लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग तीन

थोड्या वेळापूर्वी बोल्ड वागणारी अधिरा, आता मात्र लाजळूचं झाड बनून निघाली.
लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग तीन

Love at Second Sight (Bhutkalaat Dokaavtana) Part Three

कथेचे नाव:- लव्ह ॲट सेकंड साईट
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (डिसेंबर २०२२)
विषय:- भूतकाळात डोकावताना


भाग तीन

"..." अधिराच्या कपाळी ओठांनी मोहर उमटवत तो म्हणाला, "भूक लागली आहे का? की माझ्या प्रेमात विसरलीस?"

"तुझ्या मिठीत मी स्वतःला सापडते. हरवत जाते, ती फक्त बाहेरच्या जगाची जाणीव." तिचं असं नजरेला नजर भिडवून मनाचा ठाव घेणारं बोलणं त्याला खूप आवडायचं.

ती नेहमीच त्याला आश्चर्यचकित करायची. गुंतवायची स्वतःत आणि जगाचा विसर पडलेला तो गुंतून जायचाही.

"निघायचं का?" ती उठून आपले कपडे नीट करत म्हणाली.

तसा त्याने उठायला मदत हवी अशा आविर्भावात तिच्यासमोर आपला हात धरला. तीही त्याची ही कृती पाहून मनमोकळं हसली.

"हस नंतर, आधी हात दे." त्याने असं म्हणताच तिच्या इवलुश्या हाताने त्याच्या भारदस्त हाताला आपल्यात सामावून घेतले.

तो त्या आधाराने उठायचं नाटक करत, उभा राहताना तिच्या देहावर कलंडला; तसा तिचा तोलच गेला.

एक हात तिच्या हाती आणि दुसरा तिला सावरताना तिच्या पाठीवर रुळला. तिनेही त्याला कवेत घेतले होतेच की.

"मदहोश करती है तेरे बदन की ये खुशबू,
खुद के होने का अब हमे एहसास कहां।"

त्याचे ओठ तिच्या कानात मंतरले.

"कसूर ये तेरा भी उतना ही है,
इतने प्यार से तूने जो छुआ।"

तिने या जवळीकीचा फायदा घेत त्याच्या गालावर अलगद मोहर उमटवत म्हटले.

तिच्या या गोड धक्क्यातून तो सावरतोय, तोपर्यंत त्याला धक्का देऊन ती त्याच्या सैल पडलेल्या मिठीतुन निसटली.

थोड्या वेळापूर्वी बोल्ड वागणारी अधिरा, आता मात्र लाजळूचं झाड बनून निघाली.

त्याला पाठमोरी झपझप चालणारी तिची पावले. त्याने घातलेल्या सादेला प्रतिसादही न देता अजून वेगाने पुढे पडू लागली.


"वेडी कुठली! एवढी लाज वाटत असताना, इतकं धाडस आणते कुठून?" तो तिला पाहत हसत उभा होता.

"आफ्टर ऑल दॅट्स माय गर्ल! अँड आय लव हर." त्याने टीशर्टला अडकवलेला गॉगल डोळ्याला लावला आणि तिच्या पाउलखुणांना आपलंसं करत निघाला.


—-----------


"काय?"

"......." तो काही न बोलता फक्त तिला पाहत होता.

"असा काय पाहतोय?" आता ती त्याच्यापासून नजर चोरू लागली.

"मी आयुष्यभर तुला असाच पाहत राहायचा विचार करत आहे आणि तू? तू मात्र माझ्याकडे दुर्लक्ष कर." अगदी लहान मुलासारखे गाल फुगवून युवराज म्हणाला.

"हो का? मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतेय का?" आता मात्र अक्षयाने त्याला नजरेत कैद केले.

"…….." तो बोलायला शब्द शोधत होता; पण फितूर सगळे कुठे गायब झाले होते कुणास ठाऊक.

"राज." नेहमीच तर नावाने हाक मारत असली, तरी आज ही हाक त्याला वेगळे संकेत देत होती.

तिची हाक त्याच्या धडधडणाऱ्या हृदयाची कवाडे ठोठावत होती.

"राज, मला चेहऱ्याचं आकर्षण कधीच नव्हतं. हवं होतं एक धडधडतं हृदय." बोलता बोलता तिने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या मिठीत शिरत, भारदस्त छातीवर हात स्थिरावला. "जे मला पाहून असं बुलेट ट्रेन बनून सुसाट पळेल." हाताला जाणवणारी धकधक बंद पापण्यांनी ती अनुभवू लागली.

