Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

लव कल्लोळ - १

Read Later
लव कल्लोळ - १


लव कल्लोळ - १

नमस्कार सर्व वाचक मित्र मैत्रिणींनो...! मी प्रेमकथा मालिका लिहीत आहे. कथा काल्पनिक असून स्वकल्पनेतून लिहीत आहे...
आपण सर्वांनी वाचून कशी वाटली आणि काय आवडले काय नाही व सूचना समीक्षामध्ये आवर्जून सांगा...

****************************


"अहो मान दुखेल तुमची एवढा वेळ वर पाहून.... त्याचा वेळ होईल तेव्हा येईलच की" हे वाक्य कानी पडताच शालिनी सरदेशमुख यांची तंद्री भंगते. ते बराच वेळ आकाशाकडे एकटक डोळे लावून एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये गाडीत बसलेले असतात.

"चला आता अराईव्हल गेटकडे जाऊयात... प्लेन लँड होण्याची वेळ झालेली आहे." असे म्हणत शशिकांत सरदेशमुख सपत्नीक अराईव्हल गेटकडे निघातात.

आज दोन वर्षांनी त्यांचा मुलगा \"शर्विल\" मार्केटिंगचे शिक्षण घेऊन ऑस्ट्रेलिया मधून भारतात परतणार असतो. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी मधून त्याने मार्केटिंगची डिग्री घेऊन आपल्या वडिलांचा बिझनेस नॅशनल पासून इंटरनॅशनल लेव्हलला एक्सपांड करायचा असे ठरवलेले असते. अर्थात तो हुशार असल्यामुळेच सरदेशमुख दाम्पत्याने विचारांती शर्विलला ऑस्ट्रेलियाला मार्केटिंगची डिग्री घेण्यास पाठवलेले असते.

आज शर्विल दोन वर्षांनी परतणार म्हणून शर्विलची आई आणि वडील दोघेही स्वतः पुण्याहून कार घेऊन शर्विलला रिसिव्ह करायला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेले असतात. एक वाजता ऑस्ट्रेलिया वरून आलेली क्वांटस एअरवेज (Qantas Airways) ची फ्लाईट मुंबईच्या विमानतळावर लँड करते आणि पुढच्या अर्ध्या तासात समोरून चालत येणाऱ्या आपल्या मुलाला पाहून दोघेही त्याला हात उंचावून आवाज देतात.

५.११" उंच, गोरगोमटा, स्पायकी हेअर स्टाईल, डोळ्यांवर ब्लॅक गॉगल, बारीकशी वाढलेली दाढी, दंडाला फिट असलेला ब्लॅक टी शर्ट, कॉफी कलरची ट्राऊजर, पायात स्निकर शुज, पाठीला सॅक, एका हातावर ब्लॅक लेदर जॅकेट टाकलेले व पुढे बॅगेज ट्रॉली ढकलत गर्दीतून हळू हळू वाट काढत शर्विल त्याच्या मॉम डॅड समोर येऊन उभा राहतो.

त्याला पाहून आईच्या डोळ्यात पाणी दरवळते तसा शर्विल दोघांनाही मिठी मारतो. आईचे आणि शर्विलचे बोलणे चालू असताना सरदेशमुख त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून गाडी आणायला सांगतात. गाडीत सर्व बॅग्ज ठेवून ते थेट पुण्याच्या दिशेने निघतात. एक्स्प्रेस हायवे लागण्यापूर्वी पनवेलला ते जेवणासाठी गाडी थांबवतात.

"आई... काय गं, तू मला आज हॉटेलचे जेवण खाऊ घालणार आहेस? दोन वर्ष झाली आता मला तुझ्या हातचे जेवायचं आहे" असे शर्विल म्हणताच...

"अरे थांब जरा... आधी बघ तरी मी तुझ्यासाठी काय आणलंय" असे म्हणत आई सोबत आणलेल्या बॅगमधून डबा बाहेर काढते आणि विचारते "सांग बरं काय असेल यात तुझ्यासाठी?"

"आई.... विषय आहे का? मला ओळखायची गरज पडेल का कधी??? तू माझ्यासाठी गुलाबजाम बनवून आणले असणार अशी पक्की खात्री आहे माझी.... चल आण बघू इकडे लवकर मला कधी तुझ्या हातचे गुलाबजाम खातोय असे झाले आहे." असे म्हणत शर्विल डबा उघडून एक गुलाबजाम तोंडात टाकतो आणि "आहाहा..... आई तुझ्या हातचे गुलाबजाम जगात भारी!" अशी दाद देत खायला सुरुवात करतो.

"तू दोन वर्ष परदेशात राहिलास पण तुझी पुणेरी भाषा काही बदलली नाही बघ"

"बास का! सिडनीमध्ये मला ज्यांनी मार्केटिंगचे धडे दिले त्यांना मी गुरुदक्षिणा म्हणून आपले पुणेरी शब्द शिकवून आलोय... आता तिकडे एकमेकांना सर ऐवजी \"शेठ\" आणि हाय ऐवजी \"काय विशेष\" असे बोलतात.

