हळुवार भाग एक

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग एक.


सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.


रमा -"बाबा तुम्हाला माझं काही ऐकायचंच नाहीये का?"

बाबा -"का ऐकू मी तुझं काही? सांग ना?"

आई -"अहो असं काय करता? ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या!"

बाबा -"तू मध्ये बोलू नकोस! तुला जर यातलं काही माहित नाहीये तर तू न बोललेलंच बरं!!"

आई -"अहो पण….." रमाच्या बाबांनी केवळ आता हात उंच केला. त्यांच्या नजरेत एवढी जरब होती की, रमाच्या आईला इच्छा नसतानाही गप्प बसावं लागलं.

बाबा -"ते पाहुणे बोलावले होते ना तू रमा करिता?"

आई -" अं काय?"

बाबा -"अग तू रमा करता एक चांगलं स्थळ सांगून आलाय असं म्हणत होतीस ना परवा?"

आई -"हो, हो! पण तेव्हा तुम्ही म्हणाला होतात…."

बाबा -"तेव्हा मी काय म्हणालो होतो हे महत्त्वाचं नाहीये. रमाच्या भविष्याचा विचार करायला हवा!"

रमा -"बाबा कॉलेजचे हे माझे शेवटचे वर्ष आहे. दोन महिन्यांवर परीक्षा आहे. प्लीज बाबा मला एकदा माझं मत तरी मांडू द्या ना!" रमा फारच अजीजीन बोलत होती.

पण रमाच्या बाबांच्या मनावर आणि निर्णयावर त्याचा काही एक परिणाम होत नव्हता. रमाच्या बाबांच्या अचानक अशा वागण्या मागचं कारण रमाला, तिच्या आईला किंवा घरात इतर कुणालाच माहिती नव्हतं. तसेही रमाच्या बाबांचा रमेश रावांचा स्वभावही तसाच होता. स्वतः एकदा घेतलेल्या निर्णयावर ते परत फेर विचार करत नसत आणि त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत जोशींच्या घरात कुणातच नव्हती.

रमेश जोशी अन्न आणि औषध प्रशासन विभागात ते एक मोठे सरकारी अधिकारी होते. अतिशय प्रामाणिक आणि वक्तशीर असा त्यांचा नाव लौकिक होता. आजकालच्या भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यांना रमेशरावांच्या नावाची फारच जरब होती. त्यांच्या सच्चेपणामुळेच त्यांच्या वारंवार बदल्या व्हायच्या, त्यामुळे सीमाताईंनी स्वतःची मराठी प्राध्यापिकेची नोकरी, घर आणि मुलींसाठी सोडली होती.

जोशी कुटुंबात रमा-मीरा अशा दोघीजणी. मोठी रमा तर, रमेश रावांचा अगदी जीव की प्राण! आई-सीमाताई मराठीची प्राध्यापिका होती, तर रमाने इंग्रजी वाङमय विषय निवडला होता. रमा अभ्यासात हुशारच होती, पण तिला विज्ञानाच्या रुक्ष विषयात अजिबात रस नव्हता, म्हणूनच मग तिने इंग्रजी वाङमय निवडलं होतं. अभ्यासासह शाळा-कॉलेजात वादविवाद, वक्तृत्व, भाषण, गाणं अशा सगळ्या उपक्रमात रमाचा नेहमी पहिला नंबर असे. रमा दिसायलाही सुंदर होती. गोरी पान उजळ कांती, सरळ अपरे नाक, घारे पाणीदार डोळे, सडपातळ बांधा.


रमा रमेश रावांची अतिशय लाडाची होती. ज्यावेळी रमाचा जन्म झाला त्याच दिवशी रमेश रावांना नोकरीत इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. त्यापूर्वी रमेश राव एका खाजगी बँकेत व्यवस्थापक होते, परंतु तिथले आर्थिक गैरव्यवहार त्यांना आवडले नाही आणि त्यांनी सरळ राजीनामा दिला. लग्नाच्या एका वर्षातच रमेश रावांनी नोकरी सोडल्यामुळे कुटुंबाचा सगळा आर्थिक भार सीमाताईंनी उचलला आणि रमेश रावांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून एम.पी.एस.सी. ची परिक्षा पास केली. आर्थिक तंगीच्या काळात सीमाताईंनी घर, रमेशराव, आणि सासुबाई यांची छान काळजी घेतली, त्यामुळे सीमाताई आणि रमेशरावांचं नातं अधिकच घट्ट झालं.

सहसा रमेशराव घरी शांत असत. मिळालेला वेळ आपल्या मुली आणि आईसह ते आनंदात घालवत. अगदी हसत खेळत कुटुंब होतं जोशींचं पण आज अचानक रमेशराव एवढे का चिडले? ते कुणालाच कळत नव्हतं.

"अहो जरा शांत व्हा!" सीमाताई समजूतदारीच्या स्वरात बोलल्या.

"हे बघ सीमा, अग तरुण, देखण्या मुलीचा बाप होण एवढं सोपं नसतं." रमेशराव दुखावल्या स्वरात बोलले.

"अग रमा माझा जीव की प्राण आहे. पण आज मला भेटायला एक तरुण आला आणि त्याने चक्क रमाचं त्याच्यावर प्रेम आहे असं सांगितलं."

"काss य?" सीमाताईंना आश्चर्याचा धक्काच बसला.

"हे बघ सीमा, ते स्थळ आहे ना! त्यांना लवकरात लवकर बोलावण पाठव आणि गुरुजींना पण विचार कुंडली आणि मुहूर्त वगैरे." रमेशराव उद्वेगाने बोलले.

"पण मी काय म्हणते, तुम्ही एवढी घाई का करताय? कुणी काही सांगितल्याने काही होत नसतं! माझा रमावर पूर्ण विश्वास आहे." सीमाताई रमाची बाजू घेत होत्या.

"तो मुलगा चांगला असेल तर त्याच्याशीच….."

सीमाताई आपलं म्हणणं मांडत होत्या पण रमेशरावांनी त्यांना मध्येच थांबवलं.

"अग तुला कसं सांगू? परवा मी ज्या डान्स बारवर धाड टाकली ना! त्या डान्स बारच्या मालकाचा मुलगा आहे तो. रमाला मागणी घालत होता. अगदी उनाड, लफंडर, आणि टपोरी आहे. तो. सीमा डान्स बार मालकाचा मुलगा म्हणजे तूच विचार कर तो कसा असेल?" रमेशरावांना एवढं हतबल सीमाताईंनी याआधी कधीही पाहिलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी रमेशरावांना रमाशी बोलेल असे सांगितलं.



©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all