Login

मितवा भाग अठरा

Love story of a young couple.

मितवा भाग अठरा

मागील भागात आपण पाहिले कि मेघना आणि अप्पा पाटील देशमुखांकडे जेवायला जातात. तिथे मेघनाला तिचा बालपणीचा मित्र राज भेटतो आणि त्याच्याकडून तिला समजतं कि त्या दोघांचं लग्न ठरलंय. आता पाहू पुढे...

  मेघना रागारागात आत निघून जाते. त्या दोघांची वाट बघत सगळे जण हॉल मध्ये बसलेले असतात. तिच्या पाठोपाठ राज सुद्धा येतो. मेघनाला बघून देशमुख विचारतात,
"काय मग सुनबाई.. आवडला का आमचा राज??तुमचा बालमित्र एवढ्या वर्षांनी भेटला तुम्हाला कसं वाटतय?? "
मेघनाला काय बोलावं काहीच सुचत नसतं. तिला फक्त आत्ता तिच्या पप्पांना जाब विचारायचा असतो. तिने काही चुकीचं बोलू नये म्हणून तेवढ्यात राज बोलतो,

"अहो पप्पा असं काय विचारत आहात तुम्ही? ती किती लाजतीये बघा.. तुम्हा सगळ्यांसमोर ती काय बोलणार"

"अच्छा म्हणजे दोघांनी एकमेकांना पसंती दिली तर.. वा वा.. " देशमुख बोलतात.

   तसे सगळे जण जाम खुश होतात. अप्पा पाटील उठून मेघना जवळ येतात. तिला जवळ घेतात आणि म्हणतात, "आम्ही खूप खुश आहोत बेटा.. आम्हाला माहित होतं तुम्ही आमचा निर्णय मान्य कराल.. "

     तसं मेघना पप्पांकडे एक कटाक्ष टाकते. त्यांचा हात खांद्यावरून खाली टाकते आणि जाऊन सोफ्यावर बसते. तितक्यात माई राजला  म्हणतात..

"राज बाळा जा.. मेघनाच्या शेजारी बसा.. आम्हाला बघू तर दे कशी दिसतीये तुमची जोडी.. "

"माई नको.. काहीतरीच काय.. "राज बोलतो.

"नाही नको काही नाही.. जा बघू मेघनाच्या शेजारी बसा.. आम्हाला डोळे भरून पाहू दे तुम्हाला.. "माई आग्रह करतात तसा राज मेघनाच्या शेजारी जाऊन बसतो. मेघनाला फार कसतरी वाटतं. ती खाली मान घालून तिचे अश्रू आणि राग दोन्ही लपवायचा प्रयत्न करते. तिला आता मात्र आर्यनची फार आठवण येत असते.. आत्ता ताबडतोब पुण्याला जाऊन त्याला भेटावं.. कडकडून मिठी मारावी.. आणि पुन्हा परत कधी इथे येऊ नये तिला वाटतं.तिला आर्यनच्या घरी ती गेली असते तो दिवस आठवतो.. त्याचे सगळे कुटुंब आठवते आणि तिला वाटते,
"माझ्या मनात बसलेलं तर ते घर आहे 'मल्होत्राज '..इथे कुठे येऊन अडकले.. आत्ता माझ्या शेजारी आर्यन पाहिजे.. हा कोण कुठला राज.. मी नाही याच्याशी लग्न करणार.. "आणि ती रडू लागली. सगळ्यांना समजले कि मेघना रडतीये. तेवढ्यात राज तिला म्हणतो,

"मेघना अहो.. काय झालं?? असं रडू नका.. आम्ही नाही बघू शकत तुम्हाला रडताना.. "

माई पटकन तिला जवळ घेतात आणि बोलतात,
"आई बिना पोर वाढलीये.. आता अशा प्रसंगी आईची आठवण येणार ना.. "माई तिचे अश्रू पुसतात आणि म्हणतात, "आम्ही आहोत ना.. यापुढे तुम्हाला आईची कमी जाणवू देणार नाही.. चला रडू नका.. बास.. " पण मेघना आर्यनच्या आठवणीत रडत असते. आत्ता तिला फक्त आणि फक्त आर्यनकडे जायचं असतं.समोर पप्पांना बघून ती तिचे अश्रू पुसते.
       
