मितवा भाग अंतिम

Love story of a young couple

मितवा भाग अंतिम

मागील भागात आपण पाहिले कि मेघनाचा राजसोबत साखरपुडा होतो.. आर्यन अजूनही खाली तिची वाट बघत थांबलेला असतो... ती त्याला शेवटचं भेटून येते.. आणि तिच्या लग्नासाठी तयार होते. आता पाहू पुढे...


    सकाळी सकाळी राज आणि मेघनाच्या हळदीचा कार्यक्रम होता.मेघना आज मनावर दगड ठेवून तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या दिवसाला सामोरं जायला तयार झाली होती. पिवळी साडी नेसून, त्यावर फुलाचे दागिने घालून मेघना खाली गेली. तसं अक्कांनी तिला राज शेजारी बसवलं.. तितक्यात माई आल्या..

माई : बघू.. बर.. आमची सून किती गोड दिसत आहे ते.. खरंच आज घरी या तुम्ही.. तुमची मीठ मोहरीने दृष्टच काढणार आहे...

सारिका : खरंच जाऊबाई.. खूप सुंदर दिसत आहात तुम्ही.. आणि आता भावोजींची उष्टी हळद लावल्यावर तर अजूनच तेज येईल चेहऱ्यावर...
  
    असं म्हणून सारिका, माई आणि देशमुखांच्या घरातील इतर सुवासिनी मेघनाला हळद लावू लागल्या... मेघनाने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.. तिला क्षणभर वाटत होते कि हे भयानक स्वप्न आहे आणि डोळे उघडताच हे नाहीसं होऊन जावं. माईंनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं..

माई : बाळा.. काय झालं?? बरं नाही वाटतं तुम्हाला??

मेघना : नाही माई.. ठीक आहे.. भरून आलं मला..बाकी काही नाही..

माई : बाळा काळजी करू नका..आम्हाला कळतंय तुम्हाला आईची आज आठवण येत असेल.. पण आम्ही तुम्हाला आमच्या लेकीसारखंच ठेवू.. चला डोळे पुसा.. आज किती आनंदाचा दिवस आहे ना.. रडू नका..

    असं म्हणून माईंनी मेघनाचे डोळे पुसले. राजने मेघनाकडे पाहिले आणि तिला नजरेने काळजी करू नको असं खुणावलं...आणि हळूच तिच्या कानात बोलला..

राज : तुम्ही हसतानाच छान दिसता..रडताना एखाद्या शेमड्या मुलीसारख्या दिसता..
तसं मेघनाने त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि ती म्हणाली..

मेघना : कोण शेमडं आणि रडका आहे ते जगाला माहित आहे.. लहानपणी खेळताना हरला कि लगेच माई माई करत रडत जायचास...

राज : मग काय.. किती त्रास द्यायचा तुम्ही आम्हाला.. सतत खोड्या काढायचा आमच्या.. नाहीतर चिडवत बसायच्या..... हे कोणाला कळायचं नाही.. माईंना तर अजूनही वाटतं मेघना किती गुणाची पोर आहे ते...

मेघना : हो मी आहेच... तुझ्यासारखी नाहीये लूजर..

    राज आणि मेघनाचं कुजबुजणं पाहून सारिका बोलली...
सारिका : ओहो...बरंच कुजबुजणं चालू आहे.. आता आयुष्यभर एकमेकांशी बोलायचंच आहे... एवढं काय कानात खुसरपुसर चालू आहे हा???

राज : काही नाही गं वाहिनी..सहजच...

माई : हम..पुरे आता.. चला तुम्ही अंघोळ्या उरकून घ्या.. त्या नंतर लग्नाचे विधी सुरु करायचे आहेत.. मुहूर्त चुकायला नको...

   तसं राज आणि मेघना पुन्हा आपापल्या रूम मध्ये जातात. राजच्या बोलण्याने, त्याच्या चिडवण्याने मेघनाचा मूड आता जरा बरा झाला होता. ती हळदीच्या अंगाने आरशासमोर उभी राहिली.. आणि स्वतःला न्याहाळू लागली...
"मला वाटत होता तितका वाईट नाहीये राज ... माझ्यासाठी किती काय करायला तयार आहे तो... मग मी त्याचा मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारू शकते.. कमीत कमी त्याच्याशी नीट तरी बोलू शकते..."मेघनाचा मनोमन विचार चालू असताना मेघनाची मामी, काकू, आत्या, अक्का आणि इतर बायका तिला अंघोळ घालण्यासाठी आल्या.
 
