लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग एक
Love at Second Sight (Bhutkalaat Dokaavtana) Part One
कथेचे नाव:- लव्ह ॲट सेकंड साईट
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (डिसेंबर २०२२)
विषय:- भूतकाळात डोकावताना
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (डिसेंबर २०२२)
विषय:- भूतकाळात डोकावताना
भाग एक
शहरातील दगदगीपासून खूप दूर जायचं हे ठरवतानाही तिचं मन सुखावलं होतं. लग्नानंतर फिरायला जाणे, हे त्यांना शक्यच झाले नव्हते. दोघेही मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होते, पदरात मोठी मोठी सॅलरी पॅकेजेस. नुकतंच मिळालेलं प्रमोशन आणि त्याच वेळी जुळून आलेलं हे लग्न.
"झाली का तयारी?" युवराजने पाठीमागून अक्षयाला मिठीत घेतले. हनुवटी तिच्या खांद्यात रोवत तोही ती काय पाहत आहे ते पाहू लागला. तिने त्याच्या स्पर्शाने डोळे मिटले. नुकताच आंघोळ करून आलेला तो, शरीराचा गंध जरी रोजचाच असला तरी, तिच्या अंगप्रत्यंगात निर्माण होणारा शहाराही रोजचाच होता.
ती त्याच्या दिशेने मिठीतच वळली आणि त्याच्या डोळ्यांत दिसणारं स्वतःचं प्रतिबिंब पाहून तृप्त झाली.
नजरेनेच त्याला व्यवस्थित भरून ठेवलेल्या बॅग्स दाखवल्या.
"एवढे कपडे? आपल्याला खरंच गरज आहे का यांची?" त्याने तिला डोळा मारत मानेला एक झटका दिला. त्याच्या ओल्या केसांतून काही तुषार तिच्या चेहऱ्यावर पडले.
तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत, चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या जवळ आणायला सुरुवात केली. तिच्या नजरेच्या मोहिनीत इतका गुंतला तो की, तिने एका हाताने त्याच्या गळ्यातला टॉवेल काढून कधी त्याच्या डोक्यावर घातला त्याला कळलेच नाही.
"चल, केस पुसून देते." टॉवेलच्या आतही त्याला तिचे हसरे ओठ उमगले आणि त्याने डोळे मिटून मानेनेच संमती दर्शवली.
केस पुसता पुसता त्याने मध्येच तिचे हात धरले आणि ते समोर ओढले. ती बेडवर तर तो तिच्या पायाशी बसला होता. त्याच्या कृतीने आपसूकच तिची हनुवटी त्याच्या डोक्यावर लागली.
"काही असं आहे का गं, जे तुझ्या मनात सलतंय?" त्याने पापण्या मिटून घेतल्या.
प्रश्न विचारला होता खरा; पण उत्तराची भीती वाटत होती.
तिचं शांत राहणं त्याला अजूनच घाबरवून गेलं.
"झालेत केस पुसून. चल, तयार हो. नाहीतर आपल्याला उशीर होईल." ती अशी बोलली की, जणू तिने त्याचा प्रश्न ऐकलाच नव्हता. ऐकलाच नव्हता की तिला त्याच उत्तर द्यायचं नव्हतं?
तो उठून तयारी करू लागला. उत्तराचा हट्ट त्यानेही धरला नाही. तिचं उत्तर आपण ऐकू शकू, याची शाश्वती त्यालाही कुठे होती.
तयारी करताना मध्ये मध्ये एक नजर तिच्या दिशेने जात होती. तशी दोघांची नजरानजर होऊन ती गोड हसत होती.
आपण प्रश्न मनातच विचारला का? असं त्यालाच वाटून गेलं.
—-----------
एवढा काही लांबचा प्रवास नव्हता. तरीही अधिरा त्याच्या हाताला डोकं टेकवून झोपली होती. झोपली होती की, डोळे मिटून बसली होती तिचं तिलाच माहित.
एवढीशी ती त्याच्या उंच खांद्यावर डोकं टेकवायची धडपड करून दमली आणि थकून हाताला डोकं टेकून राहिली.
तो मात्र अचल पर्वतासारखा, शांत बसला होता. पापण्या पांघरून डोळे आराम करत असले तरी हृदय मात्र तिच्या स्पर्शाने धडधडत होते.
