Love U Zindagi
भाग 8
पूर्वार्ध :
विवेकने इवा फॅशन हाऊसमध्ये बेस्ट मॉडेलचे टायटल जिंकले होते. त्याचा सहा महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट असतो ज्यात त्याला परदेशी जावे लागणार असते. घरी आई आणि बहिणीची सगळी सोय करून तो प्रभातीला भेटायला जातो.
आता पुढे:
पासपोर्ट , व्हिसा इवा फॅशन हाऊसच्या मदतीने लवकर मिळाला होता. एक दिवसाने त्याला सिंगापूरसाठी निघायचे होते. म्हणून तो एकदा प्रभातीला भेटायला म्हणून पुलाजवळ आला होता. येत होता तर त्याला प्रभाती पुलाच्या काठावर एका महिलेसोबत बोलतांना दिसली. तिचे बोलणे होयीपर्यंत तो तिथेच दूर उभा राहिला. ती महिला तिथून गेली , तसा तो प्रभाती जवळ गेला.
" काय ग , कोण होती ती बाई? आणि ती रडत का होती? " विवेक तिथे प्रभातीजवळ येत म्हणाला.
" आरे , ती इथे आत्महत्या करायला आली होती. खूप वेळेपासून इथे बसली होती. बरे झाले माझे लक्ष गेले आणि मी पळतच इथे आले. तिला खूप समजावले, तिला तिची चूक कळली. म्हणून ती रडत होती." प्रभाती.
" बापरे, बरे झाले तू वेळेवर पोहचली. खूप मोठा अनर्थ होता होता टळला." विवेक.
" हो रे , तू भेटूया म्हणाला होता, म्हणून जरा लवकरच आले होते, तर हे असे दिसले. समजावले तर आहे , माहिती नाही किती कळले ते तिला? देव तिला सतबुद्धी देऊ दे." प्रभाती.
"ह्मम तू समजावले ना, तिलासमजले असेल. don't worry!" विवेक.
" काय माहिती? चार दिवस आधी एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा इथून कुदायला इथे आला होता. बारावीच्या परीक्षेत नापास झाला म्हणत होता. घरचे खूप रागावले म्हणाला. सगळ्यांच्या अपेक्षा मातीमोल केल्या म्हणे. त्याला खूप समजावून सांगितले. समजलो म्हणाला आणि घरी परत गेला. पण मला तो समजल्यासारखा वाटत नव्हता म्हणून मी त्याचा पाठलाग केला. तो घरी पोहचला बघून मी घरी परत आले. पण दुसऱ्या दिवशी कळलं त्याने गळफास घेतला." प्रभाती , बोलता बोलता तिचा उर दाटून आला होता.
"नको ग वाईट वाटून घेऊ, तू तुझा प्रयत्न केला होता ग. ते वयच तसे आहे ग , सगळं समजण्याच्या पलीकडे आहे. घरच्यांच्या अपेक्षा, जगण्यासाठी लागलेली रेस, पेशंस उरलं नाहीत, वाट बघणं जमत नाही, सगळं लवकर हवे असते, हार पचवणे कठीण जाते..त्यात आताची जनरेशन एकलकोंडी बनत चालली.. मन मोकळं करायला मित्र नाहीत..आणि या सर्वांचा परिणाम असा की, ही लोकं लवकर डीप्रेस होतात. मी पण नाही काय डीप्रेस झालेलो, तू समजावले म्हणून वाचलो बघ." विवेक.
