लव कल्लोळ - २

Confused Boy Of Choosing Girlfriend For Marriage

लव कल्लोळ - २

कोथरूडच्या \"प्रिझम कम्युनिकेशन\" या कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये सकाळी ११ वाजता \"ग्रीन व्हेव\" कंपनीची कोअर टिम मिटिंगसाठी पोहोचते. कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांना बसवले जाते. त्यानंतर कंपनीचे सी.ई. ओ. अलंकार दिक्षित त्यांच्या टिमसह हॉलमध्ये प्रवेश करतात.

५.९" उंच, गोरीपान रंगाची, केसांची पोनी टेल स्टाईल, शॉर्ट स्लिव्ह्ज असलेला क्रिम कलरचा टक्सीडो सूट आणि पॅन्ट, चेहऱ्यावर लाईट मेकअप अशी तरुणी त्या टिमसोबत प्रवेश करते. तिला पाहताच खुर्चीत रेलून बसलेला शर्विल खुर्ची पुढे घेवून ताठ बसतो आणि तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहतो.

अलंकार दिक्षित हे स्वतःची ओळख करून दिल्यानंतर इतर मेंबरची ओळख करून देत शेवटी त्या तरुणीची ओळख करून देतात. "ही माझी मुलगी तनया दिक्षित, आमच्या कंपनीची भावी सी.ई.ओ." हे ऐकून तनया गालातल्या गालात हसून सर्वांना अभिवादन करते. शर्विल अजूनही तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहतच असतो.

यानंतर ग्रीन वेव्ह कंपनीचे रिप्रेझेन्टेटिव्ह हे कंपनीचे सी.ई.ओ. शशिकांत सरदेशमुख व इतरांची ओळख करून देत सर्वात शेवटी शर्विलची ओळख करून देताना सांगतात "हे आमच्या कंपनीचे भावी सी.ई.ओ. व सरांचे सुपुत्र शर्विल सरदेशमुख" यावेळी तनया आणि शर्विलची नजरानजर होते आणि क्षणभर एकमेकांवर खिळून राहते. पुढे मिटिंग चालू होते तशी दोघे पुन्हा भानावर येतात.

प्रिझम कम्युनिकेशन कंपनीचे रिप्रेझेन्टेटिव्ह कंपनीची माहिती देतात. "कंपनीने परकीय देशांमध्ये केलेली गुंतवणूक मोठी असून भारताचा पाकिस्तान व चीन या एशियामधील प्रमुख देशांसोबत असलेल्या तणावामुळे कंपनीला त्यामानाने पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही. तसेच नवीन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायद्यांमुळे देखिल बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कंपनीचे अडकलेले पैसे, थकलेले बिल्स याकरीता कंपनीने ४०% शेअर्स विकून कंपनीला संकटातून बाहेर करण्याचे ठरविलेले आहे. परंतु असे केल्यानेदेखील कंपनीची स्थिती लगेच सुधारेल असेही नाही."

शशिकांत सरदेशमुख सर्व परिस्थिती समजून घेत विचार करतात की या कंपनीचा सेटअप ऑलरेडी एशियामध्ये आहे... त्यांना सुरुवातीची गुंतवणूकीचा खर्च वाचून बिझिनेस वाढवण्यासाठी भांडवलाचा उपयोग करता येईल. "५१% शेअर्स आम्हाला देणार असेल तर आम्ही इंटरेस्टेड आहोत, कंपनीला सर्व संकटातून बाहेर काढूच आणि त्यासोबत कंपनीचा नफादेखिल करून देऊ" अशी ऑफर करतात. त्यावर प्रिझम कंपनी आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर मिटिंग घेऊन निर्णय कळवतो असे सांगून मिटिंग संपते. मिटिंग संपल्यानंतर सर्व एकमेकांसोबत बोलत हॉलबाहेर पडण्यासाठी उठून चालत निघतात.

शर्विल मुद्दाम मोबाईलसोबत चाळा करत हळूहळू उठतो आणि मागे जायला निघतो. त्याच्या मनात तनया सोबत वैयक्तिक ओळख करण्याचा मानस असतो. तेव्हा अचानक तनया स्वतःहून शर्विलला आवाज देत त्याकडे जाते.

हात पुढे करत म्हणते "हाय... आय एम तनया... तनया दिक्षित"

इतक्या वेळ दुरून पाहिलेली तनया आता एकदम समोर आल्याने तो जरा बिचकतो... आता त्याला तिचे काळेभोर डोळे स्पष्ट दिसत असतात... आयलायनर लावल्यामुळे तिला पाहताक्षणी पहिली नजर तिच्या डोळ्यांवरच जाते आणि तिथेच स्थिरावते... तो काही बोलणार तोवर तिच्या परफ्युमचा सुगंध श्वासासोबत एकदम त्याच्या नाकात जातो आणि एक क्षणासाठी त्याचे डोळे आपोआप मिटतात. स्वतःला सावरत तो तनयाने पुढे केलेल्या हातात त्याचा हात देतो.

"हॅलो... आय एम शर्विल सरदेशमुख"

तनया त्याची गंमत पाहत हलकीशी स्माईल करत म्हणते "ग्लॅड टू मिट यु मिस्टर शर्विल, सो आर यु द नेक्स्ट सी.ई.ओ. ऑफ युअर कंपनी... हा ?"

यावर पुन्हा कोड्यात पडल्यासारखा चेहरा करून शर्विल हसत उत्तर देतो "हाहाहा... इट्स जस्ट फॉर्मली इन्ट्रोडक्शन गेव्ह बाय अवर रिप्रेझेंटेटिव्ह. अवर कंपनी नॉट डिसायडेड एनी येट. बाय द वे यु आर द फ्युचर सी.ई.ओ. ऑफ युअर कंपनी."

