सवत माझी लाडकी भाग २

आणि मग एक दिवस हरेश्वराच्या सभामंडपात हरीहर आणि यशोदेच लग्न झालं. यशोदेला जशा पूर्वीच्या आठवण?

सवत माझी लाडकी भाग २ 

भाग  १ वरुन पुढे वाचा...........

हा एवढा अपमान झाल्यावर दोघी जणी तिथे थांबण शक्यच नव्हतं. पण हा प्रसंग यशोदेच काळीज विदीर्ण करून गेला. त्या नंतर ती कुठे बाहेर निघेनाशी झाली. आतल्या आत कुढत राहिली. घरातल्या सगळ्या कामाचा भार तिने आपल्या अंगावर घेतला. तिला कसं समजवाव हे रेवती आणि हरीहरला कळत नव्हतं. दिवस असेच जात होते.

अशातच तिचा भाऊ एक दिवस तिला न्यायला आला. तो तिला घरी चल म्हणत होता. “आता इथे तू आश्रित म्हणून राहणार, त्यापेक्षा माझ्याबरोबर चल. तिथे तुला काही खायला प्यायला कमी पडणार नाही अस म्हणाला.” तो असं म्हणाला खरं पण त्यांची देह बोली काही वेगळच सांगत होती. रेवतीच्या ते लक्षात आलं. तिनेच परस्पर उत्तर दिलं.

“हे बघा भाऊजी, यशोदेला इथे कशातच कमी पडत नाहीये. दुसरं ती आमची आश्रित नाहीये. ती या घराची मालकीण आहे. माझी मोठी जाऊ आहे. त्या मुळे तुम्ही हा विचार मनातून काढून टाका की ती इथे आपलं मन मारून राहात आहे. बाकी तिची मर्जी.”

“काय ग यशोदे काय विचार आहे ?” – यशोदेचा भाऊ.

“दादा मी इथेच राहणार. हेच माझं घर आहे. उलट तुझाच मला भरवसा वाटत नाही. तू जा. माझी काळजी करू नको.” – यशोदा ठामपणे म्हणाली.

तिच्या भावाचा चेहरा एकदम उजळला. तिचं मन बदलायच्या अगोदर आपण इथून काढता पाय घ्यावा या विचाराने तो उठला आणि म्हणाला “ठीक आहे, तर मग मी निघतो आता. बाकी यशोदे तुला केंव्हाही वाटेल तेंव्हा तो माहेरी येऊ शकतेस. चलतो मी.”

त्याच दिवशी रात्री रेवती हरीहरला म्हणाली

“अहो मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. महत्वाचं आहे.” – रेवती.

“रेवती, ज्या पद्धतीने यशोदाच्या भावाने पळ काढला, त्याने माझं मन उद्विग्न झालं आहे. आज काही बोललं नाही तर चालणार नाही का ?” – हरीहर.

दुसऱ्या दिवशी रात्री रेवतीने पुन्हा विषय काढला.

“हं सांग काय सांगायचं ते.” – हरीहर.

“मला यशोदेची परवड पाहवत नाही. यातून काही मार्ग काढला पाहिजे.” – रेवती.  

“मी काय बोलू ? तिलाच विचार दुसऱ्या लग्नाला तयार आहे का? मग बघू आपण तिच्या साठी. तुझ्या पाहण्यात आहे का कोणी?” – हरीहर.

“आहे.” – रेवती.  

“कोण?” – हरीहर

“तुम्ही.” – रेवती.

“काय ? रेवती तू शुद्धीवर आहेस ना?” हरीहरला काय बोलावं ते सुचेना.

“होय मी पूर्ण विचारांती हे तुमच्याशी बोलते आहे. तिच्यावर येऊ नये ती वेळ आली आहे आणि आपण, तिच्या सर्वात जवळची माणसं, गप्प बसलो तर देव आपल्याला क्षमा करणार नाही. ती मला बहिणी सारखी आहे आणि मी तिचं दुख: उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीये.” – रेवती.  

“रेवती तू अस विचित्रासारखं बोलशील असं वाटलं नव्हतं. डोकं ताळ्यावर आहे ना? आणि यशोदा तरी कशी तयार होईल? हा प्रश्न उपस्थित करून तू काय साधलंस? अग उद्या तिच्या समोर जातांना माझी स्थिती किती अवघडल्या सारखी होईल याची तुला कल्पना नाही. मी आत्ताच अस्वस्थ झालो आहे. आणि तुझं काय होईल ? प्रत्येक गोष्टीत भागीदारी करावी लागेल. सवत आणायला तुझी तयारी असली तरी माझी नाही. मला, तुझ्या माझ्या मध्ये कोणी तिसरं नको आहे. तो काळ आता मागे पडला. बहुधा पुढच्याच वर्षी कायदा येतो आहे एक पत्नीत्वाचा.” हरीहर म्हणाला.

“अहो यशोदेचा विचार तिच्या भावाने तर केला नाही. मग आपल्या शिवाय कोण आहे तिला. मागे हळदी कुंकू ला गेलो होतो तेंव्हा काय प्रकार घडला हे तुम्हाला माहीत आहे. किती अपमान सहन करायचा तिने. या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे की नाही ? काळ बदललेला असला तरी समाजात वावरायचं म्हणजे कुंकवाचा धनी लागतोच. नाहीतर असे अपमान सहन करायचं कपाळी येतं.” – रेवती.