" ह्ममम ..... ही बाई तशीच, घरी कंटाळली होती. सासरचे खूप त्रास देतात म्हणे. माहेरून पैसे आण म्हणतात म्हणे, नाही ऐकले तर नवरा खूप मरतो म्हणाला. बाकीचे पण खूप छळतात म्हणली. दोन लहान मुलं आहे म्हणून सहन करत होती म्हणे, पण आता असह्य झाले तर इथे आली होती. तिला महिला पुनर्वसन केंद्राचा पत्ता सांगितला. तिथे जा म्हटले, मुलांसाठी आणि मुख्य म्हणजे स्वतः साठी जग सांगितले. आयुष्य एकदाच मिळतं, असं कोणाहीसाठी आपल्या आयुष्य मातीमोल कसे होऊ द्यायचे? जगायचं म्हटलं तर संघर्ष तर करावाच लागेल ना? त्या राक्षसांसाठी आपलं आयुष्य का मिटवायचे?" प्रभाती कळकळीने सांगत होती.
" Good , ती आता तिच्या जिवाचं काही वाईट नाही करणार. मुलं आहेत ना, एक आई मुलांना बघून कितीही त्रास सहन करू शकते. खचली होती, पण आता उभारेल." विवेक.
"असेच होऊ दे रे.. तिचा नवरा काय ही मेली तर सहा महिने होणार नाही की दुसरी बायको करून आणेल. खरंच तिची छोटी छोटी मुलं आहेत. आईची माया आईच लावू शकते..ती दुसरी बाई खरंच बनू शकते का आई?" प्रभाती.
"हो, तुझं एकदम खरंय. बरं ऐक , उद्या सिंगापूरसाठी निघतोय. सहा सात महिने लागतील म्हणाले, किंवा जास्ती पण वेळ लागू शकतो." विवेक.
"हो रे बिनधास्त जा आणि यशस्वी बनून ये!" प्रभाती.
" हो. परत आल्यावर मला तुला खूप महत्वाचे काही सांगायचे आहे. मी आलो की येशील आहे. विवेक.
" काय?" प्रभाती.
" माझं आपलं एक अस्तित्व निर्माण करेल , मग सांगेल आहे." विवेक.
"ओके विवी जी, तुमची जशी इच्छा.." प्रभाती हसत म्हणाली.
"हा हा हा.. बघ ना तिकडे सगळे मला विविच म्हणतात. फॅशनवर्ल्डमध्ये विवेक असे नावं ओल्ड फॅशन आहे म्हणे, आणि विवि काय तर खूप कूल वाटते म्हणाले." विवेक थोड्या नाराजीच्या सुरात म्हणाला.
"अरे खरंच , विवि नाव खूप कूल वाटते. आणि नाव बदलले म्हणून व्यक्ती बदलतो काय? स्वभाव बदलतो काय?" प्रभाती.
"नाही.." विवेक.
"मग.. मग बिनधास्त वापर की हे नवीन हॉट अँड सेक्सी नेम.." ती हसत त्याला चिडवत म्हणाली..
"काहीही ह तुझं.." तो थोडा लाजत, गालात हसत, खाली बघत म्हणाला.
"बापरे, कोणीतरी चक्क लाजत आहे.." प्रभाती.
"हा मग.. तू ते..ते…"
"सेक्सी?"
"हो.. असे काही म्हणेल तर लाजयालाच होईल ना?"
"अरे..तू आता फॅशन इंडस्ट्रीजमध्ये आहेस.. आता या शब्दांशी मैत्री करून घे.. पुढे तर तुला कोणी विवि सुद्धा म्हणणार नाही.."
"मग?" त्याचा चेहऱ्यावर परत टेन्शन पसरले.
"हे हॉटी.. हे सेक्सी.. हॅलो हँडसम.. असे काय काय नाव घेऊन आवाज देतील.." प्रभाती.
"बापरे.. "
"होगी होगी… धीरे धीरे सबकी आदत होगी.. पण तू आपली पायरी सोडू नकोस.. " प्रभाती.
"हो, नक्की लक्षात ठेवेल." विवेक.
"गुड लक मग.. रॉक द फ्लोअर.." ती त्याला हाताच्या अंगठ्याने गुड लक इशारा करत म्हणाली.
"थँक्यू! बरं, स्वतःची काळजी घे. एकटीने अशी इकडे तिकडे फिरत नको जाऊस..दिवस खूप खराब आहेत ग.." तो तिच्या काळजीने म्हणाला. बोलता बोलता त्याचा गळा दाटून आला होता, डोळ्यात अश्रूंचे दोन थेंब सुद्धा दिसत होते. प्रभातीपासुन दूर जायला त्याचे मन धजत नव्हते.
"अरे हे काय? असा हा धाडधिप्पाड पुरुष तू.. अन् असा रडतोय?" प्रभाती.
"काही नाही ग.. आपलं असच. पहिल्यांदा घर सोडून जातोय म्हणून.. बाकी काही नाही.." तो आपले डोळे पुसत म्हणाला.
"बरं, ही घे माझ्याकडून एक छोटीशी भेट. तुझ्या आवडत्या पुस्तकात ठेव.." ती त्याला एक मोरपीस देत म्हणाली.
"हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. मी खूप जपून ठेवेल.." तो ते मोरपीस हातात घेत म्हणाला.
"हो, आणि आता जसा आहेस ना.. निरागस, अगदी तसाच रहा.. अगदी या मोरपीस सारखा.." प्रभाती एक गोड स्मायल देत म्हणाली.
"हो नक्की. पण मी तुझ्यासाठी काहीच आणले नाही.."
"चालतंय रे.. माझं तसे पण वस्तूंवर प्रेम नाही. बस जमेल तशी दुसऱ्यांची मदत करत रहा.. म्हणजे माझं गिफ्ट मला मिळालं."
"तू पण अगदी अशीच रहा..गोड मनाची.."
त्यावर ती फक्त हसली.
"बरं निघ आता.. उशीर करू नकोस.."
"हो.. काळजी घे. लवकरच भेटू.."
"बाय.." म्हणून प्रभाती तिच्या घराच्या दिशेने निघाली.
विवेकचे मात्र तिला बघून मन भरत नव्हते. तो तिचे रूप डोळ्यात साठवून घेत होता. पाठमोरी तिला बघून, तिच्या जवळ जावे आणि तिला आपल्या मिठीत घ्यावे त्याची इच्छा होत होती. पण त्याने स्वतःच्या मनावर ताबा ठेवला. परत आल्यावर मात्र मग तो तिला आपल्यापासून दूर जाऊ देणार नव्हता.
*******
चार वर्षा नंतर....
" विवी ssssss ...... I love you yar " ..... माईक लाऊडस्पीकर मधून एका मुलीचा आवाज येत होता, जो चहूबाजूंनी घुमत होता.
एक दुमजली मोठं आश्रम , दोन भागात विभागलेले, एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी असे बिल्डिंग होती. पण कार्यक्रमाच्या वेळी मात्र सगळे एकत्र मैदानावर यायचे. आज तिथे कोणाच्यातरी वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू होती.
हे आश्रम एक कौन्सेलर आणि लघु उद्योग केंद्र होते, जिथे डीप्रेस , जीवनाला कंटाळलेले, स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या लोकांसाठी त्यांना नवजीवन सुरू करण्यासाठी वेगवेगळे काम केले जात होते, समुपदेशन दिल्या जात होते . इथे तरुण, म्हातारे सगळ्याच वयाचे स्त्री पुरुष होते. त्यांना इथे मोफत उपचार आणि जीवनावश्यक गोष्टींची सोय होती . त्यांच्यासाठी काही लघुउद्योग उपलब्ध करून देण्यात आले होते. दोन वर्षांपासून हे आश्रम निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करत होते. आज तिथे एका वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू होती.
आश्रमातल्या एका मोठ्या ऑफिस खोलीमध्ये एक तिशीच्या आसपासचा खूप सुंदर, हॉट अँड हँडसम असा तरुण एका खूप सुंदर मुलीच्या पाच फूट मोठ्या फोटोपुढे उभा होता.
" एकदाच शेवटचे भेटून जायचे होते ना.... माझ्या एवढ्या लहान चुकीची इतकी मोठी शिक्षा दिली तू मला .."
******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा