प्रेमा तुझा रंग कसा भाग 2

Lifes Different Shades Of Love

प्रेमा तुझा रंग कसा भाग 2



      प्यार वो जंग नही जिसमे जीत और हार हो

      प्यार कोई चीज नही जो हर वक्त तैयार हो

      प्यार तो वो यकीन है जिस्मे किसी के 

     आने की उम्मीद ना हो फिर भी इंतजार हो


  वाचक हो आपण पहिल्या भागात पाहिलं की वसुंधरा आणि आकाश यांचे प्रेम आयुष्यातील कर्तव्य आणि जबाबदारी नावाच्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबलं आहे. आता या भागात बघूया की वसुंधरा आणि आकाश आपल्या नात्याला कुठलं नाव देतात मैत्रीचं - आयुष्यभराच्या सहवासाचं - लग्नाचं.


***********************************************


         आधी आयुष्याचा क्षण क्षण व्यक्ती वसु च्या सहवासात घालवत होती ती व्यक्ती- आकाश - आता क्षितीजाच्या पार गेली होती. आकाश च्या दुर्लक्ष करण्याने वसु खूप चिडली , रडली नाही म्हणायला एखादवेळी ती आकाशशी भांडली सुद्धा. पण आकाश आता पूर्वीसारखा तिची मनधरणी करत नव्हता, तिचा रुसवा काढत नव्हता, शंभर वेळा सॉरीचे मेसेजेस वसुला पाठवत नव्हता, वसूची कळी खुलावी म्हणून कधी चॉकलेट, कधी फुलं तर कधी फुगे देऊन वसुच्या एका गोड स्मितासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या आकाशला या सगळ्या गोष्टींचा जणू विसरच पडला होता. आकाश आता वसुला टाळू लागला होता. आकाशच्या आयुष्यात उरलं होतं फक्त त्याचं त्याच्या कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य आणि त्याचं नवं काम. आकाशला नवनवीन करिअरच्या संधी खुणावत होत्या आणि त्याला त्याच्या क्षेत्रातलं सगळ्यात वरचं स्थान मिळवायचं होतं आणि त्यासाठी आकाश जीवाचं रान करत होता.


          तिकडे वसूच्या घरी मात्र तिच्या वडिलांनी वसूकरिता वरसंशोधन सुरू केलं होतं. वसूच्या इतर सर्व मैत्रिणींचे ही विवाह झाले होते. आकाश मात्र वसुच्या भावविश्वातून खूप दूर निघून गेला होता. पण तरी अजूनही वसू विवाहाकरिता आणि नवीन नाात्याकरीता मानसिकरीत्या तयार नव्हती. त्यामुळेच वसूची आई वसुला आयुष्याच्या नवीन सुरुवातीसाठी वारंवार समजावून सांगत होती. तर आपली बडबडी, अल्लड अवखळ मुलगी अचानक गंभीर का झाली हे वस्तूच्या वडिलांना मात्र अजिबात लक्षात येत नव्हतं.


आई - "वसू अजुन किती दिवस अशी तोंड पाडून बसणार आहेस?"


वसू - "मग मी काय करू आई ? माझं कशातच लक्ष लागत नाही. सारखी आकाशची आठवण येते. जळी, स्थळी, काष्ठी,पाषाणी मला आकाशचीच सोबत हवी असते. आणि त्याला माझ्याकरिता अजिबात वेळ नाही . तो माझा फोन सुद्धा उचलत नाही."


आई - "वसू असं करून कसं चालेल बाळा ? आकाश त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे. तुलाही तुझ्या आयुष्याचा विचार करावाच लागणार आहे . नाही काही तर निदान तुझ्या बाबांचा तरी. आज काल तू अशी उदास आणि शांत शांत असते तुझे बाबा मला सतत विचारत असतात वसूला काय झालय ? तिचं काय बिनसलंय? मी काय सांगू तुझ्या बाबांना?"


वसू - "आकाशच्या आठवणीतून बाहेर यायला मला आणखी थोडा वेळ हवाय आई."


आई - "बरं ठीक आहे. आज आमची भिशी पार्टी आहे. तुला आठवतं का ते बाबांचे आत्येभाऊ मिस्टर सबनीस त्यांच्याचकडे भिशी आहे आज. चल तयार हो माझ्याबरोबर येशील तर तुझा मूडही फ्रेश होईल."


