लव कल्लोळ - १३

Confused Boy For Choosing Girlfriend



लव कल्लोळ - १३

"मे आय कम इन सर..." गार्गी नॉक करते

"येस... गार्गी या ना प्लिज, जेवली नाहीस ना ?"

"नाही, आता जाणारच होते तेवढ्यात तुमचा मेसेज आला."

"मला इकडे एकटा जेवायला जरा बोअर होते कारण घरी आम्ही एकत्रच जेवतो आणि हॉस्टेलला असताना आम्ही सर्व मित्र मेसमध्ये एकत्रच जेवण करायचो, यासाठी कंपनी म्हणून तुम्हाला बोलावले" शर्विल एक्सपलेनेशन देतो

"हो एकटे असले की जेवण जातही नाही" गार्गी त्याच्या हो ला हो म्हणते

"एरवी तनया असते सोबतीला, पण आता तीही इथे नाही, चला तर मग आपण जेऊया..." असे बोलून शर्विल त्याचा टिफिन घेतो

"काय दिलंय केतकी काकूंनी आज डब्याला ?" शर्विल फ्रेंडली होत विचारतो

"मटकी आहे, मला आवडते फार म्हणून केली. आणि हो मीच बनवली आहे, आईने नाही" गार्गी टिफिन उघडून शर्विलकडे सरकवते

"अरे वा... तूच बनवून आणतेस रोज ?"

"हो... मला सवय आहे, कॉलेजला असतानासुद्धा मीच सकाळी टिफीन बनवून नेत असे, बाबांना सुद्धा माझ्या हातचे जेवण आवडते म्हणून मी सकाळी त्यांच्यासाठी बनवतेच नेहमी... तुम्ही घ्या ना सर" शर्विलला भाजी घेण्यासाठी ऑफर करते

"बाबांची लाडकी आहात तर... त्यादिवशी ते खूप कौतुक करत होतेच तुमचे" शर्विल चमच्याने भाजी काढून घेतो

त्या दिवशीचा विषय काढल्याने गार्गी मान खाली घालते, "हो..."

शर्विलला जाणवते की त्याने उगाच त्या दिवशीचा विषय काढला... तो मुद्दाम विषय बदलतो,
"ग्रेट... छान आहे नाहीतर आमची शरण्या बघा, अजिबात काही जमत नाही तिला"

"लहान आहे ओ ती... जमेल की तिलासुद्धा, मी भेटले आहे शरण्याला... काकूंसोबत ती एकदा घरी आली होती."

घरातील सदस्यांचा विषय निघाल्याने ते त्यांच्याबद्दलच गप्पा मारतात. दोघांमध्ये असलेला फॉर्मलपणा थोड्या प्रमाणात निवळतो. जेवण झाल्यानंतर गार्गी निघून जाते. गार्गीचा निरागस स्वभाव शर्विलला फार आवडतो. तिच्यासोबत बोलून त्याला एक प्रकारची आपुलकी जाणवते. गार्गी तिच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर रीना आणि नेहा तिच्या जवळ येतात,

"झाले का डिस्कशन सरांसोबत" रीना मुद्दाम डिस्कशन शब्दावर जोर देत बोलते

"कसे झाले लंच ? काय म्हणाले सर ?" नेहा एकामागे एक प्रश्न विचारू लागते

"तनया मॅम नसल्यामुळे सर एकटेच होते त्यामुळे त्यांनी बोलावले होते. एकटे जेवण जात नसणार ना" गार्गी सांगते

"ओहह... मग तर सरांना छान कंपनी मिळाली आज. लगे रहो..." रीना पुन्हा हसत हसत बोलते

"काहीही बोलू नका तुम्ही... आणि जरा हळू बोला, सरांनी ऐकले तर देतील आपल्याला हकलून" गार्गी

गार्गीचा स्वभाव कोणाला दुखवायचा नसल्याने तिची आज दोन्ही बाजू सांभाळताना धांदल उडालेली असते.
"शर्विलच्या नावाने आज उगीच सर्वांनी चिडवले, पण त्यांना काय माहिती की शर्विल तिचा फॅमिली फ्रेंड असून त्याचे स्थळ देखील सांगून आले होते. हे जर कोणाला समजले तर मग काही आपलं खरं नाही. आज शर्विलच्या बोलण्यातून तनया मॅमचा विषय निघाला, ते रोज एकत्र जेवण करतात म्हणजे तनया मॅम येईपर्यंत तरी शर्विल सर बहुतेक रोज लंचसाठी बोलावतील किंवा बोलावणार सुद्धा नाही. बघू काय होतंय !" असा स्वतःशीच विचार करत बसते.

नवीन सेक्शन चालू होऊन आता पंधरा दिवस झालेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कामाचा फॉलोअप घेण्यासाठी शर्विल दुसऱ्या दिवशी मिटिंग बोलावतो. त्यासाठी आजच तयारी करण्याच्या सूचना गार्गीला फोन करून देतो. त्याप्रमाणे गार्गी तिच्या टिमसह तयारीला लागते. संध्याकाळचे सहा वाजतात पण काम अजून पूर्ण झालेले नसते, टिम त्यांचे काम तयार करून टिम लिडर गार्गीकडे देतात. गार्गीला सर्वांचे काम एकत्रित करून त्याचे प्रेझेंटेशन तयार करायचे असल्याने ती ऑफिसमध्येच थांबते. तिला अजून एक तास तरी लागणार असल्याने इतर सर्व टिम निघून जाते.

पावणे सात वाजता शर्विल त्याचे काम संपवून घरी जायला निघतो तर त्याला गार्गीच्या सेक्शनची लाईट चालू दिसते. तो पियुनला बोलावून विचारतो तर त्याला गार्गी काम करत असल्याचे समजते. लेट थांबून काय काम चालू आहे हे पहायला तो तिच्या सेक्शनकडे जातो.

"गार्गी, आज घरी नाही जायचे का ?" शर्विल

अचानक मागून आवाज आल्याने गार्गी दचकते, "सर..."

"सॉरी सॉरी... मीच आहे, लाईट लागलेली दिसली आणि पियुन म्हणाला की तुम्ही काम करत आहात म्हणून पहायला आलो मी" शर्विल

"सर उद्याच्या मिटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करत आहे." गार्गी जागेवरून उभी राहत उत्तर देते

"मग एकटेच कसे काय थांबळात ? बाकी टिम कुठे आहे ?" शर्विल

"सर सर्वांनी त्यांना दिलेले काम करून माझ्याकडे दिले आहे, त्यामुळे मीच सर्वांना जायला सांगितले. मी प्रेझेंटेशन बनवण्यासाठी थांबले, तसे माझंही काम झालंय... फक्त शेवटचे दोन-तीन स्लाईड राहिलेत.ते झाले की मी निघेल." गार्गी

"ओके... खाली बसा आणि करा पूर्ण, मी थांबतो तुमचे होइपर्यंत" शर्विल शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसतो

"सर तुम्हाला उशीर होईल, मी निघणारच आहे दहा मिनिटांत" गार्गी

"करा तुम्ही काम मी थांबतोय" असे सांगून शर्विल पियुनला दोन कॉफी आणायला सांगतो.

गार्गी मानेनेच हो म्हणून खाली बसते आणि राहिलेले काम करू लागते. पाच मिनिटांनी पियुन कॉफी घेऊन येतो आणि दोघांना देतो.

"थॅंक्यु सर, आता खरंच गरज होती मला कॉफीची"

"मग मागवायचे ना इतका वेळ, आणि एकटे थांबण्यापेक्षा कोणा एकाला सोबतीला थांबवायचे, मदत होते." शर्विल कॉफी घेत बोलतो

"तासाभराचेच काम होते म्हणून एकटीच थांबले, पीपीटी च बाकी होती" गार्गी हातात कॉफीचा मग घेत शर्विलकडे खुर्ची वळवून बोलते

"काम कसे चालू आहे ? काही अडचणी वगैरे येत आहेत का ?"

"नाही सर... अडचण वगैरे नाही पण कॉलेजमध्ये शिकलेली थिअरी आणि आता करत असलेले प्रॅक्टिकल काम यात खूप फरक आहे हे जाणवतंय" गार्गी

"हो हे खरं आहे... हे मलासुद्धा जाणवले, इनफॅक्ट नवीन नवीन तर मला एवढी तफावत पाहून आश्चर्य वाटले होते." शर्विल

"डन... पीपीटी झाली सर पूर्ण. निघुयात आता" गार्गी कॉम्प्युटर बंद करते

"ट्रॅव्हलिंग कशी करता ?" बाहेर येता येता शर्विल विचारतो

"सिटी बस... डेक्कन बस स्टॅण्डवरून बस आहे थेट घरासमोरच." गार्गी

"माझ्यासोबत चला, मी सोडतो घरी आज" शर्विल

"सर आधीच तुम्ही माझ्यासाठी ऑफिसमध्ये थांबले आणि आता पुन्हा घरी सोडायला नका येऊ. मी जाईल ना" गार्गी

"आज उशीर होतोय हे घरी सांगितले होते का ?"

"नाही, पण मी आता बस मध्ये बसले की आईला फोन करून सांगेल"

"एकतर मी उद्याच्या मिटिंगचे दुपारी लेट कळवले हे मला माहीत आहे, त्यामुळेच तुम्हाला उशीर झाला. आता मी सोडायला येतो, कम विथ मी" असे बोलून शर्विल गार्गीला पार्किंगकडे चलण्याचा इशारा करतो

गार्गी त्यापुढे काहीच बोलू शकत नसल्याने ती निमूटपणे त्यामागे चालू लागते. दोघेही शर्विलच्या गाडीत बसतात.


****************************

गार्गी आणि शर्विलमध्ये काय बोलणे होईल ? स्थळ आणि बॉस अश्या दोन्ही भूमिकेत पाहिलेला शर्विल आज तिच्यासोबत कोणत्या भूमिकेत बोलतो ? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

🎭 Series Post

View all