किमयाला जाग येते. तिला एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलेले असते.
"अरे मी इथे कशी काय आले? मी तर इन्स्पेक्टर सांगळे सरांकडे निघाले होते! पण त्यानंतर काय झाले हे मला नीट आठवत नाहीये."
तेवढ्यात तिला एक आवाज ऐकू येतो,
"आठवेल कसं ग बाई, मी तुझ्या नाकावर गुंगीच्या औषधाचा रुमाल लावला आणि तू बेशुद्ध पडली. मग मी तुला इथे आणले."
ती मागे वळून पाहते तेव्हा तिला चेहऱ्यावर पूर्ण पणे मास्क असलेला एक व्यक्ती दिसतो.
"कोण आहेस तू ?मला इथे का आणले आहेस?"
"चालली होती मोठा संघर्ष करायला त्या विजयच्या प्रेमासाठी! आता घे बस,इथे अंधाऱ्या कोठडीत. चांगलं म्हटलं होतं त्याचा नाद सोडून दे, पण नाही बाईसाहेब भलत्याच शूरवीर ! "
" याचा अर्थ मला सर्वात आधी ज्याचा फोन आला होता तो तूच आहेस."
"तेवढी तू चलाख आणि हुशार आहेच. हो मीच केला होता तो फोन तुला."
"तुला काय पाहिजे आहे? का विजयच्या मागे लागला आहेस? तुझे आणि त्याचे काही वैर आहे का?"
"अग बाई मला काहीच नाही पाहिजे. मी फक्त मला दिला गेलेला आदेश पूर्ण करतोय."
"मग कोण आहे तुझ्यावरचा माणूस? कोण आहे तुझा बॉस? तुम्ही सगळे मिळून असा खेळ का खेळत आहे माझ्या विजयशी? काय केलंय त्याने तुमचं? का मागे लागले आहात तुम्ही सर्व माझ्या निरागस विजयच्या?"
"हा हा.. याला म्हणतात खरं प्रेम. देव पण कसा खेळ खेळतो !त्या वेड्या विजयला एवढी सुंदर चलाख बायको मिळते आणि आम्ही बघा अजून कुवारेच!"
"हे बघा मुद्द्याचं बोला. तुमचा आणि विजयचा काय संबंध?"
" ए बाई सांगितलं ना तुला, आम्हाला जसा वरतून आदेश येतो तस आम्ही काम करतो."
" मग तुम्ही केव्हापासून विजयला अगदी जवळून ओळखता, अशाप्रकारे बोलत आहात."
" अगं बाई ही आमची स्टाईल आहे. बर तू इन्स्पेक्टर सांगळे यांना काय माहिती दिली आहेस?"
" ते मी तुम्हाला का सांगू?"
" तुला तुझा जीव आमच्या तावडीतून वाचवायचा असेल तर तुला सांगावं लागेल."
किमया आता पूर्णपणे कोलमडते. तिला काय करावं हे सूचना. एवढ्यात तिने समोर पडलेला एक लोखंडी रॉड पटकन उचलला आणि त्या मास्क घातलेल्या व्यक्तीला मारला. तेवढ्यात ती मास्क घातलेली व्यक्ती बेशुद्ध पडली. किमयाने आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. तिने हळूच रूमचे दार उघडले. एका फ्लॅटमध्ये तिला असे बंदिस्त केले गेलेले होते.
ती मेन दरवाजा उघडायला गेली. पण तो पूर्णपणे लॉक होता. मग तिने एक शक्कल लढवली .ती टॉयलेट मध्ये गेली. येथील खिडकीच्या काचा काढून त्या खिडकीतून तिने पाईपच्या साहाय्याने खाली उतरण्यास सुरुवात केली.
अशा रीतीने अत्यंत शिताफीने किमया या मास्कधारी व्यक्तीच्या तावडीतून सुटली.
तिने त्वरित धापा टाकत पोलीस स्टेशन गाठले. तिथे ती इन्स्पेक्टर सांगळे यांना भेटली आणि घडला प्रकार सांगितला.
