Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

लव कल्लोळ - ८

Read Later
लव कल्लोळ - ८लव कल्लोळ -

डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे डॅमच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असते. त्या पाण्यात दोघेही मनसोक्त भिजतात. थंड पाण्यात भिजल्याने दोघांनाही थंडी वाजू लागते, साईडला असलेल्या टपरीवर जाऊन गरमागरम चहा पितात. समोर डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे बोट दाखवत शर्विल तनयाला विचारतो,
"आपण अजून थोडे पुढे चालत गेलो की त्या धबधब्याकडे पोहचू, जायचे का तिकडे?"

तनया "तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता कसा आहे?"

शर्विल "जायला पायवाट आहे आणि मध्ये वाहणारा झरा आहे, त्याच धबधब्याचे पाणी या झऱ्यामार्फत वाहून इकडे डॅममध्ये मिसळते."

तनया "तुला काय वाटतंय जाऊयात का? कारण मला इकडेच खूप थंडी वाजली आहे, तिकडे जाऊन अजून भिजले तर त्रास होईल. असे जास्त भिजण्याची सवय नाही रे मला"

शर्विल "असे असेल तर आपण नको अजून पुढे जायला, आपण इथेच आजूबाजूला गवतांनी अच्छादलेले सपाट मैदान आहे त्यावर बसूयात"

तनया "सॉरी यार माझ्यामुळे तुला नाही जाता आले धबधब्यावर"

शर्विल "अगं सॉरी काय त्यात, मी खूप वेळा गेलो आहे आणि पुन्हा येईन तेव्हा जाईनच की. बरं तू बस समोर मी आपल्याला खायला बुट्टा घेऊन येतो. पाण्यात भिजल्यामुळे मला तर खूप भूक लागली आहे"

"ओके ये तू, मी बसते" असे म्हणत तनया पुढे चालत जाऊन एका मोठ्या खडकावर जाऊन बसते आणि विचार करू लागते,

\"इतक्या कमी वेळच्या भेटीत मी कशी काय शर्विलसोबत इतकी बिनदास्त राहू लागले. माझा स्वभाव तसा बिनदास्तच आहे म्हणा पण शर्विलविषयी मला माझ्या मनात काही वेगळ्याच फिलिंग्स येत आहेत. आज त्याच्यासोबत कामाव्यतिरिक्त इतर गप्पा मारून मला एक जाणवले की शर्विल मनाने फार साधा सरळ आहे. अजून त्याने कठोर दुनिया अशी काही अनुभवलेली नाही. तो अजूनही त्याच्या कॉलेजच्या लाईफमध्ये, त्याच्या मित्रांसोबतच्या मस्तीमध्ये रममाण असतो. नुकताच कामाचा ताण आल्यामुळे एका आठवड्यात थकला बिचारा... तो जरी स्वतःला मॅच्युअर्ड बिझिनेसमॅन दाखवत असला तरी मनाने अजूनही तो नाजूकच आहे. ऑफिसमध्ये त्याच्या बोलण्यात, वागण्यात असणारा करारीपणा मला आज कुठेच दिसला नाही याउलट त्याच्यातील लाईफ एन्जॉय करणारा कॉलेजबॉय मला दिसला आणि मला आवडलाही... आवडला??? हा काय विचार करत आहे मी? शर्विल मला आवडला???\"

"हे घ्या मॅडम गरमागरम कणीस, मस्त लिंबू, मीठमसाला लावून आणलाय, एकदा खाऊन बघ फार आवडेल, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय" शर्विलच्या येण्याने तनयाची तंद्री भंगते आणि आपण काय काय विचार करत बसलो होतो हे आठवून ती एकटीच हसते.

शर्विल "हसायला काय झालं? जास्त कौतुक केले का मी बुट्ट्याचे ?"