“आपणहूनच सवत आणा असं म्हणणारी, जगात तू एकटीच असावीस, पण मला हे पटत नाहीये. मला जरा विचार करू दे. जरा वेळ दे मला.” – हरीहर.

“ठीक आहे. तुमचा विचार पक्का झाला की सांगा. मग मी यशोदेशी बोलेन. तो पर्यन्त नाही.” – रेवती.  

“ठीक आहे पण तू हे उपकाराच्या भावनेतून बोलत नाहीस ना ? तस असेल तर काही दिवसांनी पश्चात्ताप करायची वेळ यायची . तू सुद्धा विचार कर याचा. घाई करू नकोस.” – हरीहर.  

आठ दिवस तसेच गेले. हरिहरची मनस्थिती विचित्र झाली होती. यशोदे समोर आता तो नेहमीच्या सहजतेने वावरू शकत नव्हता. आणि मग तो प्रसंग घडला.

यशोदेचा भाऊ आला. पण आता त्यांच्या येण्यामागे एक वेगळंच कारण होतं. त्याची बायको गरोदर होती आणि तिला घरकामाला बाई हवी होती. फुकटात मिळाली तर चांगलच असा विचार करूनच तो यशोदेला न्यायला आला होता.

“यशोदे मी तुला घेऊन जायला आलो आहे. इथे परक्या घरी किती दिवस राहशील ? माझ घर तुझ हक्काचं घर आहे, तू चल माझ्या बरोबर.” – भाऊ.

वहिनी गरोदर आहे ही बातमी आता पर्यन्त यशोदे पर्यन्त पोचली होती. आणि, भावाला जो प्रेमाचा उमाळा आला होता त्याचं कारण तिला न कळण्या इतकी, ती भोळी नव्हती. तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला.

पण भावानी आपला मुद्दा पुढे रेटला. “यशोदे तू चल माझ्याबरोबर नाहीतर हरीहरची ठेवलेली बाई म्हणून शिक्का बसायला वेळ लागणार नाही.”

यशोदा भयंकर चिडली. लाल बुंद चेहऱ्याने ती म्हणाली,

“तू भाऊ असून तुला माझ्या बद्दल अस बोलवतं तरी कस ? भाऊजी स्वच्छ चारित्र्याचे आहेत. माझी जाऊ, जाऊ नसून सख्ख्या बहिणी सारखी आहे. तूच विकृत मनाचा आहेस. मला यापुढे तुझ्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाही. इथून ताबडतोब चालता हो तू.” आणि तिने भावाला जवळ जवळ ढकलतच घरा बाहेर काढलं.

हरीहर कामावर गेला होता. संध्याकाळी घरी आल्यावर त्याला हा सगळा  प्रकार कळला. “यशोदा कुठे आहे? तिची मनस्थिती कशी आहे?” त्यांनी विचारलं.

“दुपार पासून तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं आहे. नुसती रडते आहे. मी विचार केला की काही वेळ तिला एकटं राहू द्याव. जरा मन शांत झालं की येईल बाहेर.” रेवती म्हणाली.  

“मला अस वाटतंय की ह्या दुष्ट चक्रातून तिची सुटका करायची असेल तर मला तू सुचवलेला पर्याय मान्य करावाच लागेल.” हरीहर म्हणाला “तू बोल तिच्याशी. पण एक लक्षात ठेव, मी दोघींच्या मधे भेदभाव करू शकणार नाही. तुम्ही दोघी समान पातळीवर असणार आहात. नंतर “हेची फळ काय मम तपास” अशी तुझी अवस्था व्हायला नको. बघ पुन्हा विचार कर, कारण एकदा निर्णय घेतला की मागे वळता येणार नाही.”

“मी सगळा विचार केला आहे. आणि तुमच्या न्याय बुद्धी वर माझा पूर्ण विश्वास आहे.”- रेवती  

“ठीक तर मग बोल तिच्याशी.” – हरीहर  

आणि मग एक दिवस हरेश्वराच्या सभामंडपात हरीहर आणि यशोदेच लग्न झालं. यशोदेला जशा पूर्वीच्या आठवणी नको होत्या तसंच नाव पण नको होतं. हरीहर ने तिचं वसुधा नाव ठेवलं. साधारण वर्षभरात त्यांनी आपलं बस्तान पुण्याला हलवलं. वाडया मधल्या दोन खोल्या ठेऊन बाकी भाड्याने दिल्या. हरीहर एक हुशार वकील होता त्यामुळे पुण्याला जम बसवणं काही जड गेलं नाही. रेवतीला विकास आणि वसुधाला विनय अशी मुलं झाली. सगळं कसं छान चाललेलं होतं आणि आता जवळ जवळ १२ वर्षांनंतर अचानक विश्वास घरी आला होता, घरातलं वातावरण गढूळ करायला. सुखी संसारात मिठाचा खडा टाकायला.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

🎭 Series Post

View all