अखेर ते हॉटेलवर पोहोचले.
हेल्पर बॅग्स गाडीतून काढत होता. तो टॅक्सीच्या डिकीमधून सगळं सामान काढलंय याची खात्री करून त्या टॅक्सी ड्रायव्हरला पैसे द्यायला गेला.
"इट्स सो ब्युटिफुल! एक फोटो तो बनता है।" तिने लगेच आपल्या पाठीवरची बॅग काढली आणि त्यातून एक प्रोफेशनल कॅमेरा बाहेर काढला.
लेन्स ऍडजस्ट करत करत ती फोटोज् भराभर क्लिक करू लागली. थोड्या वेळात तिची नजर एका फ्रेमवर येऊन स्थिरावली.
त्याची प्रत्येक मुव्ह फोटोजेनिक होती. कोणी इतकं कसं परफेक्ट असू शकतं? तिने स्वतःलाच विचारलं.
त्याचं निर्मळ मन, त्याच्या प्रत्येक हावभावातून डोकावत होते. त्याने हातांना आणि मानेला स्ट्रेच करून प्रवासाची मरगळ झटकून टाकली. त्यातच त्याची नजर तिच्यावर गेली.
तिला बघताच मिश्कीलपणे एक डोळा मिटून पुन्हा उघडला गेला. अगदी कॅमेऱ्याच्या क्लिकचा आभास झाला तिला. तीही गोड हसत त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद करत होती.
"सगळे इथेच काढायचे की, रूम घेऊ या? प्रवासाचा थकवा फोटो काढून जाणार नाहीये." धैर्य एक हात तिच्या गळ्यात टाकून तिला हॉटेलच्या आत नेऊ लागला. पाठीमागून हेल्परला खूण करून बॅगा आणायला सुचवले त्याने.
अधिरा त्याला नुकत्याच काढलेल्या पिक्समधल्या कँडिड त्याला दाखवत होती. तो मस्त ते पाहत हॉटेल लॉबीमध्ये शिरला.
हॉटेलचे प्रशस्त आवार बघताच अधिराचे हात शिवशिवू लागले. तिने लगेच लेन्स डोळ्याला लावून ऍडजस्ट केली आणि पुन्हा क्लिकस् पडू लागले.
—-----------
"वेलकम सर, वेलकम मॅम." रिसेप्शनिस्टने हसून स्वागत करताच ते दोघेही हसले.
"हाऊ कॅन आय हेल्प यू?"
त्याने त्याची रूमची डिमांड सांगितली. तशी रिसेप्शनिस्टने त्याच्याकडे त्याचे बुकिंग डिटेल्स मागितले.
त्याने मोबाईलमधले डिटेल्स तिला दाखवले. तिने कॉम्प्युटरमधून त्याच्या डिटेल्सची एक प्रिंट काढत त्यावर त्याला सही करायला सांगितली. तेवढ्यात तिनेही आपला मोबाईल रिसेप्शनिस्टसमोर धरला.
"मॅम, फक्त सरांनी साइन केले तरी चालेल." रिसेप्शनिस्टच्या अशा बोलण्यावर दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि क्षणभर बघतच राहिले.
"तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही एकत्र नाही आहोत." अक्षया शांतपणे म्हणाली.
तेवढ्यात तिथे युवराज आला आणि बिनधास्तपणे धैर्यच्या शेजारी उभ्या असलेल्या अक्षयाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "काही प्रोब्लेम आहे का?"
"नाही रे. त्याचं मिसअंडरस्टँडींग झालं होतं." अक्षया म्हणाली. रिस्पेशनिस्टने दिलेले प्रिंट्स हातात घेऊन तिनेही त्यावर आवश्यक तिथे सही केली. तोपर्यंत धैर्यच्या शेजारी अधिरा येऊन उभी राहिली होती.
त्या दोन्ही जोडप्यांना बघून रिसेप्शनिस्ट पुन्हा एकदा गोड हसली आणि त्यांच्या रुमच्या चाव्या त्यांना दिल्या.
तशी ती दोन्ही जोडपी विरुद्ध दिशेला त्यांच्यासोबत असणाऱ्या हेल्पर्ससोबत निघून गेली.
क्रमशः
- © मयूरपंखी लेखणी
fb.me/mayurpankhilekhani
mayurpankhlekhani@gmail.com
Disclaimer:
ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा