प्रेमबंध - भाग ५

प्रस्तुत कथेमध्ये मी किमया आणि विजय यांची संघर्षमय प्रेम कथा सादर केलेली आहे.

" तसही असू शकेल कदाचित.पण कोण असेल हा सूत्रधार?"

"या केसमध्ये हा एकच व्यक्ती म्हणजे सूत्रधार असा आहे,जो खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवू शकतो किंवा तो स्वतःही गुन्हेगार असू शकतो."

" विजय चे तर कोणाशी वैर असेल असे मला वाटत नाही .पण तरीही खात्रीसाठी मी त्याच्या आईला याबद्दल विचारते."

"हो तुम्ही विचारा त्यांच्या आईला. मला वाटतं त्याच आपल्याला या केस मध्ये मदत करतील."

" ठीक आहे सर मी येते आता. विजय च्या आईच्या माहितीचा तपशील सांगण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल."

"हो. पण हा माहितीचा तपशील लवकरात लवकर भेटला तर अजून चांगलं होईल. आपल्याला खऱ्या सूत्रधारापर्यंत नक्कीच लवकर पोहोचता येईल."

" हो सर मी उद्याच सर्व माहिती काढून आणते."

किमया हॉस्पिटलमध्ये येते. तिथे विजयची आई विजय जवळ बसलेली असते.

" किमया काय म्हणाले ग सांगळे सर?"

" आई ते म्हणाले की विजय चे कोणाशी वैर होते का ते शोधावे लागेल.आई आता मला सांगा,की विजय चे नक्की कोणाशी भांडण किंवा वाद झाले आहेत का अशात?"

" नाही ग,तो कधीच कोणाशी भांडत नाही,किंवा त्याचे कोणाशी वादही नाहीत.पण मला आठवतं की कॉलेज मध्ये असताना त्याला एका मुलाने खूप त्रास दिला होता.कारण विजयचा दरवषी येणारा प्रथम क्रमांक त्याला सहन होत नव्हता.ही साधारण ३ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दुसरे म्हणजे त्याचे काका म्हणजे माझे दीर हे आमच्यावर खूप जळतात. त्यांनी विजयला पहिली नोकरी लागली तेव्हा चांगलेच नाक मुरडले होते.ही साधारण एक वर्षा पूर्वीची गोष्ट असेल. बस्स ही एवढीच प्रकरणे मला माहीत आहेत. या दोन्हीही जुन्या गोष्टी आहेत, तरीही यांचा आणि तुमच्या अपघाताचा संबंध असू शकतो असे मला नाही  वाटत."

"ठीक आहे आई .मी सांगळे सरांना याबाबत आजच दुपारी जाऊन सांगते. म्हणजे लवकरात लवकर या घातपाताची उकल होईल."

" ठीक आहे. आता तू आधी जेवून घे आणि मगच पुढची पावलं उचल. कारण या सगळ्यात तुझी तब्येतही सांभाळणे खूप गरजेचे आहे. तुला माहित आहे का, विजयने आज मला वेगळ्याच भाषेत आई आपण घरी कधी जाणार ? असे विचारले."

" हो काय आई? अरे व्वा! तुम्हाला माहित आहे का विजय अशीच सांकेतिक भाषा वापरून किंचित हात व पाय हलवून माझ्याशीही बोलत असतो. मला वाटतं त्याची हालचाल त्याच्याशी सतत बोलून बोलून तसेच रोज सकाळी डॉक्टर जे व्यायाम घेतात त्यामुळे वाढली आहे. खरं सांगू का आई, देवालाच सगळी काळजी. म्हणूनच एकीकडे माझा विजय चांगला प्रतिसाद देऊ लागला आहे आणि दुसरीकडे इन्स्पेक्टर सांगळे सुद्धा अगदी चिकाटीने व प्रामाणिकपणे आमच्या अपघाताच्या घातपाताचा कसोशीने तपास करत आहेत. देव करो आणि या दोन्हीही गोष्टी लवकर मार्गी लागोत."

