अबोल प्रीत ही

अबोल प्रीत ही


तो ....

        आज खुप दिवसांनी ... नाही नाही .... खुप वर्षांनी तो  दिसला ... जवळपास १२ ते १५ वर्षांनी . त्याला बघून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता . इतका आनंद कि तो माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या वागण्यातून स्पष्ट दिसत होता . कॉलेजचे ते सोनेरी दिवस एका क्षणांत असे झरझर डोळ्यापुढे आले आणि मी सुद्धा त्या आठवणींमध्ये हरवून गेले . माझी आठ वर्षांची मुलगी मला सारखी विचारत होती " आई आज काही स्पेशल आहे का ग ..! आता तिला कसे सांगू कि मला कित्ती आनंद झालाय ते .

       कॉलेजच्या सगळ्या मित्र मैत्रीणींनी मिळून एक ग्रूप तयार केला गेल्या महिन्यातच आणि सगळे एक एक हरवलेले ... हरवलेले म्हणजे जो तो त्यांच्या कामात आणि संसारात गुरफटलेले मित्र मैत्रीणी भेटत गेले . सगळ्यांना एकमेकांना बघून इतका आनंद झाला कि सगळे एकदमच बोलायचे , त्या ग्रूप मध्ये तासाभरात नाही म्हटले तरी पाचशेच्या वर मेसेज व्हायचे ... इतक्या उत्साहाने सगळे बोलायचे . बोलणारच ना ..! कारण सगळे एकमेकांची चौकशी करत होते . कोण काय करतेय किंवा नोकरी कुठे आणि लग्न कधी झाले , मुलं किती ... अशा सगळ्या गप्पा व्हायच्या सुरुवातीला . इतक्या वर्षांनी सगळे कसे काय सापडले ?  तर काही मित्र अजूनही एकमेकांच्या संपर्कात होते . त्यामुळे सगळे असे एक एक जोडत गेले आणि कॉलेजच्या नावानेच एक ग्रूप तयार करण्यात आला मग  आमच्या वर्गातले सगळेच भेटत गेले .

      सगळे असे व्हॅट्स ॲप वर भेटलेच होते पण कॉलेजची , त्या दिवसांची , सर्व शिक्षकांची खुप आठवण येत होती . त्यामुळे सगळ्यांनी एक छोटसं गेटटुगेदर करायचे ठरवले . ते हि कॉलेज मध्येच ... किती धम्माल येईल ना असे झाले तर ... इतक्या वर्षांनी सगळ्यांना बघून भेटून खुप भारी वाटेल ... जुन्या आठवणी ताज्या होतील ... ते सर्व क्षण  काही काळ का असेना पुन्हा जगता येईल .... त्यामुळे सगळेच तयार झाले होते त्यासाठी .... सगळ्यांच्या सोयीनुसार दिवस आणि वेळ ठरवण्यात येईल ... असा ठराव पास झाला ग्रूप मध्ये आणि सर्वच खुप खुश झाले होते .

      कॉलेजमध्ये असतांना काही जणं खुप मस्तीखोर तर काही अभ्यासू किडे , काही फक्त मज्जा करण्यासाठी कॉलेजला यायचे तर काही नुसतीच शायनिंग मारायला यायचे . यांच्यात " तो " म्हणजे खुप साधा सरळ आणि अभ्यासात जास्त हुशार नसला तरी बाकीच्या स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घेणारा , शिक्षकांचा आवडता , सगळ्यांची मदत करणारा असा " तो ". सगळे जणं कॉलेज संपल्यानंतर पुढे चांगले शिक्षण घेऊन कोणी प्रोफेसर झाले तर कोणी राजकारणात गेले , तर कोणी गावाकडे राहून आधूनिक शेती करत होते , कोणी बिझनेसमन झाले , तर कोणी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत होते . कोणी बाहेर देशात स्थायिक झालेले होते तर काही कामानिमित्त गाव सोडून पुण्या मुंबईला वास्तव्य करत होते .  सगळ्यांचे सुरळीतपणे चाललेले ऐकून खुप भारी वाटत होते . पण आमच्या मुलींपैकी सुद्धा काही जणी चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी करत होत्या . कोणी शिक्षिका झाल्या होत्या , \" तर कोणी लग्न करून सासरी सुखाचा संसार करत होत्या .

