लव कल्लोळ - ६

Confused Boy For Choosing Girlfriend



लव कल्लोळ - ६

सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर शर्विल त्याने दिलेली रिकरूटमेंटची जाहिरात पेपरमध्ये पाहतो आणि एच आर टिमला बोलावून नवीन स्टाफसाठी पुढील आठवड्यात इंटरव्ह्यू घेण्यास सांगतो. तनयासोबत काल रात्री झालेल्या तुटक चॅटमुळे शर्विल तनयाच्या केबिनमध्ये जाऊन नॉर्मल असल्याच्या आविर्भावात तिच्यासोबत जाऊन त्यांच्या कंपनीचे स्टॅटिस्टिकबाबत माहिती विचारतो. हा अचानक आल्याने नुकतीच ऑफिसमध्ये आलेली तनया म्हणते,
"गुड मॉर्निंग शर्विल... अरे वा... ऑफिसला आल्या आल्या कामाला सुरुवात? कॉफी घेणार का?"

"हो कॉफी चालेल, मला आज डॅडींसोबत चार वाजता बाहेर जायचे आहे त्यामुळे आज ऑफिसला लवकर येऊन काम उरकून घेतोय."

तनया बेल देऊन ऑफिसबॉयला कॉफी आणायला सांगते आणि शर्विलला विचारते,
"बाहेर म्हणजे वर्क रिलेटेड की पर्सनल?"

तनयाला आता काय सांगू असा शर्विल विचार करतो कारण तो जरी लग्नासाठी मुलगी पहायला जाणार असला तरी आईच्या शब्दाखातरच. त्या कार्यक्रमात त्याचा सहभाग मनापासून नसणार होता. तेवढ्यात कॉफी घेऊन ऑफिसबॉय आत येतो. कॉफीनिमित्ताने विचार करायला थोडा वेळ मिळून तो म्हणतो,
"वर्क रिलेटेड नाही आणि पर्सनल पण नाही, आम्ही आईच्या फॅमिली फ्रेंडच्या घरी त्यांना भेटायला जाणार आहोत. नॉट एनी इम्पॉटंट"

"ओहहह..." असे म्हणत तनया शर्विलसमोर स्टॅटिस्टिक फाईल देते. ती घेऊन शर्विलत्याच्या केबीन मध्ये जातो. जाताना तनयाला लंचसाठी त्याच्या केबिनमध्ये येण्यासाठी इन्व्हाईट करतो.

केबिनमध्ये येऊन \"मी आज लग्नासाठी मुलगी पहायला जाणार आहे हे तनयापासून का लपवले असेल?\" असा विचार शर्विल करतो. खरंतर मी लग्नाचा आजपर्यंत विचार केलेला नाही आणि मी त्यासाठी अजून मनाने तयारही नाही मग कशाला त्या गोष्टीचा आत्तापासूनच बागलबुवा करायचा? अश्याच काही कारणामुळे आणि मी असा लग्नासाठी मुलगी पहायला जात आहे या गोष्टीची लाज वाटून मी तनयापासून लपवले अशी शेवटी स्वतःच्या मनाची समजूत तो घालतो आणि कामात मग्न होऊन जातो. दुपारी जेव्हा लंच करण्यासाठी येऊ का असा तनयाचा फोन येतो तेव्हा तो काम बाजूला ठेवतो. दोघेही गप्पा मारत जेवण करतात. तनयासोबत गप्पा मारून शर्विल मनसोक्त हसतो. तिच्यासोबत बोलताना रिलॅक्स फिल करतो त्यामुळे त्याचा मूड पण चांगला झालेला असतो. तनया जेवण करून गेल्यानंतर तो आज संध्याकाळी केतकी काकूंच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीला एकटे साईडला बोलवून त्याचा आत्ताच लग्न न करण्याचा निर्णय सांगायचा आणि आईच्या हट्टासाठी तो येथे आला आहे असे सांगायचे हे ठरवतो. आणि मग डॅडींसोबत घरी जाण्यासाठी निघतो.