       सगळे जण जेवायला बसतात. मेघना जेवताना सुद्धा फारसं कोणाशी बोलत नव्हती. तिचा अबोला बघून राज देशमुखांना म्हणतो,
"पप्पा आम्ही ठरवलंय.. मेघना आमच्या सोबत कारखान्याच काम बघणार.. आणि त्यांची इच्छा असेल तर त्यांनी पुढे त्यांचं शिक्षण चालू ठेवावं.. "

"करू दे कि.. आम्ही तर सुरवातीलाच बोललो कि पुण्याला जायची काही गरज नाहीये.. इथेच पुढचं शिक्षण पूर्ण करावं त्यांनी.. "देशमुख म्हणतात. पण यावर मेघना काहीच प्रतिक्रिया देत नाही.. ती गुपचूप खाली मान घालून जेवत असते. राज तिला बोलत करायचा प्रयत्न करत असतो मात्र मेघना त्याला काही प्रतिसाद देत नाही.
      सगळ्यांच जेवण झाल्यावर देशमुख त्यांच्या गुरुजींना फोन करून बोलवून घेतात. काही वेळात देशमुखांचे गुरुजी वाड्यावर पोहोचतात.

देशमुख : या गुरुजी या.. बसा.. तुम्हाला मी म्हटलं त्या प्रमाणे आमच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची तारीख काढायची आहे..

गुरुजी : हो हो.. काढूयात कि.. मला फक्त दोघांच्या पत्रिका दया..
   तसं माई मेघना आणि राजची पत्रिका त्यांना देतात. आपली पत्रिका सुद्धा यांच्यापर्यंत पोहोचली हे पाहून मेघनाला अजूनच धक्का बसतो.

गुरुजी : आत्ता दिवाळी झाल्यावर लागलीच एक चांगला मुहूर्त आहे.. त्या नंतर डिसेंबर मध्ये काही मुहूर्त आहेत.. आणि त्या नंतर एप्रिल मध्ये.. मग सांगा कोणती तारीख योग्य पडेल तुम्हाला..

अप्पा पाटील : दिवाळी नंतरचा पहिला मुहूर्त धरा..

राज :काका पण दिवाळी आता दहा दिवसांवर आहे.. त्या नंतर लगेच?? सगळी तयारी कशी होणार?

देशमुख : त्याला काय झालं? होईल सगळं.. आम्हाला चालतोय तो मुहूर्त..

मेघना :पप्पा अहो पण माझं कॉलेज.. माझी परीक्षा.. ते तर होऊ दया..

अप्पा पाटील :आता लग्नानंतर इथेच ऍडमिशन घ्या.. आम्ही बोलू इथल्या कॉलेज मध्ये..

माई : आम्हाला पण चालेल हा मुहूर्त.. शुभ कार्याला उशीर कशाला करायचा..

देशमुख : मग ठरलं तर.. दहा नोव्हेंबर लग्नाची तारीख.. अजून तीन आठवडयांनी...

     मेघना हताश होऊन सगळं बघत असते. राजला तिच्या मनाची घालमेल समजते. तो तिला बोलतो,
"तुम्ही अशा हताश होऊ नका.. आम्ही तुमची काळजी घेऊ.. तुमचा मान राखू.. "

"एवढी काळजी आहे माझी तर लग्नाला नकार दे ना.. खोटी वरवरची काळजी नको दाखवूस मला.. " असं म्हणून मेघना तिथून बाजूला होते.

       देशमुख आणि पाटील खूप खुश होतात. दोघे मित्र एकमेकांना मिठाई भरवतात. आज त्यांची मैत्री नातेसंबंधात बदललेली असते. थोड्या वेळाने अप्पा पाटील आणि मेघना तिथून निघतात. गाडीत मेघना गप्प असते. तिला कधी एकदा घरी जातोय आणि आर्यनशी बोलतोय असं वाटत होतं. पण त्याआधी तिला तिच्या पप्पांना जाब विचारायचा असतो. दोघेही घरी पोहोचतात. अप्पा पाटील त्यांच्या खोलीत जायला निघतात तोच मेघना त्यांना बोलते..
मेघना :पप्पा थांबा.. मला तुमच्याशी बोलायचं आहे..

