Login

प्रेम... पहिल्या नजरेत...

Love At First Site
©®विवेक चंद्रकांत....... मित्राच्या भावाच्या लग्नाला गेलो होतो. संकेत आणि मी एकाच कॉलेज मध्ये चार वर्षे रूमपार्टनर. त्यामुळे घट्ट संबंध. आता दोघेही नोकरीमुळे वेगवेगळ्या गावी. तरीपण त्याच्या आग्रहामुळे गेलो लग्नाला.

लग्न एका छोटया तालुकाच्या गावी. गाव छोटे असले तर व्यवस्था उत्तम होती. तर मुख्य मुद्द्यावर येतो. तिथे एक निळा ड्रेस घातलेली चटपटीत मुलगी होती. भराभर काम करत होती. नवरीच्या सोबत राहत होती.नवरीची जवळची नातेवाईक असावी.बहुतेक सगळे तरुण तिच्या सौंदर्याने, उत्साहाने, दिलखुलास हास्याने घायाळ झाले. त्यात अर्थात संकेतही होता. लग्न लागल्या लागल्या संकेत मला बाजूला घेऊन म्हणाला

"यार त्या निळ्या ड्रेसवालीचा काही ट्रेस लागतं नाही. नवरीकडची असल्याने एकदम विचारणेही बरोबर नाही. तु तिचे नाव गाव विचारशील? आमच्याच जातीची आहे... पुढे जाता येईल."

मी तसा बिनधास्त होतो. त्यातही संकेतची जात आणि माझी जात भिन्न असल्याने तिला विचारायला हरकत नव्हती. थोडया निरीक्षणाने कळले की तिच्यासोबत फक्त आई होती. ते तर फारच बरे. एखादा मुच्छड बाप असता तर हिम्मत झाली नसती. माझा आणखी एक plus point म्हणजे म्हणजे माझा चेहरा एकदम सभ्य आणि निरागस आहे त्यामुळे कोणी मला निदान चेहऱ्यावरून तरी वाईट म्हणत नाहीत.

लग्न झाले तसे सगळे जेवणाला गेले. ती निळ्या ड्रेसवाली तिच्या आईसोबत एका कोपऱ्यात बॅगेतून काही काढत होत्या बहुदा गिफ्ट असावे. त्यांच्या सोबत कोणी नसल्याने मी ही संधी साधायची ठरवली.

"नमस्कार " मी तिच्या आईला म्हणालो.

" नमस्कार " तिची आई काहींश्या आश्चर्याने म्हणाली.

"काही नाही. तुमच्या मुलीबद्दल माहिती विचारायला आलो. तिच्या लग्नाचे बघत असतील ना या वर्षी."

मुलीचे लग्न हा मुलीच्या आईचा वीक पॉईंट असतो.
"हो, हो, ह्यावर्षी सुरुवात करणारच आहे बघायला. कोणाला हवी माहिती?"

इथे मी थोडं गडबडलो. संकेतचे नाव कसे सांगणार "ते काका आहेत तिथे त्यांनी विचारले. काय नाव मुलीचे,?"

"नीलम रामचंद्र.***"

"आणि शिक्षण?"

" ग्रॅज्युएट झाली. आता msw करतेय. म्हणजे झालेच आहे पण निकाल बाकी आहे. "

"आणि गाव कुठले?"

"पाचोरा. पण आता जळगावला राहतो. नीलमच्या वडिलांची बदली तिथे झाली. मुलीच्या आईची मी मामेबहीण, पण अगदी सख्या बहिणीसारखे संबंध आहेत."

इतक्या वेळ शांतपणे आमचे बोलणे ऐकत असलेली नीलमची रोखलेली नजर मला अस्वस्थ करत होती.

"चालेल काकू, मी निघतो." मला नीलमच्या नजरेपासून दूर पळायचे होते.
"थांबा." पहिल्यांदाच नीलम बोलली.

"कोणत्या काकाने पाठवले तुम्हांला? "

"ते तिथे आहेत ना.. मंडपाजवळ." मी कसेतरी म्हणालो.

"आणि ते स्वतः का नाही आले तपास करायला?" तिचा आवाज शांत पण ठाम होता.

", ते तिकडे आहेर द्यायचं घ्यायचे बघत आहेत." मी तिच्याकडे बघत थातुरमातुर उत्तर दिले.खूप छान होती दिसायला..इतक्या जवळून प्रथमच बघत होतो.

मी जायला निघणार तेवढ्यात ती म्हणाली

"तुमचे नाव काय?"

"अजय मनोहर **"

"काय करतात?

" मी B. ed झालो. नुकताच शाळेत ला लागलोय मलकापूरला."

"अच्छा.. आणि तुम्ही नवरदेवाचे कोण?"