        तो ... तो म्हणजे " निलेश " ... नाही ... निल्याच तो , कारण कॉलेजमध्ये आपले सरळ नाव घेऊन कोणी बोलवेल असे कधी झालेच नव्हते ... सगळे जण आपले नाव काय आहे हे विसरूनच जायचे . कारण सगळ्यांच्या नावाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते . म्हणजे निलेश चा निल्या , अमित चा अम्या , रवी चे रव्या , विनायक चा विन्या , नितिनचा नित्या ....हे  झाले मुलांचे नाव ... तर आम्ही मुली हि काही मागे नव्हतो ... नमिताची नमी , मानसीची मनू , तनिषाची तनू , अपर्णा ची अप्पू , आणि मी शुभांगीची शुभा कधी झाले कळलेच नाही . तर असा हा आमचा दहा जणांचा ग्रूप होता . कॉलेजमध्ये निल्या सोडून आम्ही नऊ जणं  आधीपासूनच होतो . पण निलेश हा बी ए च्या पहिल्या वर्षापासून दाखल झाला होता . कारण त्याच्या आई वडिलांची नेहेमी बदली व्हायची . पण खुप कमी कालावधीत तो आमच्या ग्रूप मध्ये मिसळून गेला होता .

      तसा होताच तो मनमिळाऊ , शांत स्वभावाचा , कधी कोणाला उगाच चिडवायचा नाही पण बाकीचे मित्र नेहेमीच त्याची खेचायचे . पण तो जेव्हढ्यास तेव्हढेच पण नेमकं बोलणारा म्हणून मला जास्त आवडायचा . त्यालाही मी आवडत होते हे त्याच्या नजरेतून समजायचे मला . पण त्याने कधीच बोलून दाखवले नव्हते . नेहेमी मला जेव्हा कॉलेजसाठी उशीर व्हायचा तेव्हा तोच माझ्यासाठी नोट्स काढून ठेवायचा आणि नंतर समजावून पण सांगायचा . त्याच्या बोलण्यातून वागण्यातून सतत काळजी करण्यातून मला हेच फिल व्हायचे कि त्याचे माझ्यावर प्रेम आहे . आणि हे तो जरी लपवत असला तरी बाकीच्यांना पण ते कळायचे पण कोणीही आम्हांला चिडवत नव्हते . कारण मैत्री हि असू शकते ना पक्की . आणि आम्ही तस एकमेकांना कधीच बोलूनही दाखवले नव्हते . बी ए ... त्यानंतर एम ए ला सुद्धा आम्ही सगळे सोबतच होतो . पूर्ण कॉलेजमध्ये आमचा दहा जणांचा ग्रूप फेमस होता . फिरायला जाणे सोबतच , कधीकधी लेक्चर बुडवून कॅंटिंगमध्ये मस्त कटिंग चहा आणि गरमागरम समोसे खाणे . सोबत अभ्यास करणे ... असे सगळे मजा मस्तीने चालायचे . पण कोणाला कोणतीही अडचण आली तर सगळे त्याला मदत करायला मागे पुढे बघत नव्हते ." मित्र असावे तर असे " ... असा आमचा ग्रूप होता .

