लव कल्लोळ - ११

Confused Boy For Choosing Girlfriend



लव कल्लोळ - ११

मंगळवारी सकाळीच तनया तिच्या आईसोबत मुंबई एअरपोर्टवर जाते. सोबत सुयशदेखील असतो. शर्विल नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला येतो. आज नवीन रिकरुटमेंटसाठी इंटरव्ह्यू असतो त्यामुळे ऑफिसमध्ये उमेदवारांची गर्दी असते. त्यांना पाहून शर्विलला गार्गीची आठवण येते आणि तो उमेदवारांची लिस्ट चेक करतो. त्यात तिचे नाव दुपारच्या स्लॉटमध्ये असते त्यामुळे सकाळी ती आलेली दिसत नाही.

शर्विल केबिनमध्ये जाऊन तनयाला मेसेज करून तिची चौकशी करतो. नंतर कामाला सुरुवात करतो. संध्याकाळी सर्व इंटरव्ह्यू संपून एच आर हेड शर्विलच्या केबिनमध्ये येतो आणि सिलेक्टेड उमेदवारांची लिस्ट दाखवतो. एकूण पाच जणांचे सिलेक्शन झालेले असते, त्यात दोन जण अनुभवी तर तीन जण फ्रेशर्स असतात. लिस्टमध्ये गार्गी गिरीश राजेशिर्के हे नाव पाहून शर्विलला बरे वाटते.

"गार्गी खरंच कलेव्हर दिसते, तिची करिअर करण्याची जिद्द पाहुनच त्या दिवशी चुणूक जाणवली होतीच." शर्विल स्वतःशीच पुटपुटतो

"या सर्वांना अपॉइंटमेंट लेटर द्या आणि उद्याच जॉईन होण्यास सांगा, कारण आपल्या एका टिमचे ऑलरेडी एशियामध्ये काम चालू झालेले आहे. आपल्याला इकडूनसुद्धा सर्व स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल." शर्विल एच आर हेड ला सूचना देतो.

गार्गी इंटरव्ह्यू देऊन घरी पोहोचताच तिच्या मोबाईलवर मेल नोटिफिकेशन दिसते. ती मेल ओपन करून पाहते तर तो मेल ग्रीन वेव्ह कंपनीचा असतो; त्यात तिचे जॉब कन्फर्मेशन मेसेज आणि अपॉईंटमेंट लेटर असते. हे पाहून गार्गी प्रचंड खुश होते.

"आई... आई, किमया कुठे आहात सर्वजण ?" गार्गी आवाज देत हॉलमध्ये येते.

आई आणि किमया तिच्या आवाजाने टेरेसवरून खाली येतात,

"काय गं... काय झालं एवढं आवाज द्यायला, आम्ही टेरेसवर होतो... वाळलेले कपडे आणायला गेलो होतो." गार्गीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आई कुतूहलाने विचारते

"आई... गुड न्यूज आहे, मला जॉब मिळाला... येएएएए..." गार्गी उंच उडी मारते

"अगं हळू हळू... किती गोड बातमी दिलीस, अभिनंदन तुझे... चल देवाला साखर ठेव" आई गार्गीच्या चेहऱ्यावर हात फिरवून माया करते

"काँग्रेज्युलेशन दिद्या... पार्टी पाहिजे मला, पहिला जॉब आहे" किमया हात मिळवत बोलते

"हो देईन तुला पार्टी पण आत्ता नाही... दोन महिन्यांनी" गार्गी किमयाच्या तोंडासमोर दोन बोटं करून बोलते

"हे असं काय ? दोन महिने कशाला लागतात पार्टी द्यायला ? मला आजच पाहिजे" किमया तोंड फुगवल्याचा अविर्भाव आणते

"अरे बाळा... आई बाबांनी आपल्याला शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार केले, तर पहिला मान त्यांचा नाही का!" गार्गी किमयाला समजावते

"किती गं निरागस आहेस तू गार्गी... कायम अशीच रहा; चल देवाला साखर ठेऊयात आता... आणि हो बाबांना फोन करून सांग ते येताना गोडधोड घेऊन येतील." आई गार्गीच्या डोक्यावर हात ठेवून पुढे चालू लागते

