाही मध्ये उत्तर दया.. तुम्हाला माहित होतं का हे??

तारा अक्का :(खाली मान घालून ) हो साहेब..

अप्पा पाटील : अरे चाललंय काय हे?? शेवटी आमच्या लेकीची आई नाही बनू शकला तुम्ही..

मेघना : पप्पा यात अक्काची काही  चूक नाही.. त्यांनी या नात्याला विरोध दर्शवला होता..

अप्पा पाटील : मग?? तरी सुद्धा निर्लज्ज बनून त्या मुलासोबत फिरत होता तुम्ही??  ते काही नाही.. विसरून जायचं त्या मुलाला..

मेघना : बास पप्पा.. मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी काही पण करू शकता.. पण नाही.. तुम्हाला फक्त तुमच्या इमेजची काळजी आहे.. माझी नाही.. पण मी सुद्धा सांगून ठेवते.. मी आर्यनला अजिबात विसरणार नाही...
     म्हणत मेघना स्वतःच्या खोलीत जायला निघते. तितक्यात अप्पा पाटील जमिनीवर कोसळतात..

क्रमश :

अप्पा पाटील ऐकतील का?  त्यांना काय झालं.. ते जमिनीवर का कोसळले..? मेघना आता काय करेल?  पाहूया पुढील भागात..

वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा.. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे... धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®

Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..