लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग दोन

त्याने तिला पुन्हा आपल्याकडे ओढले आणि ती तोल जाऊन जवळ असलेल्या बेडवर बसली. तोल जाताना घाबरून तिने त्याच्या खांद्यांना धरले होते.

लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग दोन


Love at Second Sight (Bhutkalaat Dokaavtana) Part Two

कथेचे नाव:- लव्ह ॲट सेकंड साईट
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (डिसेंबर २०२२)
विषय:- भूतकाळात डोकावताना


भाग दोन

घरापासून थोडं दूर, थोडं निसर्गाच्या तर थोडं वेगळ्या वातावरणात आल्यावर अक्षया आणि युवराजला फ्रेश वाटलं नसतं तर नवल. दुपारच्या दरम्यान पोहोचलेले ते दोघे. आधी थोडा वेळ आराम केला आणि मग बाहेर फिरायला जायचं ठरवून तयार होऊ लागले. अक्षया फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली आणि तशीच दाराला टेकून उभी राहिली क्षणभर.

मग लक्षात आलं, हा हनिमून सुईट आहे. संपूर्ण बाथरूमच्या भिंती काचेच्या आहेत.

\"आपण जे वागतोय ते तर युवराजला स्पष्ट दिसतंय अगदी कसलाही आडपडदा न राहता; पण आपल्या मनालाही असंच वाचू शकतो का तो? का असा त्याला प्रश्न पडतो की, माझ्या मनात काहीतरी आहे?\" एक सुस्कारा टाकत आरशासमोर उभी राहिली. चेहऱ्यावर पाण्याचे काही हबके मारले आणि चेहरा तिथल्या एका नॅपकिनने टिपून ती आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहू लागली.

शांत प्रतिबिंब, त्यात कसलीही हालचाल नव्हती कारण त्या आरशात फक्त शरीर दिसत होते. काहीही झालं तरी तिचं मन त्या आरशात प्रतिबिंबित होणार नव्हतेच.

अचानक त्या शांत प्रतिबिंबात तिला काही हालचाल जाणवली.

"निघायचं ना?" युवराजने आत येऊन तिला मागून मिठीत घेतले होते.

"हं.... आलेच मी. तू थांब बाहेर." असं त्याला सांगून तिने नॅपकिन पुन्हा हातात घेऊन उगाचच चेहरा पुसण्याचे नाटक केले.

त्याने तिला आपल्याकडे वळवले. तिच्या कमरेभोवती आपले हात गुंफून तिला आपल्या जवळ ओढले.

"की आज नको जाऊया बाहेर?" तो आपले नाक तिच्या नाकाला टेकवत म्हणाला. तसा तो उंच होता त्यामुळे त्याला असे करायला किंचित झुकायला लागले होते तिच्या चेहऱ्यावर.

त्याच्या ओठांनीही पुढाकार घेतला होताच की….

"राज, तू...." ती त्याच्या स्पर्शात हरवत चालली; पण क्षणभरच. तिने स्वतःला लगेच भानावर आणले, त्याला अंमळ दूर करून तिने आपला चेहरा पुन्हा नॅपकिनने ठीक केला.

"तू बाहेर थांबलास, तर मी लवकर तयार होऊ शकेन." त्याला ढकलत ढकलत तिने बाथरूमबाहेर आणले.

"पण आपल्याला घाई नाहीये."

त्याने तिला पुन्हा आपल्याकडे ओढले आणि ती तोल जाऊन जवळ असलेल्या बेडवर बसली. तोल जाताना घाबरून तिने त्याच्या खांद्यांना धरले होते.

तोसुद्धा तिच्या शेजारी बसला. तिचे डोळे भीतीने अजूनही बंद होते.

"काय झालं? बाहेर जावंसं वाटत नाहीये ना तुलाही?" त्याने तिला विचारलं.

"राज, प्लिज ना. मला तयार होऊ दे ना." तिने डोळे किलकिले उघडले.

"आधी डोळे बंद कर." त्याने खिशातून रुमाल काढत त्याची पट्टी तयार केली.

"राज...." त्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधायला हात पुढे आणले, तसे तिने त्याला थांबवायचा प्रयत्न केला.

"अंहं, जेव्हा मनाचा गोंधळ उडतो ना अक्षु, तेव्हा हे डोळे बंद करायचे असतात आणि मनाचे डोळे उघडायचे असतात. त्याने बरेच प्रश्न सुटतात." त्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तिच्या मागे जाऊन बसला.

त्याचा आजूबाजूचा वावर अचूक ओळखून तिनेही पाठी असलेल्या त्याच्यावर रेलून बसत त्याच्या मानेवर आपलं डोकं किंचित घासलं.

"राज...." आता मात्र तिने स्वतःला त्याला सोपवलं.

"बाहेरचं काहीही दिसत नाहीये. हो ना?" त्याने तिला विचारलं.

"नाही." तिने डोळे बंद केले तसे तिला मनातील कोलाहल अधिकच जाणवायला लागला.

त्यानेही तिला मागून मिठीत घेतले आणि ती आठवणींच्या राज्यात जाऊन पोहोचली.


—-----------


सहा महिन्यांपूर्वी....

"बाबा, मला आज खरोखर वेळ नाहीये कोणाला भेटायला. मला न विचारता कसे हो तुम्ही असे काही ठरवता?"

"अगं, संध्याकाळी भेटायचं आहे. हे बघ, मी त्यांना आधीच कळवलं आहे. तो मुलगा साडेसहा वाजता कॅफे ओशन ब्लुमध्ये तुझी वाट बघणार आहे. माहिती पाठवतो तुला त्याची...."

"नको, मला माहिती नकोय. मी संध्याकाळी जाईन आणि प्रत्यक्ष त्यालाच विचारीन माहिती. तसं पण टेम्प्लेटेड बायोडेटा वाचून मला आयुष्याचा जोडीदार निवडायचा नाहीये." इतकं बोलून तिने फोन ठेवला.


—-----------


संध्याकाळी सव्वा सहा वाजता...

अक्षया कारमधून उतरली. पार्किंगमध्ये कार पार्क करून तिने मोबाईलमधून पत्ता शोधायला सुरुवात केली.

"मी पण ना.... कॅफे सी ब्लु म्हणाले होते बाबा. संध्याकाळी साडेसहा वाजता." तिने आजूबाजूला नजर फिरवली. थोडी शोधाशोध केल्यावर तिने एक चौक पलीकडे असलेल्या कॅफे सी ब्लुमध्ये प्रवेश केला.

थोडी इथे तिथे नजर फिरवल्यावर तिला एक टेबलवर एक मुलगा बसलेला दिसला.

\"बहुतेक हा तोच आहे. कॅफेमध्ये गॉगल लावून कोण बसते?\" तिने मनाशीच म्हटले.

"हाय, मी अक्षया. तुम्ही ते...." इतकं बोलल्यावर तिला हे आठवलं की, तिला मुलाचं नावसुद्धा माहित नाही. तिने जीभ चावली आणि ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली.

"आपण आज भेटणार होतो ना?" इतकं बोलून ती थांबली. पुढे काय बोलायचं हे तिला सुचत नव्हतं.

तिच्या अशा येण्याने आणि समोर बसण्याने तो सुद्धा हडबडला होता. त्याने सर्वात आधी गॉगल काढून ठेवला.

युवराज आपटे - तीन चार महिन्यांपूर्वी एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका मुलीला भेटायला तो आज कॅफे सी ब्लुमध्ये आला होता. तिचा फोटो वा नाव काहीच माहीत नसल्यामुळे समोर आलेल्या मुलीबद्दल तो साशंक होता. त्याने बाजू सावरून घेतली.

"माझं नाव युवराज आपटे. तुम्ही…" त्याच्या या प्रश्नावर तिने आपलं नाव सांगितले.

दोघांमध्ये थोडेफार बोलणे झाले. जुजबी ओळख जसे शिक्षण, छंद, असेच काही प्रश्न अक्षया विचारत होती. खरंतर त्याने डेटिंग ॲपवर बोलताना आपल्या नावाव्यतिरिक्त इतर कसलीही माहिती तिच्यापासून लपवली नव्हती.

तरीही ती हे प्रश्न पुन्हा का विचारतेय हा प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा पडत होता. कदाचित ती सगळं कन्फर्म करायला विचारते आहे असे वाटून त्याने तिच्याशी संभाषण करणे सुरू ठेवले.