"एक गंमतच आहे ना अक्षया,

बंद हृदयाच्या आत तू,
तरी बाहेरूनी देशी मजला साद तू,
माझा मी न राहिलो;
पण झालीस माझीच तू."

तो चेहरा तिच्या कानाशी नेत, मादक आवाजात म्हणाला.

मुग्ध ती त्याच्या मिठीत विरघळत होती.

सभोवतालचे भान येताच त्याने तिला सावरत मिठीतुन कवेत घेतले आणि तिला घेऊन हॉटेलच्या दिशेने निघाला.


—-----------


जेवण आटपून धैर्य आणि अधिरा रूममध्ये परतले होते.

"अंगाची खूप चिकचिक झाली आहे. आय नीड अ शॉवर." असं म्हणत धैर्यची पावले बाथरूमच्या दिशेने वळली.

अधिरा त्याला आणि बाथरूमला एकटक पाहत होती. त्या अर्धपारदर्शक काचा तिला आकर्षित करत होत्याही आणि मनातली लज्जा रोखतही होती.

अखेर या द्वंद्वात ओढीने विजय मिळवला. पावलांनी देहाला त्याच्या जवळ आणून कधी उभे केले, तिला कळलेच नाही.

अंगावर फक्त शॉर्टस घालून तो शॉवरखाली भिंतीकडे चेहरा करून उभा होता. त्याची मजबूत शरीरयष्टी, तिची नजर त्याच्यावरच स्थिरावायला भाग पाडत होती.

"दाराला लॉक नाही आहे." ती अडखळत म्हणाली.

"हं?" त्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली.

"ऑफ कोर्स. हा हनिमून सुईट आहे." तो अजूनही तिला पाठमोरा शॉवर खाली उभा राहून थंड पाण्याचा शिडकावा झेलत होता.

"......" त्याचं वाक्य ऐकताच ती पुढे काही बोलली नाही.

"अधिरा?" तिची काहीच हालचाल न जाणवल्याने त्याने कानोसा घेतला.

"ह्मम." तिचा मोहित करणारा आवाज अगदी त्याच्याजवळ आला. पाठीला एक मखमली स्पर्श जाणवला.

अधिरा त्याच्या पाठीला स्पर्श करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.

तिचा तो नाजूक थरथरता हात त्याच्या पाठीवरून फिरत होता.

तो स्पर्श हा धैर्यच्या मनाला, तिच्या मनातली त्याला जाणून घेण्याची ओढ समजावत होता. त्यात एक कुतूहल होते.

त्याला स्पर्श करताना ती कधी शॉवरखाली उभी राहिली, तिचं तिलाच कळलं नाही.

आता मात्र उशीर झाला होता. ती पूर्ण भिजून थरथरत होती. थंड पाण्याच्या शिडकाव्याने तिने जसं गोठायला सुरुवात केली, तशी ती धैर्यला पाठीमागून बिलगली.

तशी त्याच्या संपूर्ण देहातून वीज प्रवाहित झाली. तो तिचा स्पर्श अनुभवत होता. काहीतरी नवीन होत त्या स्पर्शामध्ये. तिचे हात त्याच्या छातीवर फिरत होते. त्याच्या अंगाची ऊब स्वतःत सामावून घ्यायचा यत्न करत होती.

तिची अवस्था लक्षात येताच त्याने हॉट मिक्सरमधून गरम पाण्याचा नॉब फिरवला. पाण्याचा थंडावा कमी झाला असला, तरी भिजलेल्या कपड्यातली ती त्याच अवस्थेत होती. न राहून अखेर धैर्यने तिला मिठीत घेतले. शरीरे एकमेकांत रत झाली.

"…" तिच्या पुढाकारला प्रत्युत्तर देताना त्याने ओठांनी तिच्या शुष्क ओठांवरचे पाणी टिपले. तसा तिच्या हातांनी आपला आवेग वाढवला. ओठांवरील दाब वाढला आणि तिची बोटे त्याच्या ओल्या केसांतून फिरू लागली.

परदेहाची उब, स्वदेह पुलकित करू लागली.


—-----------


श्वासात शॉवर जेलाचा सुगंध, मनात काही क्षणापूर्वीच्या गुलाबी भावना आणि शरीराला अजूनही तृप्त करणारा तो आश्वासक स्पर्श.