आता काही लपवणे शक्य नव्हते.

"मुलाचा लहान भाऊ आहे संकेत. त्याचा मी जवळचा मित्र. तो आणि मी सोबत B.ed केले."

" त्या निळ्या ड्रेसवालीची माहिती काढ असेच म्हणत होता ना तुमचा मित्र "

अरे? हिला कसे कळाले? माझी तर बोलतीच बंद झाली.

ती हसली अगदी सगळे समजल्यासारखी.

"", तुम्ही आमच्या जातींचे नाही म्हणून तुम्हांला माहित नाही. पण तुमच्या मित्राला सांगा. आपल्या जातीत आडनाव एकच असले तर लग्न होतं नाही."

मी मान हलवली आणि निघालो.आता बोलण्यासारखे काही राहिलेच नव्हते.

" तुम्ही आता मलकापूरला असतात का?"

"सध्या रजा घेतली आहे चार पाच दिवस अंमळनेरला आहे."

आता माझ्याशी बोलण्याचे प्रयोजन काय?

"अंमळनेर ना? Ok.

त्यात ok काय?मला तर काहीच समजेना. मी निघालो.

संकेतला बाकीच्या गोष्टी न सांगता फक्त तिचे नाव व माहिती सांगितली. तो लगेचच म्हणाला " एक आडनाव चालत नाही यार आमच्यात. जाने दो. लक नाही आपल्यासोबत. "
*****

महिनाही झाला नसेल. शनिवार होता. सकाळी सकाळी फोन वाजला. अनोळखी नंबर...

"हॅलो अजय का?" समोरून मुलीचा आवाज.

"हो. कोण बोलतंय?"

" मी नीलम. "

", कोण नीलम?"

"तिचं... निळ्या ड्रेसवाली." ती हसत म्हणाली.

"अरे नीलम तू? सॉरी, सॉरी, तुम्ही? काय काम काढले?"

"चालेल, एकेरी हाक मारली तरी.मीही एकेरीच बोलणार.तू आता अंमळनेरला आहे का मलकापूर?"

"अंमळनेर. आज उद्या सुट्टी आहे."

", मी अंमळनेरला आलीय. मी msw इथेच केले. Result घ्यायला आलीय. "

"छान. " मला अजून शब्द सुचत नव्हते.

"मी पास झालीय. म्हणजे ऑनलाईन तर दोन दिवसापूर्वी च कळाले. आज मार्कशीट घ्यायला आलीय."

"अभिनंदन"

"Thanks! ते जाऊ दे. आपण भेटूया."

"चालेल ना. ये घरी."

"घरी नको. कुठल्यातरी हॉटेलला भेटू. तुझ्याकडून जेवण, मी पास झाल्याबद्दल."

"पास तू झाली आणि जेवण माझ्याकडून?"

"हो. तुझ्याकडूनच, काही स्त्री दाक्षीण्य वगैरे आहे का नाही तुला?आणि चांगले हॉटेल बघ. जिथे व्यवस्थित बोलता येईल."

"बघतो. पण एवढे काय बोलायचे आहे?"

" अरे बुद्दू.. एखादी मुलगी तुझ्याबरोबर चांगल्या हॉटेलामध्ये जेवायला येते आहे आणि तुझ्याशी बोलू पाहते आहे याचा अर्थ काय? "

"काय? " मी समजून न समजल्यासारखे केले.

तिने फोन कट केला.
****

त्या नवीन हॉटेलच्या फॅमिली रूममध्ये आम्ही दोघे बसले होतो. जेवणाचा आस्वाद घेतांना मी बोललो.

"हे एकदम कसे काय? पहिल्या नजरेत प्रेम वगैरे."

", मिस्टर अजय, थोडे इकडेतीकडेही बघत जा. तू राहतो st स्टॅंडच्या मागे.. त्याच्याच पुढच्या बाजूला आम्ही चार मैत्रिणी रूम करून राहत होतो. तूझ्या घरावरून जायचो. बरेचदा दिसायचा तू. तू मुलींकडे बघत नाही हे बघूनच मी तुझ्याकडे खेचली गेली. पण तुला विचारणार कसे?
पण नशीब बघ... तूच विचारायला आला. "

" पण मी अजून हो कुठे म्हणालो? घरून अंतरजातीय विवाहाला हो म्हणायला हवे, शिवाय तू नॉनव्हेज खात असशील तर कायमचे सोडावे लागेल.

"सगळे सोडेल पण आता तुला सोडत नाही सात जन्म. "

"अग पण एवढ्या फास्ट ..." पुढे मला बोलताच आले नाही कारण नीलमने मला प्रेमाने गुलाबजाम भरवला.

©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.