दोघेही एकमेकांना संभाषणातून उलगडून पाहत होते. कॉफी झाली, मग परत एक कॉफी मागवण्यात आली. स्नॅक्ससुद्धा मागवण्यात आले.

"ओके, छान वाटलं तुला भेटून. तुझा बायोडेटा पाठव ना मला." म्हणत तिने स्वतःचा फोन बाहेर काढला.

आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटले.

त्याच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून तिला जाणीव झाली, आपण थोडा जास्तच उत्साह दाखवतो आहोत.

\"पण मला हा मुलगा खरोखर छान वाटतेय. याचा अर्थ असा नाही की, मी याच्याशीच लग्न करेन; पण एकदा विचार करायला हरकत नाहीये.\" तिच्या मनात विचार चालू होते.

"सॉरी पण कसला बायोडेटा?" त्याने विचारलं.

"अरे म्हणजे ती माहिती असते ना स्वतःची…. जन्मतारीख, जन्मवेळ, वगैरे… तुझा नंबर दे, मी तुला मेसेज करते. तुझी माहिती पाठव, तुला मी माझी माहिती पाठवते." म्हणत तिने त्याच्याकडून त्याचा नंबर घेतला आणि आपल्या नंबरवरून त्याला "हाय." मेसेज करून ठेवला.

"बायोडेटा आता नाहीये फोनमध्ये. नंतर पाठवतो. पण तू त्याचं काय करणार आहेस?" त्याने साळसूदपणे विचारलं. एका डेटिंग ॲपमधून ओळख झालेल्या मुलीला भेटणे इथपर्यंत ठीक; पण तिने डायरेक्ट असा बायोडेटा मागणे त्याला खटकले होते.

"वाचून बघेन. हे नातं जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, जर आपल्याला पुढे लग्न करायचं असेल तर ही माहिती लागेलच ना." तिने आपला मुद्दा ठेवला.

त्याने एक क्षण तिचं निरीक्षण केलं.

"ठीक आहे. घरी जाऊन पाठवतो." त्याने वेळ मारून नेली.

"ओके मग. आपण निघायचं?" तिनेच विचारलं.

"हो." त्याने बिल पे केलं आणि ते दोघे निघाले.


—-----------


दुसऱ्या दिवशी….

"हॅलो बाबा."

"बोल बेटा, काल वाट पाहिली तुझ्या फोनची…"

"हो, काल उशीर झाला थोडा. बरं, त्या मुलाला भेटून आले. प्रथमदर्शनी मुलगा चांगला वाटतोय. त्याची माहिती त्याच्याकडूनच मागवली होती, ती तुम्हाला पाठवते. संध्याकाळी सविस्तर फोन करते. आता उशीर झालाय ऑफिससाठी."

इतकं म्हणून तिने फोन ठेवला, त्यांना माहिती फॉरवर्ड केली आणि कार चालू करून मेन रोडवर आणली. ऑफिसच्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला.

"ही मुलगी कायमच घाईत असते. वर्षा, अगं, ऐकतेस का? अक्षया भेटून आली त्या मुलाला काल."

असं म्हणत त्यांनी व्हॉट्सॲप उघडलं. आलेली माहिती वाचून मात्र ते चक्रावले.

त्यांनी लगोलग पुन्हा अक्षयाला फोन केला.

"बाबा?"

"बेटा, तू नक्की कोणाची माहिती पाठवली?"

"काल भेटलेल्या मुलाची. का हो बाबा?"

तिने फोन स्पीकरवर ठेवला होता. सध्यातरी तिचं लक्ष समोरच्या रस्त्यावर होतं.

"नावं वेगवेगळी आहेत.... मी तुला जो मुलगा सुचवला होता, तो धैर्य वामन परांजपे आहे आणि तू ज्याला भेटून आली तो युवराज प्रशांत आपटे आहे." बाबा म्हणाले.

"असं कसं शक्य आहे बाबा? तुम्हीच तर म्हणाला होतात ना कॅफे सी ब्लु, संध्याकाळी साडेसहा वाजता." अक्षया आठवत म्हणाली.

"मी कॅफे ओशन ब्लु म्हणालो होतो." बाबांनी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला.

"बाबा, तुम्ही सी ब्लु म्हणाला होतात." अक्षया म्हणाली.

"...."

"बरं, मी आता कार चालवते आहे. संध्याकाळी करते फोन." म्हणत अक्षयाने फोन ठेवला.

भयानक गोंधळली होती ती.

\"म्हणजे आपण वेगळ्याच मुलाला भेटून आलो? तरीच तो इतका गोंधळला होता; पण मग त्याने बायोडेटा का पाठवला? आपल्याला माहीत नव्हतं हे ठीक; पण तो तर सांगूच शकला असता ना? का त्याने बोलणे चालू ठेवले?\" विचार करता करता ती ऑफिसला पोहोचली.

काम सुरू झालं आणि बघता बघता दुपारसुद्धा झाली. बऱ्याच वेळाने तिने मोबाईल हातात घेतला.

युवराजचे दोन मेसेज आलेले होते. लंच करता करता अक्षया त्याच्यासोबत बोलत होती.


—-----------


पुढची चक्र मात्र पटापट फिरली. बाबांसोबत बोलून अक्षयाने आपण युवराजला आधी भेटू आणि पूर्णपणे पटल्यासच पुढे जाऊ असे ठरवले. युवराज आणि अक्षया त्यानंतर ठरवून तीन चार वेळा भेटले. प्रत्येक भेटीत अक्षयाला युवराज आणि युवराजला अक्षया आवडत होते. युवराजच्या बोलण्यातून तिला हे जाणवलं होतं की तो तिथे एक वेगळ्याच मुलीला भेटायला आला होता आणि तो अक्षयाला ती मुलगी समजत होता.


—-----------


जेव्हा अक्षयाने घरी युवराजसोबत लग्न करण्याबाबत सांगितलं, तेव्हा खूप आढेवेढे घेतले अक्षयाच्या आईबाबांनी; पण अक्षया युवराजसोबत लग्न करण्याबाबत ठाम होती.

बाबांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. किमान युवराजला सगळं स्पष्ट सांगायला हवं, असं बाबांचं मत होतं. अक्षयाने मात्र असं काही करण्यास नकार दिला. तिला भीती वाटत होती की, हे सगळं सांगितल्यावर युवराजने नकार दिला तर….

अक्षयाच्या हट्टासमोर तिच्या आईवडिलांनी नमते घेतले. दोघांचे आईवडील भेटले. सर्वांची पसंती झाली. लग्न झाले आणि अक्षया आता अक्षया युवराज आपटे झाली. लग्नानंतर ऑफिस लगेच जॉईन करावे लागण्याने दोघांनीही थोड्या दिवसांनी फिरायला जायचे ठरवले होते. युवराजपासून सत्य लपवल्याची हुरहूर मात्र तिच्या मनात कायम राहिली.


—-----------


भूतकाळात गेलेली अक्षया युवराजच्या हाक मारण्याने भानावर आली. तिने मग मनात येणारे विचार बाजूला सारले. थोड्या वेळाने दोघेही फिरायला बाहेर पडले. शांत असलेल्या अक्षयाचं युवराज निरीक्षण करत होता.

—-----------


धैर्य आणि अधिरा मात्र चेक इन केल्यावर फ्रेश होऊन लगेच फिरायला बाहेर पडले. एक शांत तळ्याच्या काठावर ते दोघे येऊन बसले होते. जितके शांत तळे होते, तितकेच अशांत धैर्यचे मन. अधिरा उठून तळ्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढण्यात मग्न होती.

चालता चालता ती थोड्या दूरवर आली. इथून तिला धैर्य अगदी स्पष्ट दिसत होता. एका उंच दगडावर बसून तिने धैर्यचे काही फोटो काढले. काढलेले फोटो बघता बघता तिने एक फोटो झुम केला. धैर्यच्या चेहऱ्यावर असलेली चिंता तिला दिसली.

\"कसल्या विचारात हरवलेला असतो हा कधी कधी? विचारलं तर सांगतही नाही आणि हसून विषय टाळतो.\" मनात आलेले विचार झटकत ती धैर्यच्या दिशेने निघाली.

"आय लव्ह यु." ती त्याच्याजवळ येऊन कानात कुजबुजली. त्याच्या चेहऱ्यावरचे मळभ जाऊन शीतलता आली. "आय लव्ह यु टू." त्याने म्हटले आणि तिला किंचित जवळ घेतले. दोघेही तसेच एकमेकांच्या मिठीत काही वेळ बसून होते.


—-----------


चार महिन्यांपूर्वी

"धैर्य, घाईत आहेस का?" ऑफिसला जाणाऱ्या धैर्यच्या खोलीत डोकावत त्याची आई म्हणाली.

"हो पण आणि नाही पण." धैर्य ऑफिस बॅग नीट चेक करत म्हणाला.

"काल प्रकाश मामा येऊन गेले. त्यांनी एका मुलीची माहिती दिली आहे. एकदा बघून घेतोस का?" तिने छापील माहिती असलेला कागद टेबलवर ठेवला.

"पुन्हा संशोधन सुरू झालं?" धैर्य किंचित त्रासत म्हणाला.

"बाळा, एकदा साखरपुडा मोडला म्हणून आपण तुझ्या लग्नाचा विचार करायचाच नाही, असं आहे का? भूतकाळ मागे सोडायला हवा आणि पुढे जायला हवं." आई धैर्यला समजवायचा प्रयत्न करत होती.

"आई, तुझं म्हणणं बरोबर आहे; पण आमचा फक्त साखरपुडा नव्हता झालेला. लग्न दहा दिवसांवर आलं होतं. खरेदी, बुकिंग सगळं झालं होतं आणि त्या मुलीने फक्त परदेशातील दुसरं चांगलं स्थळ मिळालं म्हणून काहीही चर्चा न करता हे लग्न मोडले. त्यात माझी आणि तुमच्या सर्वांची काय चूक होती सांग. नाही म्हटलं तरी माणसाला गुंतायला होतंच ना समोरच्या व्यक्तीत?" धैर्य हताश होऊन बोलत होता.

"तुझं पटतंय मला; पण किती काळ थांबून राहशील तू?"

"नंतर फोन करतो आई." म्हणत धैर्य उद्वेगाने निघून गेला.

ऑफिसचं काम आणि इतर घडामोडी यात थोडा मूड नॉर्मल झाल्यावर त्याला त्याच्या वागण्याचे वाईट वाटले. आपण जे उद्वेगाने वागतो ते बरोबर नाही आणि आई आपल्या भल्यासाठीच सांगते आपल्याला हे त्याला पटले.


—-----------


"आई, कुठे भेटायचं आहे तिला?" त्याने दुपारी लंच ब्रेकमध्ये आईला फोन केला.

आपला मुलगा त्या मुलीला भेटायला तयार झाला याचा त्या माऊलीला खूप आनंद झाला. तिने पटकन त्याला कॅफे ओशन ब्लूमध्ये त्या मुलीला साडेसहा वाजता भेटायला सांगितले.


—-----------


संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर धैर्य त्या कॅफेमध्ये गेला. एक टेबलवर एक मुलगी कोणाचीतरी वाट पाहत बसली होती. तीच ती मुलगी आहे, असे वाटून धैर्यने तिच्यासमोर जाऊन आपली ओळख करून दिली.

ती मुलगी थोडी गडबडलेली वाटली धैर्यला; पण कदाचित ती पहिल्यांदाच असे बाहेर मुलाला भेटायला आली असेल असे वाटून तो शांत राहिला. पुढचा अर्धा पाऊण तास ते दोघेही बोलत होते. दोघेही बोलत होते म्हणण्यापेक्षा ती मुलगी म्हणजे अधिरा बोलत होती आणि धैर्य ऐकत होता. दोघांनीही नंबर्स एक्सेंज केले आणि नंतर दोघेही घरी निघाले.

"If you don\"t mind, I can drop you at your place." धैर्य म्हणाला.

तिनेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत. कारमध्येसुद्धा सुद्धा तिची अखंड बडबड चालूच होती.

धैर्यने तिला घरी सोडले आणि तिथून मग आपल्या घरी गेला.


—-----------


फ्रेश होऊन जेवायला आल्यावर त्याने झालेली भेट आणि त्याला पटलेल्या गोष्टी आईला सांगितल्या. सोबतच सकाळसाठी सॉरीसुद्धा म्हटले.

हसतखेळत जेवण पार पडले. धैर्यची आई किचन आवरत होती. अधिराने वॉट्सॲपवर तिने काढलेले काही फोटोज पाठवले होते. ते फोटोज आईला दाखवायला म्हणून त्याने आईला हाक मारली.

"आई, अधिराने फोटोज पाठवले आहेत तिने काढलेले. ये ना तुला दाखवतो." धैर्यची आई जी आत काम करत होती ती लगोलग बाहेर आली.

"कोणी पाठवले फोटो?" तिने विचारले.

"अधिराने." धैर्य आपल्या मोबाईलमध्ये फोटो तिला दाखवत म्हणाला.

"अधिरा कोण आहे?" तिने फोटो बघायला सुरुवात केली.

"आई, असं काय करते? आताच भेटून आलो ना मी तिला?" धैर्य काही न समजून म्हणाला.

"अरे, तिचं नाव अक्षया आहे." फोटोज बघत बघत आई म्हणाली.

"नाही ग. तिनेच तिचं नाव मला सांगितले. हे बघ, मेसेज पण लिहून पाठवलाय." त्याने आपल्या मोबाईलमधला मेसेज तिला दाखवला.

"तुला ज्या मुलीची माहिती सकाळी दाखवलेली ती अक्षया आहे." आई उठून आत जात म्हणाली.

तिने माहिती असलेला कागद आणून धैर्यला दाखवला.

"आई, हे कसं शक्य आहे? एकीचीच दोन दोन नावं?" धैर्यसुद्धा आता चक्रावला होता.

"एक काम कर. तू तिला तिचं पूर्ण नाव विचार." आईने सुवर्णमध्य सुचवला.

"अधिरा प्रवीण गोखले." आलेला मेसेज धैर्यने आईला वाचून दाखवला.

"ही वेगळीच मुलगी आहे धैर्य." आई हातातील माहिती त्याला देत म्हणाली.

"मग आता? आणि तुला प्रकाश मामांचा फोन नाही कसा आला की, त्या मुलीला भेटायला कोणी गेलं नाही तर?" धैर्य आईला विचारत होता.

"उद्या त्या मुलीला फोन करून भेटायला न आल्याबद्दल माफी मागायला हवी आणि उद्या तिला भेटणे शक्य आहे का विचारायला हवे." आई आपल्याच विचारात बोलत होती.

"आई एक मिनिट. अधिराचं काय?" धैर्यने विचारले.

"तिचं काय? उद्या फोन करून तिचीही माफी मागू आपण. तिला जे झालं आहे, ते सर्व सांगू. नक्कीच समजून घेईल ती."

दोघेही झोपायला गेले.

धैर्य अधिराचाच विचार करत होता. तिचं बोलणं, तिच्या वावरण्यातील आत्मविश्वास, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या नजरेसमोरून जात होत्या. अजूनही तो आधीच्या मोडलेल्या लग्नाच्या धक्क्यातून सावरला नव्हता; पण अधिरासोबत घालवलेली ती काही मिनिटे त्याला भूतकाळात डोकावू देत नव्हती.

बऱ्याच उलटसुलट विचारांनंतर आणि मनाशी काही एक ठरवून तो झोपी गेला.


—-----------


दुसऱ्या दिवशी आईने त्याला करायच्या फोनची आठवण करून दिली; पण त्याने मात्र आईकडून थोडा वेळ मागून घेतला. आईनेही समजून घेतले.

त्या पहिल्या भेटीनंतर अधिरा आणि धैर्य पुन्हा भेटले. दोघेही एकमेकांना आवडले होते, त्यामुळे नीट विचार करून त्यांनी घरी सांगितले. घरचे भेटले, लग्नाच्या तारखा निघाल्या.

जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली, तसतसे धैर्यच्या मनात जुनी आठवण जागी झाली. पुन्हा तर तसे होणार नाही ना या विचाराने त्याचा जीव घाबरा घुबरा होई; पण अधिराने आपल्या बोलण्यातून आणि आपल्या अस्तित्वातून त्याला कंव्हिन्स केले. लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकले. मधल्या घटनेमुळे दुखावलेला आणि थोडा शांत झालेला धैर्य आता खुलला होता; पण मनात अधिराशी खोटं बोलल्याची बोच कायम होती. ही बाहेर फिरायला यायची कल्पना सुद्धा अधिराचीच होती.


—-----------


मिठीत असलेल्या अधिराच्या चुळबुळीने भूतकाळात जरासा डोकावलेला धैर्य वर्तमानात परत आला.


क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all