अप्पा पाटील : बोला बेटा.. काय झालं?

मेघना : काय झालं?? आज तुम्ही एवढी मोठी गोष्ट केली माझ्यासोबत आणि मला विचारत आहात काय झालं? मला न विचारता तुम्ही माझं लग्न ठरवू कसं शकता?

अप्पा पाटील : त्यात तुम्हाला काय विचारायचं आहे.. तुम्हाला तेवढी अक्कल असती तर पंजाबी मुलासोबत प्रेम करून बसला नसता तुम्ही..

मेघना :हो पडले मी एका पंजाबी मुलाच्या प्रेमात.. तर मग काय? तुम्ही असं बोलत आहात जसं कि कोणी रस्त्यावरच्या मुलाच्या प्रेमात पडलीये.. पंजाबी आहे म्हणून काय झालं.. तो घरंदाज आहे..

अप्पा पाटील :आणि आम्ही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढतोय त्याचं काय?? इतक्या वर्षांचा लढा तुमच्या प्रेमापायी पाण्यात सोडू का??

मेघना : तुमच्या राजकीय उन्नतीसाठी तुम्ही माझ्या प्रेमाचा बळी देत आहात.. मला का खेचताय तुमच्या राजकारणात? माझी स्वप्न, माझ्या इच्छा याची काही किंमत नाही?

अप्पा पाटील : तुमच्या त्या प्रेमापोटी माझी इज्जत वाया घालवू का?? आणि काय वाईट केलं मी तुमचं?? देशमुखांच्या घराण्यात जाणार आहात...राज रावांसारखा चांगला नवरा भेटतोय.. आईसारखी माया करणारी सासू आहे..अजून काय पाहिजे तुम्हाला?

मेघना :पप्पा प्रेम पाहिजे मला.. लग्न करण्यासाठी प्रेम झालं पाहिजे.. ते फक्त मी आर्यनवर करते.. राज वर नाही.. मी कसं आयुष्य काढू त्याच्यासोबत?

अप्पा पाटील : (खूप चिडून ) बास करा.. प्रेम प्रेम काय घेऊन बसलाय?? लग्न करा.. होईल तुम्हाला प्रेम.. किती वेळ झाला ऐकतोय फालतू बडबड.. बापासमोर काय बोलताय जरा देखील भान नाहीये तुम्हाला.. खूप लाड झाले तुमचे.. आता बघा हा अप्पा पाटील काय करतो ते..
   असं म्हणत पाटील मेघनाच्या हातून फोन घेतात..
अप्पा पाटील : हा फोन आता तुम्हाला लग्नानंतरच मिळेल..

मेघना : अहो पप्पा.  दया माझा फोन.. असं काय करताय तुम्ही..

अप्पा पाटील : बस्स.. अजिबात आवाज नकोय मला.. आजपासून घराबाहेर एकटं जाणं बंद.. तुमच्यासोबत नेहमी गार्ड्स असतील आता.. आणि हो तुमचा लॅपटॉप पण जप्त..
   असं म्हणत घरात काम करणाऱ्या एका माणसाला ते आवाज देतात आणि मेघनाचा लॅपटॉप आणायला सांगतात.
अप्पा पाटील : फोन, लॅपटॉप सगळं बंद आजपासून.. अजिबात घराबाहेर पडायचं नाही.. बघतोच मी..प्रेम प्रेम काय करताय ते..
      असं म्हणून पाटील त्यांच्या खोलीत जातात.
"पप्पा.. पप्पा.. प्लीज ऐका ना.  असं नका करू.. पप्पा.. प्लीज... "मेघना बोलते.. पण पाटील काही थांबत नाहीत.
     मेघना एकटीच हॉल मध्ये रडत बसलेली असते. तारा अक्कांना ते बघवत नाही. त्या तिला मायेनं जावळ घेतात आणि तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात.

क्रमश :

आता पुढे काय होईल? आर्यनला कसं समजेल मेघनासोबत काय घडतंय ते??मेघना आता काय करेल? पाहू पुढच्या भागात.

वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा.
धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®

 

🎭 Series Post

View all