     हळदीचा कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडला, मेघना आता लग्नाच्या विधीसाठी तयार होत होती.. मनोमन कुठंतरी आर्यन बद्दल विचार करत होती.."आर्यन खरंच अजून खाली असेल का?? असेल ना तो व्यवस्थित?? पप्पांना कळलं तर नसेल ना तो इथे आला आहे ते?? त्याला काही केलं तर पप्पांनी?? बापरे.. मी हा विचार केलाच नव्हता...एकदा राजशी बोलून बघते.."असा विचार करून तिने राजला फोन लावला...

राज : हा मेघना बोला.. ठीक आहे ना सगळं?? काही पाहिजे का तुम्हाला??

मेघना : हो.. खरंतर मला तुझी हेल्प पाहिजे..

राज :काय झालं??

मेघना : मला भीती वाटतीये कि पप्पांना समजलं कि आर्यन इथे आला आहे तर त्याचं काही खरं नाही.. ते त्याला काहीतरी करतील.. आणि मला वाटतंय आर्यन अजूनही खालीच आहे...प्लीज तुझ्या माणसांना सांगून एकदा बघशील का तो सेफ आहे कि नाही...

राज : मेघना.. काळजी करू नका तुम्ही... आम्ही कालच आमच्या काही माणसांना आर्यनवर लक्ष ठेवायला सांगितलं आहे..त्याच्या सुरक्षेसाठी आमची काही माणसं आहेत तिथे उभी.. आणि हो आर्यन अजूनही तुमची वाट बघत उभा आहे खाली... आणि सेफ आहे..

मेघना : थँक गॉड.. तो सेफ आहे... मला माहित आहे तो लग्न झाल्याशिवाय इथून जाणार नाही.. थँक यू राज.. तू न सांगता हे सगळं केलंस..

राज : फक्त एकच प्रॉब्लेम आहे.. आर्यन आत लग्नात आला तर.. त्यात आम्ही काही करू शकणार नाही..

मेघना : नाही येणार तो.. त्याला मी शपथ घातली आहे.. तो काही लग्नात येऊन तमाशा करून लग्न मोडणाऱ्यातला मुलगा नाहीये..

राज : ग्रेट कपल आहात तुम्ही.. तुम्हा दोघांकडून कडून शिकावं प्रेम म्हणजे काय असतं...

मेघना : आणि तुझ्याकडून शिकावं मैत्री कशी निभावायची असते ते...

राज : थँक यू.. तुम्हाला आमची मैत्री तरी समजली..

मेघना : मला तुझा मैत्रीचा प्रस्ताव मान्य आहे..

राज : थँक्स.. इट मीन्स अ लॉट..

   मेघना फोन ठेवते.. तितक्यात अप्पा पाटील तिला लग्नासाठी खाली घेऊन जायला येतात... मेघनाला नऊवारी साडीत तयार झालेलं पाहून ते बोलतात..

अप्पा पाटील : बेटा.. तुम्ही आज अगदी तुमच्या आईसारख्या दिसत आहात.. त्यांना सुद्धा नऊवारी नेसायला फार आवडायची...

मेघना : हो ना.. मला सुद्धा आज आईची कमी जाणवत आहे.. असं वाटतय ती असती तर तिने तरी माझी साथ दिली असती...

अप्पा पाटील : बेटा तुमचा लग्नाचा मुहूर्त जवळ आला.. आता तरी आमच्याशी नीट बोला.. तुमच्या जाण्याने आम्ही खूप एकटे पडणार आहोत...

मेघना : हो ना... आता कोणाच्या आयुष्याशी खेळणार तुम्ही... तुम्हाला प्रश्न पडला असेल...

अप्पा पाटील : काय बोलत आहात तुम्ही?? काय वाईट केलं आहे तुमच्यासोबत?? आज इतकं छान लग्न लावून देतोय, महागड्या  साड्या, ड्रेस, दागिने सगळं तर तुमच्या पायापाशी आणून ठेवलंय...