        कॉलेजमध्ये दरवर्षी गॅदरिंग असायचे , तसे त्या वर्षी पण होते . तेव्हा आमच्यातले दोघे जण म्हणजे विन्या आणि नमी हे नेहेमी भाग घ्यायचे पण मी कधीच भाग घेतलेला नव्हता . ते वर्ष म्हणजे आमचे कॉलेजमधील शेवटचे वर्ष होते ,  त्यामुळे  त्या वर्षी मला निल्याने आग्रह केला कि तु पण भाग घे , तुला पण येतय कि थोडाफार नाचता आणि नाहीच जमल तर मी शिकवेन तुला . कारण निल्या खुप छान डान्स  करायचा . त्याची तर सगळी तयारी झाली होती . अगदी गाणे हि सिलेक्ट करुन ठेवले होते त्याने . ***** खुप रोमॅन्टिक गाणे होते ते . मला प्रॅक्टिस करतांना ऑकवर्ड फिल होऊ नये म्हणून तो नेहेमी काळजी घ्यायचा . छान डान्स प्रॅक्टिस झाली होती आमची आणि प्रत्यक्ष परफॉर्मन्स तर अगदीच भारी झाला होता . कडकडून टाळ्या वाजत होत्या . त्या वर्षी आमच्या जोडीचा पहिला क्रमांक आलेला . पहिल्यांदाच मला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते आणि ते हि फक्त निल्या मुळे . त्या डान्स नंतर तर आमची जोडी आख्ख्या कॉलेजमध्ये फेमस झाली होती . सगळ्यांना असेच वाटायचे कि आमची जोडी कधीच तुटू नये . तसे आम्ही कायम सोबतच असायचो म्हणजे  आमच्या अम्या नित्या विन्या रव्या आणि नमी तनू अप्पू मनू या सगळ्यांच्या टोळीत असायचो .
   
           गॅदरिंग संपले आणि परीक्षा तोंडावर आल्या होत्या . जो तो आपला चांगला  अभ्यास व्हावा म्हणून जास्तकरुन घरीच राहत होते . मी निल्या विन्या नमी आणि अप्पू मात्र रोज कॉलेजमध्ये यायचो आणि काही कोणाला अडले तर समजावून सांगायचो , एकमेकांचा अभ्यास घ्यायचो . पण एक दिवस यांच्यापैकी कोणीच आले नव्हते . फक्त मी आणि निल्या च होतो त्यामुळे आम्ही एकाच बेंचवर बसून अभ्यास करत होतो . पण मी मात्र निल्याला बघण्यात गुंग होते . मला खरचं तो खुप आवडायचा . असे वाटायचे कि कधी हा व्यक्त करणार त्याच्या मनात असणारे माझ्याबद्दलचे प्रेम . पण त्याने कधीच बोलून दाखवले नाही . कारण त्याचे ध्येय ठरलेले होते . त्याला खुप शिकून काहीतरी मोठ्ठ करून दाखवायचे होते . त्याच्या आई वडिलांनी खुप कष्ट घेतले होते त्याच्यासाठी त्यामुळे आता त्याची वेळ होती . म्हणून मग मी पण माझे त्याच्याबद्दल असणारे प्रेम मनातच साठवून ठेवत होते .

         परिक्षा संपल्या , सगळ्यांना पेपर खुप छान गेले होते म्हणून शेवटच्या दिवशी पार्टी करण्याचे ठरले . याआधी सगळ्यांची पार्टी देउन झाली होती आणि आता माझा नंबर होता .कॅंटिंगमध्ये सगळ्यांनी मिसळ पावची ऑर्डर दिली . आम्ही दहा जण होतो त्यामुळे बील शक्यतो दोनशेच्यावर होणार होते हे माहिती होते . अचानक पार्टी म्हटल्यावर  त्यावेळी माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते हे निल्याला बहुतेक समजले असावे . म्हणून त्याने ती पार्टी त्याच्याकडून आहे असे जाहीर करून मोकळा झाला होता . त्यावेळी दोनशे रुपये म्हणजे खुप होते आमच्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी निल्याने ते बील भरले होते . त्याची घरची परिस्थिती तशी बरी च होती पण तरीही त्याने मॅनेज केले सगळे . त्यानंतर रीझल्ट लागल्यावर मात्र मी माझी पार्टी दिली . अर्थात सगळेच चांगल्या मार्कांनी पास झाले होते .