"असे असेल तर मग ओके... पण मग मला पार्टीसोबत माझी शॉपिंग पण करायची तू... तरच ऐकेन मी" किमया एक बोट दाखवून गार्गीकडून कबूल करून घेते

दोघी आईच्या मागे देव्हाऱ्याच्या दिशेने जातात. जाता जाता गार्गी तिच्या वडिलांना फोन करून जॉब मिळाल्याची बातमी देते. वडीलांना हे ऐकून फार आनंद होतो. ते येताना मिठाई घेऊन येतात आणि आल्या आल्या गार्गीचे कौतुक करतात.

आई बाबा आणि किमयाला खुश पाहून गार्गीच्या डोळ्यात पाणी येते. तिचा स्वभाव असतोच हळवा. तिने कधी कोणाला उलट बोललेले नसते तर कधी कोणाला दुखावलेले नसते. स्वच्छ आणि निरागस मनाची नाजूक अशी गार्गी संपर्कातील सर्वांच्याच आवडीची व्यक्ती असे. लहानपणापासूनच आई वडिलांच्या आज्ञेत राहिलेली असून त्यांनी घेतलेल्या कष्टाची तिला जाण असते. शिक्षणात हुशार आणि सर्व घरकामात निपुण अशी ती असते. तिच्या वडिलांना व्यवसायात चढउतार आलेले तिने पाहिलेले असतात त्यामुळेच आई वडिलांसाठी काहीतरी छान करण्याची तिची आकांक्षा असते. किमयाची सुद्धा ती फार काळजी घेत असते. घराला हातभार लागावा म्हणून शिक्षण होताच तिने नोकरीसाठी प्रयत्न चालू केलेले असतात. स्वतःच्या हुशारीच्या जोरावर तिने नोकरी मिळवलेली असल्याने तिचा आत्मविश्वास वाढलेला तिच्या चेहऱ्यावर जाणवत असतो.

उद्यापासूनच जॉईन होणार म्हणून गार्गी कपाटातून छान ड्रेस बाहेर काढून इस्त्री करते. पर्सनल सामान आणि टिफीनसाठी एक बॅग तयार करून ठेवते. ऑफिसला जायची सर्व तयारी करून झोपी जाते. सकाळी लवकर उठून तयारी करते. आईला सुद्धा कामात मदत करते आणि नोकरीच्या पहिल्या दिवसासाठी घरातून बाहेर पडते.

***********

ऑफिसमध्ये आल्यानंतर शर्विल नवीन जॉईन झालेल्या एम्प्लॉयींना एकत्र मिटिंग हॉलमध्ये जमायला सांगतो आणि ब्रिफिंग देण्यासाठी जातो. शर्विल हॉलमध्ये गेल्यानंतर एडमीन हेड सर्वांना शर्विलची ओळख करून देतात. सर्वजण शर्विलला उभे राहून आपापली ओळख सांगतात. सर्वात शेवटी गार्गी उभी राहते आणि स्वतःची ओळख सांगू लागते.

स्काय ब्ल्यू रंगाचा त्यावर व्हाईट फुलांची प्रिंट असलेला कॉटन पंजाबी ड्रेस, एक खांद्यावर ओढणी, स्टेटनिंग केलेले मोकळे केस, हिल्स सॅंडल, हलका मेकअप अश्या उभी राहिलेल्या गार्गीकडे शर्विल पाहतो. तिची ओळख सांगून झाल्यानंतर शर्विल तिला हलकेसे स्माईल देतो आणि सर्व नवीन मेंबरला ब्रिफ करु लागतो.

