लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग पाच अंतिम

त्याने पायातले शूज काढून ठेवले आणि पाण्यात पाय सोडून बसला, तशी तीही काही न बोलता त्याच्या बाजूला बसली आणि त्याच्या हाताला मिठीत घेतले.

लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग पाच अंतिम


Love at Second Sight (Bhutkalaat Dokaavtana) Part Five

कथेचे नाव:- लव्ह ॲट सेकंड साईट
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (डिसेंबर २०२२)
विषय:- भूतकाळात डोकावताना


भाग पाच अंतिम

जे ठरवलं, ते वाटतं तितकं सोपं नव्हतं आणि या सगळ्यातून बाहेर तर पडायचं होतं. मनाला पोखरणाऱ्या भूतकाळातील घटनेबरोबर किती दिवस ते दोघे राहणार होते.

रात्रीच्या उदरात मनातील घालमेल सोडून उद्याच आपण आपलं मन मोकळं करायचं असं त्या दोघांनीही ठरवलं.

सूर्योदय होण्याची प्रतीक्षाही होती आणि काय घडेल याची अनामिक हुरहूरही.


—-----------


रूममध्ये पसरलेल्या प्रकाशाने अधिराने डोळे किलकिले केले.

लक्ष खिडकीतून डोकावणाऱ्या प्रकाश किरणांकडे गेले.

डोळ्यांवरची झोप तशीच सांभाळत ती पडदा लावण्यासाठी उठली.

जशी खिडकीजवळ गेली तसा बाल्कनीत उभा असलेला धैर्य तिला दिसला.

\"अरे हा आपल्या बाजूला नव्हता का?\" तिने पुन्हा एकदा पाठीमागे रिकाम्या बेडकडे वळून पाहिले.

त्याची ती शांत छबी आणि सकाळची गुलाबी थंडी. अधिराने त्याला पाठीमागून मिठी मारत त्याच्या पाठीवर डोके टेकवले.

नुकतीच आंघोळ करून उभा होता तो. त्याचा गंध श्वासात भरून घेत तिने एक दीर्घ श्वास घेतला.

"उठलीस?"

"हो." तिचे डोळे अजूनही बंदच होते.

त्याला हे कळायला वेळ लागला नाही.

"तू का एवढ्या सकाळी तयार झाला आहेस?"

"तूही तयार हो. आपण बाहेर जायचं आहे."

त्याने वळुन तिला मिठीत घेत तिच्या कपाळी ओठांनी मोहर उमटवली.

ती तयार व्हायला निघून गेली.

\"अखेर धैर्य त्याचं मन माझ्याकडे मोकळं करायचा विचार करत आहे तर. त्याचा स्वभाव लपवाछपवीचा नाहीच मुळी. स्वतः ला ही त्रास होत असेल.\"

विचार करत असतानाच ते तळ्याकाठी पोहचले.

अधिराने आज धैर्यचं अनुकरण करायचं ठरवलं होतं.

त्याने पायातले शूज काढून ठेवले आणि पाण्यात पाय सोडून बसला, तशी तीही काही न बोलता त्याच्या बाजूला बसली आणि त्याच्या हाताला मिठीत घेतले.

काही वेळ असाच गेला. त्याने मनाची खूप तयारी आधीच केली होती. आता फक्त सुरुवात करायची होती.

"अधिरा, मी आता तुला जे सांगणार आहे. ते तू सगळं आधी शांतपणे ऐकून घे आणि माझं सांगून संपल्यानंतरच तू तुझा रिप्लाय दे." असं म्हणून त्याने तिला त्यांची पहिली भेट, त्यात झालेला गैरसमज, त्याला लग्नासाठी आलेली मुलगी ती नाही आहे हे कळूनसुद्धा गप्प राहिलेला तो. अश्या सर्व घटना क्रमाने सांगितल्या.

"हे सगळं असं घडलं आहे. मला माझ्या चुकीची जाण आहे. तू वाटेल ती शिक्षा मला देऊ शकतेस." तो बोलला खरा; पण शिक्षेच्या विचाराने पुरता घाबरला होता.

"पण मला सोडून जाऊ नकोस."

तो सगळं इतकं भरभर आणि मनापासून बोलत होता की, त्याला अधिराने त्याचा हात कधी सोडला, हे त्याच्या लक्षात आले नाही.

ती काही न बोलता उठली आणि हॉटेलच्या दिशेने निघाली.


—-----------


अक्षया बराच वेळ बाथरूममध्ये होती. ती बाहेर का येत नाही आहे, हे बघण्यासाठी युवराज बाथरूममध्ये डोकावला.

अक्षया आरशात आपलं प्रतिबिंब पाहत उभी होती. नुकताच चेहऱ्यावर पाण्याचा एक हबका मारला होता. पाणी निथळून मानेपर्यंत पोहोचलं होतं.

"अक्षू, चल बाहेर जाऊ." युवराजच्या मिठीने ती वास्तवात आली.

"राज, मला तुला काही तरी सांगायचं आहे."

"हो. मला त्याचा अंदाज आला आहे. आपण बाहेर जाऊ या. त्या वातावरणत तुला बरं वाटेल आणि बोलणंही होईल." तिचा हात धरून तो निघाला.

हॉटेलच्या लॉनमध्ये हिरवळीत अनवाणी पायांनी ते दोघे फिरत होते.

अक्षया बोलायचं आहे म्हणाली होती खरं; पण बोलत मात्र नव्हती. त्याच्या हातावरची तिची पकड अजून अजून घट्ट होत चालली होती.

"युवराज." आज बऱ्याच काळानंतर तिने त्याचं पूर्ण नाव घेतलं होतं.

