प्रेमबंध- भाग १

सदर कथामालिकेत मी किमया आणि विजय यांची संघर्षमय प्रेमकथा मांडली आहे.


        विजय आणि किमया दोघेही एकमेकांना एकदम अनोळखी. दोघांचाही एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम झालेला होता आणि पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांना पाहून क्लीन बोल्ड झाले होते. त्यामुळे त्यांचे अरेंज कम लव्ह मॅरेज ठरले होते. दोघांचेही कुटुंब म्हणजे आधुनिक विचारांचे धनी.विजय चे आई बाबा दोघेही शिक्षक होते तर किमयाचे आई बाबा दोघेही सरकारी नोकरदार.त्यामुळे चांगला मुहूर्त बघून दोघांना एकदा एकमेकांचे साथीदार बनवले की त्यांचा संसार सुखाने फुलेल असे सर्वांना वाटत होते.

        दोघांच्याही ऑफिसमध्ये लग्न ठरल्याचे कळाले होते.त्यामुळे त्यांच्या मित्र मैत्रिणींचे त्यांना एकमेकांबद्दल चिडवणे,चेष्टा मस्करी करणे चालू होते.मग काय दोघेही कायम एकमेकांच्या विचारांच्या तंद्रीत राहून,या सुंदर पहिल्यावहिल्या प्रेमबंधनात बांधले गेले होते.त्यांचे कुटुंबीय सुद्धा दोघांना एकमेकांसोबत खुश पाहून फार आनंदात होते.

           दोघांचीही स्वारी एकदम खुश होती.साखरपुडा झाला आणि मग त्यांची " मॅसेजवारी' चालू झाली.सकाळ,दुपार,संध्याकाळ ,रात्र कधीही दोघेही तासन् तास एकमेकांशी मॅसेज द्वारे बोलायचे.प्रेमाची गुलाबी धुंदी दोघांवर जादू करण्यात यशस्वी झाली होती आणि होणारच होती कारण दोघेही दिसायला सुंदर,एकमेकांना अगदी साजेसे होते.खरतर किमया नेहमी समोरच्या व्यक्तीच्या मनात तिच्या गोड स्मितहास्याने एक वेगळीच छाप पाडणारी अशी सुंदर तरुणी होती.तिच्या याच गोड हास्याच्या प्रेमात विजय पाहताक्षणीच प्रेमात पडला होता.जशी काही देवानेच त्यांची लग्न गाठ स्वर्गातूनच बांधून दिली होती.असेच दिवस सरत होते.दोघांचेही एकमेकांसोबत फिरणे,समजून घेणे चालू होते.प्रेमांकुर जणू चहू बाजूंनी त्यांच्या निखळ नात्यात फुलू लागला होता.त्यात घट्ट मैत्रीची साथ मिळाल्याने हा प्रेमांकुर बहरत चालला होता.दोघांनाही हे सुंदर जग एक मखमली महाल वाटत होते.कारण त्यांच्या या प्रितीच्या नावेला किमयाचे स्मितहास्य साद देत होते आणि ही नाव अखंड प्रेमसागराच्या ओघात पुढे जात होती.दोघांनाही सुख चहू बाजूंनी लोटांगण घालतांना दिसत होते.सगळे कसे अगदी छान जुळून आले होते.लग्नाची तारीख मुहूर्त नसल्यामुळे जरा लांबच होती ,तरीही ते दोघे एकमेकांना भेटले तरी खुश होत असत.

      किमया एकदा विजयला म्हणाली,

    " विजय चल ना आपण लाँग ड्राईव्हला जाऊ. तसही तुला आणि मलाही उद्या सुट्टी आहे.प्लीज चल ना."

" आपकी खिदमत मे आपका ये आशिक हमेशा हाजिर है हमारी राणी सायबा! आप बस हुकूम किजीये|"

    किमया मोठ्याने हसू लागली.विजय तिच्या या नुकतीच प्रेमपालवी फुटलेल्या निरागस हसऱ्या चेहऱ्याकडे बघत होता. मग आनंदात ते दोघेही लाँग ड्राईव्हला निघाले.

    विजयने गाडीतील रेडिओ चालू केला. नेमके किमयाचे आवडीचे गाणे चालू होते.

