प्रेमबंध - भाग ३

प्रस्तुत कथामालिकेत मी किमया आणि विजय यांची संघर्षमय प्रेमकथा मांडलेली आहे.

किमया फोन उचलते, 

" हॅलो"

" काय किमया मॅडम काय म्हणतोय तुमचा विजय?"

"कोण तुम्ही ? मी तुम्हाला ओळखलं नाही?"

"तू मला ओळखतच नाहीस. का ग बाई कशाला त्या विजयच्या नादी लागतेस? तो तर कोमात आहे ना! तो कसा आता ठीक होणार? एवढी तरणीताठी सुंदर मुलगी तू, घे दुसरं लग्न करून! त्याचा नाद आता तू सोडून दे!"

" काय रे तुला कस कळल की विजय कोमात आहे? मुकाट्याने सांग तू कोण आहेस ते! आणि तू कोण रे मी काय करायचं काय नाही ते सांगणारा?"

" माफ करा, माफ करा ताई.. हा हा हा.. ए शहाणे जास्त माज दाखवू नको.शिस्तीत त्याचा नाद सोडायचा."

" नाही सोडणार विजयला ! काय करशील तू?"

" बघा हे म्हणजे असं झालं ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझच खरं!"

" हो हो आमचं प्रेम खरं आहे,ही आमची ताकद आहे जी विजयला बरे करेल!"

" बापरे एवढा कॉन्फिडन्स! मानल बाई तुला! आता मी पण बघतो विजय कसा वाचतो ते!"

" ए तू समोर येऊन बोल ना! हॅलो हॅलो, याने फोन कट केला वाटत. शीट!"

तेवढ्यात विजयच्या रूममधून काहीतरी आवाज येतो.

" कोण आहे ?"

 " हो मॅडम ,मी सफाई कामगार आहे इथला! रूमची सफाई करायला आलोय."

" मग दार आधी नॉक करायचं ना!"

" बर..इथून पुढं नक्की लक्षात ठेवीन."

तो सफाई कामगार तिथून निघून जातो.पण किमयाला विजय च्या कॉटखाली एक बाटली सापडते.

तेवढ्यात डॉक्टर येतात..

" हॅलो किमया मॅडम.काय म्हणतय पेशंट?"

" विजय बरा आहे डॉक्टर.पण ही बाटली कसली आहे."

"ओ माय गॉड! हे तर खूप डेंजरस असे औषध आहे.पण हे इथे कसं काय आलं?"

"डॉक्टर थोड्या वेळापूर्वी इथे एक सफाई कामगार आला होता."

"काय सफाई कामगार? पण आज तर सर्व सफाई कामगार संध्याकाळी येणार आहेत!"

"म्हणजे ही बाटली त्या सफाई कामगारानेच आणली असणार! पण त्याने कशाला आणली असेल इथे? हा सफाई कामगार म्हणजे नक्की कोण असेल?"

"हे बघा किमया मला असं वाटतं तुम्ही याबद्दल म्हणजे तुमच्या कार अपघाताबद्दल पोलीस एफ आय आर केल पाहिजे! कारण ही बाटली तुम्ही पाहिलेल्या सफाई कामगारानेच आणलेली असणार! इथे शहरात तर ही बाटली मिळणे खूप अशक्य आहे. माफ करा पण मला काहीतरी विचित्र वाटतंय!"

"हो डॉक्टर मला वाटतं तुमचं बरोबर आहे. म्हणजे आमचा कार एक्सीडेंट केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न होता."

"बर ठीक आहे मी येतो आता. तुम्ही विजय जवळच थांबा. त्याच्या जीवाला धोका आहे."

" हो डॉक्टर .मी इथेच थांबणार आहे."

किमया विचार करू लागली. म्हणजे याचा अर्थ त्या फोनवरील माणसाचा आणि आत्ताच आलेल्या सफाई कामगाराचा नक्कीच काहीतरी संबंध असला पाहिजे.

तेवढ्यात किमयाला परत एक फोन येतो.

"हॅलो आई बोला."

"अग किमया तू त्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही अशोकामार्ग ला लॉन्ग ड्राईव्ह साठी गेले होते."

"हो."

"अगं तिथे असे अपघात सतत घडत असतात."

"काय?"

