Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक वादविवाद

प्रेम विवाह -2 (वादविवाद स्पर्धा )

Read Later
प्रेम विवाह -2 (वादविवाद स्पर्धा )

प्रेम विवाह-२ (वादविवाद स्पर्धा)एक लफ्जे मोहब्बत का अदनासा फसाना है,

सिमटे तो दिले आशिक, फैले तो जमाना है,

ये इश्क नहीं आसाँ, बस इतना समझ लीजिये,

एक आग का दारियाँ है, और डुब के जाना हैlआयुष्यात कधीही प्रेम केलं नाही असा माणूस मिळणं विरळाच. खरं तर आपण सर्वजण कधी ना कधी, कुठे ना कुठे कोणावर तरी भाळलो असतो. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर त्या व्यक्तीसह कल्पनेत विराजमान झालेलो असतो. आयुष्याच्या वाटेवरती त्या व्यक्तीची सोबत आपल्याला निरंतर हवी असते. आपण आपल्या प्रत्येक विश्वासावर, हृदयाच्या ठोक्यावर त्या व्यक्तीचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं असतं

     

\"ऐसी कोई जवानी नहीं...जिसकी कोई कहानी नहीं...\" खरं ना?


लग्न किंवा विवाह म्हणजे जोडीदाराशी आयुष्यभराचं समर्पण! खरंतर आजच्या आधुनिक जगात, इंटरनेटच्या युगात प्रेम विवाह की अरेंज मॅरेज हा प्रश्न फार आउटडेटेड वाटतो.व. पु. काळे म्हणतात,\"आपल्या आवडीची व्यक्ती आयुष्याचा जोडीदार मिळायला नशीब लागतं, ज्यांना असा जोडीदार मिळाला तेच खरे नशीबवान\".


खरंतर विवाह संस्थेचा मुळ उद्देश शारीरिक गरज पूर्ण करून, वंशवृद्धी करणे हा आहे. त्यामुळे जर होणारा जोडीदार आपल्या आवडीचा, ओळखीचा असेल तर किती छान! समविचारी, आवडीनिवडी समान असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यास काय हरकत घ्यावी?

खरंतर आपल्या भारतीय परंपरेत अरेंज मॅरेज आणि लव मॅरेज असं काही नव्हतंच! पूर्वीच्या काळी राजकन्यांना आणि सरदारांच्या मुलींना स्वतःचा वर स्वतः निवडायची मुभा होती. कधी ते स्वयंवर असायचं तर कधी गंधर्व विवाह. सीता स्वयंवर, द्रोपदी स्वयंवर, नलदमयंती स्वयंवर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. त्यामुळे लव मॅरेज ही संकल्पना पाश्चात्त्य देशातून आली आहे हे चुकीचं असून ती भारतीयच आहे. पण त्यानंतर परकीयांच्या आक्रमणामुळे स्त्रियांच्या एकूणच सामाजिक वावराला मर्यादा आल्या आणि हे अरेंज मॅरेजचं खुळ सगळीकडे पसरलं. इतिहासातलं एक अगदी ओळखीचं उदाहरण आपण बघू शकतो, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधरराव यांचा विवाह हा पण ठरवून केलेला विवाहच होता. गंगाधरराव वयाने मणिकर्णिकापेक्षा मोठे होतेच आणि दम्याच्या व्याधीने ग्रस्तही होते, त्यांचा लवकरच मृत्यू झाला आणि लक्ष्मीबाईंनी एकहाती सर्व कारभार सांभाळला.\"महादेव आणि पार्वती यांचा विवाह\", सृष्टीतील पहिला प्रेमविवाह म्हटला जाऊ शकतो. स्वतः रुक्मिणीने कृष्णाला \"माझं हरण करा आणि माझं पाणिग्रहण करा, कारण मी मनोमन तुम्हाला वरलं आहे\" असा संदेश पत्राद्वारे पाठविला होता, असाही पुराणात उल्लेख येतो.\" श्रीकृष्ण नवरा मी नवरी,