तनया "नाही रे... ये बस तू पण इकडे, इकडून समोरचा डोंगर बघ ना किती मस्त दिसतोय, हिरवीगार चादर ओढल्यासारखा आणि ते बघ ना दोन डोंगरांच्यामध्ये इंद्रधनुष्य पण दिसतंय... वॉव किती सुंदर नजारा आहे"

शर्विल "हो... पावसाळ्यात हेच निसर्गसौंदर्य पहायला तर दूरदूरवरून लोक येतात. पण मी आज निसर्गाचे सौंदर्य पाहायला नाही तर निसर्गालाच सौंदर्य दाखवायला आलो आहे."

तनया "निसर्गाला सौंदर्य दाखवायला म्हणजे? काय म्हणतोयेस माझ्या तर डोक्यावरून गेलं हे"

शर्विल तनयाच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो "निसर्गाला तुझे सौंदर्य दाखवायला तुला घेऊन आलोय मी आज"

शर्विलच्या अश्या वाक्याने तनयाची हसू की लाजू अशी अवस्था होते, त्याची भिडलेली नजर तोडत ती मान खाली घालून म्हणते
"ए काहीही काय बोलतोस रे, मी विचार करत बसले तू काय म्हणालास आणि तू माझीच मस्करी करतोय, मी बरी सापडली तुला आज टांग खेचायला"

"मस्करी कुठे करतोय मी, खरंच बोलतोय की, मी निसर्गसौंदर्य पहायला नेहमी इकडे आलो आहे पण आज त्याची परतफेड म्हणून मी या निसर्गाला तुला दाखवणार आहे" असे म्हणत शर्विल जागेवरून उठतो आणि दोन्ही हात लांब पसरवून समोरच्या डोंगर व धबधब्याकडे पाहून म्हणतो
"हे लोणावळा निसर्ग देवता तुम्ही आजपर्यंत तुमच्या सौंदर्याने मला दिलेल्या नेत्रसुखाची आज मी परतफेड करत आहे, ही बघा तनया तुमच्या सौंदर्याला तोडीस तोड आहे की नाही. तिचे सौंदर्य पाहून आज तुम्ही पण खूप खुश झाले आहात. त्यामुळेच आज तुम्हीदेखील या सप्तरंगात हसत आहात. या सौंदर्याचा आस्वाद घ्या."

शर्विलचे असे बोलणे ऐकून तनया तिच्या हातातला खाऊन उरलेला बुट्टा त्याच्या दिशेने भिरकवते, शर्विल ते हुकवतो आणि हसत हसत लांब पळतो. नेम चुकला म्हणून तनया जागेवरून उठून शर्विलच्या मागे त्याला पकडायला धावते, दोघांचीही पकडापकडी चालू होते. पाच मिनिटं पळल्यावर तनया थकून बसते आणि शर्विलला हातानेच इकडे ये असे खुणावते. इतक्यात पाऊस पडायला सुरूवात होतो. तनया शेजारी असलेल्या टपरीच्या आडोश्याला जाऊन उभी राहते आणि शर्विलला पण बोलावते. पावसामुळे शर्विलसुद्धा कान पकडून तनयाशेजारी येऊन उभा राहतो तशी तनया त्याच्या दंडाला एक जोराचा चिमटा काढते. शर्विल थोडा विव्हळतो आणि पुन्हा हसू लागतो.

तनया "माझी अशी मस्करी करायला घेऊन आलास का इकडे, आता बघच तू... मी पुन्हा तुझ्यासोबत फिरायला येणारच नाही"

शर्विल "सॉरी... पण मजा आली ना, बरं पुन्हा नाही असे करणार"

तनया "थकवलेस रे पळवून पळवून, चल निघुयात आपण मला भूक लागली आहे आता"