              कॉलेज संपल्यानंतर काही दिवस आम्ही  एकमेकांच्या संपर्कात होतो . सगळे वेगवेगळ्या मार्गांवर पांगले होते पुढच्या शिक्षणासाठी . आणि नेहेमीप्रमाणे निल्याच्या आई वडिलांची पुन्हा बदली झाली होती बहुतेक , कारण त्यांनी घर देखील बदलले होते . त्यामुळे आमच्यातला संपर्क तुटला होता .आमच्यातील काहींचे लग्न ठरले होते आणि थोड्याच  दिवसांत अप्पूचे लग्न झाले . पाठोपाठ तनूचे हि झाले . आम्ही आवर्जून सगळे लग्नाला उपस्थित होतो . त्यानंतर वर्षभरात माझेही लग्न झाले आणि मी माझ्या संसारात इतकी गुरफटून गेले कि मला या सगळ्या मित्र मैत्रीणींचा विसर पडला होता . फक्त एक मैत्रीण सोडून ,  ती म्हणजे नमी . कारण आमची घरं देखील जवळजवळ होती आणि लग्नानंतर तिला भेटता हि येत होते .

             आज ग्रूप मध्ये " तो "ॲड झाला होता . त्याच्याबद्दल त्याने सगळे सांगून झाले होते . तो एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होता आणि त्याला एक मुलगा एक मुलगी असे दोन मुलं होते . त्याने त्याच्या फॅमिलीचा फोटो देखिल ग्रूपमध्ये पाठवला होता . आजही तसाच दिसत होता तो , अजूनही मेंटेन होता . पण बाकीच्यांचे पोट सुटलेले होते केस पांढरे झालेले तर काहींचे एव्हाना टक्कल पडले होते . त्यामुळे सगळ्यांचे फोटो बघून ग्रूप मध्ये पुन्हा एकदा चिडवाचिडवी चालली होती . आणि निल्याला मात्र सगळे मित्र विचारत होते कि " आपकी इस खुबसुरती का राज क्या है " . तेव्हा निल्याने पण त्याच जोश मध्ये उत्तर दिले कि " बायको के हात का जेवण और पुणेरी टोमणे "लगेच सगळे पुन्हा हसायला लागले . यावरून कळले कि त्याची बायको पुण्याची आहे .    

           सगळ्यांसोबत मी देखील मधेच बोलायचे त्याच्याशी . तो हि लगेच उत्तर द्यायचा . कुठे राहतो विचारल्यावर लगेच घरी येण्याचे आमंत्रण सुद्धा दिले . त्याने घर घेतले होते नुकतेच थ्री बी एच के आणि ते हि पुण्यासारख्या शहरात .  त्याच्याशी किती बोलू आणि किती नाही असे झाले होते मला . आणि पर्सनल मेसेज करु का त्याला ? असा विचार कितीदा माझ्या मनात आला . पण नको , काय वाटेल त्याला ... म्हणून मी नाही केला . आणि चक्क पाच मिनिटानंतर त्याचाच मेसेज आला मला .

निलेश : हाय शुभा , कशी आहेस ग ..!

शुभांगी : हाय निल्या , मी मजेत आहे ...इतक्या वर्षांनी तुला बघून खुप बरं वाटल मला .

निलेश : मलाही , आपण सगळे पुन्हा एकत्र आलो ... खुप भारी वाटतय

शुभांगी : हो ना , स्वप्नात पण वाटले नव्हते कि कधी आपण पुन्हा असे अचानक भेटू . पण मी खुप खुश आहे तुझ्यासाठी . तु तुझे स्वप्न पूर्ण केलेस निल्या . ॲम प्राउड ऑफ यु

निलेश : थॅंक्यू शुभा , स्वप्न पूर्ण तर होणारच होते कारण मी आणि माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांनी खुप मेहेनत घेतली होती .

शुभांगी : हो ते तर आहेच , ए तुझी बायको पुण्याची का रे ?

निलेश : हो ... का ग ? काय झाले ?

शुभांगी : काही नाही रे , बोलता बोलता तुच सांगून गेला ना तुझा राज .. कि बायको के पुणेरी टोमणे म्हणून

निलेश : ते होय ... दोघेही हसतात

शुभांगी : पण काहीही म्हण हं , बायको मात्र देखणी भेटली तुला ...

निलेश : हो ना आणि मैत्रीण सुध्दा , तु हि काही कमी सुंदर नाहीये .

शुभांगी : हो का ... हे आत्ता दिसतय का तुला .