तो काही बोलणार एवढ्यात त्याच्या ओठांवर हात ठेवत तिने त्याला सगळं सांगायला सुरुवात केली.

त्याच्या डोळ्यांत डोळे घालून सांगणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

त्याची प्रतिमा पाणीदार दिसू लागली. आसवांची हजेरी तिच्या मनाला मोकळं करत होती.

तो मात्र शांत होता.

"झालं का सगळं सांगून की अजून काही शिल्लक आहे?" त्याने असं विचारताच तिला मात्र राहवलं नाही.

"मी मुद्दाम नाही रे केलं." ती काकुळतीला आली.

"अक्षया, आपण बाहेर आहोत. रूमवर जाऊ या." आता मात्र तिचा हात न धरता तो पुढे निघाला आणि ती त्याच्या मागून.


—-----------


रूम मध्ये पोहोचलेली अधिरा बेडवर शांत बसली होती. धैर्यही तिच्या पाठोपाठ आला होता. तिला असं शांत बसलेलं त्याच्याने बघवत नव्हते; पण करणार काय? तिला वेळ देणंही गरजेचं होतं.

ही भयाण शांतता त्याचा जीव जाळत होती. अखेर न राहवून तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला.

तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत त्याने त्यावर डोकं टेकवले.

पुन्हा एकदा तो तिची माफी मागणार होता, तेवढ्यात….

"आय एम सॉरी."

"…..?" त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.

"तू का?" गोंधळलेला धैर्य पुढे काही बोलणार त्या आधीच अधिराने त्याच्या तोंडावर हात ठेवला.

"मलाही तुला पाहून लव्ह ॲट सेकंड साईट झालं होतं." ती मान खाली घालून म्हणाली.

"हां?" त्याला काहीच संदर्भ लागत नव्हता.

"मी सांगते. मला तुझी बाजू माहित नव्हती; पण हे हळूहळू कळायला लागलं होतं. ज्याला मी भेटायला गेले होते तो मुलगा तू नाहीस. तरी तुला भेटण्यापासून, तुझ्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला रोखू नाही शकले." तिचं बोलणं ऐकत असताना त्याच्या चेहऱ्याचे भाव झरझर बदलत होते.

"एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह विचारांची मी. आता जेव्हा तू तुझं मन मोकळं केलं, तेव्हा स्वतःच्याच विचारांना बाजूला सारून गिल्टी फिल करू लागले." तिची मान अजूनही खालीच होती.

"भूतकाळात कधीही न डोकावणारी मी. आज तुझ्या प्रेमाने पुरती बदलून गेले." त्याच्या नजरेला नजर मिळवत तिने विचारले.

"मला माफ करशील ना?"

दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत पाहून आता मात्र हसू लागले होते.

"आय लव्ह यू." धैर्यने तिला घट्ट मिठी मारली.

"आय लव्ह यू टू."


—-----------


रूममध्ये झरझर जाणाऱ्या युवराजच्या पावलांशी पावले मिळवणं तिला कठीण झालं होतं.

तो मात्र कधी एकदा खोलीत पोहोचतोय असा चालत निघाला होता.

रूमचा दरवाजा ढकलून तो एकदाचा आत आला.

"राज, अरे मी मुद्दाम…." पुढचे शब्द तिच्या ओठातच राहिले.

तो तिला आवेगाने बिलगला. ती मात्र काही न कळून अधांतरी तशीच उभी होती.

"अक्षु, एवढंसं बोलायला तू किती वेळ लावलास, जे मला आधीच कळलं होतं. आपली भेट जरी चुकून झाली असली आणि मी जिला भेटायला गेलो होतो ती तू नसलीस, तरीही मी जिच्या प्रेमात पडलो, ती मात्र तूच आहेस." त्याने मिठी सैल करत तिला घेऊन बेडवर बसला.

"प्रेम हे प्रेम असतं, काहींना फर्स्ट साईटमध्ये होतं आणि आपल्या सारख्यांना सेकंड साईटमध्ये." तिच्या हातांना प्रेमाने कुरवाळत बोलला.

"दुष्ट आहेस तू! माहित होतं तर आधी का नाही बोललास?" तिने त्याच्या छातीवर हलकेच गुद्दा मारला.

"अरे, पण मला कसं कळणार ना? तुझ्या भूतकाळातली कोणती गोष्ट सलते आहे. मी माझ्या भूतकाळात डोकावू शकतो, तुझ्या नाही." त्याने हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवले.

"यापुढे बिनधास्त मन मोकळं बोलत जा मॅडम." खट्याळ नजरेने तो तिच्याकडे पाहू लागला.


—-----------


हनिमून एन्जॉय करून दोन्ही कपल चेक आउट करायला रिसेप्शनजवळ आले. चौघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता.

अधिरा आणि तिचा कॅमेरा पुन्हा अँक्शनमध्ये आले होते आणि फ्लॅशनी क्षण कॅमेऱ्यात कैद होत होते.

"प्रोफेशनल कॅमेरा? कोणतं मॉडेल आहे?" मागून आलेल्या आवाजाने अधिरा पाठीमागे वळली.

युवराज तिच्या कॅमेराबद्दल विचारत होता आणि ती त्याला माहिती देत होती.

तिच्या कॅमेऱ्यातले धैर्यचे फोटो बघत युवराज म्हणाला,

"वाऊ! डॅशिंग पर्सनलिटी!"

"बीकॉज ही इज माइन." असं म्हणत तिने रिसेप्शनजवळ फॉर्मलिटी पूर्ण करणाऱ्या धैर्यला बघून स्माईल केलं.

युवराजही तिथे उभ्या असणाऱ्या अक्षयाला बघून हसत होता.

"आणि शी इज माइन."


संपन्न


- © मयूरपंखी लेखणी

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all