मेघना : पप्पा.. तुम्ही मला ओळखलंचं नाही.. मला कधीच या सगळ्या गोष्टींचा हव्यास नव्हता.. लहानपणी तुम्ही आणि मी पन्हाळ्याला फिरायला जायचो.. मला ते आवडायचं.. तुम्ही बागेत घेऊन जायचा ते आवडायचं... तुमच्यासोबत गाड्यावरची कुल्फी खायला आवडायची.. मला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं पण नंतर तुम्ही कामात व्यस्त झाला कि मला तुम्ही तुमचा वेळ सोडून इतर सर्व गोष्टी दिल्या.. अक्कांवर माझी जबाबदारी टाकून तुम्ही मोकळे झालात..मला तुम्ही सोन्याच्या पिंजऱ्यात अडकवून ठेवलं होतं... मला कधी माझ्या मर्जीने तुम्ही उडू दिलंच नव्हतं...नको मला हे महागडे कपडे, दागिने... मला कोणीतरी प्रेम करावं एवढंच वाटत होतं... आणि जे मला आर्यन कडून मिळालं... पण तुम्ही आता तर मला पिंजऱ्यात बंद केलं होतं त्यासोबत माझे पंख सुद्धा छाटले...

अप्पा पाटील : बेटा असं नका बोलू.. तुमच्यासाठी तर पैसा कमावला आम्ही...

मेघना : नको तो तुमचा पैसा.. आणि खोटी प्रतिष्ठा.. त्याच्यामुळे आज तुम्ही माझ्या प्रेमाचा बळी दिला आहे.. आय हेट यू.. मला बरं वाटतंय लग्न होऊन मी तुमच घर सोडून जातीये...चला आता खाली...

   असं म्हणून मेघना रूमच्या बाहेर जाऊन थांबली. तिच्या मागून खाली मान घालून अप्पा पाटील आले.. आणि तिला घेऊन हॉल मध्ये गेले.

     देशमुख कुटुंबीय,लग्नाला आलेली पाहुणे मंडळी मेघनाची वाट बघत होते. मेघना मंडपात आली. अप्पा पाटलांनी तिचे कन्यादान केले, मेघना राज शेजारी जाऊन बसली.. तिच्या गळ्यात राजने मंगळसूत्र घातले, सप्तपदी होऊन दोघांनी अग्नीभोवती फेरे घेतले आणि मेघना विधिवत राज देशमुखची पत्नी झाली. राजसोबत लग्नाचे एक एक वचन घेताना मेघनाने आर्यनला विसरून जायचे मनोमन वचन घेतले... मंडपातील अग्नीत आज तिचं आणि आर्यनचं नातं जळून स्वाहा झाले होते....

      लग्नाचे विधी झाल्यावर खिन्न मनाने मेघना रीसेस्पशनसाठी तयार होण्यासाठी तिच्या रूम मध्ये आली... सुन्न होऊन काही वेळ तशीच खुर्चीवर बसून राहिली... खऱ्या अर्थाने आज तिचं आर्यन सोबतचं नातं संपलं होतं. समोरच तिचा मोबाईल पडला होता... तिने तो हातात घेतला.. तोच तिला आर्यनचा मेसेज दिसला.. तिने तो ओपन केला आणि वाचू लागली...