" बहारो फुल बरसाओ,

मेरा मेहबूब आया है,

मेरा मेहबूब आया है||"

         विजय सुद्धा हे गाणे किमयाकडे पाहत गुणगुणत होता.किमया तिच्या सुंदर स्मित हास्याने, हे सुंदर गाणे ऐकून जणू मोहरतच होती.अंगावर येणारे प्रेमभावनांचे हळूवार शहारे तिला चिंब चिंब भिजवत होते.त्यात तिचे ते मधाळ स्मित हास्य विजयला परमोच्च आनंद देत होते.अशातच अचानक निर्जन स्थळ असूनही एक भरधाव ट्रक आला आणि सरळ विजय ची गाडी चिरडून गेला.

       रात्रीची वेळ होती त्या चिक्कार शांततेत दोघेही वेदनांनी विव्हळत होते.पण तिथे कोणीही मदतीसाठी नव्हते.मदती साठी किमया आणि विजय ओरडत होते,पण हळूहळू विजयचा आवाज आता बंद झाला होता कारण त्याचा खूप रक्त स्त्राव झाला होता,आणि मेंदूला जबर मार लागलेला होता.तेव्हा किमया घाबरली. ती जोरजोरात अजूनही ओरडत होती ," अहो कोणी आहे का मदतीला ? माझा विजय बोलत नाहीये. प्लीज त्याला हॉस्पिटल मध्ये न्या.प्लीज आम्हाला या कार मधून बाहेर काढा.प्लीज वाचवा आम्हाला."

       पण दूर दूर पर्यंत कोणीही किमयाला दिसत नव्हते.ती आक्रोश करत होती,रडत होती.ती आता हताश झाली होती,निराश झाली होती पण असह्य वेदनांचे घाव तिला सहन होईना म्हणून ती ओरडत विव्हळत अचानक शांत झाली.जेव्हा तीला जाग आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती.ती सगळीकडे फिरत विजयला शोधू लागली.

" विजय तू कुठे आहेस?"

तेव्हा नर्स आल्या आणि म्हणाल्या," हे बघा तुमच्या सोबत जो माणूस कार मध्ये अडकलेला होता ना तो आता कोमात आहे.ते तुमचे कोण आहेत?"

" माझे होणारे मिस्टर आहेत ते !"

" माफ करा ताई त्यांची कंडीशन जरा नाजूक आहे त्यांच्या मेंदूतून खूप रक्तस्त्राव झालाय आणि ते कोमातून बाहेर कधी येतील हे सांगणं जरा कठीण आहे."

" काय? "किमया निराश झाली.

      दुःखाच्या डोहात बुडून जीव द्यावा असे तीला वाटू लागले.पण तिची विजयला एकदा पहायची इच्छा होती.पण ती त्याला या अवस्थेत कशी बघू शकणार होती? तिच्या लेखी आता सारेच संपले होते.ती या विपरित घटनेमुळे ती पूर्णपणे हादरली होती. तिला वेड लागायची वेळ आली होती. क्षणभर ती कुठेतरी हरवली.ती एकटक कुठेतरी पाहत होती. तीला आता कसलेच काहीच भान नव्हते.ती खूप शांत झाली होती.स्मितहास्य जे तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य सतत खुलवत असायचे ते केव्हाच नाहीसे होऊन आता त्याची जागा एका उदास ,खिन्न चेहऱ्याने घेतली होती.ती आतून पूर्णपणे कोसळली होती.थोड्या वेळात डॉक्टर आले आणि तिला चेक करू लागले..

भाग १ समाप्त..

    आता पुढे काय होणार आहे? विजय कोमातून खरच बाहेर येईल की नाही ? किमया आणि विजय चे हे प्रेमबंध इथेच संपतील का? किमया या सर्वांतून स्वतःला सावरू शकेल? काय होईल पुढे? हा निव्वळ एक अकस्मात अपघात होता की घातपाताचा कट होता? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा पुढील भाग..

फोटो: साभार गूगल

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

कथामालिका ( राज्यस्तरीय करंडक स्पर्धा)

कॅटेगरी: प्रेमकथा

जिल्हा : नाशिक 

🎭 Series Post

View all