" हो ग पोरी तुझ्या तोंडात साखर पडो.खर तर तुझ्यामुळेच माझा विजय आता बरा होऊ लागलेला आहे. तुझा तुमच्या प्रेमासाठीचा हा संघर्ष नक्कीच यशस्वी होणार आहे, तू काही काळजी करू नकोस. माझा आशीर्वाद सतत तुमच्या दोघांच्या पाठीशी आहे."

" थँक्यू आई. खरंतर कधी कोणाशीही न बोलणारी मी आज चक्क इन्स्पेक्टर सांगळे यांच्याशी निडरपणे बोलले. खरंतर विजयचा हा कोमातील खरा संघर्ष पाहून मी स्वतःला खूप बदलले.खूप धीट बनवले.अगदी भित्री असणारी मी आज एकदम आत्मविश्वासू बनले आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या विजयमुळे. थँक्यू विजय. पण आई आता विजय सुद्धा लवकर आणखी बरा व्हायला हवा. आता मी सुद्धा त्याचा रोज सकाळी डॉक्टरांसारखा व्यायाम चालू करणार आहे."

" हो ग पोरी. तुझ्या ध्येयांना नक्की यश मिळो."

" थँक्यू आई.अहो आई तुम्ही पाहिलत का विजय ने आता चांगले स्मित हास्य केले." 

" अग बाई खरंच?"

" हो आई कदाचित आपल्या दोघींचा संवाद ऐकून त्याने आपल्याला जणू काही प्रतिसाद दिला."

" देवा श्री गणेशा माझ्या विजयला असंच लवकर बरं वाटू दे. त्याच्या हाता पायांमध्ये ताकद येऊ दे ,त्याचा धरणीला टेकलेला हा देह चंचल होऊ दे. त्याला लवकर चालते बोलते होऊ दे. आमच्यावर तुझी कृपा आणि छत्रछाया अशीच कायम राहू दे."

"आई तुमच्या या प्रार्थना श्री देव बाप्पा नक्की ऐकत आहेत, म्हणूनच वेळोवेळी देव आपली मदत करतोय."

" हो ना ग पोरी,तू होतीस म्हणून हे सर्व प्रकरण मार्गी लागतय नाहीतर कसे काय झाले असते माझे? कारण तुला तर माहीतच आहे विजय चे बाबा पॅरेलाइज्ड झाल्यापासून अंथरुणाला खिळून आहेत. तुझे बाबा सुद्धा फिरतीच्या नोकरीवर आहेत. म्हणूनच तुझी आई आणि तुझा, आमच्या कुटुंबाला खूप आधार झाला."

"अहो आई मी तुमची होणारी भावी सून आहे. त्यामुळे प्लीज मला तुम्ही अस बोलून परक करू नका.मग मला खूप वाईट वाटेल."

" बर बाई नाही बोलणार असं. बस्स."

" बरं आई तुम्ही सांगितलेली माहिती मला सांगळे सरांना सांगण्यासाठी आता निघावं लागणार आहे."

"अग पण तू काही जेवण सुद्धा केलं नाहीस."

" मला सध्या भूक नाहीये. आधी इन्स्पेक्टर सांगळे यांना भेटणं महत्त्वाचं आहे. मी निघते आता. तुम्ही थांबा मी आलेच."

" बर ठीक आहे बेटा."

 किमया विजयच्या स्पेशल रूम मधून बाहेर येते आणि अचानक समोरून एक व्यक्ती तिच्या नाकाला रुमाल लावत तिला दुसऱ्या रूम मध्ये खेचतो.

  कोण असेल हा व्यक्ती? किमयाला ती किडनॅप करेल का? किमया विजयच्या आईने सांगितलेली माहिती इन्स्पेक्टर सांगळेंकडे पोहोचवू शकेल? की या सगळ्यात किमयाच स्वतः संपेल? तिचा हा एकाकी लढा कधी थांबेल?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

कॅटेगिरी - कथा मालिका

सब कॅटेगिरी-  प्रेम कथा

जिल्हा - नाशिक.


🎭 Series Post

View all