कंपनीचे उद्दिष्ट, कामकाज, चालू असलेला प्रोजेक्ट तसेच नवीन रिकरुटमेंट केल्याचे कारण (स्ट्रॅटेजी सेक्शन) हे सर्व सांगून प्रत्येकाला त्यांना दिलेली जबाबदारी किती महत्वाची आहे हे समजावून सांगतो. प्रत्येकाकडून उत्तम कामाची अपेक्षा करून पुढचा एक आठवडा सर्वांना ट्रेनिंग दिले जाईल असे सांगून हॉलमधून बाहेर जातो. शर्विलसारखा अत्यंत हुशार आणि एकटिव्ह बॉस पाहून सर्व नवीन मेंबर प्रोत्साहित होतात. त्याविषयी चर्चा करतात. गार्गीसुद्धा शर्विलचे हे रूप पाहून इम्प्रेस होते. तिला प्रत्यक्ष काम कधी सुरू होतंय याची उत्सुकता लागते.

शर्विल निरोप देऊन गार्गीला केबिनमध्ये बोलावून घेतो. शर्विलचे आलेले एक स्थळ आणि बॉस अश्या व्यक्तीसमोर कोणत्या पद्धतीने सामोरे जाऊ या दुविधेसह शर्विलच्या केबिनमध्ये जाते.

"मे आय कम इन सर ?" गार्गी डोअर नॉक करते

"कम इन गार्गी... या बसा, फर्स्ट ऑफ ऑल आय काँग्रेज्युलेट यु फॉर सिलेक्टिंग अवर कंपनी" शर्विल खुर्चीकडे हात दाखवत बोलतो

"थँक्स सर... इट्स माय प्लेजेन्ट टू बिइंग अ पार्ट ऑफ हिअर" गार्गी मान खाली घालून हळू आवाजात उत्तर देते

"तुमच्याकडे फार महत्वाच्या आणि जबाबदारीचे सेक्शन आहे, मी स्वतः हे सेक्शन नव्याने तयार केले आहे. आय होप तुम्ही उत्तम काम कराल." शर्विल

"नक्कीच सर... मी नेहमी बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. पण.... पण.. काही चुकले तर सांभाळून घ्या कारण मी अजून नवीनच असून हा माझा पहिलाच जॉब आहे. आय हॅव नो एक्सपेरिअन्स" गार्गी पुन्हा हळू आवाजात बोलते

"गार्गी तुम्ही त्याबाबत काळजी करू नका, तुम्हाला ट्रेर्निंगमध्ये सर्व शिकवले जाईल आणि आम्ही सांभाळून घेऊ. फक्त थोडं मोठ्याने बोलत जावा म्हणजे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल" गार्गीचा ओकवॉर्डनेस पाहून शर्विल मुद्दाम तिला हासावण्याचा प्रयत्न करतो

यावर गार्गी अजूनच लाजल्यासारखे करते. "सर..."

"बाय द वे काकू कश्या आहेत... त्यांना सांगितले आहे का इकडेच जॉब आहे असे ?" शर्विल विषय बदलतो

"आई, मला जॉब लागला म्हणून खूप खुश आहे. पण तिला अजून माहीत नाही की मला ग्रीन वेव्ह कंपनीमध्ये जॉब लागला. तिला जॉबची बातमी कळताच ती एवढी आनंदून गेली की तिने पुढचे काही विचारलेच नाही, मीसुद्धा काल काही सांगितले नाही... तसा बोलण्यासाठी वेळच नाही मिळाला. आज सांगेन तिला घरी गेल्यावर." गार्गी आता नॉर्मल होत बोलते

"हो नक्की सांगा, मीसुद्धा मॉमला सांगेन आज की तुम्ही इकडे सिलेक्ट झाले आहात, तीसुद्धा खुश होईल" शर्विल

"हो, हे समजल्यावर आई काकूंना फोन करेलच तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत बोलेल."

"ग्रेट... देन आता तुम्ही ट्रेनिंग कन्टीन्यू करा, काही लागले तर मी आहेच, निःसंकोचपणे मला विचारा" शर्विल असे बोलून दोघे एकमेकांचे नंबर एक्सचेंज करतात आणि आपल्या कामात बिझी होऊन जातात.


****************************

शर्विलचे आजचे रूप पाहून गार्गीच्या मनात काय विचार आला असेल ? शर्विल गार्गीला कसे ट्रीट करेल ? एक फॅमिली फ्रेंड की एम्प्लॉयी ? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

🎭 Series Post

View all