जिव्हाळा पत्रांशी

पत्र एक लोप पावत चाललेली संस्कृती


पस्तिशी पार वनिताने टपाल कार्यालयात खिडकीवर तीस पत्र मागितली. तसे त्या बाजूला बसलेले पन्नाशीत असलेले मोरे काका आश्चर्याने तिला बघू लागले. कितीतरी वर्षाने आज कोणीतरी त्यांना पत्र मागितली. त्यांनी वनिताला परत विचारलं,
"काय म्हणालात तुम्ही?"

"तीस पत्र हवीत." तिने परत सांगितलं.

डोळ्यावरचा चष्मा नीट करून त्यांनी तिच्याकडे बघितलं. तिला अपेक्षितच होतं. ती फक्त गोड हसली. काकांनी तीस पत्र मोजून तिला दिली. आजूबाजूला काही तरुण, वयस्कर मंडळी होती त्यांनीही तिच्याकडे

\"वेडी का खुळी? मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेलच्या काळात ही पत्र लिहितेय?\"

या अविर्भावात बघितलं. पण ती मात्र जग जिंकल्यासारखं हास्य चेहऱ्यावर घेऊन घरी परतली.

काही दिवसांपूर्वी वनिताने बातम्यांमधे ऐकलं होतं,
"संदेश वहनाची नवनवीन, प्रगत माध्यमं व तंत्र आल्याने पत्रांची खपत अगदीच कमी झाली आहे. तेव्हा लवकरच टपाल कार्यालयात पत्र विक्री बंद होणार आहे."

ज्या पत्रांनी एकेकाळी आपल्याला आपल्या दूरदेशी नौकरी करणाऱ्या बाबाचं प्रेम दिलं होतं, आईला आधार दिला होता, नातेवाईकांशी जुळवून ठेवलं होतं, आपल्या कितीतरी गरजा ज्या पत्रांद्वारे पूर्ण झाल्या, जे एकेकाळी संदेश वहनाचे एकमेव साधन होते, ज्यांची आपण आतुरतेने वाट बघायचो ती पत्र आता लोप पावणार हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं होतं. ही पत्र विक्री बंद व्हायच्या आधी तिला तिच्या आई बाबाला व प्रियजनांना ती लहानपणी लिहायची तशी पत्र लिहायची होती. तो आनंद परत जगायचा होता.

आपण खूप प्रगती केली पण काही गोष्टींचा आनंद हा सावकाशपणातच आहे असं वाटतं.

येणाऱ्या जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार