लव कल्लोळ - ४

Confused Boy For Choosing Girlfriendलव कल्लोळ - ४

पहिल्या क्षणी पाहता तुजला
झाले होते मन हे बावरे...
प्राजक्ताच्या फुलांचा सडा
जणू माझ्याच अंगणी पडे...

अशीच काहीशी अवस्था आज तनयाची झालेली होती. कारण तिने आज शर्विलला एका वेगळ्याच ढंगात पाहिलेले होते. शर्विलला भेटून आल्यापासून ती तिच्या बेडरूममधील बाल्कनीमध्ये एकटीच डोळे मिटून शांत बसून कॉफी घेत होती. हातातील कॉफीचा मग तिला शर्विलची आठवण करून देत होता. आज पहिल्यांदा तिला शर्विलबद्दल आकर्षण वाटले होते. त्याच्या बोलण्याची स्टाईल, हावभाव, त्याचे हसणे या सर्व बारीकसारीक गोष्टी आठवून तनया त्यात रमत होती. त्याची प्रत्येक गोष्ट आठवत तिच्या डोळ्यांची होणारी हालचाल पापण्यांमधून स्पष्ट दिसत होती. त्यासोबतच गालावर हसण्याचा खुणादेखील उमटत होत्या. हातातील कॉफीचा विसर पडून ती केव्हा थंड झाली तिला समजलेच नाही. अशी बराच वेळ बसून राहिल्यावर तिच्या कानावर आईचा आवाज येतो.

"तनया... डिनर घ्यायला चल, डॅडी पण आले आहेत."

आईचा आवाज ऐकून भानावर येत ती उठून जेवायला जाते. जेवताना तिचे वडील सांगतात की,
"तनया आता आपल्याला न्यू पार्टनर कंपनी सोबत काम करायचे आहे तर त्यांच्या कंपनीचा जो कॉर्डिनेटर असेल त्यासोबत आपल्या कंपनीतर्फे तुला नेमण्यात येणार आहे असे आमचे डिस्कशन झाले आहे. तू हवे तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकतेस किंवा त्यांचा जो कोणी नेमलेला व्यक्ती असेल त्याची व्यवस्था आपण इकडे करूयात. तू म्हणशील तशी मी व्यवस्था करतो."

"ओके डॅड.. थँक्स, माझ्यावर तुम्ही सर्व जो विश्वास टाकत आहात हे पाहून मला खरं तर फार ग्रेट वाटत आहे. मी काम करण्यासाठी जे आवश्यक असेल तसे करेल, माझी काहीच हरकत नाही. आता माझा फोकस आपल्या कंपनीला पुन्हा उभारी देण्याकडेच असेल... त्यासाठी कितीही मेहनत करण्याची माझी तयारी आहे. तुम्ही टाकलेल्या विश्वासावर मी खरी उतरवून दाखवेल."

"दॅटस लाईक माय डॉल..." तनयाचे डॅडी असे बोलत तिला एक हाय फाय देतात आणि सर्वजण जेवण करून झोपण्यासाठी बेडरूममध्ये जातात.

इकडे शर्विलही तनयाला भेटून आज घरी आल्यानंतर खुश असतो. तो टिव्ही पाहत बसलेली त्याची लहान बहीण शरण्यासोबत गप्पा मारायला हॉलमध्येच बसतो. अधेमधे कोणतेतरी गाणं तो गुणगुणत असतो. त्याच्या चेहऱ्यावर आज मस्त हास्य खुलून आलेले असते. शरण्याला ते काही प्रमाणात जाणवते.

"भावा काय चालू आहे... आज एकदम गाणं वगैरे..." शरण्या

"काही नाही गं... मी इतके दिवस इकडे नव्हतो ना म्हणून मग जरा बाहेर जाऊन फिरून आलो. कुठेतरी ऐकले बाहेर तेव्हापासून गुणगुणतोय." शर्विल

"बास का भाई... कोण है वो?" शरण्या शर्विलला चिडवत म्हणते.

"ए... काहीही काय बोलतेस.... फटके पाहिजे वाटतं. दोन वर्षांपासून दिले नाहीत तसेही... थांब आज देतोच" असे म्हणत शर्विल तिच्या जवळ जातो तोवर शरण्या पळत पळत किचनमध्ये आईकडे जाते आणि त्याला जीभ दाखवत आईमागे लपते.

"सांगू का... सांगू आईला???" शरण्या

"आई हिचं काही ऐकू नकोस गं... हिला जरा फटके दिले पाहिजेत फार मोठी झाली... काहीही बोलते मला" शर्विल

"काय गं... काय सांगतेस... सांग बरं" आई

"आई काही नाही गं... इकडे ये तू शरण्या... आधी बाहेर चल" शरण्याला डोळे दाखवत शर्विल तिला बाहेर येण्यास खुणावतो.

"फार झाली मस्ती... चला मी आता जेवायलाच घेत होते, शर्विल लवकर फ्रेश होऊन ये आणि शरण्या चल मला मदत कर जेवण बाहेर घेऊन जायला." आई असे म्हणत शरण्याच्या हातात पोळ्यांचा डबा देते.

शर्विल शरण्याला तुला नंतर बघतो असे हातवारे करत फ्रेश होण्यासाठी त्याच्या बेडरूमकडे जातो. तेवढ्यात आई शरण्याला विचारतेच,
"काय गं शरयू... काय सांगत होतीस? आणि हा का तुझ्यामागे आला होता पळत?"

"काही नाही गं मम्मी... त्याला जरा चिडवत होते... लाजत लाजत गाणं गुणगुणत होता म्हणून जरा त्याची मस्करी केली" शरण्या

"हं... तसेही आज त्याला एक सरप्राईज द्यायचंच आहे त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल. बघूया काय म्हणतोय."
असे म्हणत आई आणि शरण्या दोघेही डायनिंग टेबलकडे जातात.

डायनिंग टेबलवर जेवताना आई शर्विलला विचारते,
"मग... का रे हिच्या मागे धावत होतास? कोणी मुलगी वगैरे आवडते का तुला?"

"नाही गं मम्मी.. तीचं काय ऐकतेस" शर्विल

"नक्की ना... बघ कोणी असेल तर आत्ताच सांग, पुन्हा बोलू नकोस मला विचारले नाही म्हणून" आई

"नाही गं... असे कोणी नाही, उगाच का मला छळताय दोघी" शर्विल

"हं... बरं.... शर्विल... तुला माझ्यासोबत एन.जी.ओ. च्या केतकी राजेशिर्के लक्षात आहेत का?" आई

"हो आहे की, मी कॉलेजला असताना तुमच्या सांगण्यावरून मित्रांना घेऊन आलो होतो कात्रज डोंगरावर अवैध झाडेतोडला विरोध करायला म्हणून. तेव्हा त्याच होत्या ना सर्वात पुढे माईक घेऊन"
"त्यांचं काय आता मध्येच?" शर्विल

"हो त्याच... आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे दोन दिवसांनी त्यांची मुलगी आहे तिला पहायला... स्थळ म्हणून" आई

आईने अचानक हे काय मध्येच चालू केलं यावर चकीत होऊन शर्विल एकदमच ओरडतो

"काय...! हे तू काय काढले आहेस अचानक, अजून माझं वय आहे का? आणि मी नाही लग्न वगैरे करणार इतक्यात... शरयूच झाल्याशिवाय तर नाहीच नाही." शर्विल

"अरे लगेच कर असे कुठे म्हंटले आहे मी... मी नेहमी त्यांच्याकडे जाते तेव्हा त्यांची मुलगी असते घरी... सुंदर आहे दिसायला, माझ्याशी तर फार छान गप्पा मारते..."

"तिचं शिक्षण पूर्ण झाले आहे आता ती जॉब सर्च करत आहे, असे म्हणत होत्या केतकीताई. तू एकदा भेटावेस असे वाटते मला. बाकी तू ठरवं... नाहीतरी आता तू फॉरेन रिटर्न आहेस.. आम्हाला जुमाणणार आहेस का?"

आईच्या अश्या खोचक शब्दांमुळे शर्विल निरुत्तर होतो आणि आईला वाईट वाटू नये म्हणून एकदा जाऊन यायला काय हरकत आहे असा विचार करतो. डॅडीसुद्धा जेवताना सर्व ऐकत असतात त्यामुळे फार काही न बोलता शर्विल आईला सांगतो...

"असं का बोलतेस... यु आर हर्टींग मी... जाऊयात आपण मी येईन सोबत... पण माझी एक अट आहे. मंजूर असेल तरच मी येईन. प्लिज"

"बोल काय अट आहे तुझी?" आई

"आता तू ठरवले आहेस तर आपण एकदा जाऊन येऊ पण मला याबाबतीत काही निर्णय घ्यायला लगेच फोर्स नको करूस... मी खरचं आत्ता याबाबतीत काहीच विचार केलेला नाही. आत्ताच तर सिडनीवरून आलोय आणि डॅडसोबत एका नविन डिलमध्ये काम करत आहे, सध्या तरी मला असे डिस्ट्रेक होऊन चालणार नाही."

"डॅड... टेल हर" शर्विल

"हं... तुझ्या ममाचे आणि माझे यावर आधी बोलणे झालेले आहे, आपण एकदा जाऊन येऊयात राजेशिर्केंच्या घरी आणि मग पुढचे पुढे पाहुयात." वडील

हे ऐकून तर आता शर्विलचा नाईलाज होतो आणि मानेनेच त्यांना होकार देतो. तशी आई त्याकडे पाहून हसते. शर्विलही जरा मग लटकेच हसतो. शरण्या हळूच शर्विलकडे पाहत त्याला पुन्हा चिडवते.

****************************

तनया आणि शर्विल सोबत एकत्र काम करतील का... की अजून काही प्रॉब्लेम येणार आहे? त्यांची मने जुळतील का? कोण असेल आईने शर्विलसाठी सुचवलेले नवीन स्थळ? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय)
पुणे

🎭 Series Post

View all