वसू - "तुमच्या बायकांमध्ये येऊन मी काय करू आई?"


आई - "वसु तुझं परत सुरू झालं का? अगं तुला स्वतःला कशात तरी गुंतवावेच लागेल, आकाशच्या आठवणीतून बाहेर यायला स्वतःला बीजी करून घे वसू. आणि तू आता माझ्यासोबत चालणार आहेस. मी तुझं काहीही एक ऐकणार नाही."


            आईच्या आग्रहापुढे आणि तिच्या समजावण्याचा परिणाम म्हणून की काय वसू तिच्या आईसोबत भिशी पार्टीला गेली. बरेच वर्षात ती सबनिसांकडे गेली नव्हती. मधल्या काळात रवीने त्यांच्या टुमदार बंगल्यात अनेक बदलही केले होते. त्याच्या कल्पकतेने त्या छोट्या टुमदार बंगल्याचा कायापालटच झाला होता. त्या बंगल्यासमोर सुंदर लाॅन होते. लाॅनच्यामध्ये छान इवलसं कारंजं होतं. कारंज्याचं थुई थुई नाचणारं सप्तरंगी पाणी , पुढे मोगरा, जाई , जुई, सायली, चमेली आणि इतर फुलझाडांच्या बुंध्यापर्यंत अनेक वळणं , वळसे घेत जात होतं. बाजूलाच सायलीच्या वेलींचा एक सुंदर मांडव बनवला होता. त्या मांडवाखाली मध्ये टेबल आणि समोरासमोर दोन आलिशान सोफे ठेवले होते. मांडवाच्या संगमरवरी चार खांबांवर सुंदर नक्षी तर होतीच, पण त्यावर ती जुन्या काळातले लॅम्प पोस्टही लावलेले होते. तर मांडवाखाली जाणाऱ्याला आपण एखाद्या कुंज वनातच आल्याचा भास होत असे.


           वसू कितीतरी वेळ ते कारंजं आणि त्यातून उडणारं , थुईथुई नाचणारं पाणी भान हरखून बघत होती. तेवढ्यात रवी तिथे आला आणि दोघांच्या गप्पा रंगल्या. कितीतरी वेळ दोघजण कॉलेजमधल्या आठवणी आणि इतर गोष्टींवर बोलत होते. तेवढ्यात वसुची आई घाबरी घाबरी होत लाॅनमध्ये आली . तिच्यासोबत रवीची आई पण होती. तिला फोन आला होता की , वसुच्या वडिलांना घरी हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला होता.


आई - "वसू अग लवकर चल घरी तुझ्या बाबांना जोरदार हार्ट अटॅक आला आहे."


वसू - "बापरे ! आता काय करायचं आई?"


आई - "मला तर काहीच सुचत नाहीये."


रवी - "वसुंधरा, काकू तुम्ही दोघी अशा घाबऱ्या होऊ नका! चला मी तुम्हाला घरी सोडतो."


रवीची आई - "रवी तु काकूंना आणि वसुला घरी पोहोचव आणि आणखीन काही मदत लागली तर तिथेच थांब."


             रवी वसुला आणि तिच्या आईला घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. तिथे पोहोचेपर्यंत रवीने स्वतःच्या फॅमिली डॉक्टरला सांगून वसुच्या घरी अंबुलन्स बोलावून घेतली होती. रवी , वसू आणी वसूची आई घरी पोहोचेपर्यंत दारात अंबुलन्स आली होती . रवीने वसूच्या घरच्या नोकराच्या मदतीने वसूच्या बाबांना ॲम्बुलन्स मध्ये ठेवले आणि त्यांच्यासोबतच हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रवीच्या डॉक्टरांच्या ओळखीने वसूच्या वडिलांवर तात्काळ उपचार सुरू केले. रवीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने वसूच्या वडिलांना योग्य वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि त्यांचे प्राण वाचले.

            

         ह्या सगळ्या धावपळीमध्ये दोन महिने निघून गेले.

