बायकोने नव-याला लिहिलेलं प्रेमपत्र

Love should be unconditional

बायकोने नव-याला लिहिलेलं प्रेमपत्र

प्रिय नवरोबा,

आज आपल्या लग्नाला पंचवीस वर्षे होतील आणि इतक्या वर्षांनी मी असं तुम्हाला पत्र लिहीत आहे ,त्याला कारण तसचं आहे ,तुम्ही हे वाचा ,शांतपणे विचार करा आणि मलाही पत्राद्वारे उत्तर दिलं तरी चालेल. समोरा समोर बसल्यावर एकमेकांना चुकिच काही बोलण्यापेक्षा पत्र लिहिणं मला जास्त योग्य वाटलं. लग्नाला इतकी वर्षे होऊन सुध्दा , तुम्हाला अजून मी कशी आहे ,हे समजलं नाही,हा विचार करून माझ्या मनाला असंख्य वेदना झाल्या. आपण ज्या व्यक्ती सोबत इतक्या वर्षापासून राहतो ,त्याच्या बरोबरीने आपण सगळ्या सुख दु:खाला सामोरे गेलो आणि आज ती व्यक्ती तुम्हाला म्हणते ,की मला तुझे वागणे पटत नाही ,तुला ही घाणेरडी सवय लागली आहे. तुम्ही मला इतक्या वर्षापासून ओळखता ,त्यामध्ये मी तुमच्या कडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही . आता तुम्ही म्हणाल ,मी तुला सगळं मागण्याआधीच देत होतो ,पण अशा ब-याच गोष्टी आहेत की ,ज्या मला तुमच्या पटत नाही.आपण दोघेही नोकरी करतो ,मी माझ्या स्वत:च्या पायावर उभी आहे,हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे . मला मान्य आहे ,मी तुमच्या पेक्षा खूप कमी कमावते,माझ्या पगारात घरातलं भागणार नाही, पण मला यातून समाधान मिळते. पहिल्या पासून सांगायच झालं तर,आपलं लग्न ठरलं,तेव्हा तुम्हाला माझ्या कडून काही अपेक्षा असतील ,त्या मी पूर्ण न करु शकल्याने ,तुम्हाला माझा राग येणं साहजिक आहे,नवीन लग्न झालेलं,तुम्ही आधी बोलले ,लोणावळ्याला थांबू ,नंतर नाही थांबले ,मी म्हटलं ,ठिक आहे . पण त्यावेळी हे मात्र कळून चुकलं की ,लग्न पिक्चर मध्ये असतं,तसं रोमँटीक नसतं,ख-या आयुष्यात वेगळच असतं. नवीन लग्न झालेलं , तुम्हाला जर एखादी माझी गोष्ट पटली नाही ,तर तुम्ही तीन तीन दिवस माझ्याशी बोलत नसत,मी तुमच्या घरात नवीन ,त्यात तुमचा तो अबोला ,मन तरी कुणाजवळ मोकळं करणार,त्यात हे कळालं की,तुम्हाला जी मुलगी आवडायची तिचं आणि माझं नाव सारखं म्हणून तुम्ही मला निवडलं,मग राहून राहून असं वाटायच,तुमचं लग्न मनाविरुद्ध तर झालं नाही ना. तुम्ही लग्नाआधी टू व्हिलर घेतलेली ,घराचं भाडं जायच ,लग्नासाठी कर्ज घेतले होते,त्यामुळे घरात खर्चायला पैसे खूप कमी असायचे ,म्हणून स्वत:च्या घरात राहायला गेलो ,तुम्ही काही न बोलता ,मी स्वत:चे दागिने बँकेत ठेवले ,नंतर तुम्ही मला त्याच्या कितीतरी जास्तपट घेऊन दिले ,त्याबद्दल धन्यवाद.

लग्ना नंतर मी माहेरी चालले ,तर कधी बस स्टॉप वर सुध्दा सोडवायला आला नाहीत ,मला खूप वाईट वाटायचे ,पण नंतर ही गोष्ट बोलल्यावर,तुम्ही म्हणालात ,म्हणून मी independent झाले ,नाहीतर दुबळी राहिले असते . मला आईवडीलांनी सांगितलं आहे की,आपण तेव्हाच आनंदी राहू शकतो ,जेव्हा आपण समोरील माणसातील चांगले गुण पाहावेत ,आता पर्यंत मी तेच करत आले ,म्हणून तुमच्या बरोबर आनंदात दिवस घालवत आहे .

तुम्हाला आठवतं तुम्ही दिल्लीला होतात ,तेव्हा मीच स्वत:हून तुम्हाला फोन करायची ,पण आपण दोन तीन मिनिटाच्या वर कधी बोललो नाही,मी तुम्हाला कधी कधी हे विचारुन इरिटेट केलं आहे की ,नक्की तुम्हाला मी आवडते ना ,पण तुम्ही त्याच्यावर ही कधी मला उत्तर दिले नाही.

आपण मुलांसाठी खूप ट्रिटमेंट घेतली ,हे तर तुम्हाला माहितच आहे,खूप मोठ्या आशेने आपण ट्रिटमेंट घ्यायचो,ती सक्सेसफुल नाही झाली ,तर तुम्ही तुटून जायचे ,माझ्याकडे पाठ फिरवून झोपायचे,दोन दोन दिवस माझ्याशी बोलायचे नाही,मलाही खूप वाईट वाटायचं,मला मानसिक आधाराची खूप गरज असायची,पण ती तुमच्या कडून कधीच मिळाली नाही. तुम्हाला जसं आवडतं,तसं वागण्याचा प्रयत्न करायची ,तरी तुम्हाला माझं वागणं ,कुठंतरी खटकायचं आणि मग परत वाद आणि त्यातून परत अबोला हे सगळं आलंच. 

मी इतक्या प्रेमाने वाढदिवसाला टिशर्ट घ्यायची ,पण ते सुध्दा तुम्ही कधी प्रेमाने घातले नाही ,का तर ते तुमच्या स्टँडर्डचे नव्हते ,इतकच काय क्लासचे पैसे वाचवून चैन इतक्या प्रेमाने  केली,ती पण आईच्या बांगड्या मध्ये घातली ,मी बोलायला गेले तर मला गप्प केलं आणि मला बोलले ,मी आईला बांगड्या घेतोय,हे तुला आवडत नाही ,पण त्या  चैन मध्ये माझ्या भावना होत्या,ते तुम्हाला कधी जाणवलंच नाही,एक शर्ट घेतला ,तोही एकदा सुध्दा अंगावर घातला नाही ,माझ्या भावनांची कधीच कदर केली नाही ,म्हणून मी गिफ्ट देणेच बंद केले.गिफ्ट किती किमतीच आहे , यापेक्षा त्याच्या मागच्या भावना कश्या आहेत ,हे तुम्ही कधी बघितलच नाही.

एकदा रागाच्या भरात तुम्ही म्हणालात,काय तर माझा तुमच्या प्रॉपर्टी वर डोळा आहे. असचं असतं तर आता पर्यंत माझा सगळा पगार माझ्याच खात्यात टाकला असता ,तुम्हालाही माहित आहे ,माझ्या खात्यात किती बैलेंस असतो ते.

तेव्हाही तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढत होतात आणि आताही तेच करताय . सगळ्या भौतिक गरजा पुरवणे,महागड्या गोष्टी गिफ्ट करणे म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम करतात असा होतं नाही. काही काही लोकांना नसते प्रेम व्यक्त करायची सवय असं समजून मी कधीच तुमच्या कडून,तुम्ही मला I love you म्हणावं अशी अपेक्षा केली नाही आणि इथून पुढेही नसेल.

मी माहेरी एकदम स्वतंत्र विचार असणारी मुलगी ,तुमच्याशी लग्न झाल्या नंतर स्वत:त खूप बदल करायचे प्रयत्न केले ,पण तरी तुम्ही कधी समाधानी दिसलाच नाहीत.

माझ्या आयुष्यात तुमच्याशी लग्न झाल्यावर ,मी तुमच्या सहित तुमच्या सगळ्या माणसांना आपलंसं केलं ,त्यादिवशी तुम्ही म्हणालात ,तुझ्या बापाबरोबर बसून पिता नाही येत ,जरी पीत नसले ,तरी बसून तुम्ही त्यांची विचारपूस करु शकता. निदान महिन्यातून एक फोन ,मला मान्य आहे की,मी तुमच्या आईची काळजी घेतली,म्हणजे उपकार नाही केले ,ते तर माझं कर्तव्य होतं,आपल्यात एवढे प्रोब्लेम झाले होते ,तरी माझे आईवडील हेच सांगायचे की ,सगळं गुपचुप करायचं ,आम्ही जसे आहोत ,तशा त्या आहेत ,त्यामुळे त्या कशा वागतात ,ते आम्हाला सांगायचं नाही.

कारण आपण कधीही एकमेकांशी कधी मोकळेपणाने बोलतचं नव्हतो ,तुम्ही फक्त मला तुम्हाला काय हवयं,हेच सांगत आलात,मोठी स्वप्ने पहा,असं सांगत आलात आणि त्याप्रमाणे मी वागत गेले ,पण तुम्ही मला असं कधीच विचारलं नाही ,की तुला काय वाटतं ,माझ्या मनाचा तरी कधी विचार केला का. तुम्ही स्वत:लाच विचारा ,मला काय आवडते ,मी काय केल्याने मला आनंद मिळतो.