"डिअर मेघना,

      शादी मुबारक!!! डोन्ट वरी.. मै तुमसे नाराज नही हू.. बस मेरे नसीब मै तुम नही हो ये सोच के चूप बैठा हू... मला माहित आहे तुझ्यासाठी हे लग्न करणं खूप अवघड गेलं आहे... आणि त्यात मी इथे आलो त्यामुळे अजूनच त्रास झाला असेल... पण काय करू.. तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तुला प्रॉमिस पण केलं होतं तुला घ्यायला येईन.. म्हणून आलो होतो. मी आलो नसतो ना.. तर मला आयुष्यभर ही गोष्ट मनाला लागली असती... एक शेवटचा प्रयत्न का नाही केला मी असं वाटत राहिलं असतं.. पर अब नही... मैने तुम्हे ले जाने कि पुरी कोशिश कि.. पण तू पण इतकि जिद्दी आहेस ना.. माझा जीव वाचवण्यासाठी, आमचा बिजनेस वाचवण्यासाठी तू स्वतःच आयुष्य पणाला लावलंस... तू मनात पक्क केलं होतं कि काहीही झालं तरी चालेल पण आर्यन आणि त्याच्या फॅमिलीला त्रास नाही झाला पाहिजे...
     मेघना इतना प्यार करती हो मुझसे कि मेरी जान बचाने के लिये तुमने अपनी जिंदगी के बारे मै सोचा भी नही... पण आता तुझं लग्न झालं आहे.. माझा तुझ्यावर ना तुझा माझ्यावर अधिकार आहे... आपण एकमेकांना विसरून गेलेलं बरं आहे... खूप अवघड आहे हे माझ्यासाठी पण मी प्रयत्न नक्की करेन...तू राजसोबत आयुष्यात पुढे जा... तो चांगला मुलगा आहे.. माझ्या सेफ्टी साठी त्याने माणसं ठेवली होती हे समजलं मला... कौन करता है ये सब??
     तू माझी काळजी करू नकोस.. मी माझ्या जीवाचं बरं वाईट काहीही करणार नाहीये.. माझं आयुष्य मी बरबाद करणार नाहीये... कारण माहितीये?? कारण मला हे आयुष्य मिळावं.. माझं काही बरं वाईट होऊ नये म्हणून तू तुझ्या आयुष्याचा, स्वप्नांचा विचार केला नाहीयेस.. त्यामुळे मी अजिबात रडत बसणार नाहीये... आलेला प्रत्येक क्षण खूप छान घालवणार आहे.. कारण मी असं नाही केलं तर तू माझ्यासाठी जे काही केलंस ते वाया जाईल..
     मेघना तुम्हारी वजह से और तुम्हारे लिये में जिंदगी कि कदर करने लगा हू... तुम हमेशा मेरी मितवा रहोगी... someone very special.. very close to my heart... चल येतो... पुन्हा भेट नाही होणार.. पुन्हा बोलता पण नाही येणार... तू काळजी घे तुझी..
                                                  आर्यन.....

        मेघना वारंवार तो मेसेज वाचून रडू लागली.. पण थोड्या वेळात तिने स्वतःला सावरलं.. आर्यनचा जीव वाचला होता, त्यांचा बिजनेस पुन्हा रुळावर येणार होता. तिने ज्या गोष्टीसाठी लग्न केले होते ती गोष्ट साध्य झाली होती. ती आवरून खाली गेली. राज आणि मेघनाची रिसेप्शन पार्टी झाली.. मेघनाची पाठवणी झाली आणि मेघना राज सोबत गाडीत बसून देशमुखांच्या वाड्यावर जायला निघाली. हॉटेलच्या बाहेर पडता पडता तिने पुन्हा मागे वळून पाहिले... तर मागे आर्यनची गाडी नव्हती. तो निघून गेला होता... कायमचाच....

         मितवा म्हणजे काय तर आपल्याला सर्वाधिक प्रिय आणि जवळ असणारी व्यक्ती.... आर्यन मेघनाचा मितवा होता म्हणून तिने त्याचा जीव वाचवण्यासाठी राजसोबत लग्न केले... आर्यनसाठी मेघना मितवा होती म्हणून त्याने तिच्या निर्णयचा मान ठेवला आणि तिच्यामुळं मिळालेले आयुष्य आनंदात घालवायचा निर्णय घेतला... आणि राजसाठी सुद्धा मेघना त्याची मितवाच होती.. म्हणून त्याने तिच्याशी लग्न केले... आर्यन आणि मेघनाची प्रेमकहाणी अधुरी राहिली... पण त्यांनी स्वतःचे प्रेम सिद्ध केले होते... कदाचित राज आणि मेघनामध्ये आता मैत्रीतून प्रेम निर्माण होऊ शकते.....

समाप्त.

वाचकहो मितवा कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा... कथामालिका लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता.. त्यामुळे काही चूक झाली असेल तर समजून घ्यावे... तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे मी या कथेचे इतके भाग लिहू शकले. लवकरच नवीन कथेसोबत आपली पुन्हा भेट होईल. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®
        

   



 

🎭 Series Post

View all