तनया दोन्ही भुवया उंचावून ओठांचा चंबू करत म्हणते "होप सो, इफ थिंग्ज विल गेटिंग बेटर... देन आय विल बी देअर... ऑन दॅट पोजिशन"

गप्पा मारत मारत ते एन्ट्री डोअर पर्यंत येतात तसा शर्विल थोडा बिचकत बोलण्याच्या प्रयत्नात असताना एक हाताने कपाळ खाजवत काहीतरी विचार करतो. तनया त्याची अस्वस्थता पाहून तिचे बिझिनेस कार्ड त्याच्या हातात देते व "कॉल मी... सी यु सून... बाय" असे बोलत हाताने टाटा करते.

शर्विल फजिती झाल्यासारखा चेहरा करून ओठांवर हसू आणत "या डेफिनेटली... सी यु सून... बाय" असे म्हणत बाहेर पडून समोर आलेल्या कारमध्ये जाऊन बसतो.

तनया स्वतःशीच हलके हसत लिफ्टकडे जाते. लिफ्टमधील आरश्यामध्ये स्वतःचा असा विनाकारण हसत असलेला चेहरा पाहून चकीत होते आणि पुन्हा हसतच तिच्या केबिनकडे जाते.

इकडे शर्विल कारमध्ये बसल्यावर तिने दिलेल्या बिझिनेस कार्डवरचे डिटेल्स त्याच्या मोबाईलमध्ये उतरवून घेतो. स्वतःची झालेली फजिती आणि तनया सोबत झालेली ओळख अशी संमिश्र भावना येऊन तोही गालातल्या गालात हसतो.

दुपारी त्याच्या ऑफीसला आल्यानंतर तो लंच घेतो आणि आज झालेल्या मिटिंगबाबत विचार करत बसतो. जर प्रिझम कंपनीने आपली ऑफर नाकारली तर आपला प्लॅन बी काय असेल? आपण अजून कोणत्या अटींवर पुढे जाऊ शकतो याबाबत डिस्कशन करण्यासाठी पुन्हा असलेल्या मिटिंगसाठी तो मिटिंग हॉलकडे जायला निघतो. चर्चेमध्ये तो त्याचा मुद्दा मांडतो...
"आपण जर त्यांच्या कंपनीला आपल्यात मर्ज म्हणजे विलीनीकरण केले तर आपला पूर्ण हक्क कसा होईल किंवा दोन्ही कंपन्या एकत्र येऊन एमलगमेशन (amalgamation) केले तरी आपलाच कसा जास्त फायदा होईल."

असे विविध युक्त्या नुकत्याच आलेल्या विचारातून तो मांडण्याचा प्रयत्न करतो. नुकत्याच रुजू झाल्यामुळे एवढ्या कमी कालावधीतच त्याची एवढा मोठी झेप घेण्याची तयारी पाहून सर्वच जण त्याचे कौतुक करतात आणि याबाबत त्याचे सविस्तर प्लॅन ऐकतात. काही जुजबी चर्चा होऊन त्यांच्या उत्तराची वाट पाहून त्यानंतर पुढील चर्चा करू असे ठरवून मिटिंग संपते.

रात्री घरी आल्यानंतर आजच्या सर्व घडामोडी आठवत त्याचा विचार पुन्हा तनयापाशी येऊन थांबतो आणि या सर्व गडबडीत तनयाला फोन करायचे राहून गेले असा विचार करत तिचे नाव मोबाईलमध्ये टाईप करतो. एकतर आता रात्र झाली आहे म्हणून फोन तरी कसा करू आणि दुसरे म्हणजे फोन केला तर काय बोलू अश्या दुविधेसह तो पुन्हा मोबाईलच्या स्क्रीनवरून बॅक जातो आणि \"बघू उद्या\" असा विचार करत फोन करण्याचा निर्णय रद्द करतो.

आपण आजपर्यंत मुली तर खूप पहिल्या... कॉलेजमध्ये, सिडनीमध्ये... पण कोणाला पाहून अशी अस्वस्थता यापूर्वी कधी जाणवली नव्हती. असे काय झाले तनयाला पाहून की एवढा बिनधास्त असलेला मी तिच्यासमोर असा गडबडलो. तनयाचा विचार करताना त्याला ती डोळ्यासमोर नीटशी दिसत नाही पण तिचे डोळे मात्र त्याला जसेच्या तसे आठवत होते. आयलायनर लावलेले, टपोरे काळ्या रंगाचे, अगदी स्वच्छ आणि कटाक्ष टाकल्यासारखे, जणू आपल्यालाच पाहत आहेत असे त्याला वाटले. पण तिचा चेहरा का धूसर दिसत होता ते त्याला काही समजत नाही.

तनयाच्या विचाराने त्याला झोप तर काही येत नव्हती म्हणून तो पुन्हा मोबाईल घेऊन चाळू लागतो. तितक्यात त्याला तिचा फोटो मेसेजिंग एपवर असेल म्हणून शंका येते. तसे तो मेसेजिंग एप ओपन करून तिचे नाव टाईप करतो पण त्याची निराशा होते. याचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसल्याने तिचा डीपी याला ब्लॅंक दिसतो. मग याची पुन्हा घालमेल चालू होते. शेवटी न राहवून तो तिला मेसेज टाईप करतो.

"हेय.... शर्विल हिअर, प्लिज सेव्ह माय नंबर"

****************************

काय चालले असेल तनयाच्या मनात? तीही पाहत असेल का शर्विलच्या फोनची वाट? शर्विलच्या मेसेजला तिचा रिप्लाय येईल का? आला तर काय असेल? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय)

पुणे

🎭 Series Post

View all