"धन्य आहे रे बाबा तू आणि तुझा पुणेरी बाणा" आई त्याला नतमस्तक होण्याची नक्कल करते

अश्या गप्पा मारत मारत ते जेवण करून पुन्हा गाडीत बसतात आणि पुण्याच्या प्रवासाला सुरुवात करतात. खंडाळ्याच्या घाटातून गाडी जात असताना शर्विल गाडीबाहेर सर्व निसर्ग पाहत लोणावळा खंडाळा ट्रिप्सच्या जुन्या आठवणीत हरवून जातो. बाहेर पाहता पाहता थंड वाऱ्याची झुळूक लागून गाडीत लागलेले गाणे ऐकत झोपी जातो.

हिंजवडीला येताच वडील शरण्याला फोन करून आम्ही अर्ध्या तासात घरी पोहोचू असे सांगतात. गाडी भांडारकर रोडच्या \"श्री कुंज\" या बंगल्यासमोर येऊन थांबते तशी शरण्या पळत येऊन "भावा... आय मिस यु लॉट" असे म्हणत शर्विलला मिठी मारते. आई लगबगीने गाडीतून खाली उतरत सरिता मावशींनी तयार केलेले ओवाळणीचे ताट घेवून शर्विलला ओवाळून घरात घेते.

शर्विल आठ दहा दिवस आराम आणि सर्व मित्रांना भेटण्यात, फिरण्यात घालवतो. त्यानंतर वडिलांचे ऑफिस जॉईन करतो. आज सकाळीच वडीलांसोबत ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतो.

स्काय ब्ल्यू रंगाचा फॉर्मल एप्पल कट फिटिंग शर्ट, नेव्ही ब्ल्यू नॅरो लेंथ पॅन्ट, ब्राऊन बेल्ट आणि कट शूज, ब्राऊन बेल्ट असलेले घड्याळ, ब्राऊन रे बॅन चा गॉगल... अशी शर्विलची \"ग्रीन वेव्ह नॅशनल मार्केटिंग कंपनी\" ऑफिसमध्ये एन्ट्री होताच सर्व स्टाफ मेंबर त्याचे स्वागत करतात. सर्वांचे आभार मानत तो वडिलांच्या केबीनमध्ये जातो. तिथे वडील एडमीन, रिसर्च, बजेट, एग्झिक्युशन या वेगवेगळ्या सेक्शनच्या मॅनेजर सोबत शर्विलची ओळख करून देतात. सर्व सेक्शनची माहिती घेवून शर्विल सर्वांना त्याचे पहिले उद्दिष्ट सांगतो की,
"प्रथम आजपर्यंत तुम्हा सर्वांनी मेहनत करून आपल्या कंपनीचे नाव आपल्या देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये नेल्याबद्दल सर्वांचे खूप अभिनंदन. मला आपली कंपनी जी आत्ता नॅशनल लेव्हलला अग्रेसर आहे ती आता वर्ल्डवाईड लेव्हलला घेवून जायची आहे. त्यासाठी आपल्या कंपनीच्या कामकाजात बरेच बदल आणि कामात पण वाढ करावी लागणार आहे. आपल्या कंपनीचे नाव आता ग्रीन वेव्ह नॅशनल मार्केटिंग कंपनी ते ग्रीन वेव्ह \"मल्टिनॅशनल\" मार्केटिंग कंपनी असे लवकरच करायचे आहे, त्यासाठी आजपर्यंत केली तशी यापुढेही सर्वांची मोलाची मदत लागणार आहे."
असे बोलून सर्वांचे आभार मानत त्याला दिलेल्या केबीनमध्ये जाऊन बसतो आणि प्रत्यक्षात कामकाजला सुरुवात करतो.

तेवढ्यात ऑफिसबॉय मोठ्या साहेबांनी म्हणजेच शर्विलच्या वडिलांनी मिटिंग हॉलमध्ये अर्जंट बोलावले आहे असा निरोप घेऊन येतो. शर्विल हॉलमध्ये जातो तिथे सर्व मॅनेजमेंट बोर्ड सदस्य उपस्थित असतात. एडमीन हेड मिटिंगचा अजेंडा सांगायला सुरुवात करतात... "मार्केटिंग क्षेत्रात नावाजलेली आणि पॅन एशिया मध्ये शाखा पसरलेली \"प्रिझम कम्युनिकेशन\" ही कंपनी काही कारणाने आपले ४०% शेअर्स विकत आहे. आपल्या कंपनीचे पुढील एक्सपानशनचे उद्दिष्ट आणि कंपनीचे आर्थिक स्थैर्य पाहता आपल्यासाठी ही नामी संधी चालून आलेली आहे. याबाबत चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी ही तात्काळ मिटिंग बोलावलेली आहे."

या मिटिंगमध्ये सर्वानुमते इंटरेस्ट दाखवला जातो आणि दोन दिवसांनी प्रिझम कंपनीसोबत मिटिंग घेण्याचे ठरवले जाते. पहिल्याच दिवशी या अश्या संधीने शर्विल तर फार उत्सुक होतो.

****************************

या मिटिंगमुळे त्याच्या जीवनात काय काय उलाढाली, बदल घडणार असतात पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय)
पुणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//