पाऊस थोडा कमी झाल्यावर दोघेही गाडीजवळ जातात, शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये चेंज करून जेवण करतात आणि परतीच्या प्रवासाला निघतात. आलेल्या वाटेने पुन्हा जाताना सर्व निसर्ग तनया डोळ्यात भरून घेते. सिटी संपून हायवे लागताच पाण्यात खेळून आणि जेवण झाल्याने तनयाला झोप लागते. तिला झोप लागलेली पाहून शर्विल कारमधील म्युझिक सिस्टीम बंद करतो आणि तिच्या प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून एका क्षणासाठी तोही भान हरपून जातो. पण पुन्हा स्टेरिंगकडे नजर फिरवत गाडी चालवू लागतो. तासाभराने गाडी पुण्यात सिटीमध्ये येते तेव्हा तनयाला जाग येते.

तनया "अरे आपण आलो सुद्धा, सॉरी मला झोप लागली"

शर्विल "फार वेळ नाही गं... एका तासात पुण्यात पोहोचलोसुद्धा आपण"

तनया "थँक्स शर्विल... आज खूप दिवसांनी एन्जॉय केला मी, गेल्या वर्षभरात मी कुठे बाहेर फिरायला गेलेच नव्हते. तुझ्यामुळे आज छान विकेंड गेला माझा, आय होप यु ऑलसो एन्जॉयड्"

शर्विल "ऑफकोर्स, आय रिअली व्हेरी एन्जॉयड् माय डे, गेल्या पंधरा दिवसांचा स्ट्रेस निघून गेला माझा. आता उद्यापासून पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करतो. आले बघ तुझे घर"

"दॅट्स गुड... थँक्स गेन, सी यु टुमॉरो... बाय बाय"
असे म्हणून तनया घरी जाते फ्रेश होऊन तिच्या घरातल्या आवडत्या जागी म्हणजेच बाल्कनीमध्ये कॉफीचा मग घेऊन खुर्चीवर बसते. सुर्यास्त होऊन चंद्रोदय झालेला असतो. चंद्राच्या मंद प्रकाशात चंद्राला पाहत ती आजचा गेलेल्या दिवसाच्या आठवणीत गुंग होऊन जाते आणि स्वतःशीच बोलू लागते,
\"शर्विलसोबतचा आजचा प्रवास, त्याने म्हंटलेले गाणे, सांगितलेल्या गमतीजमती, पाण्यात भिजताना नकळत त्याचा होणारा स्पर्श, मला चिडवणे, हसवणे, स्तुती करणे, गप्पा मारणे, माझी काळजी करत खुशाल झोपू देणे हे सर्व किती प्रामाणिकपणाने तो करत होता. त्याच्या सोबत असण्याने मला एक प्रकारचा विश्वास आणि सुरक्षितता वाटत होती. त्याच्यासोबतची ही पहिली ट्रिप कायम लक्षात राहील. आत्ताही तो माझ्या नजरेसमोरून जात नाहीये. असे का बरं होत असेल? मी खरंच का शर्विलकडे एटरॅकट् झाली आहे? त्याची सोबत का मला हवीहवीशी वाटत आहे? मला तर काहीच समजेना माझ्या मनाची काय स्थिती झाली आहे.\"

तनयाला सोडून शर्विल पण घरी जातो आणि फ्रेश होऊन डायरेक्ट बेडवर जाऊन झोपतो. आई जेव्हा त्याला डिनरसाठी बोलवायला येते तेव्हा तेव्हा शर्विल झोपलेला असतो पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते. त्याची आई विचार करते एवढा काय एन्जॉय केला आज याने की झोपेतसुद्धा हसतोय. मग त्याला थकलेला पाहून न उठवता निघून जाते आणि पुन्हा येऊन त्याच्या साईडटेबलवर ड्रायफ्रूटस, पाणी ठेवून जाते.

****************************

आजच्या एकमेकांसोबत घालवलेल्या दिवसामुळे त्यांचे उद्या ऑफिसमध्ये कसे एक्सप्रेशन असतील. गार्गीचे पुढे काय होते ? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//