लग्न झाल्या नंतर सगळे घरी बोलवायचे ,पण तुम्ही कधी कुठं नेलं नाही ,का तर तुम्हाला नातेवाईकांकडे जायला आवडत नाही.जे तुम्हाला आवडत नाही ,ते मीही केलं नाही पाहिजे.

मला मान्य आहे ,तुम्ही मला सगळ्या सुख सोयी न मागता दिल्या आणि त्याबद्दल धन्यवाद. मला तुम्ही खूप सोनही केलं ,त्या बद्दल धन्यवाद ,परदेशात फिरायला नेलं त्या बद्दल धन्यवाद ,तुमच्या मित्रां बरोबर पार्टीला नेलं त्याबद्दल धन्यवाद ,हे सगळं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं ,पार्टीला गेलो तर तिथे तुमचं ड्रिंक ,म्हणून सोबतीला आम्ही. पण खरचं हे सगळं मला कधीच नको होतं ,तुम्ही मला एखाद्या शांत ठिकाणी नेलं असतं,हातात हात घालून बसलो असतो ,तरी यापेक्षा जास्त आनंद मिळाला असता ,तुम्ही नेहमीच आनंदाला पैशाच्या तराजुत तोलत आला आहात. मी लग्न करताना कधीही हा विचार केला नव्हता की,मला माझ्या मनाला एवढी मुरड घालावी लागेल ,मला महागाचे ड्रेस नाही घेतले तरी चालतात पण तुमचं नेहमीच स्टँडर्ड हा आग्रह करणं . मला हे ही कळत होतं ,वजन वाढल्यामुळे तुम्हाला माझी लाज वाटत होती,मी खूप प्रयत्न करत होते,पण यश येत नव्हते . तुम्ही मला नेहमी ओरडायचे,दुस-यांच्या बायकांची उदाहरणे द्यायचे ,त्यांच कसं कमी होतं ,तुझं का कमी होत नाही,असे म्हणायचे . तुम्ही तुलना केलेली तुम्हाला चालते ,पण तेच मी कुणा पुरुषाबद्दल सांगायला लागले की ,तुमचं वाक्य ठरलेलं,मला कुणाशी तुलना केलेली आवडत नाही.

तुम्ही जसे आहात ,तसं मी स्विकारलं आहे,तुमच्या चांगल्या वाईट गुणांसहित,कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ,तसच तुम्ही मला नाही का स्विकारू शकत का? 

तुम्ही घरातले आतापर्यंतचे सगळे निर्णय एकट्याने घेतले, खुप मोठ्या रिस्क घेऊन इथपर्यंत पोहोचले आहात ,पण तुम्ही नेहमीच मला ,तुमच्या निर्णयात गृहित धरलं आहे ,पण मला मात्र तो अधिकार अजुनही नाही असं मला तुमच्या वागण्यावरून स्पष्ट होत आहे. आपल्याला देवाने एक सोडून दोन कन्या रत्न दिली ,पण कधी कधी मुलगा नाही ,ह्याची खंत तुमच्या वागण्यातून जाणवते ,तुम्ही बोलून नाही दाखवत पण मला समजते ,मलाही असं वाटतं होतं की,मुलगा व्हावा ,पण देवाची इच्छा,त्याची त्याच्या मागे पण काहितरी योजना असेल.आपण पामर ,दिलं ते आनंदाने घ्यायचं आणि आनंदात राहायचं हे मला समजतं , मला आठ वर्षांनी देवानी मातृत्व दिले आणि त्याचे आभार मानण्या साठी मी हे सगळं करते ,त्यातून मला एक वेगळा आनंद आणि समाधान लाभत्ं ,त्यासाठी हे सारं आणि एक सांगू का आता पर्यंत जे केलं ,ते सगळं,त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या नावाने दान केले आणि ते करते म्हणून मला असं वाटत की,आपण प्रत्येक अडचणीतून बाहेर पडतो आणि मी यात चुकीच काही वागते ,असं मला बिलकूल वाटत नाही,मी माझा हा स्वभाव बदलणार नाही, मला तुम्ही या सकट स्वीकारत असाल ,तर ठिक आहे.

मुलांसमोर दोघांच भांडण नको आणि त्यातून त्यांच्यावर काही परिणाम नको ,म्हणून हा पत्र लिहायचा खटाटोप,मी अशी अपेक्षा ठेवते ,की माझ्या भावना तुम्हाला कळाल्या आणि तुम्ही त्या समजून घेण्याचा प्रयत्न कराल ,नाही केला तरी मी काही सोडून जाणार नाही.तुमची मी कोणत्याही परिस्थीतीत साथ दिली आहे,देत आहे आणि पुढेही देत राहिल हे निर्विवाद सत्य आहे.

फक्त तुमचीच (अर्धांगिनी)

🎭 Series Post

View all