 शिशुपाल नवरा मी न वरी\". शब्द श्लेष अलंकार याचं हे एक नितांत सुंदर उदाहरण आहे. यामध्ये रुक्मिणीने आपली मनोव्यथा आपल्या सखीला सांगितली आहे. रुक्मिणीचे म्हणणे आहे की, \"कृष्ण नवरा होत असेल तर मी त्याला वरायला तयार आहे, पण शिशुपाल जर माझं पाणिग्रहण करणार असेल तर, मी शिशुपालाला कदापि वरणार नाही.\"
 कृष्णाची बहीण सुभद्रा हीचं पाणिग्रहण दुर्योधनाने करावं असा बलरामाचा मानस होता, पण सुभद्रेने मनोमन अर्जुनाला आपला जीवनसाथी निवडलं होतं,म्हणूनच मग कृष्णाने सुभद्रेला सांगितलं की,\"तूच अर्जुनाचं हरण कर...\"प्रेम विवाहामध्ये जरी दोघेजण एकमेकांना आधीपासून ओळखत असले तरी पाहिल्याबरोबर काही कोणी कोणाच्या प्रेमात पडत नाही. आज काल तर अजिबातच नाही. आजची पिढी ही खूप हुशार आहे. मैत्रीच्या नात्याला विवाहाच्या बंधनात बांधताना, ते सर्व बाजूने सारासार विचार करतात, जसं की समोरच्याचं राहणीमान, विचार करण्याची पद्धत, सामाजिक-धार्मिक मान्यता आणि विचार.
लग्न म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट, त्यामुळे होणारा जोडीदार ती पूर्ण करू शकेल की नाही याचाही विचार ही आजची पिढी सर्व बाजूने करत असते.   
आजकाल कांदेपोहेच्या कार्यक्रमाला वेळ कुणाकडे आहे? सगळ्यांचे आयुष्य घड्याळ्याच्या काट्याला जुंपले आहे. तरीही कांदेपोह्यांचा कार्यक्रमात अगदी चावून चोथा झालेले प्रश्न विचारले जातात, \"मुली तुझं नाव काय? शिक्षण किती? तुला छंद कुठले?\" मुलगी पण सर्वांसमक्ष सांगते वाचनाचा छंद आहे, तर मुलाचे ठरलेले उत्तर असते \"मला प्रवासाची आवड आहे\". प्रत्यक्षात लग्न झाल्यावर मुलगी घरात येणारं साधं वर्तमानपत्रही वाचत नाही आणि नोकरीवरून परतल्यावर नवरा जो सोफ्यावर आडवा होतो तो चार वेळा जेवायला उठवलं तरी उठत नाही.  
ठरवलेल्या लग्नामध्ये बरेचदा असं होते कि, अगदी नात्यातल्या मुलाच्या किंवा मुलीच्या काही बाबी घरचे किंवा मध्यस्थ हेतुपुरस्सर लपवून ठेवतात. उदाहरणार्थ एखादा गंभीर आजार किंवा शारीरिक मानसिक व्यंग, भूतकाळातील काही वाईट घटना किंवा व्यसनं, त्यामुळे नात्यातल्या मुलामुलींचा सगळा इतिहास माहिती आहे, असं कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही, अशा काही भावी आयुष्यासाठी महत्वाच्या बाबी लपवून ठेवून केलेला विवाह सुफळ कसा होणार?
प्रेमविवाह जरी मुला-मुलींनी ठरवून केलेला असला तरी,आजकाल पालक आडमुठी भूमिका घेत नाहीत आणि घरातील मोठ्यांचा आदर, धाक, मान या साऱ्या गोष्टी संस्कारांच्या आहेत. सुसंस्कारित कोणीही व्यक्ती विनाकारण कोणाचाही अपमान किंवा पाणउतारा करीत नाहीत. मोठ्यांचा तर नाहीच नाही! आणि तसं जर असतं तर ठरवून केलेल्या विवाहा मध्ये सासु-सुनेची,नवरा बायकोची भांडण विकोपाला जाऊन शारीरिक हिंसाचार आणि न्यायालयातील कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं वाढलीच नसती.
मुळात एखादं नातं टिकवायचं की नाही हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्न असतो. एखादी सुंदर मुलगी अत्यंत गरीब परंतु होतकरू मुलाशी लग्न करून आनंदाने संसार करते, पण काही ठरवून केलेल्या लग्नांमध्ये सुनेला टोमणे मारले जातात, तिच्याकडून हुंड्यासाठी मागणी केली जाते, गाडी, फ्रीज, टीव्ही, घर, जमीन-जुमला यासारख्या भौतिक वस्तूंसाठी तिच्या मागे तगादा लावला जातो. तिचं मानसिक खच्चीकरण केलं जातं, तिच्यासमोर तिच्या घरच्या लोकांचा पाणउतारा केला जातो. प्रसंगी तिच्यावर शारीरिक अत्याचारही केल्या जातो.कदाचित म्हणूनच सरकारला हुंडा विरोधी कायदा करावा लागला असेल.
जेव्हा एखादी लग्न उत्सुक उपवर मुलगी विवाहासाठी तयार होते, मग तो विवाह प्रेमविवाह असो अगर ठरवून केलेला, तेव्हा तिच्या मनाची पूर्ण तयारी झालेली असते की, माहेरचं माहेरी ठेवायचं आणि सासरच्या परंपरा आणि प्रथा जपायच्या. प्रेम विवाहामध्ये या गोष्टी थोड्या सहज वाटतात कारण आपला जीवनसाथी आपल्याला ओळखून असतो, नवीन ठिकाणी त्याची साथ खूप आश्वासक ठरते.भांडणे तर सगळ्याच नात्यात होतात भाऊ-बहीण, वडील-मुलगा आई -मुलगी.पण मुळात भांडणं होण्यामागचं कारणच हे आहे की, समोरच्याचे विचार आपल्याला न पटणे आणि तरीही ती मतं आणि विचार आपल्यावर लादली जाणे. मान्य आहे की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात परंतु मतभेदाच्या जागी मनभेद झाले तर सगळंच कठीण होईल. गौतम ऋषि आणि अहिल्याचा विवाह ठरवून झालेला होता पण इंद्राने अगोचरपणा केला आणि गौतम ऋषींनी संशयाने अहिल्येला शिळा होण्याचा शाप दिला. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की, प्रेमविवाहापेक्षा ठरवून केलेल्या लग्नातच संशयी वृत्ती अधिक असते.


 खरंच व. पु.काळे यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या आवडीची व्यक्ती जर आपल्या आयुष्यात असेल तर हे इतकं सुंदर मानवी जीवन आणखीन खूप सुंदर होईल, जगण्याची आणखीन मजा येईल आणि आपण समाजासाठी काहीतरी भरभरून करू शकू.
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्ती,दोन कुटुंब किंवा दोन संस्कृतींचे एकत्र येणे नव्हे. तर दोन सक्षम स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन, समस्त मानव जातीसाठी आणि सृष्टीतील चराचरांसाठी एकत्र येऊन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं. तेच जर ठरवून केलेल्या विवाहात दोघांची तोंड दोन दिशेला असतील तर सगळा वेळ रुसवे-फुगवे काढण्यात आणि मनधरणी करण्यात निघून जाईल. मग परिवारासाठी आणि समाजासाठी आपण काही देणं लागतो ह्या गोष्टींचा विचार तरी मनात येईल का?
प्रेमविवाह करणाऱ्यांना एकमेकांचे विचार, स्वभाव, आवडी-निवडी माहिती असतात. जोडीदाराची भावनिक, मानसिक आंदोलन, जीवनसाथीची एखाद्या परंपरेविषयी आस्था आणि दृष्टिकोन दुसऱ्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादविवाद कमी होतात आणि झाले तरी विकोपास जात नाहीत.
ठरवून केलेल्या विवाहात घटस्फोटचं प्रमाणही कमी नाहीये. बरेचदा घराच्या ज्येष्ठ लोकांनी ठरवून विवाह करवून दिलेला असतो म्हणून केवळ घराच्या लोकांचा विचार करून कितीतरी जोडपी अगदी जबरदस्तीने नाती निभावताना दिसतात.


खरंच अशा जबरदस्तीने गळ्यात पडलेल्या नात्यात किती विश्वास आणि प्रेम रहात असेल हा प्रश्न राहतोच.राखी भावसार भांडेकर

टीम-नागपूर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//