" हो ग पोरी. म्हणूनच तुमचाही कार अपघात या ठिकाणी घडला. मला तर या प्रकरणाची भीतीच वाटते आहे. हा काही घातपाताचा प्रकार तर नाही ना?"

किमयाने तिच्या सासूबाईंना म्हणजे विजयच्या आईला आत्ताच आलेल्या फोन बद्दल आणि त्या सफाई कामगाराबद्दल सांगितले. त्यावर तिच्या सासूबाई म्हणतात,

" किमया मला विजय ची खूप काळजी वाटते ग. खरंतर लहानपणापासून त्याने खूप सोसलय. कधीही कुठलाही हट्ट केला नाही. आपले काम भले आणि आपण भले या वृत्तीनुसारच आजवर तो काम करत आलेला आहे."

"आई त्याचे कोणाशी भांडण वगैरे झाले होते का किंवा कोणी त्याच्या वाईटावर आहे का?"

"किमया मला तर काहीच समजत नाहीये बाई! आपण याबद्दल पोलीस कम्प्लेंट करूया. माझ्या विजयला काहीही होता कामा नये. माझे अगदी साधे भोळे लेकरू आहे ग ते!"

"आई तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आहे ना! जोपर्यंत ही किमया आहे तोपर्यंत ती तिच्या विजयला काहीही होऊ देणार नाही. आमचे हे अतूट प्रेमबंधच आमची यातून सुखरूप सुटका करतील. म्हणजे एक गोष्ट तर आता स्पष्ट झाली आहे की आमचा कार अपघात हा केवळ अपघात नव्हता तर घातपाताचाच प्रयत्न होता."

" हो ग पोरी मलाही तेच वाटतंय. पण किमया अगदी सावध रीतीने पुढील पावले टाक. स्वतःची सुद्धा काळजी घे."

"हो आई तुम्ही निश्चिंत रहा. आता मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. मी तुमची वाट बघते तुम्ही तोपर्यंत घरून निघा आणि विजय जवळ थांबा. तुम्ही आल्यावर मग मी पोलीस स्टेशनला जाईल. कारण विजय सोबत एक व्यक्ती सतत थांबणे आता खूप गरजेचे आहे. आपल्याला आता खूप सावध राहावं लागणार आहे."

" हो किमया. मला तुझं म्हणणं पटतंय. मी आता लगेच निघते."

थोड्याच वेळात विजयची आई हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा किमया पोलीस स्टेशन कडे निघते.

पोलीस स्टेशन_____

एक पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या रजिस्टरवर काहीतरी लिहीत असतो.

"नमस्कार मी किमया."

"बर. या बसा."

अजूनही तो कॉन्स्टेबल काहीतरी लिहीत असतो.

"मला एक पोलिस कंप्लेंट करायची होती."

"अहो करू ना ताई कुठे घाई आहे? आम्ही दिवसभर याच कामासाठी इथे बसलेलो आहे."

"माफ करा पण मला जरा घाई आहे. तुम्ही लवकर पोलीस कम्प्लेंट नोंदवली तर बर होईल."

"असं म्हणताय! बर ठीक आहे. सांगा तुमची कंप्लेंट."

किमया आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा अहवाल पोलीस कॉन्स्टेबलला सांगते.

" बरं असं आहे तर! समजल मॅडम मला. म्हणजे हा घातपाताचाच प्रयत्न होता."

"हो मलाही तेच वाटतंय."

" बरं विजयचे कोणाशी वैर होते का?"

"मला तरी वाटतं नाही. कारण विजय एकदम साधाभोळा मुलगा आहे. पण तरीही आपण खोलवर जर चौकशी केलीत तर या मागचा सूत्रधार नक्कीच सापडू शकेल."

भाग ३ समाप्त..

     किमयाचे हे प्रयत्न सफल होतील? हा पोलीस कॉन्स्टेबल या घटनेमागचा सूत्रधार पकडण्यात यशस्वी होईल? नक्की कोण असेल खरा सूत्रधार? त्याच्या तावडीतून किमया आणि विजयचे प्रेमबंध सुखरूप सुटतील? किमया आणि विजयचा आपल्या प्रेमासाठीचा हा संघर्ष कधी थांबेल?पाहूया पुढील भागात..


तोपर्यंत नमस्कार..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

कॅटेगिरी-कथा मालिका

सब कॅटेगिरी-प्रेमकथा

जिल्हा नाशिक

🎭 Series Post

View all