शर्विल घरी आल्यावर आई त्याला लवकर तयार होऊन येण्यास सांगते. मनात नसतानाही तो तयार होण्यासाठी स्वतःच्या मर्जीविरुद्ध तयार होण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये जातो तर त्याच्या बेडवर इस्त्री केलेला स्काय ब्ल्यू रंगाचा बारीक चेक्सचा छान शर्ट व नेव्ही ब्ल्यू रंगाची ट्राउजर घालण्यासाठी काढून ठेवलेली असते. ते पाहून शर्विल मुद्दाम त्याच्या वॉर्डरोबमधून प्लेन व्हाईट शर्ट व ब्ल्यू जीन्स घालून खाली येतो. त्या लूकमध्येही शर्विल खूप स्मार्ट दिसतो. त्याला असे पाहून आई समजून जाते की शर्विलच्या मनात काय आहे आणि तो आपल्यासोबत फॉर्मलिटी म्हणून येत आहे. तरीही आई ठरवल्याप्रमाणे जाण्याचा निश्चय करते कारण तिला आशा असते की केतकी ताईंच्या मुलीला पाहून आणि तिला भेटून शर्विल नक्की काहीतरी पॉजेटिव्ह विचार करेल. सरदेशमुख कुटुंब राजेशिर्केंच्या घरी जाण्यास निघतात.

इकडे राजेशिर्केंच्या घरी गार्गीला पहायला पाहुणे येणार म्हणून लगबग चालू असते. गिरीश राजेशिर्के हे लघु व्यावसायिक असतात. दोन मुली, मिडल क्लास अँड हॅपी फॅमिली असे छान कुटुंब असते. घराची साफसफाई, हॉलमध्ये आवराआवर, दारात रांगोळी वगैरे तयारी चालू असते. सरदेशमुखांची कार जशी दारात पोहोचते तसे राजेशिर्कें दाम्पत्य बाहेर येऊन त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना घेऊन घराच्या हॉलमध्ये येऊन बसवतात. दोन्ही कुटुंबाच्या जुजबी गप्पांना सुरुवात होते. शर्विल अवघडल्यासारखा बसलेला असतो. थोड्या वेळात केतकी काकू आत जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन बाहेर येतात. हातात नाश्त्याचा ट्रे घेऊन साडी घातलेली एक सुंदर मुलगी हॉलमध्ये येते.

राजेशिर्कें तिची "ही आमची थोरली कन्या गार्गी" अशी ओळख करून देतात.

तिच्यासोबत बाहेर आलेली तिची धाकटी बहीण किमयाचीदेखील ओळख करून देतात. गार्गी ट्रे टेबलावर ठेवून सर्वांना नमस्कार करते आणि प्रत्येकाच्या हातात नाश्त्याची प्लेट देते. शर्विल तिच्याकडे न पाहताच प्लेट घेत तिला थँक्स म्हणतो.

नाश्ता करता करता शर्विलची आई त्याच्या शिक्षणाविषयी, कामाविषयी आणि स्वभावाविषयी बसलेल्या सर्वांना माहिती सांगतात. हे सर्व ऐकून शर्विल अजूनच ऑकवर्ड होतो. गार्गी सर्व मान खाली घालूनच ऐकत असते. त्यानंतर केतकी काकूदेखील गार्गीची शैक्षणिक माहिती आणि गुणांविषयी बोलू लागतात. शर्विलने अजूनही गार्गीकडे पाहिलेले नसते. दोघांनाही ऑकवर्ड झालेले पाहून केतकी काकू या दोघांना एकांतात बोलता यावे म्हणून त्यांना दुसऱ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारायला घेऊन जा असे गार्गीला सांगतात. हे ऐकून गार्गी आणि तिची लहान बहीण किमया दोघेही आतल्या रूमच्या दिशेने चालू लागतात. शर्विलला हे हवेच असते म्हणून तोसुद्धा लगेच उठतो आणि त्या दोघींच्या पाठोपाठ चालू लागतो. तेवढ्यात केतकी काकू किमयाला आवाज देऊन तिला माघारी बोलावतात आणि त्या दोघांनाच बोलू देत असे सांगतात. किमया सोबत नाही हे पाहून गार्गीचा पाय जागेवरच अडखळतो आणि ती थांबते तोच मागून आलेला शर्विल तिला म्हणतो
"तुम्ही चला पुढे... कोठे आहे दुसरी रूम?"

शर्विलच्या अश्या बोलनाने गार्गी हिम्मत करून पुढे चालू लागते आणि आता ते दोघेही एका रूममध्ये बोलण्यासाठी येतात. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवत गार्गी शर्विलला त्यावर बसण्यासाठी सांगते आणि स्वतः समोरच्या खुर्चीजवळ जाऊन उभी राहते. तिला उभी पाहून शर्विल तीलादेखील बसायला सांगतो तेव्हा ती बसते.

"५.५" उंच, गव्हाळ रंग, फिक्कट पिस्ता कलरची साडी, मेकअप म्हणून फक्त पावडर आणि लाईट लिपस्टिक, शरीरयष्टीने बारीक अशी समोर गार्गीला शर्विल निरखून पाहतो. दोन मिनिटं शांततेतच गेल्यानंतर शर्विल तिला बोलतो,
"हाय... मी शर्विल, माझी आई आणि केतकी काकू यांची एन.जी.ओ. मधली ओळख... मी देखील एकदा त्यांच्यासोबत एका आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. तुम्ही पण त्यांच्या सोबत जात असता का त्यांच्या एन.जी.ओ. मध्ये?"

"नाही... मी नाही जात पण तुमच्या आई शालिनी काकू एन.जी.ओ. च्या कामानिमित्त नेहमी आमच्या घरी येतात त्यामुळे त्यांची आणि माझी ओळख आहे. फार छान बोलतात त्या माझ्यासोबत." गार्गी थोडं सावरून बसत बोलते

"अच्छा तर त्यामुळे आई मला इकडे घेऊन आली. तुम्हाला राग येणार नसेल तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मी सांगू शकतो का?" शर्विल

"हो तुम्ही निश्चिंतपणे काहीही सांगू शकता" गार्गी

"तुम्ही बाहेर ऐकलेच असेल की मी सिडनीवरून आत्ताच शिक्षण घेऊन आलो आहे आणि डॅडींचा बिझिनेस जॉईन केला आहे. एका कंपनीसोबत मी आत्ता काम सुरू केले आहे आणि मला सध्या तिकडे कॉन्सनट्रेट करायचे आहे. तसेच माझे वयदेखील अजून कमी आहे त्यामुळे लग्नाचा विचार मी इतक्यात केलाच नव्हता. मला आत्ताच लग्न नाही करायचे पण आईने अचानक असे मला इकडे यायला सांगितले आणि तिला मी दुखवू शकत नाही म्हणून मी आज इकडे तुमच्या घरी आलो आहे." शर्विल

हे ऐकून इतका वेळ मान खाली घालून शांत बसलेली गार्गी शर्विलकडे पाहत त्याला बोलते, "हो का... बरं झालं तुम्ही हे मला सांगितले, एकच्युली मी पण तुम्हाला हेच सांगणार होते, माझे आत्ताच कॉलेज पूर्ण झाले आहे आणि मी आता करिअरच्या दृष्टीने सेटल होण्यासाठी जॉब शोधत आहे. माझेही वय कमी असल्याने मी पण अजून लग्नाबाबत काही ठरवले नाही. तुम्ही सिडनीवरून आले तेव्हा आपल्या दोघांच्या आईंचे काहीतरी बोलणे झाले त्यामुळे त्यांनी आज असा कार्यक्रम ठेवला, मला हे अनपेक्षित होते पण मला घरच्यांना विरोध करता आला नाही. आई बाबांना मला दुखावता येणार नाही. आता तुमचेसुद्धा असेच मत असल्यामुळे मला जरा हायसं वाटतंय."

"ओहह गॉड... मला तर फार टेन्शन आले होते या सर्व गोष्टीचे. आपल्या दोघांचेही एकमत असल्याने आपण काहीतरी कारण सांगून आता ही गोष्ट टाळू शकतो. हे आपल्याला सोपे जाईल आणि आपल्या घरच्यांची मने न दुखावता त्यांच्यामध्येही आपापसात एकोपा राहील." शर्विल

"येस... आय फिल व्हेरी रिलॅक्स नाऊ... थँक्स फॉर अंडरस्टँडिंग माय साईड. मी माझ्या आईला सांगेल काहीतरी आणि तुम्ही पण सांगा." गार्गी

"हो... बाय द वे तुमचे एज्युकेशन काय झाले आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा जॉब सर्च करत आहात?" शर्विल

"माझे बी. कॉम आणि नुकतेच बी.बी.ए. कम्प्लिट झाले आहे आणि त्याच रिलेटेड जॉब सर्च करत आहे. दोन-तीन ठिकाणी अप्लाय केला आहे, सध्या इंटरव्ह्यूची वाट पाहत आहे, बघुयात काय होतंय ते..." गार्गी

"आमच्या कंपनीमध्येदेखील तुमच्या क्वालिफिकेशनकरीता व्हॅकन्सी आहे. इफ यु डोन्ट माईंड... तुम्ही तिथे अप्लाय करू शकता." समोरच्या स्टडी टेबलवर पडलेल्या आजच्या पेपरमधील त्यांच्या कंपनीची जाहिरात दाखवत शर्विल म्हणतो

गार्गी ती जाहिरात वाचत त्याला प्रतिसाद देत म्हणते "हाऊ को-इनसिडन्स... मी ही जाहिरात पाहून माझा रिज्युम आणि डॉक्युमेंट्स या कंपनीला आज दुपारीच मेल केले आहेत. त्यामुळे तर हा पेपर हॉलमधून या स्टडीरूममध्ये आणून ठेवलाय. सध्या जॉब सर्चिंग चालू असल्यामुळे माझे डॉक्युमेंट्स रेडीच आहेत; सो आय सेंट क्विकली"

"दॅट्स ग्रेट... पुढच्या विकमध्ये इंटरव्ह्यू आहेत तुम्हाला तसे मेलवर इंटिमेशन येईलच." शर्विल

"तुम्ही फ्रेशर्स आहात आणि मला फार आत्मविश्वास आहे फ्रेशर्सवर, कॉज दे गिव्ह देअर बेस्ट, बेस्ट लक टू यु फॉर इंटरव्ह्यू" शर्विल

लग्नाबद्दलची दोघांचेही मते एकमेकांना समजल्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर हसू तरळते आणि करिअरबाबत चर्चेमुळे ते एकमेकांसोबत खुलून बोलू लागतात. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर ते दोघेही चेहऱ्यावर पुन्हा शांत भाव आणत हॉलमध्ये येतात. चहा पिऊन झाल्यावर या दोघांचे काय मत आहे ते आपण विचारात घेऊन पुन्हा भेटू असे म्हणत सरदेशमुख कुटुंब घरी जाण्यासाठी निघतात.

राजेशिर्केंच्या घरून निघून आपल्या घरी आल्यानंतर शर्विलची आई शर्विलला गार्गीबद्दल विचारते,
"शर्विल... काय रे गप्प का आहेस? कशी वाटली गार्गी? तुमच्यात व्यवस्थित बोलणे झाले ना? अरे बोल काहीतरी..."

"मॉम... मी म्हणालो होतो तुला की, मी तुमच्या सोबत येईन पण मला बाकी कशासाठी फोर्स करू नकोस. मला अजून थोडा वेळ हवाय. मी स्वतःहून तुला सांगेल" शर्विल

तेवढ्यात शरण्या येते आणि शर्विलला विचारते
"हे ब्रो... कशी आहे आमची वहिनी? बघू मला पण फोटो"

"तुझ्यामुळेच मॉमच्या डोक्यात इतक्या लवकर माझ्या लग्नाचे भूत शिरलंय, तुला फार हौस आहे ना वहिनी पहायची? इकडे ये तू तुला आज वाहिनीच दाखवतो मी" असे म्हणत शर्विल शरण्याला पकडायला तिच्या मागे पळतो आणि आईच्या तावडीतून सुटतो.

गार्गीला देखील तिचे आईवडील डिनर करताना शर्विलबद्दल विचारतात त्यावर गार्गी म्हणते,
"आई बाबा तुम्ही का घाई करत आहात मला समजेल का? मी आत्ता कुठे शिक्षण पूर्ण केले आहे आणि मला जॉब करून स्वतःच्या पायावर उभं रहायचं आहे, तर तुम्ही आत्ताच माझ्या पायात लग्नाच्या बेड्या अडकवताय. यासाठीच शिकवलंय का मला? प्लिज मला थोडं समजून घ्या. तुम्हाला माझ्यानंतर किमयाचं देखील टेन्शन आहे आय नो... बट किमया अजून लहान आहे तुम्ही घाई करत आहात असे मला वाटतंय"

गार्गीचा केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहत तिचे वडील तिला म्हणतात,
"ठिक आहे... तू जॉब कर आम्ही अडवत नाही पण आज ना उद्या तुला या गोष्टीला सामोरे जावेच लागणार आहे याची मनाशी गाठ बांधून ठेव. सरदेशमुखांचे काय मत आहे ते पाहुयात आणि मग हवे तर थोडे दिवस आम्ही थांबतो."

हे ऐकून गार्गी खुश होते आणि आई वडिलांना थँक्स म्हणते. तिच्या पुरता सध्या हा विषय काही दिवसांकरीता का होईना लांबणीवर पडतो.

****************************

गार्गीला जॉब मिळेल का? तनया आणि शर्विल यांची मैत्री अजून कशी पुढे जाईल? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

🎭 Series Post

View all