अधिराला कळतं नव्हतं, मनात जी भावना निर्माण होत आहे ती नक्की कशामुळे. या उबदार रजाईच्या आत देह पहुडलेला असल्यामुळे? नाही नक्कीच नाही. धैर्यच्या सहवासाचा जो कैफ तिच्या मनावर चढत आहे त्यामुळे.

त्याचं असं तिला आपलंसं करणं, तिला नेहमीच आवडायचं. त्याच्या उत्कटतेआधी तो तिच्या मनाचा कौल नेहमीच लक्षात घेत असे.

"मी इथे तुझ्या इतक्या जवळ असताना तू कोणात गुंतली आहेस?" तिला जवळ ओढत त्याने त्यांच्यातले अंतर नाहीसे केले.

"तुझ्याजवळ असतानाही मी तुझ्यातच गुंतले आहे." तिचं कोड्यात बोलणं न कळून त्याने मिठीत असलेल्या तिला दूर करत तिच्या डोळ्यांत पाहिले. त्याचे मिलनोत्सुक डोळे तिच्या डोळ्यांतील वेगळे भाव दिसताच साशंकले.

"माझं काही चुकलं आहे का? की नकळत तुला आपलंसं करताना मी तुलाच दुखावून गेलो." किती पारदर्शक मन त्याचे! कोणीही चेहऱ्यावरून वाचावे.

"अंहं. तू मला दुखावणे शक्यच नाही." गोंधळलेल्या चेहऱ्यावर प्रेमाची मोहर उमटवत ती म्हणाली.

"तू जेव्हा मला तुझ्या मोडलेल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं; तेव्हाच माझ्या मनाने तुझ्या मनातल्या सगळ्या जखमांचं मलम मला बनायचं ठरवलं होतं. तू लग्नाआधी मला तुझं सगळं आयुष्य उलगडून दाखवलं; पण असं असतानाही का वाटतंय मला की, मी तुला त्या भूतकाळात डोकावण्यापासून रोखण्यास असमर्थ ठरतेय." तिचे शब्द तिला त्याच्या हृदयाच्या जवळ घेऊन गेले.

\"हो. मी नक्कीच प्रयत्न करेन तुला सांगायचा. ती इतकी मोठी गोष्ट आहे की नाही मला माहीत नाही; पण तिच्यामुळे मला तुला गमवायचे नाही.\" तिच्यापासून दूर जावे लागेल, असे मनात येताच त्याने तिला अजूनच ऊराशी कवटाळले.


—-----------


वातावरणात बेधुंद रंग नक्की कशामुळे तयार झाला होता? त्या दोघांच्या हृदयात कैफ जो चढला होता.

खोलीत पसरलेला मंद प्रकाश, सेंटेड कँडल्सच्या मोहक गंधात, म्युझिक प्लेयरवर \"खामोशी\" पिक्चरमधलं गाणं सुरू होतं.


बाहों के दरमियाँ दो प्यार मिल रहे है।
बाहों के दरमियाँ दो प्यार मिल रहे है।
जाने क्या बोले मन, डोले सुनके बदन।
धड़कन बनी ज़ुबां….


युवराजच्या हृदयाला कान लावणं आणि ती टिकटिक कानात साठवणं हा तिचा आवडता छंद ती आज पूर्ण करत होती.

अक्षयाच्या कृतीने त्याच्या ओठांवर मंद स्मित विराजमान झाले.


खुलते बंद होते लबों की ये अनकही


ओठांची थरथर मनातली समोरच्याने पुढाकार घ्यावा, असं वाटणारी इच्छा प्रकट करत होती.


मुझसे कह रही हैं, के बढ़ने दे बेखुदी।
मिल यूँ के दौड़ जाएँ नस नस में बिजलियाँ।


त्याचा पुढाकार तिच्या ओठात मिसळून एक झाला.


आसमां को भी ये हसीं राज है पसंद।


याच मधहोशीमध्ये पुढील ओळी तिच्या हृदयी एक कळ देऊन गेल्या. चेहऱ्यावर अजूनही तोच कैफ असला तरी तिच्या डोळ्यांतली ती सूक्ष्म सल युवराजला रोखून गेली.

तिचे डोळे तिच्यापासून दूर जाऊ देत नव्हते आणि त्याला सीमारेषा ओलांडूही देत नव्हते.

या दुविधेत अडकलेला तो, तिला स्वतःपासून दूर करू शकला नाही.

याच अवस्थेत एकमेकांच्या मिठीत ती रात सरली.


क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all