निलेश : सॉरी शुभा .

शुभांगी : का रे , आणि कशासाठी

निलेश : तुलाही माहितीये मी कशासाठी म्हणतोय ते . तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी असणारे प्रेम दिसत होते मला . पण तेव्हा मला खुप शिकायच होत ग , काहीतरी बनून दाखवायचे होते , स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते . खुप जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या आणि मगच लग्नाचा विचार करायचा होता .

शुभांगी : अरे हो हो ... माहितीये रे मला . सगळे कळत होते मला , तुझ्या मनाची होणारी घालमेल आणि तुझे अबोल प्रेम देखील समजत होते मला . पण तरीही मला ते तुझ्या तोंडून ऐकायचे होते . पण तु कधी व्यक्त झालाच नाहीस  .

निलेश : आणि मी तुला गमावून बसलो ... कायमस्वरूपी .

शुभांगी : जे होत ते चांगल्यासाठीच होत रे . आणि आज बघ तु किती छान काम करतोय आणि कित्ती गोड फॅमिली आहे तुझी .

निलेश : हो , तु पण खुश आहेस ना .

शुभांगी : म्हणजे काय ? हे काय विचारन झाल का ? ... मी खुप सुखात आहे .

निलेश : तुला कॉलेज संपल्यानंतर खुप भेटावेसे वाटत होते पण नंतर कधी वेळ भेटलाच नाही आणि बाहेर शिकायला होतो त्यामुळे पैसेही नसायचे पुरेसे .

शुभांगी : हो , तुम्ही ते घर सोडून गेल्याचे कळले होते मला नंतर आणि खुप वाईट हि वाटले होते कि शेवटचे एकदा तरी भेटायला हवे होते , निदान आपल्या मैत्रीसाठी तरी .

निलेश : कळतय ग मला , पण माझा नाईलाज होता . पण किती छान दिवस आपण सर्वांनी सोबत घालवले होते . त्या सगळ्या आठवणी अजूनही तशाच आहेत मनाच्या एका कोपऱ्यात . आजही ते सगळे दिवस डोळ्यासमोर येतात .

शुभांगी : हो , कॉलेजचे ते गोल्डन डेज .

निलेश : मग अजुन काय शुभा बाई

शुभांगी : ए बाई काय रे ..! मी अजूनही तशीच आहे

निलेश : हो , तु अजूनही तशीच आहेस ... फक्त जरा जाडी वाढलीये

शुभांगी : निल्याआआआआआआआ

निलेश : नाही नाही ... छान दिसतेस , तिच शुभांगी ... माझी शुभा , शुभडी ..... आता .... माझी मैत्रीण ... फक्त एक गोड  मैत्रीण .

शुभांगी : निलेश , इतक्या वर्षांनी आपण भेटलोय हे काय कमी आहे का ..

निलेश : हो , कमालच म्हणायची ह्या पोरांची . पण खुप छान झाले , तुम्ही सगळे भेटले आणि पुन्हा एकदा त्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला .

शुभांगी : हो ना , ते सगळे दिवस आपण सोबत जगलेले मजा मस्ती केलेले .. आणि आपला सोबतचा डान्स आठवतो का रे तुला ,  जणू काही ते सगळे कालच घडले असे वाटतेय . 

निलेश : हो तर ... आठवते ना ... किती घाबरत होती तु त्यावेळेस ... मी इतक छान शिकवून सुद्धा . आणि आपला पहिला नंबर आला तेव्हा कशी उड्या मारत होतीस आनंदाने . मला खुप हसू येत होते तेव्हा तुझे .

शुभांगी : हो रे ... घाबरले तर होतेच मी . पण पहिला नंबर फक्त तुझ्यामुळेच आलेला . तु किती सांभाळून घ्यायचास  मला .

निलेश : ह्म्मम्म . आठवतय कि रे तुला सगळेच ...

शुभांगी : हो मग , आठवतय म्हणजे ... मी अजून काहीच विसरले नाहीये ... सगळे आठवते मला ... तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण .

निलेश : ह्म्मम्म्म ... चला मॅडम आजच्या दिवस रजा द्या , आता ऑफिसची वेळ संपून घरी जायची वेळ आली .

शुभांगी : अरे हो हो सॉरी , तु निघ घरी ... म्हणजे सावकाश जा ... खुप लांब नाही ना घर तुझे ऑफिसपासून

निलेश : नाही ग ... ऑफिसच्या जवळच फ्लॅट घेतलाय , त्यामुळे काही वेळ लागत नाही जायला .

शुभांगी : अरे वा छानच कि .

निलेश : बर चला ... नाहीतर आमच्या मॅडमचा फोन येईल लगेच ... आणि तसेही आता बोलणे होतच राहिल आपले नेहेमी ... हो ना शुभा

शुभांगी : हो ... नक्कीच . आपण अजूनही तेच मित्र आहोत ... पक्के मित्र .

निलेश : हो ... चल बाय शुभा .

शुभांगी : बाय निल्या .

          आज त्याच्याशी बोलून खुप छान वाटत होते . जणू काही आम्ही पुन्हा पंधरा वर्ष मागे गेलो होतो . त्या वयामध्ये असे अनुभव प्रत्येकानेच अनुभवले असतील कि नाही ,  माहिती नाही  ... पण ,,,

        कॉलेजमध्ये प्रत्येकीचा कोणीतरी स्वप्नील राजकुमार असतोच ,आणि प्रत्येक मुलाची एक सुंदर राजकन्या . भले ते प्रेमापोटी असेल किंवा फक्त आकर्षण असेल . पण असतं मात्र नक्की .... आणि ते वय म्हणजे सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असण्याच . विशेष करुन मुलींच्या बाबतीत जरा जास्तच . कुणी या भावनेच्या सादेला प्रतिसाद देत , तर कुणी मनातून आलेली हि आर्त साद मनातल्या मनातच दाबून ठेवतं ... म्हणजे हे दोघांच्या हि बाबतीत होत असतं . त्याला वाटत असतं कि ती नाही म्हणेल , नकार पचवणं पुरुषी मनाला कठीण वाटत .... नेहेमीच ... किंवा त्यांच्यात असलेली मैत्री सुद्धा गमावून बसेल म्हणून बोलायला घाबरतात ... त्यामुळे तो काही बोलत नाही . आणि तिला वाटत असतं कि , एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे त्यानं  आपल्याला प्रपोज करावं .... मनातून होकार असतोच पण , लोकं काय म्हणतील म्हणून ती देखील त्याची वाट पाहत गप्प असते . बरेचदा काही  व्यावहारिक गणितं सुद्धा असतात बरका यामध्ये . म्हणजे यापेक्षा कोणीतरी चांगला किंवा चांगली मिळेल , हि एक आशा असते . अनेक जण याचे बळी ठरतात पण , हळूहळू वय वाढत जातं आणि ज्याला किंवा जिला आपण डावलून पुढे आलो तीच व्यक्ती कितीतरी उजवी वाटायला लागते .

लग्न होत , संसार पाठीमागे लागतो आणि मग सगळ्यांचीच सवय होऊन जाते .... अगदी आपल्या जोडीदारावर प्रेम करण्याची सुद्धा ...

          पण कॉलेजचे ते सोनेरी दिवस कायम मनामध्ये घर करुन राहतात . आपल पहिल प्रेम ... म्हणजे फस्ट क्रश सुद्धा तिथूनच सुरुवात होते . प्रेमाची परिभाषा समजते , नजरेतल प्रेम कळते , आकर्षण समजते . त्या कोवळ्या वयात बरच काही शिकायला मिळते . पण ते दिवस खुपच खास असतात . मैत्रीणी मित्रांसोबत मजा मस्ती , एकमेकांच्या खोड्या काढणे , चिडवणे , खुप धमाल करणे  . पण जीवाला जीव देणारे सगळे मित्र असतात . मी काही क्षणांसाठी पुन्हा त्याच दिवसांत हरवून गेले होते . आमची अबोल प्रीत ....कधीही पूर्ण न होणारी . पण आमच्यात मैत्री आजही तशीच आहे आणि कायम राहणार होती ...!!!