" सांगळे सर, तो मास्क घातलेला व्यक्ती कोण होता हे मला समजले नाही .पण पहिल्यांदा ज्या व्यक्तीचा फोन आला तो हाच आहे,म्हणजे त्याने हे मला कबूल केले."
" हो तुमच्या माहितीवरून मला समजले ते. पण तरीही विजयच्या आईने सांगितलेल्या त्या दोन व्यक्ती म्हणजे विजयचा कॉलेजचा मित्र आणि विजयचे काका यांची सर्वप्रथम चौकशी करायला हवी. मी आजच त्यांची चौकशी करायला जाणार आहे."
" ठीक आहे सर."
" पण किमयाताई तुम्ही आता जरा जास्तच सतर्क राहायला हवं, कारण आता तुमच्या दोघांनाही धोका खूप वाढलेला आहे. म्हणून मी तुम्हा दोघांना पोलीस प्रोटेक्शन आजपासून देणार आहे."
"थँक्यू सर."
सांगळे सर विजयच्या कॉलेजच्या मित्राला गाठतात व त्याची चौकशी करतात. तो म्हणतो,
"अहो सर, मान्य आहे की विजय वर मी खूप जळायचो कारण त्याचा नेहमीच प्रथम क्रमांक यायचा. पण ही गोष्ट जुनी आहे . त्याच्या अपघाताचा प्रयत्न मी बिलकुल केलेला नाही."
" तुझ्यावर माझा काही विश्वास नाही. अजूनही खरं सांग नाहीतर तुला पोलिसी खाक्या दाखवावा लागेल."
" अहो सर ,मी खरंच सांगतोय. मला आता चांगली नोकरी आहे, बायका पोरं आहेत ,आता मी कशाला विजयचे नाव घेईल? त्याचा आणि माझा आता काहीच संबंध नाही. प्लीज मला सोडा. मी काहीही केलेल नाही."
विजयच्या मित्राच्या देहबोली वरून तो खरं बोलतोय असे सांगळे सरांना वाटले.
" ठीक आहे.पण या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत तू हे शहर सोडून जाऊ शकत नाहीस ,हे लक्षात ठेव. समजलं?"
" ठीक आहे सर."
आता सांगळे सर विजयच्या काकांकडे जातात.
विजयचे काका पेपर वाचत बसलेले असतात.
" काय काका ? काय विशेष बातमी आहे का पेपरात?"
" कोण पोलीस? काय भानगड आहे साहेब?"
" तुम्हाला विजयचा एक्सीडेंट झाला आहे हे तर माहीतच झालं असेल."
" हो वाईट झालं पोराचं."
" वाईट तर झालंच, पण हा एक्सीडेंट तुम्ही तर घडवून नाही आणला ना?"
"अहो काय बोलताय साहेब? माझ्या एकुलता एक भावाचा मुलगा आहे तो!माझ्या वहिणीला त्याचाच तर आधार आहे .मी कशाला त्याचा एक्सीडेंट घडवून आणेल?"
" पण विजयला नोकरी लागली तेव्हा तर तुमचा खूप जळफळाट झाला होता अस ऐकल मी!"
" हे बघा साहेब मी खरं खरं सांगतो. खरंतर विजयच्या नावावर असणारी पाच एकर जमीन मला मिळावी यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. त्यात विजयला नोकरी मिळाली म्हणून माझा जळफळाट झाला होता हे मान्य आहे मला. मी त्या कुटुंबाशी बोलणे देखील सोडले आहे .पण याचा अर्थ मी त्याच्या जीवावर बेतेल, असं काही करेल ,असा होत नाही."
सांगळे सर परत एकदा पेचात पडतात. विजयचे काका खरे असू शकतात, पण ते खोटं देखील बोलू शकतात.
आता खरा आरोपी कोण आहे? काय होईल पुढे? या अपघाताचा तपास अजून क्लिष्ट होईल का ? किमया आणि विजय यांच्या प्रेमबंधांना अजून किती विघ्ने सहन करावी लागतील ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या पुढील भागात!
तोपर्यंत धन्यवाद.
©® सौ. प्रियंका शिंदे बोरुडे
राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कॅटेगिरी - कथा मालिका
सब कॅटेगिरी- प्रेम कथा
जिल्हा- नाशिक.