ह्या दोन महिन्यात रवीने, वसू आणि वसुच्या आईला सर्वतोपरी मदत केली. वसूचे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना त्याने वसूची खूप काळजी घेतली. तिला मानसिक - भावनिक आधार दिला. तिच्या घरी काय हवं - नको याकडे जातीने लक्ष घातलं. रवीच्या या समंजस , समजूतदार आणि काळजी घेणाऱ्या स्वभावामुळे वसुच्या मनात रवी विषयी हळूहळू आपुलकी निर्माण झाली . वसूच्या आईने परत एकदा रवीचा विषय वसू जवळ काढला. 


आई - "वसू आता तुझ्या बाबांची तब्येत आधीपेक्षा फारच सुधारली आहे. तुझ्या बाबांना आता लवकरात लवकर तुझं लग्न बघायचं आहे बाळा."


वसू - "पण एवढी घाई काय आहे आई? आत्ता कुठे त्यांना जरा बरं वाटत आहे. आणि एखाद्या अनोळखी व्यक्ती सोबत आयुष्य सुरू करण्यासाठी माझ्या मनाची अजूनही तयारी झालेली नाही."


आई - " वसू रवी अजूनही तुझ्यासाठी अनोळखीच आहे का तुझ्या बाबांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनं किती धडपड केली ते तू पाहिलंस ना? आणि एकमेकांना पुरेसा वेळ देऊनही एकमेकांची मतं जुळतीलच असं होत नाही ना वसू."


            वसुला तिच्या आईच्या बोलण्याचा रोख कळला होता. रवीच्या प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या स्वभावामुळे मनाच्या एका कोपऱ्यात आता वसूला रवी आवडू लागला होता. पण तरीही तिच्या मनाचा निर्णय होत नव्हता.


        असंच एकदा वसू तिच्या खोलीमध्ये विचारमग्न बसली होती . तेवढ्यात तिचे बाबा तिथे आले आणि त्यांनी वसुला रवीशी लग्न करण्याची गळ घातली. वसूचं आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम होतं, मधल्या काळातल्या त्यांच्या तब्येतीच्या तक्रारीने तिला त्यांच्याबद्दल आता जरा जास्तच काळजी वाटत होती. म्हणुनच वडिलांनी रवीशी विवाह करण्याचा प्रस्ताव वसूसमोर ठेवताच तिने नाईलाजाने का होईना पण तो प्रस्ताव मान्य केला.


          त्यानंतर महिन्याभरातच एका सुमुहूर्तावर रवी आणि वसुच साक्षगंध झालं. आणि दीड महिन्यानंतर लग्न.


            मधल्या काळात वसुने तिच्या आणि आकाशच्या नात्याविषयी अनेकदा रवीला सांगण्याचा प्रयत्न केला , पण त्याच्या समजूतदार आणि समंजस वागण्याने आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने तिची हिम्मत झाली नाही.


            लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री रवीने वसूला येवढच म्हंटलं की , 

           

 रवी - "वसू आज आपण दोघे आपला भूतकाळ विसरून एका नव्या आयुष्याला सुरुवात करूया.        


               वसु , प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्या-वाईट घटना घडत असतात . भला बुरा काळही येतो आणि जातो. कॉलेजच्या सोनेरी दिवसात प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी असतंच , पण तेच नातं खरं म्हणावं , जे नातं तुम्हाला समाजात मान, प्रतिष्ठा आणि तुमच्या कुटुंबीयांना आनंद आणि सुख देऊ शकेल. मागचं झालं गेलं विसरून जा. मी तुझ्यावर तेव्हाही प्रेम करत होतो आणि आजही माझा तुझ्यावर विश्वास आहे. आपल्या आयुष्याची ही पहिली रात्र आपण एकमेकांवरच्या विश्वासानं आदराने सुरू करूया . मागचा भूतकाळ विसरण्यासाठी तू तुला हवा तेवढा वेळ घे . तुझ्यावर माझी जबरदस्ती नाही आणि तुझा नवरा म्हणून , मी तुझ्यावर कधी हक्क गाजवणारा नाही आणि बळजबरीही करणार नाही."



           रवीच्या इतक्या समजूतदार भूमिकेमुळे वसू आणि रवीचा संसार सुरू व्हायला वेळ लागला नाही.


*********************************************

        या नंतरच्या भागात आपण पाहणार आहोत की आकाश वसूच्या आयुष्यात परत येतो का ? आणि तो जर परत आला तर वसू कुठला निर्णय घेते? रवीला सोडून ती परत आकाशकडे जाते का?

🎭 Series Post

View all